Tuesday, June 22, 2010

मध्येच एक लोकसत्तेने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मी भाग घेतला होता. त्या स्पर्धेसाठी पाठविलेला हा लेख. निकाल अजून बहुदा लागला नसावा असा माझा समज आहे.

‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’


कौंटुंबिक नाती हा जगाच्या पाठीवरील कोणत्याही संस्कृतीतील कुटुंबसंस्थेचा मुलभूत पाया आहे. ह्या नात्यांची मूळ व्याख्या कशी ठरवली, काळानुसार त्यात कसे बदल झाले यानुसार प्रत्येक संस्कृतीतील कुटुंबसंस्थेचे यशापयश ठरविले गेले.

भारतीय संस्कृतीतील नाती - आई-वडील, मुलगा-मुलगी, भाऊ-बहिण, सासू-सासरे, काका-काकी या प्रत्येक नात्यात आपण काळानुसार बदल होताना पाहत आहोत. साधारणतः ५०-६० वर्षापूर्वीची स्थिती बघूया. त्यावेळी प्रत्येक कुटुंब हे त्या कुटुंबातील प्रत्येक नात्याची आदर्श व्याख्या ठरवीत असे. सासू सासरे यांच्याशी कसे वागावे याचे मुलभूत नियम ठरविलेले असत. एका विशिष्ट कुटुंबातील सासू सासरे आणि सुन यांना या नियमामध्ये बदल करण्याची फारशी संधी नसे. वरिष्ठ नात्यावर असलेल्या व्यक्तीच्या (या उदाहरणात सासू सासर्यांच्या) वागण्याचे विश्लेषण करण्याचा आणि ते मुक्तपणे प्रकट करण्याचा अधिकार कनिष्ठ व्यक्तीस नसे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा काही प्रमाणात लोप होत असे.
एकत्र कुटुंब संस्थेवर परिणाम करणारे घटक म्हणजे आर्थिक स्थिती, एकमेकाविषयीचे प्रेम / आपुलकी आणि कर्तव्यभावना. एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी टिकली ती त्या काळाच्या आर्थिक स्थितीमुळे. बरेच जण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसल्यामुळे एकत्र कुटुंबात राहणे हे गरजेचे बनले. काही काळानंतर आर्थिक स्थितीत झपाट्याने बदल घडून येवू लागले. तरुण वयातच बरेच जण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होऊ लागले. तो आत्मविश्वास कौटुंबिक नात्यात प्रकट होऊ लागला. वरिष्ठ नात्यातील व्यक्तीच्या वागण्याची, क्षमतेची जाहीर रित्या चिरफाड होऊ लागली. सुरुवातीला हि प्रक्रिया ३०-३५ वयोगटातील व्यक्तींनी त्यांच्या आई-वडील, सासू सासरे यांच्या बाबतीत सुरु केली. परंतु आपल्या समोर असलेल्या आणि या प्रक्रियेचे साक्षीदार असलेल्या मुलांचा त्यांना विसर पडला. त्यामुळे या छोट्या वयोगटातील मुलांनी सुद्धा थोड्या दिवसात आपल्या बुद्धीनुसार आपल्या पालकांना आव्हान देण्यास सुरुवात केली. मी मला वाटेल तसे वागणार त्यात ढवळाढवळ करण्याचा तुम्हास अधिकार नाही असे म्हणणे वारंवार होऊ लागले. याचाच परिणाम म्हणून काही काळातच विभक्त कुटुंब पद्धती ही स्थिरावू लागली. परंतु त्यामुळे छोटी पिढी ही संस्काराना काही प्रमाणात मुकली. काही वेळा निर्व्याज प्रेम / आपुलकी हे बाकीच्या सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून कुटुंबांस एकत्र ठेवते. एकत्र कुटुंबातील स्त्री ही कुटुंबातील सदस्यांबद्दल असणाऱ्या प्रेमामुळे सर्व तडजोडी सहन करून आणि अतीव कष्ट करून कुटुंबास एकत्र ठेवते. काही वेळा या प्रेमभावनेचे रुपांतर कर्तव्यभावनेत होऊन अशी स्त्री कुटुंब जोडून ठेवते.
सारांश असा की कुटुंबातील वडिलधाऱ्या माणसांची अधिकारवाणी, स्त्रीचे कुटुंबांविषयीचे प्रेम, आपुलकी आणि त्यातून निर्माण होणारी त्याग भावना या चार खांबांमुळे पूर्वी कुटुंबसंस्थेचा तोल शाबूत राहिला. कालांतराने झालेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या वाढीने आणि आर्थिक स्थितीत होणार्या उत्कर्षाने हे खांब काहीसे कमकुवत बनले. परंतु परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नाही. खालील जीवनकौशल्यांचा आपल्या जीवनात समावेश करून आपण आजही या कुटुंब संस्थेचा तोल कायम ठेवू शकतो.

१> कुटुंब असो वा कार्यालय असो, वरिष्ठ पदावरील व्यक्ती हि केवळ व्यक्ती नसून ती त्या कुटुंबसंस्थेचे / कंपनीचे प्रतिनिधी असतात. तुम्ही त्या व्यक्तीचा केलेला आदर हा त्या व्यक्तीबरोबर त्या कुटुंबसंस्थेचे / कंपनीचा आदर असतो.

२> कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून प्रथम हे ठरवावे की आपणा सर्वांस एका छताखाली गुण्यागोविंदाने राहणे शक्य होणार आहे का? एकाच घरात धुसमसत राहण्यापेक्षा वेगळे राहून नात्यातील ओलावा जपणे केव्हाही चांगले! परंतु हा निर्णय वस्तुनिष्ठपणे योग्य वेळी घेण्याची क्षमता सर्व सदस्यांनी दाखवली पाहिजे.

३> आजकाल प्रत्येकाचा ego (अर्थात स्वाभिमानाची भावना) हा एक नाजूक भाग बनला आहे. बर्याच वेळा हाच इगो नात्यांच्या आड येतो. ह्या इगोचे आत्मपरीक्षण करून त्याला नियंत्रणात ठेवण्याचा समजुतदारपणा सर्वानीच दाखविण्याची नितांत गरज आहे.

४> नैतिक अधिष्ठान - मुलांशी योग्य रित्या संवाद साधता आला पाहिजे. बापाची चप्पल मुलाला यायला लागली की बापाने मुलास मित्रासारखे वागविले पाहिजे हे म्हणणे प्रत्यक्ष आचरणात आणण्याची आज नितांत गरज आहे. आमच्या वडीलधारी माणसांनी आम्हास स्वातंत्र्य दिले नाही म्हणून आम्हीसुद्धा तसेच वागणार हे म्हणणे आजच्या काळात अगदी चुकीचे आहे. कुटुंबातील मुले जाणत्या वयात येताना त्यांच्याशी नैतिकतेविषयी मार्गदर्शनपर चर्चा करण्याची तयारी आणि स्वैराचाराच्या दूरगामी परिणामाची त्यांना जाणीव करून देण्याची क्षमता थोरांनी जोपासली पाहिजे. internet वरील विविध माध्यमाद्वारे कोवळ्या मुलांना नादी लावणाऱ्या नराधमाविषयी आपल्या कुटुंबातील मुलांना जागरूक ठेवले पाहिजे. internet वर स्वतः account उघडून मुलांवर लक्ष्य ठेवता आल्यास उत्तमच !

५> आजची युवा पिढी स्वतःला आधुनिक / मुक्त समजत असेल पण हा आधुनिकपणा / मुक्तपणा बर्याच वेळा लग्नाबाहेरच्या संबंधापुरता (उदाहरण महाविद्यालयीन मैत्री) मर्यादित असतो. स्वतःच्या पत्नीबाबत मात्र अजूनही प्रातिनिधिक भारतीय युवक हा रामाच्या पावलावर पाऊल टाकणारा आहे. हे वास्तवाची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. जीवनातील आनंद हा आयुष्याच्या विविध टप्प्यावर विविध पैलूंनी उपभोगता येतो. तरुण वयातील स्वैराचार हा तुम्हास आयुष्यातील बाकीच्या सर्व पैलूंच्या आनंदापासून वंचित ठेवू शकतो हे मुलांना समजावयास हवे.

६> आर्थिक समृद्धी आणि कुटुंबातील सदस्यांमधील भावनिक ओलावा या दोन बाबींचा समतोल साधणे ही कठीण गोष्ट आहे. बर्याच वेळी यातील एक गोष्ट मिळवण्यासाठी दुसरीचा त्याग करावा लागतो. अशी परिस्थिती उदभवल्यास जी व्यक्ती कुटुंबासाठी त्याग करते तिची योग्य जाण सर्वांनी ठेवावयास हवी.

७> प्रत्येक व्यक्ती ही जन्मतानाच एक विशिष्ट स्वभाव घेवून येते. एका कुटुंबात विविध व्यक्ती असतात. त्यांच्या विविध स्वभावांमुळे काही वेळा खटके उडणे नैसर्गिक आहे. स्वभावाचे काही पैलू व्यक्ती बदलू शकते पण काही पैलू बदलण्याच्या पलीकडे असतात. हे पैलू त्या व्यक्तीने आणि इतरांनीही ओळखण्याचा आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.

८> कौटुंबिक कलह व्यक्तिगत दोषांमुळे किंवा परिस्थितीमुळे उदभवू शकतात. परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या कलहांना संयमितपणे हाताळण्याची क्षमता सर्वांनी दाखवली पाहिजे. ९> घरकामात भाग घेण्याची सर्वांची तयारी असावी. या मुद्द्यावरून घरात कलह न होऊ देण्याचा समजूतदारपणा सर्वांनी दाखवावा. त्याच प्रमाणे दूरदर्शन संचावरील कोणते कार्यक्रम बघावेत यावर हवे तर एकत्र बसून नियमावली बनवावी.
आजच्या युगात आपण एकच मापदंड सर्व कुटुंबाना लावू शकत नाही. प्रत्येक कुटुंब ही एक वेगळी संस्था आहे. त्या संस्थेचे, सहभागी सदस्यांचे विविध पैलू ओळखून, अभ्यासून त्यानुसार वर दिलेल्या जीवन कौशल्यांमध्ये योग्य ते फेरफार करून ते आपण आपल्या कुटुंबात आचरणात आणावेत. आपण समाज बदलण्याची उभारी बाळगून असाल तर उत्तमच पण आपले कुटुंब सांभाळण्याची हिम्मत प्रत्येकाने दाखविलीच पाहिजे!

No comments:

Post a Comment