Sunday, August 8, 2010

क्रिकेट आणि मी (भाग २)

दहावीची परीक्षा संपल्यावर क्रिकेट पाचूबंदरच्या समुद्रकिनारी सुरु झाले. संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास आमच्या batch चे साधारणतः १२-१४ जण क्रिकेट खेळण्यासाठी गोळा होत. काही वर्षांनी ह्या सुंदर समुद्रकिनार्याचे डम्पिंग ग्राउंड मध्ये रुपांतर करण्यात आल्यावर मला फार दुःख झाले.

अकरावीत रुपारेल कॉलेज मध्ये प्रवेश केल्यावर पहिले सहा महिने क्रिकेटशी संबंध तुटला. आयुष्यात प्रथमच वसईबाहेर वास्तव्य असल्यामुळे मी आधीच काहीसा नाराज होतो आणि त्यातच क्रिकेटही बंद झाले. दिवाळी सुट्टीनंतर मात्र चित्र पालटले. रुपारेलच्या भव्य मैदानात सर्व प्रकारचे खेळ खेळले जाऊ लागले आणि त्यात अर्थात क्रिकेटचाही समावेश होताच. आमच्या डिविजनच्या वर्गाच्या संघात माझी निवड झाली. एक दोन सराव सामन्यात माझी सुंदर फलंदाजी झाली. ती पाहून वर्गातील मुले खुश झाली. काही कारणास्तव आंतरवर्गीय स्पर्धा त्या वर्षी झाल्या नाहीत. त्या वर्षी न्यूझीलंड संघ भारतात आला होता. त्या सामन्यात आमच्या कंपूने बर्यापैकी रस घेतला.

बारावीच्या वर्षी मी रुपारेल होस्टेल वर प्रवेश घेतला. माझ्या खोलीसमोर असणाऱ्या वरांड्यात उभे राहिले की समोरच्या मैदानात सुरु असलेले सामने दिसत. आधीच बारावीचे वर्ष आणि त्यात रुपारेल सारखे अभ्यासू आणि बारावीच्या परीक्षेला जीवन मरणाचा प्रश्न मानणाऱ्या मुलांचे होस्टेल. पण अशा होस्टेलवर सुद्धा क्रिकेट मध्ये रस घेणारी मुले होती. त्यांच्या बरोबर उभे राहून मी समोरच्या मैदानात चालणाऱ्या सामान्यांचं इंग्लिश मधून धावते समालोचन करी. हा आमचा एक चांगला विरंगुळा झाला होता. कॉलेज खानावळीत एका कोपर्यात दूरदर्शन संच होता. १९८९ साली भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता. संजय मांजरेकरच्या काही अविस्मरणीय खेळ्या आणि सचिन तेंडूलकरचे कसोटी सामन्यातील पदार्पण ह्याच दूरदर्शन संचावर आम्ही पाहिले. होस्टेल वर तीन मजले होते. तळमजला पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव होता, पहिला मजला अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा मजला बारावीच्या विद्यार्थांसाठी! उद्देश्य असा की बारावीच्या मुलांना कमीत कमी त्रास व्हावा. तर ह्या होस्टेलचे देखील आंतर-मजलीय सामने होत. आता पर्यंतच्या माहित असलेल्या इतिहासात पदवीच्या विद्यार्थानीच ह्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. परंतु आमच्या संघाने मात्र दोन्ही संघांचा पराभव करीत ह्या स्पर्धेचे विजेतपद पटकावले. मी आमच्या संघाचा आघाडीचा फलंदाज होतो. बारावीत दिवाळीनंतर आम्ही कॉलेजला जाणे बंद केले. भारतीय संघ न्यूझीलंड दोर्यावर गेला होता. अझहरुद्दीनची संघाच्या कप्तानपदी आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. दिलीप वेंगसरकरचा हा शेवटा दौरा होता. हे सामने आम्ही सकाळी उठून अभ्यास करता करता रेदिओवर ऐकले.

बारावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी वसईत असूनही आम्ही क्रिकेट का खेळलो नाहीत हे मला आठवत नाही. बारावीचे वर्ष संपले आणि अभियांत्रिकी अभ्यासासाठी मी सरदार पटेल कॉलेज महाविद्यालयात प्रवेश केला. ह्या कॉलेजमध्ये सुद्धा मी होस्टेल मध्ये प्रवेश केला. पावसाळ्यानंतर क्रिकेटचे वारे महाविद्यालयात वाहू लागले आणि एके दिवशी संघनिवडीसाठी आम्ही भवन्स कॉलेजच्या भव्य मैदानावर कूच करते झालो. आमच्या वर्गात सचिन कन्नडकर नावाचा उत्तम खेळाडू होता आणि त्याने बारावीत त्याच्या कॉलेजचे क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्या दिवशी नंबर पडताना त्याने शेवटचा नंबर मागून घेतला आणि बाकीचे नंबर पडण्यास सांगितले. माझा नंबर पहिला आला. मी त्याच्यासमोर फलंदाजीसमोर उभा राहिलो. मी बिनधास्तपणे त्याच्या गोलंदाजीचा मुकाबला केला आणि पुढे जाऊन चेंडू उंचावरून टोलवले देखील. ह्या एका खेळीच्या जोरावर मी पुढील चार वर्षे वर्गाच्या संघात राहिलो. ह्या चार वर्षातील सामन्याविषयी आणि कॉलेज होस्टेल संघातील माझ्या कामगिरीविषयी पुढील भागात!

No comments:

Post a Comment