परिपूर्ण चित्राच्या पहिल्या भागाला जाणकार लोकांनी दाद दिल्याने मी सध्या खुश आहे.
आज सुरुवात करूया व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमाने! अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाची हल्ली असंख्य महाविद्यालये उघडली आहेत. आणि आपली अपुरी स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा मनी बाळगून हल्लीचा पालकवर्ग आपल्या पाल्यांना ह्या महाविद्यालयात दाखल करतो. आता आपल्या पाल्याचा कल त्या अभ्यासक्रमाकडे आहे की नाही किंवा त्यात तो प्राविण्य मिळवू शकतो कि नाही ह्याचा आपण सारासार विचार करीत नाही. मागच्या एका ब्लॉग मधील माझ्या म्हणण्याची थोडी पुनरावृत्ती; भविष्यकाळात भारताला कोणत्या क्षेत्रातील किती व्यावसायिकांची गरज आहे याचा प्राथमिक स्वरूपातील सुद्धा अभ्यास कोणी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. माझे म्हणणे चुकीचे असल्यास मी आनंदी होईन.
आता पालकवर्ग दुसरे मार्ग का पत्करू पाहत नाही? तर दुसऱ्या मार्गाने आपला पाल्य गेल्यास कशा प्रकारे तो यशस्वी होवू शकतो ह्याचे परिपूर्ण तर सोडा, पण प्राथमिक स्वरूपातील चित्र देखील आपण समाजापुढे ठेवले नाही. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाने रंगवायला घेतलेले ७०- ८० च्या सुमारातील चित्र आज माहिती आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन ह्या रंगांच्या छटांनी गडद झाले आहे. ह्यात अजून एक अदृश्य घटक आहे जो एकंदरीत लेखाच्या गंभीर वातावरणाशी थोडा विसंगत आहे. आज मुले, मुली दोन्ही बहुतांशी उच्चशिक्षित बनले आहेत. ह्यातील किती मुली शेती क्षेत्रात किंवा स्वःताच्या व्यवसायात यशस्वी असलेल्या मुलांशी छोट्या शहरात किंवा गावात संसार करण्यास तयार होतील? प्रमाण नक्कीच कमी आहे.
आता ह्याच मुद्द्याची दुसरी बाजू. वसईतील वाड्यांची आजची स्थिती! आज बऱ्याच प्रमाणात वाड्यातील उत्पादन कमी होत चालले आहे. महत्वाचे कारणे म्हणजे शेतकऱ्यांची पुढची पिढी शैक्षणिक क्षेत्रात उतरली आणि परंपरागत कामगारांची पुढील पिढी कारखान्याच्या कामात रंगून गेली. ह्यात तसे बघितले एक संधी उपलब्ध आहे. वसईतील वाड्यांसाठी कामगार पुरवठा करण्याची एक संस्था स्थापण्याची. समजा एखाद्या होतकरू तरुणाने अशी संस्था स्थापिली तर त्याचे आयुष्य कसे असेल? सकाळी तो आपल्या संगणकाद्वारे त्या दिवसासाठी आपले कामगार कोणकोणत्या वाड्यांमध्ये कामाला जाणार आहेत ह्याचा आढावा घेईल. घराच्या मागे असलेल्या आपल्या गोठ्यातील गाईंचे स्वतः किंवा आपल्या कामगारांद्वारे दुध काढून घेईल. कोंबड्यांची गावठी अंड्यांची मागणी लक्षात घेवून त्यानुसार त्यांचा भाव ठरवील. पानवेलीसाठी लागणारे कुशल कामगार (गो) उपलब्ध नसल्यास तो संगणकावरील संकेतस्थळावर त्याची जाहिरात देईल. त्याच्या ह्या जीवनशैलीचे फायदे? तो वाहतूक कोंडीत सापडणार नाही, प्रदूषणापासून तो दूर असेल, त्याच्या व्यवसायातच त्याचा व्यायाम होऊन जाईल, त्याला सदैव स्वतःला अपडेटेड ठेवण्याची गरज भासणार नाही.. दुसर्या एक चित्राच्या प्राथमिक रेखा रेखाटण्याचा माझा प्रयत्न...सद्यस्थितीत हे फारसे वास्तव वादी नाही याची मलाही जाणीव आहे..ह्याचे परिपूर्ण चित्र होणार की नाही ते आपल्या मनोबलावर अवलंबून आहे.
No comments:
Post a Comment