Saturday, July 13, 2013

माझ्या मुलाचा अभ्यास!


दिनांक २०१३ जुलै 

सोहमचा अभ्यास घेताना त्याची एकाग्रता हा माझ्या चिंतेचा मोठा विषय होऊन बनला आहे. त्याच्या एकाग्र होऊन बसण्याचा अवधी तुलनेने कमी आहे. आता तुलना कोणाशी? तर मी ओघाने ही तुलना मला आठवणाऱ्या माझ्या एकाग्रतेच्या पातळीशी करतो. आता ह्यात अनुवंशिकता हा घटक सोडला तर बाकी कोणते घटक येऊ शकतात ह्याचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न !
मी सोहमच्या वयाचा असताना मला अभ्यासाव्यतिरिक्त फार कमी गोष्टी माहित होत्या. ह्या वर्गात अंगणातील खेळ, विशिष्ट महिन्यात खेळले जाणारे भारतीय क्रिकेट संघाचे सामने, संध्याकाळी ३ - ४ तास चालू असणारे दूरदर्शन ह्या प्रामुख्याने गणल्या जाणाऱ्या गोष्टी होत्या. किलबिल सोडला दूरदर्शनवर मुलांचे कार्यक्रम तुलनेने कमी असायचे, कार्टून तर माझ्या आठवणीनुसार फक्त रविवारी सकाळी असायची. अशा प्रकारे बघायला गेलं तर माझ्या मेंदूला अभ्यासाव्यतिरिक्त खुणावणाऱ्या प्रलोभनांची संख्या मोजकी होती.
आता सोहमचा विचार करूयात.
१) २४ तास सुरु असणाऱ्या कार्टून वाहिन्या अनेक आहेत, त्याला अतिवेगवान गाड्यांची खूप आवड आहे आणि त्यामुळे डिस्कवरीवरील त्या प्रकारच्या वाहिन्या तो आवडीने बघत असतो. पत्नी २ मराठी मालिका बघते. घरी त्या वेळात बाकी कोणी नसल्याने सोहमही त्या बघतो.
२) सोहमच्या शाळेत फुटबॉल खेळले जाते. त्यामुळे त्याचा घरी सराव करण्याव्यतिरिक्त त्याचे युरोपिअन लीगचे सामने तो अधूनमधून पाहतो. मे महिन्यात केलेल्या सायकलच्या सरावाचा परिणाम आणि माझी पसंद म्हणून तो टूर द फ्रान्स ही सायकल शर्यत सुद्धा पाहतो. तीच गोष्ट विराट कोहलीमुळे आवडू लागलेल्या क्रिकेटची
३) सोहमच्या शाळेचा बराचसा अभ्यास संगणकावर दिला जातो. तो अभ्यास संपवल्यावर संगणकावरील खेळ त्याला आकर्षित करतात.
४) सोहमच्या शाळेत दर आठवड्याला प्रोजेक्ट करावे लागतात. त्यासाठी सोहमला (आणि त्याही पेक्षा जास्त त्याच्या आईला) मेहनत घ्यावी लागते. ह्यासाठी आठवड्यात एकदा दुकानात फेरी आणून जागतिक प्रदूषणात भर घालणारे रंगीत चकचकीत कागद, गोंद वगैरे प्रकार त्याला / पत्नीला विकत घ्यावे लागतात.
५) सोहम सामाजिक शास्त्र / भूगोल ह्या विषयातील भारताच्या शेजाऱ्यांचा अभ्यास करताना अधिक माहितीसाठी ATLAS उघडतो. आणि मग डोरेमॉनचा देश कोणता म्हणून जपानमध्ये गुरफटून जातो.
६) माझ्या आणि पत्नीच्या मोबाईल फोन आणि iPAD वर नवीन काय उद्योग करता येतील हा सोहमच्या अंतर्मनात सदैव दडलेला विचार असतो.
एकंदरीत काय ह्या सर्व गोष्टी सोहमच्या मेंदूत प्रमुख विचार बनण्यासाठी धडपडत असतात. त्याला अभ्यासाला बसविले की माझ्या धाकाने तो १० मिनिटापर्यंत ह्या विचारांना ढकलू शकतो. पण मग त्यानंतर त्याचा नाईलाज होतो आणि मग त्याची चुळबुळ सुरु होते. मग एक दोन प्रश्न विचारून गाडी वळणावर आणावी लागते.
ह्यात एक गोष्ट मात्र आहे. सोहमचा / नवीन पिढीचा मेंदू तुलनेने अधिक प्रगतावस्थेत गेलेला आहे. मानवी उत्क्रांतीत ही काही नवीन गोष्ट नव्हे. परंतु ह्यात लक्षात घेण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. काही न करता शांत बसून राहण्याची ह्या नवीन पिढीची क्षमता खलास होत चालली आहे आणि वेळ घालविण्यासाठी तंत्रज्ञानाची त्यांना अधिकाधिक मदत लागत आहे.
जोपर्यंत मुलाला विषय समजत आहेत आणि त्याचे गुण एखाद्या विशिष्ट पातळीच्या खाली घसरत नाहीत तो पर्यंत त्याची एकाग्रता हा चिंतेचा विषय नाही. ह्यात मनन करण्यासारख्या काही गोष्टी अशा!
१) चौथी इयत्तेत सुद्धा मुलांना करावा लागणारा अनेक विषयांचा खोलवर अभ्यास! शेवटी प्रत्येकजण आपले एक विशिष्ट कार्यक्षेत्र निवडणार, असे असताना मुलांना सर्वच विषयात आपली शक्ती पणाला लावण्याची खरोखर गरज आहे काय?
२) संगणकाचे आपण निर्माण केलेलं अवास्तव स्तोम! संगणकासाठी तुम्हाला आज्ञावली लिहिता येणे म्हणजे तुम्ही खरे संगणक साक्षर झालात. बाकी संगणकाचा वापर करता येणे म्हणजे काही मोठा तीर मारला नाही! चौथीत मुलांना संगणकाद्वारे परीक्षा द्यायला भाग पाडून आपण काय साध्य करीत आहोत?
३) आधी मी लिहिले होते ह्या मुद्द्यावर! मुलांना आपण तंत्रज्ञानाशी लहान वयात अधिकाधिक संपर्कात आणून त्यांचा भावनिक बुद्ध्यांक आपण काहीसा कमी करीत आहोत. मुले जितका वेळ GADGET वापरण्यात घालवीत असतात त्याच्या ३ - ४ पट वेळ त्यांनी मैदानी खेळात किंवा प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद साधण्यात घालविला तरच ठीक आहे.
४) मुलांचा अधिक विकसित झालेला मेंदू! ह्या विकसित झालेल्या मेंदूला पालक म्हणून आपण कितपर्यंत खाद्य देवू शकणार? हा मला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न!
मी मुलांना शिकवणीला पाठवू नये अशा ठाम मताचा आहे. मुलांचा अभ्यास घेण्यात घालविलेला वेळ 'क्वालिटी टाईम' च्या व्याख्येत बसतो असे अजून एक माझे ठाम मत! तुम्हाला काय वाटत? 

2 comments:

  1. Hi Aditya,
    A very good article but I think you are mixing two things, computer literacy and software engineering.Software engineering is a specialised field where you need in depth knowledge of that perticular field, even there are so many streams and a person working in a perticular stream may not be even aware about some other stream. Where as you can be called computer literate even if you can operate the computer individually and do normal things like email checking,transacting online and using microsoft office etc.
    Thats what I feel!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for the comments and very valid point Sandesh! I totally agree with your definitions of computer literacy and software engineering. My only point is that we should not hurry our kids into computer literacy. It can be learnt once you pass 10th standard. There are too many distractions present in today's world once you are computer literate. To protect kids from them, you would need to enforce a lot of discipline in kids. Computer literacy may give kids false sense of empowerment, which may distract them from pursuing their ongoing effort to gain knowledge of basic science, arts, commerce

      Delete