Saturday, November 2, 2013

एकवीरा देवी, महड गणपती दर्शन - भाग २


थोड्याच वेळात टेम्पो ट्रेवलर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावू लागला.  सीप्झ, पवई भागात कार्यालये आहेत त्यांना हा लिंक रोड हा शब्द उच्चारला की वाहतूककोंडीची दुःस्वप्ने पडू लागतात. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने वाहतूककोंडी नव्हती. मुंबईचे हेच वैशिष्ट्य आहे, तुम्हांला चांगला प्रवास हवा असेल तर तुम्हांला सकाळी लवकर निघावयास हवे. ह्या लिंक रोडवर टेम्पो ट्रेवलरमध्ये इंधन भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पवई मागे टाकून टेम्पो ट्रेवलर पूर्व द्रुतगती मार्गाला लागला. ह्या मार्गावर काही उपनगरे, वस्त्या (त्यांची नावे घेत नाही, तेथील रहिवाश्यांच्या भावना दुखावायला नकोत!) अस्वछ आहेत आणि तिथे असह्य दुर्गंधी पसरलेली असते. आपणास केवळ ह्या भागातून जाताना इतका त्रास होतो मग तिथे राहणारे हे कसे काय २४ तास सहन करीत असतील हे समजत नाही. एकंदरीत हे आपले अपयश समजायला हवे. बाकीचा इतका मोठा सुंदर देश मोकळा असताना तिथे केवळ आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकत नाही म्हणून शहरात येऊन लोकांना अशा दयनीय अवस्थेत राहावे लागते.
पुढे वाशी आणि नवीन मुंबईचा परिसर सुरु झाला. इथील रस्ते रुंद आणि त्यामुळे वाहनेही वेगात प्रवास करीत होती. त्यामुळे आपल्या टेम्पो ट्रेवलरचा वेग जास्त असायला हवा होता अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. थोड्या वेळातच यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आमच्या वाहनाने प्रवेश केला. इथील वाहनांचा वेग भन्नाट, त्यामुळे मला कसेसेच वाटू लागलं. आमचा चालक सुद्धा आपल्या वाहनाची मर्यादा ओळखून टेम्पो चालवत होता. आमच्याहून हळू वाहने चालविणारे चालक अधूनमधून दिसत होते. त्यांनी खरेतर सर्वात डाव्या मार्गिकेत राहायला हवे, पण त्यातील काही नमुने मधल्या मार्गिकेत वाहने चालवीत होते. त्यांना मागे टाकण्यासाठी आमच्या चालकास बरीच मेहनत करावी लागत होती. तो अगदी शेवटपर्यंत त्यांच्या मागे जाई आणि मग उजव्या बाजून पुढे जाई. अजून काही वाहनचालक आपल्या मोटारगाडीत सामान खचोखच भरून जाताना दिसले. सोय म्हणून एकाच वेळी इतके सामान भरून ठीक आहे पण आपली मागून येणाऱ्या वाहनांचे दृश्य ह्या खचाखच भरलेल्या वाहनांमुळे अडले जात आहे ह्याचे भान त्यांनी ठेवावयास हवे होते. मध्ये दोन बोगदे लागले. त्यातील अंधारात मागील पार्किंग लाईट सुरु ठेवून वेगात जाणाऱ्या गाड्यांचे दृश्य सुंदर होते.
थोड्या वेळाने सौरभ आणि चालकाची परमिट ह्या विषयावर चर्चा सुरु झाली. ह्या प्रवासासाठी सर्व प्रवाश्यांच्या नावाची यादी देऊन परवाना घेणे आवश्यक होते. परंतु घाईगडबडीत हे राहून गेले होते. हे कळल्यावर रस्त्याबाजूच्या वाहतूकपोलिसाकडे आमची नजर उगाचच जास्त वळू लागली आणि थोड्या वेळातच त्यातील एकाने आम्हांला  बाजूला थांबण्याचा इशारा केला. चालकाने व्यवस्थित गणवेष परिधान केला होता. त्याचे आणि वाहतूक पोलिसाचे बोलणे आम्ही टेम्पोतून पाहत होतो. अशा वेळी प्रवाशांनी चर्चेत भाग घेऊ असे म्हणत इच्छुक सौरभला त्याच्या वडिलांनी रोखले. त्यांच्या म्हणण्यात तथ्य होते. पाच मिनिटातच दोनशे रुपयाचा दंड आणि पावती घेऊन आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात लोणावळ्याला बाहेर पडण्याचा गच्छंतीमार्ग आला. लोणावळ्यातील हवेत थंडावा जाणवत असल्याचे लक्षात येताच काकांनी टेम्पोत वातानुकुलीत यंत्रणा सुरु केल्याची टिपण्णी केली.
लोणावळ्याच्या मुख्य नाक्यावर पुन्हा एकदा वाहतूकपोलिसांची मेहेरनजर आमच्यावर पडली. चालकाने मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दोनशे रुपयाची दंडपावती दाखविली. "ही चालणार नाही, कारण ती लोणावळ्याच्या बाहेरील आहे" साहेब उद्गारले. चालकाने कार्यालयात बसून हा सर्व प्रकार पाहणाऱ्या मोठ्या साहेबाकडे "जावू द्याना आता" अशी विनवणीच्या नजरेत विनंती केली. त्याचा फायदा होऊन त्याने साहेबास आम्हांस जाऊ देण्यास सांगितले. "बाकी सर्व कागदपत्रे तर आहेत ना?" जाऊ देता देता साहेब विचारते झाले. इतका वेळ फक्त परमिटची चर्चा सुरु होती म्हणजे बाकीची कागदपत्र तर व्यवस्थित असणार अशा भोळ्या समजुतीने १६ मुखावर हो असे उत्तर आले. परंतु जे सर्वात महत्वाचे होते त्या सतराव्या (चालकाच्या) चेहऱ्यावरील अनिश्चिततेचे भाव अनुभवी साहेबांनी लगेचच जाणले. पुन्हा एकदा गाडी बाजूला लावण्याचा आदेश देण्यात आला. काकांनी गाडीच्या मालकांना फोन लावला. गाडीत असणारी कागदपत्रे पुरेशी नव्हती. आताची साहेब, मोठे साहेब आणि चालक ह्यांची बोलणी बराच वेळ रंगली. टेम्पोतील सर्वाचे लक्ष आता सौरभकडे वळले. सौरभच पोलिसांचे लक्ष वेधून घेत असावा असे सर्वांचे म्हणणे पडले. सौरभ टेम्पो चालवू शकत असल्याने त्याने तसाच टेम्पो घेवून विश्रामधामाकडे कूच करावे असेही काहींचे म्हणणे पडले. सौरभ बिचारा हे सर्व शांतपणे ऐकून घेत होता. काहीवेळाने अजून एक फोडणी देऊन आमचे चालक टेम्पोत परतला. "नऊशे रुपयाचे परमिट मी काढायला सांगत होतो. ते जर काढले असते तर ही सर्व कटकट झाली नसती" टेम्पो सुरु करता करता तो उद्गारला.
त्यानंतर मात्र आम्ही विश्रामधामापर्यंत व्यवस्थित पोहोचलो. तिथे निवासासाठी चार बंगले होते. त्यातील दोन आम्ही आरक्षित केले होते. बाकीच्या दोन बंगल्यात कोणी राहण्यास आले नव्हते. त्यामुळे एकंदरीत शांतता होती. महिलावर्गास आणि पुरुषवर्गास प्रत्येकी एक बंगला अशी निवासव्यवस्था होती. फक्त साडेदहाच झाले होते. महिलावर्गाने ब्रेडचे बरेच पुडे काढले. त्यानंतर काकड्या, उकडलेली बटाटी, सॉस असे रुचकर सँडविचला आवश्यक असणारे जिन्नससुद्धा बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुरुषवर्गात अचानक खुशीचे वातावरण पसरले. सँडविच होण्यास अजून बराच वेळ लागेल हे लक्षात घेऊन मी पुरुषवर्गाच्या बंगल्यात परत गेलो. सुदैवाने तेथील दूरदर्शन संच चालू अवस्थेत होता आणि त्याहून नशिबाची गोष्ट म्हणजे केबलही सुरु होते. केबलवर क्रिकेटवाहिनीवर २००७ साली भारताने इंग्लंडला हरविलेल्या एका सामन्याची क्षणचित्रे दाखविली जात होती. ज्यादिवशी आपला सामना नसतो अशा वेळी क्रीडा वाहिन्या जुन्या जिंकलेल्या सामन्यांची क्षणचित्रे दाखवितात. ती आपले क्रिकेटपटू पाहत असावेत आणि त्यांचे मनोधैर्य वाढत असावे असा माझा अंदाज आहे. सँडविच तयार झाल्याची हाक येताच मी त्वरित समोरच्या बंगल्यात पोहोचलो. सँडविच खरोखर रुचकर होते. ते फस्त करून मंडळी ताजीतवानी झाली. श्राव्याला एका विशिष्ट प्रकारे सँडविच बनवून हवे होते ते कोणाला समजत नसल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ह्यात ब्रेडच्या स्लाईसच्या बाजूला सॉस हा महत्वाचा घटक असल्याचे ध्यानात येताच प्रश्न मिटला.
संयोजकांनी फावल्या वेळातील उद्योगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसावे. नशिबाने प्लास्टिकची छोटी बॅट आणि तत्सम पदार्थाचा मऊ चेंडू ह्यांनी प्रश्न मिटविला. सुरुवातीला सराव करण्यात मंडळींनी धन्यता मानली. सोहम आणि श्राव्या ह्यांना वयोमानामुळे फलंदाजीचा हक्क प्राप्त झाला होता. त्यांना गोलंदाजी करण्यात स्वप्नील आणि प्रांजली ह्यांनी पुढाकार घेतला होता. ह्या दोघांची गोलंदाजी भन्नाट होती. भारतीय गोलंदाज स्वैर मारा करतात परंतु त्यांची स्वैरता केवळ यष्ट्याच्या डाव्या उजव्या बाजूला मर्यादित असते. पण स्वप्निल आणि प्रांजली ह्यांनी त्यावरही कळस केला. त्यांचा मारा यष्ट्यापासून डावी उजवीकडे  १०-१० फुट जाऊ लागला. आणि मग त्यांनी गगनभेदी मारा सुरु केला. चेंडू पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत, किंवा दुसऱ्या मजल्याच्या पातळीवर असलेल्या पत्र्यांना भेदून जाऊ लागला. हा मारा पाहून बच्चेमंडळी सोहम आणि श्राव्या ह्यांचा फलंदाजीतील रस कमी होऊ लागला. उत्कृष्ट खेळाडू सौरभ आणि स्वयंघोषित उत्कृष्ट खेळाडू जावईबापू ह्यांचाही मारा काही खास पडत नव्हता. त्यामुळे सुज्ञपणे सर्वांनी बॉक्स क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. सौरभ, सोहम, प्राजक्ता आणि सुप्रिया (स्वप्निलची पत्नी) विरुद्ध प्रांजली, चिन्मय, स्वप्निल आणि जावईबापू अशी संघाची निवड करण्यात आली. बसमधून उतरल्यानंतर सौरभ आणि त्याची पत्नी अर्पिता ह्यांचे काहीसे बिनसले असावे त्यामुळे ती प्रेक्षकवर्गासाठी असलेल्या वऱ्हांड्यातून सौरभला "चीटर चीटर" असे सतत संबोधित होती. पहिल्या सामन्यात स्वप्नीलच्या संघाची कामगिरी बेताचीच झाली. सासुरवाडीच्या समस्त वर्गाला प्रभावित करण्यासाठी जावईबापूंनी मारलेला फटका थेट सीमारेषेबाहेर गेल्याने ते बाद झाले. घोषित केलेल्या १, २ धावांच्या सीमारेषेवरून दोन्ही संघात वाद होत होते. अर्पिता थेटसौरभच्या विरुद्ध पक्षात होती आणि तीन सासूबाई, एक आजेसासू आणि दोन सासरे ह्यांना जावईबापूंच्या उघडपणे विरोधात जाणे योग्य वाटत नसावे त्यामुळे बरेचसे विवादास्पद निर्णय जावईबापू असलेल्या स्वप्नीलच्या संघाच्या बाजूने घोषित करण्यात येत होते. इतके करून सुद्धा पहिला सामना सौरभच्या संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात मात्र चिनुने चांगली फलंदाजी करून ४ षटकात २९ धावा बनवून देण्यास हातभार लावला. त्यानंतर स्वप्निल, चिनु  आणि प्रांजलीने उत्तम गोलंदाजी करून सामना जिंकून दिला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक सामन्यात जावईबापूंना सूर गवसला. त्यांनी गेल्या ५ वर्षातील सुरुच्या बागेतील आणि शाळेतील बॉक्स क्रिकेटचा अनुभव पणाला लावला आणि ३ षटकात २९ पर्यंत धावसंख्या पोहोचवली. ह्यात त्यांनी  फटक्याचा पहिला टप्पा जमिनीवर आपटून दुसरा टप्पा सीमारेषेबाहेर चौकारासाठी पोहोचविण्याच्या गनिमी काव्याचा वापर केला. चिनुने शेवटच्या षटकात १० धावा फटकावून४ षटकात ३९ अशी मजबूत धावसंख्या उभारली. सौरभचा संघ अगदी दडपण घेऊन खेळला आणि सर्वजण ४ षटकात केवळ ५ धावा काढून बाद झाले. ह्यात सुप्रियाने दोन निर्धाव षटके खेळून बराच हातभार लावला!
एव्हाना जेवणाची वेळ झाली होती. सकाळी चार वाजता उठून सौरभच्या आईने बनविलेल्या स्वादिष्ट पुलावाचा स्वाद घेण्याची वेळ झाली होती. ह्या पुलावातील समाविष्ट असलेल्या सर्व भाज्यांची नावे सौरभने आधीच अचूक सांगितली होती ह्याचे मला बरेच आश्चर्य वाटले. तेव्हा सकाळी उठून मीच ह्या भाज्या कापल्या असा दावा त्याने केला. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे मला समजले नाही. नंतर त्या भाज्या अर्पिताने कापल्या होत्या असा खुलासा खात्रीलायक गोटातून करण्यात आला तेव्हा अर्पिता सौरभच्या मागे चीटर म्हणून का लागली असावी ह्याचा थोडा अंदाज आला. पुलाव खरोखर रुचकर होता आणि गरमागरम पापड त्याच्या चवीत भर घालीत होते. समोर पराभूत संघ बसला असल्याने त्यांची चेष्टा करताना दोन घास अधिकच गेले.
दुपारचे दोन वाजले होते. सकाळी लवकर उठलेले डोळे केबल टीव्हीवर धन्य मराठी मालिका  लागताच निद्राधीन झाले!

No comments:

Post a Comment