Saturday, December 14, 2013

कलम ३७७


भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने  'समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हाच असून त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम आहे' असा निर्णय बुधवारी दिला. आणि त्यावर देशभर गदारोळ माजला. त्याबाबतीत माझी ही मते!
१> मनुष्यजातीने आदर्श कुटुंबाचे  जे चित्र वर्णिले आहे त्यात पती, पत्नी आणि मुले ह्यांचा समावेश होतो. मुलांच्या निकोप वाढीसाठी हे चित्र आवश्यक असतं.
२> आजच वाचले की समलिंगी संबंध ठेवणारे लोकांची ही वृत्ती एकतर निसर्गतःच असते किंवा ती काही अनुभवांनी विकसित होते. दोन निसर्गतः ही वृत्ती असलेल्या लोकांनी शांतपणे चार भिंतीच्या आत एकत्र राहण्यास कोणाचा आक्षेप नसावा. माझा आक्षेप आहे तो ह्या वृत्तीचे समाजात खुलेआम प्रदर्शन करण्यास! आधीच समाजात इंटरनेटच्या प्रभावाने वाईट गोष्टींचेच प्रदर्शन सर्वांसमोर होत आहे. आपल्या पुढील पिढीचे ह्यापासून संरक्षण करणे अत्यावश्यक आहे! इंग्लिश भाषेत हे संबंध सर्वांसमोर मान्य करण्याच्या तथाकथित धाडसाला 'कमिंग आउट ऑफ क्लोसेट' असे म्हणतात कारण हे संबंध असल्यास ते चार भिंतीच्या आतच ठेवावेत अशीच अपेक्षा असते.
३> एकंदरीत पूर्वी आणि आता एक मुख्य फरक दिसतो. पूर्वी वाईट गोष्टी जशा की अंमली पदार्थ वगैरेची व्यसने १००% टक्के वाईट ठरविली जात. त्यामागील व्यसनी माणसाची मानसिकता वगैरे समजून घेण्याचा फारसा प्रयत्न  केला जात नसावा. अरे आज साध्या माणसाला सर्व नियमाच्या चौकटीत राहून आयुष्य घालवायला किती कष्ट पडत आहेत आणि आपल्या समाजाची वैचारिक शक्ती मनुष्यजातीतील वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या मोजक्या लोकांच्या वैयक्तिक अधिकारांविषयी चर्चा करण्यात खर्च पडत आहे.
४> पारंपारिक प्रेमात मुलगा मुलगी प्रेमात पडतात, ते काही एकाच वेळी नव्हे! ह्यात एका बाजूने प्रणयाराधन सुरु होते आणि कधी यशस्वी होते तर कधी अपयशी. समलिंगी संबंधाला मिळणाऱ्या वाढत्या प्रसिद्धीने ज्या कोणाची इच्छा नसेल त्याचा / तिचा पाठलाग करण्याचे धाडस ज्यामध्ये ही वृत्ती निसर्गतःच असेल त्याला होऊ शकते आणि माझा तिलाच आक्षेप आहे.
५> अजून मला खटकणारा मुद्दा! अशा जोडप्यांना मुले दत्तक घ्यायला परवानगी आहे. ह्या मुलांचे लहानपण अशा परिस्थितीत घालवून देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?
व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार चांगला असला तरी विविध मनोवृत्तीची माणसे समाजात राहत असताना समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यातील कोणत्या लोकांची मते किती प्रमाणात समाजापुढे येऊ द्यावीत ह्यावर एका केंद्रीय शक्तीचे नियंत्रण असणे आवश्यक असते. आज त्याचीच कमतरता आहे! ह्या सर्व गोष्टींचा समाजाच्या पुढच्या पिढीवर जो परिणाम होत आहे त्याची जबाबदारी आजचे पुरोगामी / मुक्त विचारवंत घ्यायला तयार आहेत काय?
 

No comments:

Post a Comment