Sunday, January 5, 2014

जाणता अजाणता - भाग १


 (आधीच्या अनेक कथांप्रमाणे ही सुद्धा अपूर्ण न राहावो ही इच्छा!)

शंतनु ऑफिसातून आला तो काहीसा अबोल होऊनच! तन्वीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखलं की आज काहीतरी बिनसलं आहे. त्याला तिने फ्रेश होवून दिले. तो ताजातवाना होऊन परत हॉल मध्ये येईपर्यंत तिने  गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीच्या खारी बिस्किटाची डिश तयार ठेवली होती.

चहा आणि आवडीची बिस्किटे पाहताच शंतनुचा चेहरा खुलला. त्याने सोफ्यावर बैठक मारली. चहाचा पहिला घोट घेताच त्याची मुद्रा खुलली. तोवर तन्वी आपला कप घेऊन त्याच्याजवळ येऊन बसली होतीच.  तन्विचा स्पर्श होताच शंतनूची उरलीसुरली उदासी निघून गेली.  तन्वीने आपला चहाचा कप टीपॉयवर ठेवला!"असं रुसून घरी परत यायला काय झालं होत?" "काही नाही" शंतनु म्हणाला. दोन मिनिटे कोणीच काही बोललं नाही. तन्वीला हा अबोला सहन न होऊन ती काहीशा रागानेच स्वयंपाकघरात गेली.

"राग फक्त हिलाच धरता येतो" शंतनू मनातल्या मनात पुटपुटला. एक दोन मिनटे थांबून आज आपल्यालाच पडतं घ्यावं लागणार असा सुज्ञ विचार करीत तो स्वयंपाकघरात पोहोचला. एव्हाना तन्वीचे कांदा कापणे सुरु झालं होत. पाठमोरी असली तरी तिने शंतनुची चाहूल घेतली. १० - १५ सेकंद काही मागून हालचाल नाही हे पाहून मग ती वळली. तिच्या नजरेतील भावांनी आणि ओठात दडलेल्या स्मितहास्याने शंतनुची उरलीसुरली नाराजी दूर झाली. "माझी मुन्नारला बदली झालीय" फ्रीजला टेकून उभा राहिलेला शंतनू बोलला. भाजी कापणाऱ्या तन्वीच्या हातातील सुरी तिने कशीबशी आपले बोट कापण्यापासून वाचविली.

तन्विसाठी ही बातमी म्हणजे मोठा धक्काच होता. पुढील एका महिन्यात मुन्नारला संसार उभारायचा होता. कोल्हापुरातील सर्व मैत्रिणी, नातेवाईक सोडून अचानक असे जाणे तिच्या जीवावर येत होते. परंतु नाईलाज होता. तिच्या मनातील वादळाचा जेवणावर परिणाम झालाच.

परंतु शंतनु एव्हाना सावरला होता. भाजीतील कमी मिठाचा त्याने उल्लेखही केला नाही. त्याला वाढून तन्वीने आपले ताट वाढून घेतलं. पहिला घास घेताच तिला मिठाचा कमीपणा जाणवला. "अरे शंतनू, भाजीत मीठ कमी आहे! मला सांगायचं नाही का?" ती म्हणाली. शंतनुच्या डोळ्यात पाहून त्याने आपल्याला न दुखावण्यासाठी मौन राखलं हे तिला जाणवलं आणि इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. शंतनु लगेचच खुर्चीवरून उठला. "रडूबाई, अग लोक देशांतर करतात आणि मजेत राहतात. आपण तर आपल्याच देशात चाललो आहोत! आणि ते सुद्धा मुन्नरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी" दोघांच्या ताटात चिमुटभर मीठ ठेवता ठेवता शंतनु म्हणाला. शंतनुच्या समजूतदारपणाने तन्वी अगदी गहिवरली. एका हातानेच तिने शंतनुला आपल्याजवळ ओढले.

जेवण आटोपल्यावर शंतनुने आवाराआवर करण्यास हातभार लावला. "चल पटकन खाली एक चक्कर मारून येवू" शंतनू म्हणाला. तन्वीला थोडे आश्चर्यच वाटलं. एकदा का ऑफिसातून घरी आला की शंतनुला घराबाहेर काढण्यासाठी फार कष्ट करावे लागायचे. परंतु तिलाही थोडा मोकळेपणा हवा होता. तिने तत्काळ पंजाबी ड्रेस चढविला.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. हवेत कमालीचा उकाडा होता. रात्रीचे साडेनऊ झाले तरी हा उकाडा जाणवत होता. गावाबाहेरील ही कॉलनी गर्द झाडांनी व्यापलेली होती. रहदारी तशी चालू होती. कॉलनीच्या दुसऱ्या टोकाला एक आईसक्रीमवाल्याने गाडी लावली होती. तिच्याकडे बोट दाखवून शंतनू म्हणाला "चल, आईसक्रीमचा कोन घेऊयात!" तन्वीला आज तर एकावर एक आश्चर्यचे धक्के बसत होते.

 आईसक्रीमच्या गाडीपर्यंत दोघेही अगदी हातात हात घालून चालत होते. अचानक हवेत थंड वारा सुटला. जमिनीवर पडलेला पालापाचोळा वाऱ्याने अगदी हवेत उडवून दिला. तन्वी शंतनुला उगाचच बिलगली. आईसक्रीमवाला वाऱ्याचे रूप पाहून आपला गाशा गुंडाळायाच्या मागे होता. त्याने घाईघाईने ह्या दोघांना कोन बनवून दिले .

आपल्या कोनाचा पहिला हक्क शंतनुने तन्वीला दिला. आनंदाने फुललेल्या तन्वीचे ते मोहक रूप शंतनू आपल्या डोळ्यात साठवत होता की दूरवरून पावसाच्या जोरदार सरींचा आवाज दोघांनीही टिपला. "पळ शंतनु, पाऊस आला" तन्वी ओरडली. जमेल तितकं आईसक्रीम तोंडात भरून दोघांनी पळ काढला. अर्ध्या वाटेवर दोघांना पावसाने गाठल. एका झाडाचा आसरा घेवून दोघे थांबले. जोरदार पावसाने उरलीसुरली रहदारी थांबवून टाकली होती. आणि तितक्यात वीजहि गेली.

पहाटे चारच्या सुमारास तन्वीला जाग आली. बाजुलाच लहान मुलाप्रमाणे झोपलेल्या शंतनुला पाहून ती स्वतःशीच खुदकन हसली. रात्री पावसाने तास दोन तासभर जोरदार वर्षाव केला होता. आता मात्र आकाश बऱ्यापैकी निरभ्र झाले होते. कृष्णपक्षातील सकाळपर्यंत आकाशात रेंगाळणारा चंद्र तन्वीला खिडकीतून दिसला. अभावितपणे त्याच्या सोबतीला कुठे चांदणी दिसते का ह्याचाच ती शोध घेऊ लागली. आणि तिला चंद्राच्या बाजूलाच एक चांदणी दिसताच तिची कळी अजूनच खुलली. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कसे अचानक आपणासमोर येतात ह्याचेच तन्वीला राहून राहून आश्चर्य वाटत होते.  शंतनू तसा अगदी शिस्तीचा माणूस, त्याच्याकडून रात्री झालेला कलात्मक प्रेमाचा वर्षाव तिला अगदी अनपेक्षित होता.

तन्वी आणि शंतनू ह्यांच्या लग्नाला आताशा सहा महिने होत आले होते. शंतनु दुनियेच्या मापदंडाप्रमाणे अगदी आदर्श नवरा होता. नावाजलेल्या प्रवासी कंपनीत मोठ्या व्यवस्थापकाच्या हुद्द्यावर होता. लग्न झालेली बहिण आणि आई वडील असं सुखी कुटुंब होते. आई वडिलांना पुणे सोडून कोठे जायचे नसल्याने, तन्वी आणि शंतनुचा राजाराणीचा संसार कोल्हापुरात चालू होता. म्हणायला गेलं तर कोल्हापुरात दोघांचेही नातेवाईक होते. लग्नानंतर ह्या दोघांना बोलावण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली होती. तन्वीला ह्या सर्व गोष्टीत खूप मजा वाटे तर शंतनुला कंटाळा येई . शंतनुला नवनवीन पर्यटन ठिकाणे धुंडाळण्यात रस असे. ह्या मुद्द्यावरून कधी कधी दोघांत खटका उडे. परंतु तन्वी समजुतीने घेई. शंतनुसोबत आपणही काहीवेळा भटकण्यास जाऊया अशी मनाची तिने तयारी केली होती. आणि अचानक काल संध्याकाळी शंतनू मुन्नरला जाण्याची बातमी घेऊन आला.

तन्वीचे विचारचक्र असेच चालू होते. अचानक घड्याळाकडे तिचे लक्ष गेले. साडेपाच होऊन गेले होते. तन्वीने पुन्हा एकदा आपल्या राजसाकडे पाहिले. त्याची गाढ निद्रा अजून तशीच होती. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अजूनही कायम होती. हा अजून रात्रीच्या आठवणीतून बाहेर आला नाही वाटत ह्या खट्याळ विचाराने तन्वी अजून हसली.

तन्वीने स्वतःसाठी चहा बनविला. चहाचे घुटके घेत ती गॅलरीत आली. पूर्वेला आता उजाडून येत होते. रात्रीच्या पावसाने सर्वत्र पालापाचोळा विखरून दिला होता. काही फांद्याही मोडल्या होत्या. पक्षांचा मधुर किलबिलाट सुरु होता. मुन्नारला जाण्याबाबत तन्वीने काल रात्री विचारच केला नव्हता. विचार करायला म्हणा वेळच कुठे मिळाला होता तिला! पण आता मात्र तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले होते. तिची वाणिज्य शाखेतील पदवी होती. मुंबई सोडून कोल्हापुरात येतानाच तिला जीवावर आले होते. लवकरच कोठेतरी छोटी नोकरी मिळवावी असा तिचा मानस होता . परंतु शंतनु हे तिचे बोलणं मनावर घेत नव्हता आणि आता हे मुन्नरचे प्रकरण उद्भवल्याने आपली नोकरी आता अजून पुढे ढकलली जाणार ह्याची तिला खात्री झाली होती. ती ह्या विचाराने काहीशी अस्वस्थ होती. तिचे हे विचारचक्र शंतनुच्या अलगद स्पर्शाने खंडित झाले. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं, शंतनूने तिला एक स्मित हास्य दिलं. तन्वीच्या मनात अचानक सकाळच्या भाजीचा विचार आला आणि ती ताडकन उठून स्वयंपाकघरात गेली. शंतनुचा पुरता हिरमोड झाला होता. हिला दोन मिनिट बोलायला काय झालं होत असा विचार करीत तो नकळत आपल्या नाखुशीच्या कोशात शिरला.

बाकी सकाळ मग तशी नेहमीप्रमाणे गेली . सर्व व्यवहार यांत्रिकपणे चालू होते. अंघोळ करताना टॉवेल विसरण्याचे नाटक करण्याचा विचार महत्प्रयासाने शंतनुने परतवून लावला. ऑफिसला निघताना त्याला टाटा करण्यासाठी तन्वी गॅलरीत आली. पण तिने हात उंचावून केलेल्या निरोपाकडे शंतनूने दुर्लक्ष केले.
सकाळ आता बरीच स्थिरावली होती. रात्रीच्या पावसाच आता नामोनिशाण नव्हत. तन्वीने चपाती दुधात बुडवत आईला फोन लावला, शंतनुच्या बदलीची बातमी द्यायला. "काय बाई हे! मुन्नरला बदली? मी सांगते हो तुला, तू इकडे नोकरी पहा मुंबईला. सहा महिन्यात तो परत येईल की नाही ते बघ! ते काही नाही मी आजच गजाननकाकांना संध्याकाळी तुझ्याकडे पाठवते" आईची ही अखंडवाणी सहन न होत तन्वीने फोन ठेवला. ती तशीच किती वेळ रिकामा पेला घेऊन खिडकीतून दिसणाऱ्या एकट्या चिमणीकडे पाहत राहिली ते तिचे तिलाच माहित!

तन्वीची तंद्री शेजारच्या मनीषाच्या बेल वाजविण्याने खंडित झाली. मनीषा सहजच गप्पा मारायला आली होती. तन्वीची एकंदरीत मुद्रा पाहून मनीषाने आपलं बोलणं आवरत घेतलं आणि ती परतली. तन्वीने घड्याळाकडे पाहिलं "अरे बापरे साडेनऊ होत आले, चटकन आवरायला हवं" ती स्वतःशीच म्हणाली. शंतनुला केलेल्या चपत्यातील उरलेल्या दोन मोरंब्यासोबत झटपट खाऊन तिने आपली न्याहारी आटोपली.  ती क्षणभर थांबली. तिने फोनकडे नजर टाकली आणि शंतनुला फोन लावला. तीन चार रिंगनंतर सुद्धा त्याने फोन न उचलल्यामुळे तिने फोन ठेवला. तो बऱ्याच वेळा सकाळी कामात व्यग्र असतो त्यामुळे बहुदा त्याने फोन उचलला नसावा अशी अटकळ तिने बांधली. "पण त्याने मुद्दाम उचलला नसेल तर?" असा विचार मनात आणून द्यायचा तिचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ती अगदी उदास झाली. उदासपणावर सतत कामात राहणे हाच रामबाण उपाय आहे हे बाबांचे बोल तिला आठवले. मग ती नव्या जोमाने कामाला लागली.
इतक्यात बाहेर फोन वाजतो आहे असा भास तिला झाला. ती  धावतच बाहेर गेली. शंतनू फोनवर होता. त्याची कायम असलेली नाराजी स्वरातून डोकावत होती. "ह्या महिनाअखेरीला शिफ्ट व्हावे लागेल" तो म्हणत होता. "आणि हो फोन उचलायला इतका वेळ का लागला?" "मी आंघोळ करतेय" तन्वीच्या ह्या उत्तरावर शंतनु क्षण दोन क्षणभर तो  फोनवर तसाच न बोलता थांबला. "ठीक आहे, ठेवतो मी फोन" असे बोलून त्याने फोन ठेवला होता. दोन प्रौढांच्या  रुसून बसण्याच्या खेळात थोडी रंगत आली होती.

जेवणं आटपून, टीव्ही पाहून तन्वी जरा पहुडली होती की दाराची बेल वाजली. गजाननकाका दारात उभे होते. ते थेट घरात शिरले. आईने त्यांना सर्व इत्यंभूत खबर दिली होती हे स्पष्ट होते. "वसुधा माझ्याशी सविस्तर बोलली, मी तुझ्यासाठी मुंबईत त्वरित नोकरी शोधतो. शंतनुराव काय सहा महिन्याच्यावर तिथे थांबायचे नाहीत" गजाननकाकांच्या बोलण्याकडे तन्वी दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु ते थांबायचे लक्षण दिसेना तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी शंतनूसोबत मुन्नारला जाणार!"
 

3 comments: