Thursday, February 6, 2014

थरार भाग २..


आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत ही केस राजवाड्यासाठी नक्कीच सर्वात कठीण केसमध्ये मोडत होती. कुठेच काही धागेदोरे मिळत नव्हते आणि त्यामुळे सर्व काही ठप्प असल्यासारखे झाले होते. सर्व थरांतून भोसलेवर दबाव येत होता आणि तो राग भोसले हल्ली सतत राजवाड्यावर रात्रीच्या फोनवरील संभाषणात काढत असत. राजवाड्यांनी मानसशास्त्रात बरीच पुढची पातळी गाठल्याने ते त्याचा स्वतःवर परिणाम न होऊन देण्याची काळजी घेत आपले काम चालू ठेवण्याची दक्षता घेत होते.
राजवाड्यांच्या घटनास्थळाच्या फेऱ्या सतत चालूच होत्या. असेच एक दिवस तिथून परतताना त्यांना एका वस्तीत एक आक्रोश करणारी स्त्री आणि आणि तिच्या सांत्वनाचा प्रयत्न करणाऱ्या शेजारी स्त्रियांची गर्दी दिसली. ह्यात म्हटलं तर लक्ष देण्याचं राजवाड्यांना काहीच कारण नव्हतं. परंतु आपल्या मुख्य कामात काहीच प्रगती होत नसल्याने त्यांनी तिथे वळून पाहायचं ठरवलं. त्यांनी टपरीवर बाईक लावून'कटिंगची ऑर्डर दिली. चहावाला तसा त्यांना ओळखून होता. थेट पोलिसातील नसला तरी हा अधिकृत माणूस आहे हे त्याला माहित होते. "काय झालं रे इथे?" पहिला घोट घेत राजवाड्यांनी त्याला विचारलं. "साहेब, परवाच्या ट्रेन अपघातात इथला माणूस गेला. तेव्हापासून त्याच्या बायकोला असले अधूनमधून झटके येतात आणि ती ओरडओरडा करते." चहावाला म्हणाला. राजवाड्यांना नक्कीच मोठा झटका बसला. दामिनी एक्स्प्रेस महागडी गाडी होती आणि त्यात ह्या वस्तीतला माणूस प्रवास करत होता म्हणजे जर आश्चर्य करण्याचीच बाब होती. "त्याचं नाव काय रे?" "गण्या शिंदे" टपरीवाला उत्तरला. "काय करायचा तो? "साहेब, एका बिल्डरकडे मदतनीस म्हणून काम करायचा" राजवाड्यांच्या डोक्यात काही विचार आला, उरलेला चहा एका घोटात संपवून ते तडक त्या वस्तीत घुसले. अजूनही आजूबाजूला घुटमळणाऱ्या गर्दीमुळे गण्याचे घर शोधण्यास त्यांना फारसा वेळ लागला नाही. 
एव्हाना गण्याच्या विधवा बायकोला आतल्या खोलीत नेण्यात आले होते. घरी गण्याचे आई वडील आणि भाऊ बसला होता. राजवाड्यांनी आपली खोटीच ओळख करून दिली. बिल्डरकडील कामाच्या निमित्ताने आपला आणि गण्याचा परिचय झाला होता वगैरे वगैरे. तिथे कोणीच बोलायच्या मूडमध्ये नव्हते हे पाहून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. बाकी गण्याच्या घरातील अत्यानुधिक टीव्ही, फ्रीज, फर्निचर पाहून ते काहीसे हैराण झाले होते. त्या वस्तीच्या आणि गण्याच्या त्यांना सांगितल्या गेलेल्या पेशाशी सुसंगत असे हे राहणीमान नव्हते.
घरी परतल्यावर चपला तशाच एका कोपऱ्यात भिरकावून एका झटक्यात त्यांनी भोसलेंनी दिलेली मृतांची यादी शोधून काढली. त्यांची शंका खरी ठरली होती, ह्या यादीत गण्याचे नाव नव्हतं. भोसलेंना त्यांनी फोन लावला. त्यांना ही यादी रेल्वेकडून मिळाली होती. पहिल्या दोन डब्यातील आरक्षण केलेल्या प्रवाशांची यादी आणि त्यातील जे जिवंत असल्याचा पुरावा आहे त्यांना वगळून ही यादी बनविण्यात आली होती. १७ जणांच्या ह्या यादीत गण्याचे नाव नसल्यावर त्यांनी ज्यांची नावे ह्या यादीत आहेत त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यास सुरवात केली.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून राजवाड्यांनी नवीनच उद्योग सुरु केला. ह्या यादीतील प्रत्येकाच्या परिसरात त्यांनी फेरफटका मारण्यास सुरुवात केली. दुपारी चारपर्यंत त्यांनी सात घरे आटपली. प्रत्येक ठिकाणी खरोखर दुःखाचे वातावरण दिसले आणि अंत्यविधीला जाऊन आलेली माणसेही भेटली. आठवं नाव होतं मनोज मुलकानी. हे नाव त्यांना आधी कोठेतरी ऐकल्यासारखे वाटत होते. थोडावेळ मेंदूला ताण दिल्यावर त्यांना अचानक आठवलं. अरे हा तर सहा महिन्यापूर्वीच्या १२० कोटीच्या अफरातफरीच्या प्रकरणात अडकलेला माणूस! त्याचा पत्ता त्यांनी भोसलेकडून मिळविला.
शहरातील एका अलिशान वस्तीतील मुलकानीच्या बिल्डींगमध्ये राजवाड्यांनी प्रवेश केला त्यावेळी सायंकाळचे सात वाजले होते. "साहेब, कोणत्या फ्लैट मध्ये जायचे आहे?" इमारतीचा गुरखा विचारत होता. "साहेब त्या फ्लैट मध्ये सध्या कोणीच राहत नाही सर्व जण दिल्लीला आहेत." राजवाड्यांनी फ्लैट क्रमांक सांगितल्यावर गुरखा उत्तरला. गुरख्याने सांगितलेल्या माहितीनुसार अंत्यसंस्कार सुद्धा दिल्लीला करण्यात आले होते. आता मुलकांनीचा दिल्लीचा पत्ता शोधण्यासाठी सोसायटीच्या ऑफिसात राजवाडे शिरले तेव्हा सेक्रेटरी ऑफिस बंद करण्याच्या तयारीत होते. "तुम्हाला मला पत्ता देता येणार नाही" सेक्रेटरी संशयाने म्हणाले. शेवटी भोसलेची मदत घेऊन राजवाड्यांनी दिल्लीचा पत्ता मिळविला. तत्काळ सकाळच्या फ्लाईटचे मोबाईलवरून आरक्षण करून राजवाडे घरी परतले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. बऱ्याच दिवसांनी दमलेल्या त्यांना बऱ्याच दिवसांनी काहीशी मनःशांती मिळाली होती.

No comments:

Post a Comment