Thursday, April 10, 2014

बोलघेवड्या मोटारगाड्या !


मनुष्यप्राणी कधीच स्वस्थ बसत नाही. आहे त्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणता येईल ह्याचा मनुष्यप्राणी आणि त्याचा मेंदू सतत विचार करीत असतो. समाजातील व्यक्तींचे अनेक प्रकारात वर्गीकरण करता येतं. ज्यांना दोन वेळेचं पोट भरण्याची भ्रांत नाही असा एक प्रकार आणि ज्यांना ही भ्रांत आहे असा दुसरा प्रकार! पहिल्या प्रकारातील काही लोक फावल्या वेळात कधी विधायक काम करतात तर कधी विघातक! संशोधन हा काहीसा विधायक प्रकारच्या कामाचा प्रकार आहे! आता काहींना रोजीरोटीसाठी संशोधन करावं लागते ही वेगळी गोष्ट!
असो आता मूळ मुद्द्याकडे! विधायक प्रकारच्या कामाचे उदाहरण म्हणजे भविष्यात एकमेकांशी संवाद साधू शकणाऱ्या मोटारगाड्याविषयीचे संशोधन! अशा गाड्या नजीकच्या भविष्यकाळात रस्त्यावर धावू लागणार आहेत! आणि हे काही कल्पनाचित्र नव्हे; हे खरोखर घडेल अशी दाट शक्यता आहे. अगदी ढोबळमानाने बोलायचं झालं तर रस्त्यावर धावणाऱ्या मोटारगाड्या एकमेकांना सतत मेसेज पाठवत राहतील. आणि ह्यामागील मुख्य उद्दिष्ट रस्त्यावरील सुरक्षितता हे असेल. गाड्यातील तांत्रिक बिघाड आणि मद्यपी चालक ह्यांच्यामुळे होणारे अपघात वगळता बाकीचे ८० टक्के अपघात अशा ह्या प्रस्तावित तंत्रज्ञानामुळे टाळले जाऊ शकतात असा अंदाज आहे! प्रत्येक गाडीतील यंत्रणा गाडीचे सद्यस्थान, वेग आणि संबंधित माहिती सेकंदाला अंदाजे १० मेसेज ह्या वेगाने पाठवीत राहील. हा संवाद रेडिओ सिग्नल आणि वाय - फाय तंत्रज्ञानाचा वापर करून साधला जाईल. जर दोन गाड्या एकमेकांवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर वाहनातील संगणक चालकास तत्काळ सतर्क करील. ह्या क्षणी चालक एक तर तात्काळ ब्रेक दाबेल किंवा गाडी दुसऱ्या दिशेला वळवेल! हल्ली जवळजवळ सर्वांकडे असलेले स्मार्टफोन गाडीतील संगणकाशी संपर्क करायला वापरले जाऊ शकतील असा अंदाज आहे. आणि त्यामुळे खर्च कमी होऊन ह्या तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रमाण वाढीस लागेल असा अंदाज आहे.
कागदावर वाचण्यास नक्कीच सुरेख कल्पना आहे ही! परंतु ह्यातील काही संभाव्य त्रुटी खालीलप्रमाणे (अमेरिकेतील वापरासाठी!!)
१> ह्या तंत्रज्ञानाचा सर्व गाड्यांनी वापर करणे आवश्यक आहे. समजा अर्ध्या गाड्यांत हे तंत्रज्ञान आहे आणि अर्ध्यात नाही असला प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो.
२> बराच वेळ, दिवस  सर्व काही सुरुळीत चाललं तर चालक गाफील राहू शकतो आणि ज्यावेळी खरोखर गरज आहे तेव्हा गडबड होऊ शकते.
३> समजा संदेशवहनाचे नेटवर्क अचानक बंद पडले तर रस्त्यावर सावळागोंधळ माजेल! अधिक गंभीर गोष्ट म्हणजे बंद पडायच्या क्षणी आणि त्यानंतर काही मिनिटे अपघाताची दाट शक्यता उद्भवेल!
४> घातपात करणाऱ्यांसाठी हे एक मुख्य लक्ष ठरू शकते.
५> हे तंत्रज्ञान सतत वापरात राहिलं तर एक वेळ अशी येईल की स्वतः गाडी चालवलेले मनुष्यप्राणी दुर्मिळ होतील! जसे की हल्लीचा चांगल्या संस्कृतीच्या लोप पावण्याचा काळ सुरु आहे. ज्यांनी चांगला सुसंस्कृत काळ पाहिला आहे त्यांना ही थेरं आवडत नाहीत. परंतु सतत हेच चालू राहिलं तर एक वेळ अशी येईल ज्यावेळी ही थेरं म्हणजेच समाजाची संस्कृती बनेल.


असो ह्या तंत्रज्ञानांचे भारतीय रूप काही काळाने मुंबईत सुद्धा येईल. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांचे काही संवाद खालीलप्रमाणे!
१) एक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश पाठवेल - "जरा जपून ग बाई! सिग्नल तोडू नकोस. मामा सिग्नलच्या पुढे लपून बसला आहे!"
२) सिग्नल चालू असतानासुद्धा आपल्या हातवाऱ्यांनी वाहतुकीचा बोऱ्या वाजविणाऱ्या हवालदारास - "अरे! काय चालवलंय काय तू ? व्यायाम करायचा असेल तर घरी जाऊन कर की! आमचा गोंधळ करू नकोस!"
३) एक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश पाठवेल - " अग बाई! काय मोठा खड्डा होता हा! कंबरच मोडली माझी! बाम वगैरे आहे का तुझ्याकडे !
४) मोटार गाडी बेस्ट बसला - " अग लालुताई! बसस्टॉप वरून तुला तिरकच निघायला हवे काय? जरा सरळ चाल की!
५) मोटार गाडी रिक्षाला - "अग बाई! स्वतःची ताकद ओळख आणि उगाच भ्रुभ्रु करत माझ्याशी स्पर्धा करू नकोस!
६) मोटारगाडी रिक्षाला - "१८० अंशातून मान वळवली तर मोडणार नाय का?"
७) रस्त्याच्या उजव्या बाजूने उलट्या दिशेने भैय्याला घेऊन  येणाऱ्या सायकलीस - "एक जराशी चापटी मारली तर तुझ्या मालकासकट जमीनदोस्त होशील!"
८) कट मारणाऱ्या बाईकला "अग जीव द्यायचा असेल तर एकटी जाऊन जीव दे! उगाच मला आणि माझ्या मालकाला अडकवू नकोस!"


कालांतराने सभ्य भाषेतील संवाद काहीसा प्रभावी ठरत नाही असे प्रतिसाद मोटरगाड्या बनविणाऱ्या कंपन्यांना पाठविला जाईल. मग गाड्यांची अनेक मॉडेल्स बाहेर येतील - सुसंस्कृत स्विफ्ट, मराठीतून शेलके शब्दांचे आहेर देणारी स्विफ्ट, हिंदी - इंग्लिश मधून अपशब्द वापरणारी स्विफ्ट वगैरे वगैरे! अजून काही वेळाने ह्या भांडणात दुसऱ्या गाडीच्या मालकाशी सुद्धा सुसंवाद साधण्याची गरज भासेल. त्याचेही संशोधन होईल. "अबे बेवडे, दिखता नही क्या!" एखादी होंडा सिटी दुसऱ्या टोयाटोच्या मालकाला सांगेल. जर ते टोयाटोचे भडकू मॉडेल असेल तर ती स्वतःच होंडा सिटीवर चाल करून जाईल!


धन्य तो माणूस आणि धन्य त्या संशोधनाच्या विपुल संध्या!



1 comment:

  1. Ya gadyanvar Raj Thakare, gadyanmadhale sandesh marathitunach gele pahijet asa agreah dharu shaktat...

    ReplyDelete