Tuesday, July 2, 2019

असुनी भोवताली सारे!





गेल्या आठवड्यात बालपणीचा एक खास मित्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेऊन स्वर्गवासी झाला.  गेल्या एका वर्षात चाळीस-पंचेचाळीस वयोगटात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक सर्वांना सोडून गेलेला हा माझ्या माहितीतील पाचवा तरुण! 

हे काही वय नाही जिथं अशा आजाराने या भूतलावरील यात्रा अचानक संपवावी! हे असं वय जिथं मागची आणि पुढची अशा दोन्ही पिढ्या तुमच्यावर अवलंबून असतात. अशावेळी या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर किती मोठा आघात झाला असेल, ईश्वर त्यांना ह्या परिस्थितीतून उभं राहण्याची कशी काय शक्ती देत असेल ह्याचा विचार सुद्धा करवत नाही!  आजची ही पोस्ट दोन भागात विभागली गेली आहे. 

How is my life treating me?

अशा दुर्दैवी घटनांनंतर त्या टाळता येण्यासाठी ह्या व्यक्तींना कोणती काळजी घेता आली असती, किंबहुना ह्या वयोगटातील सर्वांना कोणती काळजी घेता येण्यासारखी आहे याविषयी प्रत्येकजण हिरीरीने आपली मते मांडत असतो.  त्यानं नियमित व्यायाम करायला हवा होता, आहाराबाबत शिस्त बाळगायला पाहिजे होती, नियमित विश्रांती घ्यायला हवी होती, मद्यपान आटोक्यात ठेवायला हवं होतं वगैरे वगैरे!

हल्ली मला या सल्ल्यांविषयी काही बोलावेसं वाटत नाही. इथं माझं एकच म्हणणं आहे ते म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला कसं वागवत आहे ही गोष्ट फारशी तुमच्या नियंत्रणात नाही!  तुमच्या दैनंदिन नोकरीच्या प्रवासात तुम्हांला किती कष्ट सहन करावे लागतात,  तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्ही किती प्रमाणात स्थिरावला आहात, तुमच्या कौटुंबिक जीवनात किती शांतता आहे हे सारे घटक तुम्ही कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी बऱ्याच अंशी तुमच्या नियंत्रणापलीकडे असतात! 

त्यामुळे नियमित / शिस्तीचा आहार, नियमित व्यायाम,  विश्रांती हे सर्व घटक जणू काही चैनीच्या बाबी आहेत असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे दुसऱ्या कोणाची परिस्थिती नक्की कशी आहे हे माहीत नसेल तर सहसा त्याविषयी टिप्पणी करू नये.  अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादा मित्र खरोखर अडचणीत असेल तर त्याला प्रत्यक्ष व्यावहारिकदृष्ट्या अथवा भावनिकदृष्ट्यासुद्धा आधार देण्याची खरोखरीची तयारी कितीजण दाखवतात?  त्यामुळे जणू काही प्रत्येकजण आपला आयुष्याचा लढा एकट्यानेच लढत असतो असे वाटावं ही परिस्थिती निर्माण झाली आहे !!

Have we lost our sensitivity / empathy altogether?
अजुन एक मुद्दा म्हणजे आपल्या समाजाची झपाट्याने ऱ्हास पावत चाललेली संवेदनशीलता! जी व्यक्ती आपल्यासोबत लहानाची मोठी झाली ती व्यक्ती आपल्याला अचानक सोडून गेल्यावर तिचे अंतिम दर्शन घ्यायला आपल्यातील किती जण जातात हासुद्धा कळीचा मुद्दा!  याबाबतीत मी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दोषी आहे! 

सोशल मीडियामधील ग्रुपवर,  मग तो फेसबुक वा व्हाट्सअप वरील असो;  ज्या ग्रुपवर ही व्यक्ती आपल्यासोबत सदस्य होती तिथं या व्यक्तीच्या निधनानंतर काही काळ तरी विनोद अथवा फुकाचे फॉरवर्ड करु नयेत इतकी तरी संवेदनशीलता आपण दाखवावी अशा मताचा मी होतो! परंतु हल्ली अगदी दुसर्‍या दिवसापासून या संवेदनशीलतेचा अंत झाल्याचे दिसून येते! 

कालाय तस्मै नमः !!

No comments:

Post a Comment