Sunday, April 27, 2014

न्यू इंग्लिश स्कूल प्रिमियर लीग - २०१४


लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केला. त्याचप्रमाणे २०१२ साली आमच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठीचा एक विरंगुळ्याचा उपक्रम म्हणून न्यू इंग्लिश स्कूल  प्रिमियर लीगची (NPL) स्थापना केली. परवाच २६ एप्रिल रोजी ह्या NPL ची तिसरी आवृत्ती मोठ्या शानदारपणे पार पडली. 
स्पर्धेत एकूण १२ संघांनी भाग घेतला होता. मागच्या शनिवारी चिठ्या टाकून ह्या १२ संघांची एकूण ४ गटात विभागणी करण्यात आली. भाग घेतलेले संघ खालीलप्रमाणे आपल्या असे लक्षात येईल की सर्वात ज्येष्ठ संघ हा १९८१ साली दहावी उत्तीर्ण झालेला असून सर्वात तरुण संघ २००२ साली दहावी उत्तीर्ण झालेला होता. अशा प्रकारे ह्या दोन्ही संघाच्या वयात  २१ वर्षांचा फरक असला तरी क्रिकेट ह्या खेळाने ह्या सर्वांना एकत्र आणले होते.

गट अ - १९९९, २००२ - निर्मळ शाखा, १९८६
गट ब -  १९८२, १९८८, २००२
गट क - १९८३, १९८५, १९९६
गट ड -  १९८१, १९८७, १९८९


प्रत्येक संघास विशिष्ट रंगाचा टी शर्ट देण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांपैकी बहुतेकजण व्यावसायिक जगात यशस्वी झाले आहेत. त्यातील उज्ज्वल म्हात्रे आणि अमोल पाटील ह्यांनी हे टी शर्ट खास मुंबईहून मागवले. . त्यामुळे ह्या स्पर्धेला नक्कीच एक प्रकारची झळाळी प्राप्त झाली.












































ह्या टी शर्टच्या रंग निवडीसाठी चिठ्या काढण्यात आल्या त्यावेळची ही चित्रे!



आपल्या आवडीच्या रंगाचा टी शर्ट मिळाल्याने खुश झालेले १९८१ बॅचचे प्रशांत वर्तक!





मागच्या दोन वर्षीच्या स्पर्धा रविवारी सकाळी सुरु करून दुपारपर्यंत चालल्या. मे महिन्यात सकाळी ९ वाजल्यानंतर उन्हात खेळणे फार कठीण होते (विशेषतः ८० च्या दशकात १० पास झालेल्यांसाठी!!) हे लक्षात घेऊन अमोल पाटील ह्यांनी पुढाकार घेवून विद्युतझोतात सामने भरविण्यासाठी खास पुढाकार घेतला. 

शाळेत २४ तारखेला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पटांगणात पिच बनविण्यात आले. आणि स्पर्धेच्या दिवशी म्हणजे २६ एप्रिलला सकाळी मैदानाच्या सीमारेषा, क्रीज, विद्युतझोतासाठीचे खांब अशा सर्व व्यवस्था करण्यात आल्या. 

प्रत्येक गटात ३ संघ होते आणि प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार होता. त्यामुळे एकंदरीत ३ * ४ = १२ साखळी सामने आणि ३ बाद फेरीचे सामने असे एकंदरीत १५ सामने होते. ४ ते १० ह्या वेळात हे सामने आणि एक प्रदर्शनीय सामना खेळवायचे असल्याने वेळेचे बंधन पाळणे फार आवश्यक होते. आनंदाची गोष्ट अशी की स्पर्धा सव्वादहाच्या सुमारास आटपली. भिडे सरांनी शिक्षकांचा संघ जमा करण्यात यश मिळविले आणि सुगंधा जोशी ह्यांनी महिला संघ तयार केला. 

२६ एप्रिल दुपार

दुपारी साडेतीन वाजताच माजी विद्यार्थी संघ मैदानावर हजर होऊ लागले होते. १९८२  बॅचचे रंजन सावंत हे खंदे खेळाडू! आपल्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेला विसरून ते सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी चारच्या आधीच हजार होते. 

चार वाजता वसईतील प्रसिद्ध खेळाडू आणि क्रिकेट प्रशिक्षक वसंत मोरे ह्यांचा शुभहस्ते मैदानावर श्रीफळ फोडून स्पर्धेचा शुभारंभ झाला. 








ह्या प्रसंगी स्पर्धेचे चेअरमन आणि ह्या ब्लॉगचे लेखक ह्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी ह्या स्पर्धेला व्यावसायिक रूप दिल्याबद्दल आयोजक समितीचे आभार मानले आणि स्पर्धकांनी मैदानाचे खडबडीत रूप पाहता जखमी न होण्याची दक्षता घेण्याची काळजी घ्यावी अशी विनंती केली. 




अ गटातील १९९९ विरुद्ध आणि २००२ निर्मळ ह्या संघातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. ह्या दोन्ही संघातील नाणेफेकीचा हा क्षण! हा सुरुवातीचा सामना अतिशय रंगतदार होऊन शेवटी बरोबरीत सुटला. १९९९ संघाने कमी विकेट गमावल्या होत्या. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्पर्धेत १९८६ हा एकमेव संघ येऊ शकला नाही. त्यामुळे ह्या एका सामन्याच्या निकालावर १९९९ संघ कमी विकेट गमावल्याच्या निकषावर उपांत्य फेरीत दाखल झाला. २००२ निर्मळ संघ - तुम्ही सुंदर खेळलात! पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच अजून पुढे जाल!





त्यानंतर ब गटातील १९८२ विरुद्ध २००२ वसई हा सामना झाला. माझे ज्येष्ठ बंधू संजीव पाटील हे सुरुवातीलाच बाद झाल्याने १९८२ संघाला धक्का बसला. त्यानंतर चंद्रशेखर गायकवाड आणि विवेक काणे ह्यांनी जबाबदार फलंदाजी करून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सचिन घरत, आनंद चौधरी आणि संदीप ठाकूर ह्यांनी मोलाची साथ दिली. परंतु २००२ च्या तरुण रक्ताच्या खेळाडूंनी चपळ क्षेत्ररक्षण करीत धावसंख्येला आळा घातला. आपल्या फलंदाजीच्या जोरावर २००२ संघाने हा सामना आरामात जिंकला. त्यानंतर गतवर्षीचे विजेते १९९६ संघ आणि उपविजेते १९८३ ह्यांच्यात एक चुरशीचा सामना झाला. १९९६ संघांचे चिन्मय गवाणकर ह्यांचा प्रसन्न मुद्रेतील हा एक फोटो!



१९९६ चे आणि माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार महेश अभ्यंकर ह्यांनी सर्व काही आलबेल असल्यांची ग्वाही दिली! बाजूलाच निळ्या शर्टातील त्यांचे प्रतिस्पर्धी उज्ज्वल म्हात्रे. उज्वल म्हात्रे ह्यांनी २०१३ स्पर्धेत सर्वोकृष्ट फलंदाजीचा पुरस्कार मिळविला होता. 




सर्व काही आलबेल असलं तरी नियमांचे पालन हे केलेच पाहिजे हे सांगायला महेश विसरले नाहीत. 



१९८३ साली उत्तीर्ण झालो असलो तरी आमच्या क्रीडाकौशल्याला कमी लेखू नका हे आपल्या खणखणीत फटक्याद्वारे सर्वांना बजावून सांगताना अमोल पाटील. त्यांच्या मागे उभे असलेले संदेश वर्तक! ह्या चित्रात जो क्षेत्ररक्षकाचा पाय दिसतोय तो चिन्मयचा आहे असे मानण्यास भरपूर वाव आहे. 





बॅकफूटवर जात महेश अभ्यंकर ह्यांनी मारलेला हा सुरेख फटका!




मग सामने जोरात चालू राहिले. १९८१ संघाचा प्रथम १९८७ संघाशी मुकाबला झाला. बऱ्याच वर्षांनी खेळत असल्याने १९८१ संघाला हा सामना जर कठीण गेला. परंतु पुढच्या सामन्यात त्यांनी जोरदार खेळ करीत १९८७ संघाला नमविले. वसईतील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर विजय फडके ह्यांनी ह्या विजयात मोलाची कामगिरी बजाविली. डॉक्टर विजय फडके हे १९८१ सालीच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण बोर्डात दहावे आले होते. त्याच्या आधीच्या वर्षी त्यांची भगिनी साधना फडके ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आली होती. त्याकाळातील न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्वांना ह्या आठवणी अजूनही लक्षात आहेत. 

ह्या सामन्यांमध्ये मग भावाभावांच्या बऱ्याच जोड्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसल्या. रमेदीचे पाटील बंधू, पारनाक्याचे अभ्यंकर बंधू, वासळईचे म्हात्रे बंधू, मुळगावचे वर्तक बंधू ह्यांचे संघ एकमेकांविरुद्ध ठाकले. ह्या सर्व बंधूंनी आपले बंधूप्रेम संघनिष्ठेच्या आड येऊ दिले नाही. 

मग योग्य वेळ साधून वसईतील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे ह्यांचे परदेशी मित्र ह्यांच्या हस्ते  वसंत मोरे ह्यांचा सत्कार करण्यात आला. जवळजवळ गेले ३० -३५ वर्षे वसंत मोरे हे वसई मैदानावर मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. 





आणि सर्व संघाचा आपल्या गणवेशातील एक सांघिक फोटो!

इतका वेळ प्रेक्षकगृहात बसून सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या महिलावर्गाने मग सामन्यासाठी मैदानावर प्रवेश केला. कार्यव्याप्तीमुळे शिक्षकवर्गाचा संघ हजर राहू शकला नाही. मग आयोजकांचा संघ त्यांच्याविरुद्ध मैदानात उतरला. १९८० बॅचच्या मिलिंद म्हात्रे ह्यांच्या दिलदार खेळामुळे महिलावर्गाने हा सामना जिंकला देखील!



गोलंदाजी करणाऱ्या चिन्मयचे लक्ष विचलित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारी सुगंधा जोशी! 



मराठीतून सामन्याचे समालोचन करणारे वसईतील भौतिकशास्त्राचे ख्यातनाम १२ चे शिक्षक  आणि १९८५ चे हेमंत डोंगरे! मध्येच आपण क्लास मध्ये आहोत असा त्यांना भास होत असे आणि ते इंग्रजीत समालोचन सुरु करीत. त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचे मित्र मुकेश ह्यांनी मध्येच समालोचनाची जबाबदारी स्वीकारली. परंतु पार्किंग लॉटमधील करिज्मा  गाडीच्या मालकाला ती बाजूला घेण्याची विनंती करीत असताना त्यांनी तिचा उल्लेख काळी करिश्मा असा केल्याने समस्त कपूर खानदान नाराज झाले आणि मग मुकेश ह्यांना समालोचनाच्या जबाबदरीतून मुक्त करण्यात आले!   



मधल्या काळात पंचांच्या निर्णयावरून काही वेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले. परंतु लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. 

बाद फेरीचे सामने सुरु झाल्यावर चषक प्रदर्शनीय भागात आणण्यात आले!




सामन्यांचा आनंद घेत असलेला प्रेक्षकवर्ग!





उपांत्य फेरीचे सामने १९९९ विरुद्ध १९८७ आणि १९९६ विरुद्ध २००२ वसई असे रंगले. १९८७ संघाने एका चुरशीच्या लढतीत १९९९ चा शेवटच्या षटकात पराभव केला. संज्योत वर्तक ह्यांनी एक अप्रतिम खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला! २००२ वसई संघाने एका सांघिक कामगिरीच्या जोरावर १९९६ च्या संघास हरविले. ह्या सामन्यात दुर्दैवाने महेश अभ्यंकर ह्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. त्यांना ३५ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. 

अंतिम सामना १९८७ विरुद्ध २००२ वसई ह्यांच्यात झाला. २००२ संघाने ५ षटकात ८९ धावांचे कठीण आव्हान १९८७ च्या समोर ठेवले. संज्योत आणि पेडणेकर ह्या दोघांनी प्रयत्नांची शर्थ केली.







परंतु शेवटी २००२ संघाने ही धावसंख्या यशस्वीपणे राखत न्यू इंग्लिश स्कूल  प्रिमियर लीग -  २०१४ चे विजेतेपद पटकाविले. शाळेचे चित्रकला विषयाचे माजी शिक्षक मोद्गेकर सर ह्यांच्या शुभहस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले!

उपविजेता १९८७ संघ - जोशी, निकेश वर्तक, अभिजित पाटील, संज्योत वर्तक, पराग पाटील, राउत!


१९८७ च्या संघाचा अजून एक फोटो

आणि न्यू इंग्लिश स्कूल  प्रिमियर लीग -  २०१४ चा विजेता २००२ संघ!



ह्या निमित्ताने २०१२ च्या स्पर्धेचा हा एक सांघिक फोटो!

















आमच्या संघाचा अतुल ह्याचा २०१२ सालचा एक फोटो!










ही सर्व छायाचित्रे काढणाऱ्या राहुल ठोसरचे, पंचांची भूमिका निभावणाऱ्या सुजित, चिन्मय, हेमंत बुवा आणि उज्ज्वल ह्यांचे मनःपूर्वक आभार! ह्या स्पर्धेच्या आयोजनात मोलाची कामगिरीबजावणाऱ्या सर्वांचे आभार!

आमचा संघ हरल्यावर अतुल आणि सचिन एका कोपऱ्यात मला म्हणाले, "अरे आपला जमाना गेला रे! नवीन पोरं काय खेळतात, कसली फिल्डिंग करतात!"
जमाना गेला नाही! पुढच्या वर्षी आम्ही नव्या जोमाने परत येऊ!





Thursday, April 24, 2014

वेळेचा सदुपयोग करण्याचे काही मार्ग!

मध्यंतरी अचानक एक गोष्ट ध्यानात आली. "वेळ मिळत नाही" अशी तक्रार बऱ्याच वेळा माझ्यासारखी पामरे करीत असतात. यशस्वी माणसांच्या तोंडी अशी वाक्ये सहसा ऐकू येत नाहीत. त्याचे विश्लेषण केल्यावर माझ्या बुद्धीनुसार काढलेले हे निष्कर्ष!
१> आपल्यासमोर असलेल्या कामांची यादी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या उतरत्या क्रमाने तयार असावी. ह्यातील पहिली तीन-चार  कामे झाल्यास समाधान मानावे. उरलेली कामे न झाल्यास चिंताग्रस्त होऊ नये. आधुनिक जगाचा एक नियम ध्यानात ठेवावा - जन स्वतःच्या समस्यांनी आधीच ग्रासलेले असतात त्यांना दुसऱ्यांच्या समस्या ऐकायला शक्यतो आवडत नाही.
२> महत्वाची कामे करताना आपली मनःस्थिती चांगली ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. वर्षाच्या शेवटी आपल्या कामगिरीचे चांगली, सुमार, वाईट असे जे वर्गीकरण होत असते ते आपल्या प्रत्येक क्षणाच्या, दिवसाच्या कामगिरीचे केलेले एकत्रीकरण असते. चांगली मनःस्थिती ठेवून कामे झटपट आणि चांगल्या प्रकारे संपविल्यास अधिक वेळ उपलब्ध असल्याची भावना निर्माण होते.
३> ह्या मुद्द्यावर माझे आणि हल्लीच्या जनांचे मतभेद होऊ शकतात. पण सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्या कामास सुरुवात केल्यास क्रमांक २ बऱ्याच वेळा आपोआप साध्य  होतो.
४> मर्यादित आहार ठेवल्यास मेंदू तरतरीत राहतो. आणि त्याचबरोबर घरातील गृहिणीचा स्वयंपाकघरातील वेळ मर्यादित राहिल्यास घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते.
५> शक्य असल्यास आपल्या कार्यस्थळाच्या जवळ निवास असावे. ही गोष्ट साध्य करणे बऱ्याच वेळा कठीण असते. अशा वेळी अगदी सकाळच्या कमी गर्दीच्या वेळात ऑफिसात पोहोचण्याचा प्रयत्न करावा. अर्धा तास लवकर निघून जर आपल्या प्रवासाला अर्धा तास कमी वेळ लागत असेल तर आपण एक तास अधिक निर्माण करीत आहोत हे ध्यानात ठेवावे. कमी गर्दीच्या वेळी रस्त्यावरील अडाणी लोकांशी गाठ पडण्याची शक्यता कमी असल्याने  क्रमांक २ साध्य होतो. त्याचबरोबर कार्यालयाच्या नियोजित वेळेच्या अर्धा- एक तास आधी पोहोचल्यास स्वतःची कामे करण्यासाठी अगदी विना- व्यत्यय वेळ मिळतो जो बराच फायदेशीर ठरतो. कार्यालयात लवकर पोहोचलो आता मित्राला फोन लावूयात असे विचार मनात येऊन देऊ नयेत.
६> जर आपण खरोखर मग्न आहोत अशी आपली समजूत असल्यास सामाजिक समारंभात आपला सहभाग मोजका ठेवावा. केवळ बायकोच्या बाजूच्या समारंभाला अनुपस्थित न राहता त्याच प्रमाणात आपल्या बाजूचे समारंभ सुद्धा टाळावेत. घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते.
७> आपल्या बायकोची आणि आपल्या बॉसची मानसिकता समजून घेण्यात योग्य वेळ घालवावा. ह्यातही बायकोची जास्त! एकदा का विवाहबंधनात पडायचे ठरविले की बायकोस खुश ठेवण्याचे तंत्र अवगत करणे क्रमप्राप्त ठरते. जेणेकरून नसते मनःस्ताप कमी होतात . परंतु कितीही प्रयत्न केला तरी अगदी अनपेक्षित कारणावरून हे प्रसंग उद्भवतातच! त्यावेळी मनातल्या मनात तरी स्वतःला दोष न द्यावा.
८> इतक्या मोठ्या आयुष्यात छोट्या मोठ्या चुका होतच राहतात. आबा आठवले असतील तुम्हांला! त्यामुळे ह्या चुकांमुळे विचलित होऊ नये. फक्त एकच गोष्ट - एकदा झालेली चूक पुन्हा करू नकोस असे मनाला बजावावे!
९> दुनियेची पर्वा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करावी. लोकानुनयासाठी आपण किती गोष्टी करतो ह्याचे विश्लेषण करून त्या गोष्टी मर्यादित ठेवाव्यात. दुनियेला आपल्याकडे लक्ष देण्यापलीकडे सुद्धा बाकीचे उद्योग असतात हे ध्यानात ठेवावे.
१०> केबलवरील मालिका, IPL ह्या सारख्या वेळकाढू आणि मती भ्रष्ट करणाऱ्या गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहावे. 


यादी लांबतच जाईल! पण ह्या लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे - महत्वाचे मुद्दे वरीलप्रमाणे, बाकीचे इतर मुद्दे लिहिण्यात मी वेळ घालवीत नाही!

Sunday, April 20, 2014

लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग २


राजीव पाटील - बहुजन विकास आघाडी


राजीव पाटील हे वसईत राजीवनाना ह्या नावाने ओळखले जातात. वसई विरार महानगर पालिकेचे प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पालघर जागेसाठी बहुजन विकास पार्टीचे उमेदवार बळीराम जाधव ह्यांना पाठींबा जाहीर केला आहे.  राजीव पाटील ह्यांच्या भाषणात त्यांच्या पक्षाने केलेल्या कार्याविषयीच्या आकडेवारीचे बरेच संदर्भ होते. त्यातील जमले तितके इथे उद्धृत करीत आहे.


'मी सध्या पंच्चावन वयात प्रवेश केलेला आहे. माझं लहानपणाचा काळ मी आठवतो किंवा इथे उपस्थित असलेले माझ्याहून ज्येष्ठ नागरिक जेव्हा पन्नास - साठ वर्षापूर्वीचा काळ आठवतील त्यावेळी परिस्थिती फार वेगळी होती. विरार गावात अवघ्या ४ मोटारी होत्या. त्यातील एक भाऊसाहेब वर्तकांच्या घरातील होती. गुजरातला जायचे असले तर भिवंडीमार्गे जावे लागे. त्या दिशेने जाणाऱ्या अगदी मोजक्या गाड्या होत्या. गेल्या ६० वर्षात चित्र बरेच पालटले आहे. भारताने खूप विकास साधला आहे. ज्या गुजरात राज्याचे हल्ली सतत उदाहरण दिले जाते तिथे अमूल डेयरीची स्थापना करण्यात आली आहे, मुंबईत सागरी सेतू बनविला गेला, नर्मदा सरोवर सारखी मोठी धरणे बांधण्यात आली. इंदिरा गांधींच्या कालावधीत भारतीय सेनादलाचा जगातील पहिल्या  ५ देशांत क्रमांक लागला. भारताने यशस्वीपणे अणुचाचणी केली. ती इतकी गुप्तपणे करण्यात आली की जगातील महाशक्तींना सुद्धा त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यावेळी 'बुद्ध हसला' हे सांकेतिक नाव वापरण्यात आले होते. मला ह्या नावाविषयी बरेच कुतूहल होते. एका ज्येष्ठ व्यक्तीकडे ह्याविषयी विचारणा केली असता त्यांनी शांततामय मार्गासाठी अणुशक्तीचा वापर करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याने शांततेचा संदेश देण्याऱ्या बुद्धाच्या नावाचा वापर केल्याचे स्पष्ट केले. राजीव गांधीनी तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतात माहिती आणि तंत्रज्ञान युग बरेच आधी येऊन स्थिरावलं असं म्हणता येईल. नरसिंहराव, मनमोहनसिंग ह्या नेत्यांनी जागतिकीकरणाचा प्रसार केला आणि भारताला एक जागतिक शक्ती बनविण्याच्या मार्गाकडे नेलं. भारतातील लोकशाहीशी तुलना फार तर अमेरिकेसोबत होऊ शकते. भारतात पहिल्या निवडणुकीपासून सर्वांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. बऱ्याच वेळा भारत आणि चीनची तुलना केली जाते. पण चीनमध्ये पोलादी भिंतीआड मानवी हक्कांचे कसे उल्लंघन चाललं आहे ते कोणालाच कळू शकत नाही. मी चीनमध्ये चार पाच वेळा गेलो. पण  केवळ शहरातील रम्य भाग आपणास पहावयास मिळतो. गावात काय चाललंय ते कळायला मार्ग नाही. तिथल्या चौकात ५ लाख विद्यार्थ्यांना चिरडलं जातं.
तर भारताला सन्मानाने जगासमोर नेणारा पक्ष म्हणून काँग्रेस ओळखला जाईल. अशा ह्या पक्षाशी आम्ही युती केली आहे. प्राथमिक शिक्षणावर भर देण्याचा आमचा भर राहील. ग्रामीण भागात ITI शिक्षण देणाऱ्या संस्था उभारण्याचा प्रयत्न करू. दर ५०००० लोकसंख्येमागे एक ITI संस्था उभारली जाईल. उच्च शिक्षणाद्वारे तंत्रज्ञान सुधारणा आणली जाईल. रोजगारनिर्मितीसाठी SEZ मॉडेलचा प्रसार केला जाईल. हे मॉडेल प्रामुख्याने ज्या विभागातून लोकसंख्येचे स्थलांतर होते (जसे की उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ) अशा ठिकाणी अंमलात आणले जाईल. नापीक जमिनीत SEZ केंद्रे उघडली जाऊ शकतात. वसईतसुद्धा अशी केंद्रे उभारण्यासाठी अनुकूल स्थिती असल्यास आम्ही त्याचा पाठपुरावा करू. ह्या लोकसभा मतदारसंघात वसई ते गुजरातच्या सीमेपर्यंतचे ८ तालुके आहेत. उत्तम प्रशासनाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची स्थापना करण्याची आमची मागणी राहील. शेतकऱ्यांसाठी आरक्षित भूभाग ठेवले जातील. शाळा, कॉलेज, नाट्यगृह ह्यांची संख्या वाढत्या लोकसंख्येला  पुरेल इतकी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक राहू. तारापूर अणुप्रकल्पामुळे प्रदूषित पाण्याचा मच्छिमारांना त्रास होतो त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवू. उघडीबोडकी झालेल्या जमिनी वनाखाली आणू. मुंबई हायमध्ये निर्माण होणारा गॅस हाजिराला जातो. येत्या पाच वर्षात इथला गॅस स्थानिक जनतेला उपलब्ध करून दिल्यास इंधनासाठी जी वनतोड होते तिला काही प्रमाणात आळा बसेल. सामुदायिक शेतीच्या मॉडेलचा एक प्रयोग यशस्वी झाला. असे मॉडेल सर्वत्र राबविण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पिण्याच्या पाण्याच्या एकंदरीत चार योजना आमच्याकडे आहेत ज्यांच्या योगाने येत्या १० वर्षात एक हजार दशलक्ष अधिक पाण्याचा पुरवठा ह्या भागास केला जाईल. विजेसाठी अधिक क्षमतेची ४ सब स्टेशन उभारली जातील. पड्घ्यावरून वीज गेली असे आपण म्हणतो, त्या पडघ्याच्या क्षमतेचे सब स्टेशन उभारलं जाईल. वसईच्या खाडीवरील पुलाचा पाठपुरावा करून मुंबईचे अंतर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. MMRDA ची हद्द विस्तारता येते का हे पाहू. आज ह्या भागातील म्हाडाच्या घरांच्या किमती खाजगी विकासकाच्या किंमतीइतक्या झाल्या आहेत. त्यावर आम्ही नियंत्रण आणू!"


ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर
मी गेले वीस वर्षे राजकीय पत्रकार म्हणून काम करीत आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपालिका मिळून जवळजवळ १०० निवडणुकाचे कवरेज मी केले आहे. दिल्ली विधानसभेतील निवडणुकीत झालेला आप पक्षाचा उदय आणि त्यानंतरचा अस्त मी जवळून पाहिला आहे. सुरुवातीच्या काळातील भाबडेपणा आता लोप पावला आहे. मला तुम्ही SADDIST म्हणू शकता, पण हल्ली मला आत्मपीडेतून आनंद मिळतो.
संसदीय कारभार हा लोकशाहीतील महत्वाचा घटक आहे. संसदेतील गेल्या  ५९ दिवसाचे कामकाज पाहिलं तर एकही दिवस गांभीर्याने चर्चा झाली नाही असे दिसून येतं. अन्नसुरक्षेच्या ज्या विधेयकाचा इतका गाजावाजा करण्यात आला ते केवळ मतानुनयासाठी मांडण्यात आले आहे. उमेदवाराचे कार्य, पक्षाची प्रतिमा पाहून लोकसभेसाठी मतदान केले जाते, जात असे. पण जेव्हापासून सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करण्याची वृत्ती उदयास आली, राजकारणाकडे एक करियर म्हणून पाहिलं जाऊ लागले तेव्हापासून सर्वकाही बदललं. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुका ह्या मार्केटिंगचे उत्तम उदाहरण म्हणून इतिहासात ओळखल्या जातील. सरकार कोणाचे तर मोदींचे, भाजपाचे नव्हे! दोघेही पंतप्रधानपदाचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यांना क्वचितच हात घालताना दिसतात. निवडणूक जिंकण्याचे एक तंत्र हल्ली विकसित झाले आहे. त्यात धनशक्ती, गुंडशक्ती, धर्म, जात ह्या सर्व अनिष्ट बाबींचा वापर केला जातो. १२८ वर्षाचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष सुद्धा व्यक्तीकेंद्रित निवडणुका करण्यावर भर देतोय. भाजपात मोदींची सभा घेण्यासाठी अहमहिका चालू आहे. कम्युनिस्ट पक्षासारखे काही अपवाद वगळता सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येते. प्रचारात व्यक्तिगत हेवेदाव्यांवर मुख्य भर आहे. जसवंतसिंग ह्यांची सुद्धा भाजपात अवहेलना झाली. ह्यात त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांचा हात होता. काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणूक लढविण्यात अजिबात रस नव्हता. मध्यंतरी मी सुझन जॉर्ज ह्यांचे 'How the other half dies' हे पुस्तक वाचले. अन्नधान्याचा कसा व्यापार चालतो हे त्यात उत्तमरित्या उल्लेखलेले आहे. जगातील अर्धे लोक उपाशी राहतात, भुकेने मरतात. ह्याचे मुख्य कारण अन्नव्यापार नियंत्रित करण्याचा एकाधिकारशाहीचा प्रयत्न! आणि त्यांना राजकारण्याचा छुपा पाठींबा असावा असे मानण्यास जागा आहे. मोठमोठाले उद्योग आणि सत्ताकारण ह्यांचा मेळ घातला जात  असून तो सर्व अर्थकारण व्यापून टाकत आहे. निवडणुकीचे गांभीर्य कमी झाले आहे. इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रतिनिधी आपल्या पक्षाचा जाहीरनामा बनविण्यात किती सहभागी झाले होते हा प्रश्न आहे. नाहीतर मग केवळ पोपटशाही दिसून येते.
जनतेने आपले हित पाहावे. भाबडेपणा बाळगू नका. पक्ष म्हणून विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. चांगले उमेदवार असतील तर त्यांना मत द्या. आपचे यश अभूतपूर्व होते ह्यात शंका नाही. विधानसभेचा प्रचार सुरु झाला त्यावेळी आपला ५ ते ६ जागा मिळतील असे मला वाटलं होतं. नंतर त्यांचा जोर पाहून १० -१२ जागा मिळतील असे वाटलं. शेवटी त्यांना २८ जागा मिळाल्या. मतांचे ध्रुवीकरण काही प्रमाणात पहावयास मिळालं. बसपा, काँग्रेस, भाजपा ह्यांच्या मतांच्या टक्केवारीत जो काही थोडाफार बदल घडला त्याचा एकत्रित फायदा आपला मिळाला. पण त्यांनी यश पचविण्याची क्षमता दाखविली नाही.
असे म्हणतात की जीवनभर मी एक चूक केली आणि आरश्यावरील धूळ पुसत राहिलो, पण खरेतर धूळ माझ्या चेहऱ्यावर होती. शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात ही मानसिकता आपण दूर केली पाहिजे. आता शेवट एक गोष्ट सांगून करतो. एका गावात एक राजा जाऊन प्रजेला विचारता झाला की तुम्हांला काही प्रश्न आहेत का? लोक काही समस्या सांगेनात. शेवटी एक माणूस बोलता झाला की गावात पक्षीच नाहीत. राजाला मग असे  आढळून आले की गावात एकही झाड नाही आणि मग त्याने प्रजेला प्रत्येकी एक झाड लावण्याचा सल्ला दिला. शेवटी काय तर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्या प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार!


प्रश्नोत्तरे


१> आपला पक्ष न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी एका वर्षात काय पावलं उचलेल?
प्रकाशन - न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरण्यावर आम्ही भर देऊ.
सहस्त्रबुद्धे - ह्या प्रश्नावर व्यापक चर्चा व्हायला हवी. न्यायमूर्तींची संख्या योग्य असली पाहिजे, रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. न्यायालयीन सुट्ट्यांचा पुनर्विचार व्हायला हवा. काही प्रमाणात न्यायमुर्तींचा जो लहरीपणा दिसून येतो त्यावर आळा घालता यायला हवा.
आप - आम्ही ग्रामन्यायालयाच्या कल्पनेस प्रोत्साहन देऊ. छोटे छोटे खटले ग्रामन्यायालयात सोडविले गेले पाहिजेत. न्यायमूर्तींना आपल्या मालमत्तेची घोषणा करणे बंधनकारक असले पाहिजे.
राजीव पाटील - आम्ही ह्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करू. न्यायालयाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. न्यायप्रक्रियेला काळाचे बंधन घालता यायला हवे, न्यायमूर्तीची संख्या वाढवायला हवी.


२> हा प्रश्न सहस्त्रबुद्धे ह्यांच्यासाठी
आपला पक्ष काँग्रेसमध्ये १० जनपथ घटनाबाह्य सत्ताकेंद्र असल्याची ओरड करतो मग आपण संघाच्या भाजपावरील प्रभावाचे कसे समर्थन कराल?
सहस्त्रबुद्धे  - प्रत्येक राजकीय पक्ष कोणत्या तरी चळवळीतून उदय पावला आहे. आपमध्ये सुद्धा समाजवादी विचारसरणीचे लोक जास्त आहेत. भाजपात संघाच्या विचारसरणीचे लोक असले तरी संघेतर विचारसरणी सुद्धा अस्तित्वात आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येकवेळी संघाच्या विचारसरणीनुसार निर्णय घेतले जातात असे नाही.
इथे प्रवीण ह्यांनी अजून एक मुद्दा मांडला. ही घटनाबाह्य सत्ताकेंद्रे सर्वत्र आहेत. अगदी आम्ही त्यातले नाहीत असे म्हणणाऱ्या कम्युनिस्ट पक्षात सुद्धा! शिवसेनेतही रिमोट कंट्रोल होताच की. हल्ली मी दोन पुस्तके वाचली. बारू आणि पंतप्रधानाचा आधीपासून परिचय होता. ह्यावरचा माझा ब्लॉग वाचा. बारुंच्या पुस्तकातील एकही गोष्ट दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीस नवीन नाही. हे सर्व मी सुद्धा जवळून पाहिलं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानासोबत किमान एक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री असावा अशी परंपरा आहे. पण ती मनमोहनसिंगच्या बाबतीत बऱ्याच वेळा पाळली गेली नाही. त्यांना एकटे पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.


३> हा प्रश्न राजीवनानांसाठी
UPA-2 हे आजवरचे सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असे म्हटले जात असताना आपला पक्ष त्या पक्षाला का पाठींबा देत आहे?
राजीव पाटील - हे जे काही म्हटले जात आहे त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहित नाही. आज सर्वत्र भ्रष्टाचार दिसतो. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे दिसत आहे. आम्ही भ्रष्टाचार दूर करण्यासाठी IT चा वापर करू. गेल्या वीस वर्षात राष्ट्रीय राजकारणात भ्रष्टाचार दिसत असला तरी नवीन पिढीत ह्याचे प्रमाण कमी आहे. मी नवीन पिढीविषयी आशावादी आहे. त्यानंतर त्यांनी Taxation Pattern आणि जागृत प्रसारमाध्यम ह्यांचा उल्लेख केला.


भाजपा - यंत्रणा सडलेली आहे. आमचा भर एका व्यक्तीवर आहे असे म्हटले जाते ते चुकीचे आहे. अबकी बार मोदी सरकार ह्यात अनुप्रासात्मक भाग जास्त आहे. गुजरातमध्ये सुद्धा यंत्रणा सडलेली आहे पण 'Catch the bull by its horn' ह्या उक्तीचा वापर करून आम्ही ह्या यंत्रणेस कामास लावलं. एकदम टोकाची भूमिका घेण्याची, घटनाबदल करण्याची वगैरे गरज नाही. जर शीर्षस्थ माणसाचा vested interest (स्वार्थी भूमिका) नसेल तर हा बदल घडवून आणता येईल. मोदी म्हणतात त्याप्रमाणे - हु खावो नथी आणि बिजानो खावानू देतो नथी  (चूकभूल माफ असावी) असा निर्धार केल्यास सर्व शक्य आहे.


४) हा प्रश्न भाजपसाठी
मतासाठी एखाद्या धर्माचे तुष्टीकरण करण्याची जी वृत्ती वाढीस लागली आहे त्यावर सर्व धर्म चार भिंतीतच ठेवावे हा उपाय तुम्हास कसा वाटतो?
सहस्त्रबुद्धे आम्ही सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणू. सर्वांना न्याय आणि कोणाचेही तुष्टीकरण नाही अशी आमची भूमिका राहील. एकगठ्ठा मतासाठी आम्ही कोणत्याही समाजाचे अनुनय करणार नाहीत.


ह्यावर बहुदा प्रवीण ह्यांनी प्रत्येक पक्षाने एकेक धर्मद्वेष्टा जोपासून ठेवला आहे अशी टिपण्णी केली.


५) हा प्रश्न खातू ह्यांच्यासाठी - केजरीवाल ह्यांची दिल्लीतील सत्ताग्रहण ही एक मोठी घटना झाली.  परंतु केजरीवाल ह्यांनी सत्तात्याग करण्याची घाई केली असे तुम्हांला वाटत नाही का? ५ वर्षात दिल्लीचे नंदनवन करून पुढील लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर देशापुढे गेला असतात तर ते अधिक योग्य झाले असते असे आपणास वाटत नाही का?


खातू - आम्ही काँग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केले. १० -१२ मुद्द्यावर कृती केली आणि त्यानंतर लोकपाल बिलाचा मुद्दा हाताशी घेतला. पुढे सरकार चालविण्यासाठी हे बिल पास करणे आवश्यक होते. हे बिल पास न करता सरकार चालविणे चुकीचे झाले असते.


प्रवीण - काँग्रेस आणि भाजपने खरेतर दिल्लीत लोकशाहीचे एक चांगले उदाहरण ठेवले होते. भाजपने सत्तेचा दावा केला नाही आणि कॉंग्रेसने आपला पाठींबा दिला. पण दिल्लीत आपचा प्रशासकीय अननुभवीपणा दिसून आला. आपने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांच्या बाबतीत जनतेच्या तीव्र भावना दिसून आल्या. एकदा का लोकपालाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर राज्यसरकारने त्यावर घटनेच्या चौकटीत राहूनच कृती करावयास हवी होती. Political Correctness नावाची एक संकल्पना असते जी आपला दाखविता आली नाही. १९८२ साली भाजपाने एक निर्णय घेतला होता की आमचे विधायक सभागृहातील वेलमध्ये जाणार नाहीत. पण तीन चार वर्षात सर्व विधायकांनी तक्रार केली की आम्हाला मिडियाचे लक्ष मिळत नाही. अभ्यासपूर्ण भाषणाला पेपरात दोन ओळींचे फुटेज मिळते तर वेलमधील गोंधळास ७ -८ ओळींचे! मग शेवटी भाजपने आपला निर्णय बदलला!


६> अंतिम प्रश्न - प्रत्येक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करतो. परंतु त्यातील वचनांची पूर्तता केली की नाही हे केव्हाच तपासून पाहिलं जात नाही. हा जाहीरनामा एक Legal Document म्हणून मानण्याविषयी आपल्या पक्षाचं काय म्हणणं असेल?


प्रकाशन - ह्या प्रश्नाविषयीच मला आक्षेप आहे. ह्यात मतदार हा एक ग्राहक आणि राजकिय पक्ष सेवापुरवठा करणारे असे अभिप्रेत आहे. परंतु तसे नसावे. जनता सुद्धा राजकीय प्रक्रियेचा भाग आहेत. जनता विरुद्ध राजकीय पक्ष असे स्वरूप देणे चुकीचे आहे.
ह्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची पुढील निवडणुकीच्या वेळी तपासणी करता येईल. दैनदिन व्यवहारात सुद्धा आपण ते तपासून पाहू शकू. प्रत्येक व्यक्तीस अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असावे असे आमचे म्हणणे राहील.


सहस्त्रबुद्धे  - मोदी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे जाहीरनामा ही श्रद्धा आणि गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. त्यातील प्रत्येक वचनाचे पालन करण्याचा आम्ही प्रतिज्ञापूर्वक प्रयत्न करू. त्यावर आम्ही कृती करू आणि त्याचा रिपोर्ट लोकांना देऊ.


खातू - प्रवीण ह्यांनी वापरलेल्या पोपटशाही ह्या शब्दप्रयोगाला तीव्र आक्षेप घेतला. इथले प्रत्येक प्रतिनिधी जबाबदार व्यक्ती आहेत. आम्ही काय बोलतो ते आम्हांला चांगलच कळते. ह्याविषयी पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे ते मला माहित नाही, पण माझे मत असे आहे की पुढील वर्षी पुन्हा सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांनी काय कृती केली ह्याच स्पष्टीकरण मागावं. केजरीवालह्यांना बोलवावं!


राजीव पाटील - जाहीरनामा हा एक विचार आहे. ह्यातील प्रत्येक बाबीचे पालन करणे कठीण आहे पण त्या सर्व बाबींचा पाठपुरावा करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू. मतदारराजा जागृत आहे ह्याचे आम्हांला चांगलेच भान आहे
कार्यक्रमाच्या शेवटी महेश अभ्यंकर ह्यांनी आभारप्रदर्शन केले. आणि एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. खंत एकाच की इतक्या सुंदर कार्यक्रमास जनतेचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. असे कार्यक्रम किती ठिकाणी होत असतील माहित नाही, पण प्रत्येक पक्षाने जाणकार लोकांना ह्या सभेला पाठविले आणि प्रत्येक प्रतिनिधीने उत्तम ज्ञान प्रदर्शित केले. आपली उदासीनता झटकून देण्याची हीच वेळ आहे. प्रवीण ह्यांनी सांगितलंलेल्या गोष्टीप्रमाणे झाड हे प्रत्येकालाच लावावं लागेल!













लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग १


वसईमध्ये चिन्मय गवाणकर आणि मित्रमंडळी दोन - तीन संघटनाच्या माध्यमातून सुरेख असे सामाजिक प्रबोधन घडविण्याचे कार्य गेल्या काही वर्षात करीत आले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि जागरूक नागरिक संस्था वसई ह्या दोन संस्था ह्या बाबतीत प्रामुख्याने गणल्या जातील. १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागरूक नागरिक संस्था वसई ह्यांनी प्रमुख राजकीय पक्षांना राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची एक प्रश्नावली सादर केली होती आणि ह्या प्रश्नांबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय स्पष्ट करण्याची विनंती केली होती. परंतु दुर्दैवाने दिलेल्या मुदतीत ह्या प्रश्नावलीला उत्तर देण्याची तसदी एकाही पक्षाने घेतली नाही. परंतु त्याने नाउमेद न होता शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ह्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना एका व्यासपीठावर बोलावून लोकसभेसाठी आपल्याच पक्षाची निवड लोकांनी का करावी हे पटवून देण्याचे आव्हान करण्यात आले होते. समाधानाची गोष्ट म्हणजे ह्या राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना पाठवलं आणि एका सुरेख बौद्धिक चर्चेत सहभाग घेतला. मी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला तो आपल्या सर्वांना मिळावा म्हणून ही ब्लॉग पोस्ट! ह्यातील माझ्या नोंदी १०० टक्के अचूक असतीलच असे नाही त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी!




ह्या परिसंवादात भाग घेतलेले विविध पक्षांचे प्रतिनिधी ह्या प्रमाणे


डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (भाजपा)
श्री. गजानन खातू (आम आदमी पार्टी)
कॉम्रेड के. प्रकाशन (CPI - M)
श्री. राजीव पाटील (बहुजन विकास आघाडी)


न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा सचिव चिन्मय आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर ह्यांनी ह्या कार्यक्रमाच्या संचालनाची जबाबदारी पार पाडली.


कार्यक्रमाच्या आरंभी चिन्मयने सर्व प्रतिनिधींना ह्या चर्चेचे स्वरूप राष्ट्रीय पातळीवरील धोरणासंबधित मुद्द्यांशी सीमित ठेवत तिला प्रत्यक्ष उमेदवारांसंबंधित मुद्द्यांवर न आणण्याचे आवाहन केले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सर्वांनी ते पाळले. प्रत्येक प्रतिनिधीला वीस मिनिटाची मर्यादा आखून देण्यात आली होती.




श्री. गजानन खातू (आम आदमी पार्टी)
सर्वप्रथम आम आदमी पक्षाचे श्री गजानन खातू आपल्या पक्षाचा जाहीरनामा / धोरण स्पष्ट करण्यासाठी व्यासपीठावर आले. भ्रष्टाचार हा केवळ एकच मुद्दा घेऊन आप पक्ष आपला लढा लढत असल्याचा काहीसा गैरसमज समाजात दुर्दैवाने पसरला असून ती सत्यपरिस्थिती नाही; शेती, संरक्षण, अंतर्गत सुरक्षा अशा अनेक मुद्द्यासहीत एकूण ३६ मुद्दे असलेला आप पक्षाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ह्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त भ्रष्टाचार, प्रशासकीय कारभार (Governance) अशा व्यापक मुद्द्यावर चर्चा होईल अशी आपली अपेक्षा होती परंतु मुख्य पक्षांनी सर्व रोख व्यक्तीकेंद्रित चर्चेकडे वळविला आहे. प्रत्येक पक्षाच्या विचारसरणीचे वैशिष्ट्य असते जसे की डाव्या पक्षांची बंदिस्त विचारसरणी, उजव्या विचारसरणीचा भाजपा, गेल्या काही वर्षात मुक्त आर्थिक धोरणाचा अंगीकार करणारा काँग्रेस पक्ष वगैरे. खरे तर समता, बंधुता ह्या सारख्या जीवनमुल्यांना खोलवर स्पर्श करणारी आपली भारतीय घटना अंगीकारणे हाच एक मोठा जाहीरनामा असू शकतो. ह्या घटनेने दाखवून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे हे ही मोठे काम आहे.
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा दोन पातळीवर असतो. राष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपाल विधेयक वगैरे मार्ग आप पक्षाने अनुसरले आहेत. परंतु दैनदिन व्यवहारातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे. स्थानिक पातळीवर समित्या नेमल्या जातील. पोलिस यंत्रणा ह्या समित्यांबरोबर समन्वय साधेल. इथे खरे तर खातू ह्यांनी answerable असा शब्दप्रयोग केला. आप पक्ष स्वराज बिलाचा पाठपुरावा करेल. लोकपाल कायद्याच्या अखत्यारीत पंतप्रधानसुद्धा यावेत असा प्रयत्न केला जाईल. सध्याची निवडणूक प्रसारमाध्यमाद्वारे लढविली जात आहे. ह्यात पैशाचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो.
निवडणुकीच्या सद्य प्रणालीत बदल घडवून आणण्याचा आप पक्षाचा प्रयत्न राहील. हल्ली असे आढळून येते की एखाद्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात २ - ३ टक्क्यांचा जरी फरक पडला तरीसुद्धा त्यांना मिळालेल्या जागांमध्ये १० - १०० इतका लक्षणीय बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात राजकीय पक्षांना जागा मिळाव्यात ह्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा आप पक्षाचा मानस आहे. त्यानंतर खातू ह्यांच्या बोलण्याचा रोख भांडवलशाहीकडे वळला. आज खुल्या स्वरुपात भांडवलशाही जरी अस्तित्वात नसली तरी छुप्या स्वरुपात ती नक्कीच आहे.  ज्याच्या उत्पादन खर्च केवळ २ रुपये १० पैसे प्रतीयुनिट  आहे अशी गोष्ट एक मोठी कंपनी ४ रुपये २० पैशाच्या  किमान दराने वीज विकते ही भांडवलशाहीच आहे. आपल्या देशाचा GDP ८ - १०% टक्क्यांनी वाढले ह्यात भांडवलशाहीचा वाटा किती? वेतनआयोगामुळे पगारवाढ होते तीही GDP मध्ये समाविष्ट होतेच ना! आपल्या देशाच्या एकूण उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पादन हे कृषीउत्पादन आहे पण त्यावर देशातील ५० टक्के जनता अवलंबून आहे. आज वसईची स्थिती अशी आहे की इथे केवळ १० टक्के वस्तूंची निर्यात केली जाते पण ९० टक्के वस्तू आयात केल्या जातात. आपला देश सोने आणि तेलाचा मोठा उपभोक्ता आहे. मध्यंतरी आपल्या देशाची तुट कमी झाली त्यात मुख्य कारण आपण त्या कालावधीत सोन्याची आयात कमी केली हे होते. आपल्या देशातील शेतीविषयक चर्चा प्रामुख्याने शेतीउत्पादनाच्या अनुषंगाने होते. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. आप पक्ष शेतकऱ्यांसाठी कमिशनचा पाठपुरावा करील. शेतकऱ्यांना उत्पनाचे संरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करतं. परंतु पुढील मोसमात शेतकरी उभा कसा राहणार ह्याचा विचार कोणी करीत नाही. मधल्या सहा महिन्यातील शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचे काय? मुख्य खनिज, पाणी ह्यासारख्या स्त्रोतांवर सरकारचं जरी नियंत्रण असलं तरी त्याच्या वापरासाठी जनतेची संमती आवश्यक असायला हवी. पावसाच्या पाण्यावर स्थानिक जनतेचा हक्क असायला हवा. अशा शब्दांत खातू ह्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.


कॉम्रेड के. प्रकाशन (CPI - M)
कम्युनिस्ट पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचे निधन झाल्याने त्यांचे पूर्वनियोजित प्रतिनिधी ह्या समारंभास हजर राहू शकले नाहीत आणि त्याऐवजी कॉम्रेड प्रकाशन  ह्यांनी इथे उपस्थिती लावली. १९९७ साली मी केमटेक्स मध्ये असतानाचे प्रकाशन हे माझे सहकारी! आपल्या पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील समस्यांवर १७ मुद्द्यांचे एक कागदपत्र प्रसिद्ध केले आहे. आधी खातू ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात पक्षाला लोकसभेत जागा मिळायला हव्यात. प्रत्येक पक्षाने आपल्या पसंतीक्रमानुसार आधीच एक यादी प्रसिद्ध करावयास हवी. समजा त्या पक्षास टक्केवारीच्या प्रमाणानुसार १० जागा मिळत असतील तर ह्या यादीतील पहिले १० उमेदवार लोकसभेत निवडले जातील.
राज्यपातळीवर जे निर्णय घेतले जातात त्यासाठी विधानसभेची परवानगी असणे आवश्यक असावे. तेलंगणा निर्मितीचा निर्णय लोकसभेत घेतला गेला हे चुकीचे आहे. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही निर्णय केवळ केंद्रातील मंत्रिमंडळ घेते ते चुकीचे आहे. ह्या निर्णयांत लोकसभेतील सदस्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मध्यंतरी प्रणव मुखर्जी अमेरिकेत असताना संरक्षणविषयक एक करार होऊ घातला आणि मग अचानक तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना तातडीने अमेरिकेत नेण्याची वेळ आली. ह्या प्रक्रियेत ह्या तिन्ही दलांच्या प्रमुखांचा सुरुवातीपासून समावेश असणे गरजेचे होते. आमचा पक्ष संशोधनास योग्य प्रोत्साहन देईल.
देशात आज विविध प्रकारे लोकसंख्येचे स्थलांतर सुरु आहे. जसे की मुंबईतील जनता वसईत स्थलांतरित होत आहे. दीड - दोन कोटींची सदनिका विकत घेणे बहुसंख्य जनतेच्या आवाक्याबाहेर आहे. अशा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावयास हवे. सर्व जेष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन कसे मिळेल ह्याचा विचार करावयास हवा. आज आपल्या देशातील गरिबांची परिस्थिती फार बिकट आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षण, लसीकरण ह्यासारख्या मुलभूत सोयी पोहोचत नाहीत. आपल्या देशातील गरिबांची संख्या वाढत चालली आहे असे आपण म्हणतो. आपल्या अपत्यांच्या जगण्याची शाश्वती नसल्याने अधिक अपत्य होऊन देण्याकडे गरीबांचा कल असतो. आज राजकारणात विविध कार्यकर्त्यांची सेवा पैसा फेकून विकत घेतली जाते. दिवसाचा दर ७५० ते १००० रुपयांपर्यंत असतो. ह्याला आमचा पक्ष अपवाद आहे. करोडो रुपये प्रसारमाध्यमांवर, परदेशी कन्सल्टिंग फर्मवर खर्च केले जातात. एखादा ब्रैंड निर्माण करण्यासाठी अफाट पैसा राजकारणात सुद्धा खर्च केला जातो. मोठमोठाल्या उद्योगांनी, विविध वृत्तवाहिन्यांनी  निवडणुकीत न भूतो न भविष्यति असा रस घेतल्याचे दिसून येते. मुसोलिनी ज्याचे नाव fascism शी निगडीत आहे त्याने म्हटले होते, 'fascism should rightly be called corporatism'. आज भारतात आपणास मोठमोठाले उद्योग आणि राजकीय शक्तींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया दिसत आहे. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा अशा प्रकारचा फेसिझम उदयास येताना दिसतोय. सुमारे वीस वर्षांपूर्वी भारतात उदार आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं आणि विदेशी गुंतवणुकीस चालना देण्यात आली. बऱ्याच वेळा विदेशी गुंतवणूक भांडवलशाहीला प्रोत्साहन देते. त्यांना समाजकल्याणकरणाऱ्या योजनांवर पैसा खर्च केलेला आवडत नाही. समाजकल्याणकरी योजनांच्या अभावी दूरदृष्टीने पाहिले असताना समाज काहीसा दुर्बल बनतो. रोजगाराचे प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले असे आपण म्हणतो, पण १.५ % ह्या दराने वाढणाऱ्या लोकसंख्येचे काय? आणि बरेच रोजगार (उदाहरणार्थ कुरियर बॉय, बूटपॉलीश करणारे) असे आहेत की ज्यात आत्मसन्मान नाही. आमचा पक्ष ट्रेड युनियनआधारित राजकारणास प्रोत्साहन देईल. हक्काधारित राजकारण करण्याकडे आमचा कल राहील. अन्नाचा हक्क सर्वांना मिळावा असा आमचा प्रयत्न राहील. काँग्रेसने फूड बिल आणले. पण ते केवळ वार्षिक उत्पन्न ५९००० रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या लोकांसाठी आहे. ह्या उत्पन्नाखालील लोक हे आर्थिकदृष्ट्या अगदी दुर्बल असे मानले जाऊ शकतात. आमचा पक्ष बहुतांशी लोकांसाठी अन्नाचा हक्क आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारत हा देश विशाल आहे. ह्या देशावर कोणी एकच पक्ष सत्ताधारी बनू शकतो असे मानणे चुकीचे राहील. त्यामुळे आमचा पक्ष सदैव युतीच्या सरकारांच्या तत्वाचा पुरस्कार करीत आला आहे. ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार नाहीत तिथे आम्ही आप पक्षाला विनाअट पाठींबा देऊ.


डॉ. सहस्त्रबुद्धे भाजपा 
रुईया कॉलेजात वर्टी सरांच्या शिक्षकी पेशातील कालावधी मी अनुभवला आहे.
१९७७ सालानंतर काँग्रेसेतर पक्ष सुद्धा शासन देऊ शकतात हा समज हळूहळू पसरू लागला होता. ह्या कालावधीत भाजपाने काँग्रेसनंतरचा दुसरा क्रमाकांचा पक्ष म्हणून आपले स्थान पक्के करण्यास सुरुवात केली होती. १७ राज्यात भाजपाने स्वतः किंवा मित्र पक्षांबरोबर आघाडीचे सरकार आणले आहे. हा तुलना करण्यासाठी ऐवज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे १९९८ ते २००४ ह्या कालावधीतील वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची कामगिरी आणि २००४ ते २०१४ ह्या कालावधीतील काँग्रेस पक्षाची कामगिरी हा तुलना करण्यासाठीचा ऐवज उपलब्ध आहे. गुजरात राज्यातील विकास आकड्यांचा बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. पण मुख्य म्हणजे चांगले जीवन जगण्याच्या जनतेच्या आकांक्षेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. गेल्या दहा वर्षातील केंद्र सरकारची कामगिरी पाहिली असता विकासाचा घटता दर, गमावलेली आंतरराष्ट्रीय पत ह्या गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. आमचा पक्ष अधिकाराधिष्टीत राजकारणाचा पाठपुरावा करील. गेल्या दहा वर्षात नेतृत्वाची अकार्यक्षमता प्रामुख्याने नजरेत भरते. पूर्वी चीन आणि भारत ह्यांची जोडीने तुलना केली जात असे. परंतु सध्या तसे आढळत नाही. आपणास दुहेरी नेतृत्व पहावयास मिळाले. पंतप्रधानांकडे असलेली मर्यादित निर्णयक्षमता पहावयास मिळाली. भ्रष्टाचार, कुशासन ह्या समस्यांनी आपणास व्यापले गेले आहे. सकारात्मक, हेतुपूर्वक राजकारण करण्याकडे भाजपचा कल राहील. भारतात एकंदरीत १३५० च्या आसपास राजकीय पक्ष आहेत. त्यातील सुमारे ५० पक्षांचे विधायक / लोकप्रतिनिधी आहेत. ह्या ५० पक्षांपैकी ४० पक्ष घराणेशाहीशी संबंधित असल्याचे आपणास आढळून येते. उरलेल्या १० पक्षांपैकी ३ कम्युनिस्ट पक्ष आहेत आणि १ पक्ष भाजपा हा आहे. Politics ऑफ performance (कामगिरीआधारित राजकारण) करण्याकडे आमचा कल राहील.  सध्या एकंदरीत सामान्य जनतेच्या मनात लोकशाही, निवडणुका ह्या प्रकाराविषयी औदासिन्य आल्याचे आढळून येते. लोकशाहीने माझ्या ताटात काय वाढलं? हा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे. परंतु भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे तिथे बऱ्याच वेळा ते पुन्हा निवडले गेल्याचे आपणास आढळून येते. शहर वाहतुकीचा सफल प्रयोग झालेले अहमदाबाद हे भारतातील एकमेव शहर आहे. कृषिविकासाचा दर गुजरातमध्ये १० टक्के तर मध्य प्रदेशात १६ टक्के आहे. सर्वसमाविष्ट विकास (inclusive / participative  development) करण्याकडे आमचा कल राहील. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आम्ही हाताळू. संरक्षणखात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे जे आरोप होत आहेत त्याकडे आम्ही लक्ष देवू. आपल्या भारतात नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली जी  चार पाच राज्ये आहेत त्यांतील प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येतो. हे समन्वय आणण्याकडे आमचा कल राहील. बालसंगोपन, आरोग्य ह्या मुद्द्यांकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष पुरवू. मातृत्वाच्या सुट्टीसोबत पितृत्वाची रजासुद्धा मिळावी असा आमचा प्रयत्न राहील. नोकरीवर जाणाऱ्या स्त्रियांच्या अपत्यांसाठी पाळणाघराची सोय केली जाईल. अपत्यपालनासाठी मातेला दीर्घकालीन मुदतीची रजा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कुपोषण ही एक गंभीर समस्या आहे त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. सोयाबीन आपण निर्यात करतो आणि ते परदेशात डुक्करांना खाऊ घातले जावून त्याचा मासनिर्मितीसाठी उपयोग केला जातो. हेच सोयाबीन वापरून त्याचे लाडू बनवले असता कुपोषणग्रस्त भागात त्याचा उपयोग मुलांना खाद्य म्हणून केला जाऊ शकतो असे आढळून आले आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आपल्या देशातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे अगदी वाईट स्थितीत आहेत. आर्थिक दृष्ट्या ती फायदेशीर नाहीत. पण त्यांच्याकडे सभोवताली बराच मोठा परिसर असतो. त्याचा व्यावसायिक वापर करून ह्या  आरोग्यकेंद्रांची स्थिती सुधारता येऊ शकते. अशा उदाहरणात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचा योग्य मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न राहील. छोट्या मुदतीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आम्ही पाठपुरावा करू. जनतेच्या भोवतालच्या परिसरात चांगल्या शाळा असाव्यात असा आमचा प्रयत्न राहील. बऱ्याच वेळा प्रसार आणि गुणवत्ता ह्याचे व्यस्त प्रमाण दिसून येते. आपल्या देशात उच्च शिक्षणाचा मोठा प्रसार झाला. रोजगाराची उपलब्धता हा प्रश्न राहिला नसून रोजगार देण्यालायक युवक उपलब्ध नाहीत हा खरा प्रश्न आहे! कला आणि विज्ञानक्षेत्रातील पदवीधरांना पाच ते सहा महीने इंटर्नशिप मिळावी असा आमचा प्रयत्न राहिला. एका खिडकीत परमिट मिळून देण्याकडे आमचा प्रयत्न राहील. सरकारी कार्यालयात काम होत नाही असा आपला अनुभव असेल परंतु मध्य प्रदेशचे उदाहरण पहा. तिथे जन्म, मृत्यू दाखला आणि इतर नेहमीच्या कामासाठी सरासरी किती वेळ लागेल ह्याचा आलेखच मांडलेला असतो. त्याच्या पलीकडे वेळ लागल्यास त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली जाते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी पुरुषांच्या मानासिकेत बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. गुजरात राज्यातील कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रशिक्षण दिले जाते.
आम्ही अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देऊ. शेती आणि प्रयोगशाळा ह्यांची सांगड घालू. जमिनीचे पृथ्थकरण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. नद्या जोडण्याचा जो प्रकल्प आहे त्यातील पर्यावरणाला हानिकारक असलेला भाग काढून टाकून त्याची अंमलबजावणी करू. भूजलाची पातळी वाढविण्याचे आमचे प्रयत्न राहतील. पर्यायी उर्जास्त्रोत विकसित करू, कालव्यावर सोलर पत्रे बसवून ऊर्जानिर्मितीचा जो प्रयोग भाजपशासित राज्यात झाला तसेच प्रयोग करू.
आज सामान्य जनतेत एका प्रकारचे औदासिन्य (sense ऑफ given up) आला आहे ते आम्ही दूर करू. महाशक्ती बनण्याचे भारताचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकते. शेवटी एका वाक्य सांगू इच्छितो - थोर माणसे काही वेगळ्या गोष्टी करीत नाहीत ते नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात!)


पुढील भागात
राजीव पाटील - बहुजन विकास पार्टी भाषण
ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर भाषण
प्रश्नोत्तरे
















Monday, April 14, 2014

Cool… अनुकूल की प्रतिकूल !


इंग्लिशमध्ये 'aging gracefully' असा एक शब्दप्रयोग आहे. वयोमानपरत्वे शरीरात आणि मनोभूमिकेत होणारे बदल परिपक्वतेने स्वीकारून त्यानुसार आपलं वागणं बदलणं आणि योग्य अशा कार्यामध्ये आपले मन गुंतवून घेणं असा काहीसा त्याचा ढोबळमानाने अर्थ घेतला जाऊ शकतो.
हल्लीच्या इंटरनेटच्या युगात ह्या संकल्पनेच्या काहीसं विरुद्ध असं वागणं पाहायला मिळतं. चाळीशी- पन्नाशीला पोहोचलेले पालक आपल्या पाल्यांसोबत तरुणाईच्या सर्व कुल क्रियांमध्ये सहभागी होत असताना दिसत आहेत. पाल्यांनाही हेच हवे असते. दिसणं, वागणं ह्या सर्वांमध्ये पालकांनी आपल्यासोबत असावे असे त्यांना वाटत राहत आणि त्यामुळे पालकसुद्धा बऱ्याच वेळा त्यांचा हट्ट पुरा करतात.
ह्या लोकी जीवनाची गंभीर बाजू कोणाला चुकली नाही. जन्मलेल्या प्रत्येकासमोर काही ना काही समस्या, क्लिष्ट कामे असतात. काही जण शांत वेळ मिळताच ह्या समस्यांवर विचार करतात. केवळ विचार करून समस्या सुटण्याची शक्यता कमी असते. विचारासोबत कृतीची सुद्धा आवश्यकता असते! परंतु विचार केल्यानं आपलं मन समस्यांचा, क्लिष्ट कामांचा विविध बाजूनं विचार करतं आणि त्यातून एखादा चांगला विचार, मार्ग निघू शकतो.
ह्या कुल बनण्याच्या प्रयत्नात आपण ही विचार करण्याची, मननाची बाजू गमावून बसलो आहोत. आपण स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा आणि आपलं कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे काही काळापुरते आपल्याला बरं वाटतं देखील! काहीजण आपल्या समस्यांचा विचार काही वेळापुरता का होईना पण दूर सारण्यासाठी ह्या तंत्राचा वापर करतात.
आजच्या ह्या छोटेखानी लेखाच सार एकच! कुल बनण्याच्या प्रयत्नात पालक म्हणून असलेल्या मुख्य जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष होऊन देऊ नये. आयुष्यातील क्लिष्ट कामं, समस्या, जमेल तितका परोपकार, सामाजिक कार्य ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या करून तुम्हांला भले लाईक मिळणार नाहीत पण तुम्ही आपल्या पाल्यांसमोर काही आदर्श ठेवाल! नाहीतर गंभीरतेचे शून्य प्रमाण घेऊन वावरणाऱ्या पालकांना डोळ्यासमोर ठेवून मोठे होणाऱ्या आजच्या पाल्यांचे भवितव्य मोठे कठीण आहे. 

Thursday, April 10, 2014

बोलघेवड्या मोटारगाड्या !


मनुष्यप्राणी कधीच स्वस्थ बसत नाही. आहे त्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणता येईल ह्याचा मनुष्यप्राणी आणि त्याचा मेंदू सतत विचार करीत असतो. समाजातील व्यक्तींचे अनेक प्रकारात वर्गीकरण करता येतं. ज्यांना दोन वेळेचं पोट भरण्याची भ्रांत नाही असा एक प्रकार आणि ज्यांना ही भ्रांत आहे असा दुसरा प्रकार! पहिल्या प्रकारातील काही लोक फावल्या वेळात कधी विधायक काम करतात तर कधी विघातक! संशोधन हा काहीसा विधायक प्रकारच्या कामाचा प्रकार आहे! आता काहींना रोजीरोटीसाठी संशोधन करावं लागते ही वेगळी गोष्ट!
असो आता मूळ मुद्द्याकडे! विधायक प्रकारच्या कामाचे उदाहरण म्हणजे भविष्यात एकमेकांशी संवाद साधू शकणाऱ्या मोटारगाड्याविषयीचे संशोधन! अशा गाड्या नजीकच्या भविष्यकाळात रस्त्यावर धावू लागणार आहेत! आणि हे काही कल्पनाचित्र नव्हे; हे खरोखर घडेल अशी दाट शक्यता आहे. अगदी ढोबळमानाने बोलायचं झालं तर रस्त्यावर धावणाऱ्या मोटारगाड्या एकमेकांना सतत मेसेज पाठवत राहतील. आणि ह्यामागील मुख्य उद्दिष्ट रस्त्यावरील सुरक्षितता हे असेल. गाड्यातील तांत्रिक बिघाड आणि मद्यपी चालक ह्यांच्यामुळे होणारे अपघात वगळता बाकीचे ८० टक्के अपघात अशा ह्या प्रस्तावित तंत्रज्ञानामुळे टाळले जाऊ शकतात असा अंदाज आहे! प्रत्येक गाडीतील यंत्रणा गाडीचे सद्यस्थान, वेग आणि संबंधित माहिती सेकंदाला अंदाजे १० मेसेज ह्या वेगाने पाठवीत राहील. हा संवाद रेडिओ सिग्नल आणि वाय - फाय तंत्रज्ञानाचा वापर करून साधला जाईल. जर दोन गाड्या एकमेकांवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर वाहनातील संगणक चालकास तत्काळ सतर्क करील. ह्या क्षणी चालक एक तर तात्काळ ब्रेक दाबेल किंवा गाडी दुसऱ्या दिशेला वळवेल! हल्ली जवळजवळ सर्वांकडे असलेले स्मार्टफोन गाडीतील संगणकाशी संपर्क करायला वापरले जाऊ शकतील असा अंदाज आहे. आणि त्यामुळे खर्च कमी होऊन ह्या तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रमाण वाढीस लागेल असा अंदाज आहे.
कागदावर वाचण्यास नक्कीच सुरेख कल्पना आहे ही! परंतु ह्यातील काही संभाव्य त्रुटी खालीलप्रमाणे (अमेरिकेतील वापरासाठी!!)
१> ह्या तंत्रज्ञानाचा सर्व गाड्यांनी वापर करणे आवश्यक आहे. समजा अर्ध्या गाड्यांत हे तंत्रज्ञान आहे आणि अर्ध्यात नाही असला प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो.
२> बराच वेळ, दिवस  सर्व काही सुरुळीत चाललं तर चालक गाफील राहू शकतो आणि ज्यावेळी खरोखर गरज आहे तेव्हा गडबड होऊ शकते.
३> समजा संदेशवहनाचे नेटवर्क अचानक बंद पडले तर रस्त्यावर सावळागोंधळ माजेल! अधिक गंभीर गोष्ट म्हणजे बंद पडायच्या क्षणी आणि त्यानंतर काही मिनिटे अपघाताची दाट शक्यता उद्भवेल!
४> घातपात करणाऱ्यांसाठी हे एक मुख्य लक्ष ठरू शकते.
५> हे तंत्रज्ञान सतत वापरात राहिलं तर एक वेळ अशी येईल की स्वतः गाडी चालवलेले मनुष्यप्राणी दुर्मिळ होतील! जसे की हल्लीचा चांगल्या संस्कृतीच्या लोप पावण्याचा काळ सुरु आहे. ज्यांनी चांगला सुसंस्कृत काळ पाहिला आहे त्यांना ही थेरं आवडत नाहीत. परंतु सतत हेच चालू राहिलं तर एक वेळ अशी येईल ज्यावेळी ही थेरं म्हणजेच समाजाची संस्कृती बनेल.


असो ह्या तंत्रज्ञानांचे भारतीय रूप काही काळाने मुंबईत सुद्धा येईल. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांचे काही संवाद खालीलप्रमाणे!
१) एक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश पाठवेल - "जरा जपून ग बाई! सिग्नल तोडू नकोस. मामा सिग्नलच्या पुढे लपून बसला आहे!"
२) सिग्नल चालू असतानासुद्धा आपल्या हातवाऱ्यांनी वाहतुकीचा बोऱ्या वाजविणाऱ्या हवालदारास - "अरे! काय चालवलंय काय तू ? व्यायाम करायचा असेल तर घरी जाऊन कर की! आमचा गोंधळ करू नकोस!"
३) एक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश पाठवेल - " अग बाई! काय मोठा खड्डा होता हा! कंबरच मोडली माझी! बाम वगैरे आहे का तुझ्याकडे !
४) मोटार गाडी बेस्ट बसला - " अग लालुताई! बसस्टॉप वरून तुला तिरकच निघायला हवे काय? जरा सरळ चाल की!
५) मोटार गाडी रिक्षाला - "अग बाई! स्वतःची ताकद ओळख आणि उगाच भ्रुभ्रु करत माझ्याशी स्पर्धा करू नकोस!
६) मोटारगाडी रिक्षाला - "१८० अंशातून मान वळवली तर मोडणार नाय का?"
७) रस्त्याच्या उजव्या बाजूने उलट्या दिशेने भैय्याला घेऊन  येणाऱ्या सायकलीस - "एक जराशी चापटी मारली तर तुझ्या मालकासकट जमीनदोस्त होशील!"
८) कट मारणाऱ्या बाईकला "अग जीव द्यायचा असेल तर एकटी जाऊन जीव दे! उगाच मला आणि माझ्या मालकाला अडकवू नकोस!"


कालांतराने सभ्य भाषेतील संवाद काहीसा प्रभावी ठरत नाही असे प्रतिसाद मोटरगाड्या बनविणाऱ्या कंपन्यांना पाठविला जाईल. मग गाड्यांची अनेक मॉडेल्स बाहेर येतील - सुसंस्कृत स्विफ्ट, मराठीतून शेलके शब्दांचे आहेर देणारी स्विफ्ट, हिंदी - इंग्लिश मधून अपशब्द वापरणारी स्विफ्ट वगैरे वगैरे! अजून काही वेळाने ह्या भांडणात दुसऱ्या गाडीच्या मालकाशी सुद्धा सुसंवाद साधण्याची गरज भासेल. त्याचेही संशोधन होईल. "अबे बेवडे, दिखता नही क्या!" एखादी होंडा सिटी दुसऱ्या टोयाटोच्या मालकाला सांगेल. जर ते टोयाटोचे भडकू मॉडेल असेल तर ती स्वतःच होंडा सिटीवर चाल करून जाईल!


धन्य तो माणूस आणि धन्य त्या संशोधनाच्या विपुल संध्या!



Wednesday, April 9, 2014

पुन्हा आभास - भाग ४


सितुने  पहिल्या भागाचं बरंच खोल विश्लेषण केलं होतं. सिंडीच्या वास्तवातील स्वभावाशी सुसंगत अशी तिचे प्रयोगातील वागणूक पाहून तो खुश झाला होता.  प्रयोगातील बॉसचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी सितुकडे अजून पुरेशी माहिती नव्हती. त्याला ह्या विश्लेषणाची माहिती मायकलला प्रत्यक्ष भेटून द्यायची होती. परंतु प्रत्यक्ष भेटण्यासाठी मायकलकडे वेळ नसल्याने सर्व संवाद ई मेल वरच चालला होता. आणि मग मायकलला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम निघाल्याने त्याने आपल्या एका वरिष्ठ विश्वासू सहकाऱ्याकडे ह्या प्रयोगाचा कारभार सोपवला होता. तो सहकारी इस्ट कोस्ट (पूर्व किनारपट्टीवरील) न्यूयॉर्कला असल्याने त्यानेही सुरुवातीचा काही काळ ई मेल द्वारे संवाद सुरु ठेवूयात असे सितुला सुचविले. प्रयोगातील सिंडीच्या व्यक्तिमत्वाचे बॉसविषयी एकंदरीत कसे मत बनले आहे असा प्रश्न त्याने सितुला विचारला. "सध्यातरी फक्त आदर आहे बाकी काही नाही" मॉडेलच्या विश्लेषणाकडे पाहत सितुने उत्तर दिले.


पुढील काही दिवस सिंडी बराच विचार करीत होती. त्या परीक्षणाच्या कालावधीत नक्की काय घडलं हे आठवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करीत होती परंतु तिला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे ती बरीच बेचैन होती, आपल्या सुरक्षिततेला ह्या प्रयोगात काही धोका तर उद्भवणार नाही ना अशीही शंका तिच्या मनात येऊन गेली. परंतु इतक्या सहजासहजी हार मानणारी ती नव्हती. पुढील परीक्षणात अजून चांगला प्रयत्न करून जागृतावस्थेत राहण्याचा निर्धार तिने मनोमन केला होता. गाढ झोपेतील मनाची अवस्था आणि त्यात पडणारी / न पडणारी स्वप्ने ह्या विषयावर तिने बरेच वाचनसुद्धा केले. त्या विषयातील वाचनात तिला बराच रस वाटू लागला होता. त्यानंतर ती 'Lucid Dreams' ह्या विषयाकडे वळाली. स्वप्ने चालू असताना स्वतःला आपण स्वप्नात आहोत ह्याचे भान आणून देणे आणि मग त्यापुढे आपली स्वप्ने आपण नियंत्रणात आणणे हा विषय तिला खूप भावला. स्वप्ने नियंत्रणात आणण्याची विविध तंत्रे तिने वाचून काढली. शनिवारी रात्री जॉनला स्वप्नात आणण्याचे ठरवून ती झोपी गेली. पहाटे केव्हातरी जॉन स्वप्नात आल्यावर तिचा आनंद पराकोटीला पोहोचला. त्या खुशीतच तिने पहाटे चार वाजता जॉनला फोन लावला. अशा कारणास्तव झोप मोडल्याने जॉन जबरदस्त वैतागला. परंतु आपल्या वैतागावर कसेबसे नियंत्रण ठेवून त्याने सिंडीला झोपी जायला सांगितलं.


दुसरा आठवडा सुरु झाला. आपण स्वप्नात जॉनला आणू शकलो हे आपल्या तंत्रांच्या अंमलबजावणीचा परिणाम की निव्वळ योगायोग हे तिला समजत नव्हते. आणि स्वप्ने नियंत्रित करणे आणि ह्या परीक्षणातील आपले वागणे नियंत्रित करणे ह्या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्याचेही तिला भान होते. तरीही ह्या दोन्हीही मेंदूच्या आभासावस्था असल्याने जर आपण एका अवस्थेत आपले वागणे नियंत्रित करू शकलो तर दुसऱ्यामध्ये सुद्धा करू शकू असा आत्मविश्वास ती बाळगून होती.
अजूनही सिंडीला दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षणासाठी बोलावणं आलं नसल्याने तिची बेचैनी काहीशी वाढली होती. तिने सहजच आपल्या ऑफिसात फोन लावला. पण वाँग किंवा दुसऱ्या कोणीही फोनवर यायला नकारच दिला. कामाचं निमित्त सांगून ते फोन घेत नव्हते. सिंडीची निराशा पराकोटीला पोहोचत होती. नशिबाने अशा परिस्थितीत तिला पुढच्या परीक्षणासाठी बोलावणं आलं.
सिंडी दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी ऑफिसात पोहोचली. प्रयोगाचा दुसरा टप्पा सुरु झाला होता. पुन्हा गॉगल आणि हेडफोन! मग इंटर बटण आणि मग संरक्षक कवच; त्यानंतर सौम्य झटका, मंद गूढ संगीत आणि झपाट्याने सरकणाऱ्या रंगबेरंगी प्रतिमा! पहिल्या वेळेपेक्षा आपली जागृतावस्था अधिक वेळ कायम ठेवण्यात सिंडीने यश मिळविले. पण जोपर्यंत आपण निद्रितावस्थेत जात नाहीत तोपर्यंत संगीत आणि प्रतिमांचा खेळ चालू राहणार हे ही ती समजून चुकली. मग तिने निद्रितावस्थेत जाण्याचं सोंग आणण्याचा प्रयत्न केला. ते सोंग आणि खरोखरीची  निद्रीतावस्था ह्याच्या सीमारेषेवर असताना दुसरा टप्पा सुरु झाला.
प्रोजेक्ट लीड सिंडीला भेटण्यास आला होता. तो एकदम खुशीत होता. कंपनीचा मालक एकंदरीत प्रोजेक्टच्या प्रगतीवर आणि सिंडीच्या हुशारीवर खुश होता. एकंदरीत सर्व टीमचे भविष्य उज्ज्वल दिसत होते. कंपनीच्या मालकाने प्रोजेक्ट लीड आणि सिंडीला चर्चेसाठी मुख्य कार्यालयात बोलावले होते. दुपारी ३ वाजता ही मीटिंग ठरली होती. सिंडीने ह्या मीटिंगसाठी तयारी चालू केली आणि चर्चेसाठीच्या मुद्द्यांची नोंद काढून ठेवली. अचानक तिचे घड्याळाकडे लक्ष गेले. दीड वाजला होता. ती दचकली, तिने झटपट सैंडविच खाऊन आपले दुपारचे भोजन आटपून घेतलं. सव्वादोनला निघायचं होतं. अचानक टीमलीडचा फोन आला, त्याला एक तातडीच्या प्रॉब्लेमवर काम करावं लागणार होतं आणि तो येऊ शकत नव्हता. सिंडी आता एकदम तणावाखाली आली.  तिला कंपनीच्या मालकाबरोबरची मीटिंग एकटीला सांभाळावी लागणार होती. सव्वादोनला कॅब आली आणि सिंडी निघाली.
कंपनीचे मुख्य कार्यालय अगदी आलिशान होते. स्वागतकक्षात सिंडी पोहोचली तेव्हा पावणेतीनच वाजले होते. तिथल्या स्त्रीने सिंडीला थांबण्यास सांगितलं आणि शीतपेये ऑफर केली. शीतपेयाचे घोट घेता घेता आणि कार्यालयाचे सुंदर रूप न्याहाळताना तीन कसे वाजले हे सिंडीला कळलेच नाही. आणि मग तिला बॉसचे बोलावणं आलं. बॉसच्या केबीनच्या भव्यदिव्यतेने सिंडीचे डोळे दिपून गेले. परंतु आता चर्चेस सुरुवात झाली होती आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक होते. बॉस एकदम आता खोलात शिरला होता. ह्या संकल्पित संरचेनेविषयी तो अगदी बारीकसारीक तपशीलवार प्रश्न विचारू लागला होता. एका प्रश्नावर सिंडी अडखळली आणि त्या क्षणी तिला हा प्रयोग चालू आहे ह्याची जाणीव झाली. जागृतावस्थेतील सिंडीला ह्या प्रश्नाचे उत्तर माहित होते आणि ते तिने झटकन दिले. पण तिची ही जागृतावस्था केवळ क्षणभर टिकली. पुढील चर्चा मात्र सुरेख झाली. बॉसच्या चेहऱ्यावर खुशी ओसंडून वाहत होती. "आपण एकदा कॉफी पिण्यास बाहेर जाऊयात" बॉसच्या ह्या निमंत्रणाने ही मीटिंग संपली. आणि प्रयोगचा दुसरा टप्पाही!
घरी परतल्यावर सिंडी बराच विचार करीत होती. त्या प्रयोगातील जागृतावस्थेतील त्या एका क्षणावर ती खूप खुश होती. तिच्या इतक्या मेहनतीला यश मिळाले होते. अचानक तिला बॉसने घातलेला टाय आठवला. असाच टाय आपण कोठेतरी पाहिला आहे असे तिला राहून राहून वाटत होते. नक्की कोठे हे आठविण्याचा प्रयत्न करता करता तिचा डोळा लागला. 

Wednesday, April 2, 2014

पुन्हा आभास - भाग ३


सिंडी आपली ह्या आव्हानात्मक प्रोजेक्टसाठी निवड झाल्याने अगदी खुशीत होती. तिला एका आठवड्यातच कॅलिफोर्निआतील दुसऱ्या एका ठिकाणी ह्यासाठी हजर व्हायचं होते. जवळजवळ सहा महिन्याचे हे प्रोजेक्ट तिथूनच पार पाडायचं होते. तिचा खास मित्र जॉन ह्यामुळे बराच नाराज होता.
सितुने आपलं पूर्णपणे विकसित केलेलं मॉडेल मायकलच्या स्वाधीन केलं. मायकलने ह्या भेटीत त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ही सर्व माहिती गोपनीय राहणे फार महत्त्वाचे होते. करारामध्ये तसे खास कलमसुद्धा होते. मायकल आता एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर बिझी होणार होता. त्यामुळे त्याची भेट घेणे आता सितुला कठीण होणार होते. ई-मेल हेच केवळ संपर्काचे मध्यम राहणार होते. ह्या परिस्थितीवर सितु काही फारसा खुश नव्हता. परंतु आपण काहीसे विकलो गेलो आहोत हे त्याला कळून चुकले होते.
सिंडी रविवारी रात्री त्या ठिकाणच्या हॉटेलात जाऊन उतरली. एकंदरीत उत्सुकतेने तिच्या मनावर कब्जा केला होता. सकाळी ती दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचली. हे ही अत्याधुनिक हॉटेल होते. ते ऑफिस म्हणजे सुद्धा एक अलिशान सुट होता. त्याच्या दर्शनी भागात स्वागतासाठी एक स्त्री हजर होती. सिंडीचे तिने स्वागत केले. ऑफिसचे हे रूप पाहून सिंडी निराश झाली आणि काहीशी चिंतीतही! त्या स्वागतकक्षातील स्त्रीशिवाय माणसाचा तिथे मागमूस नव्हता. आपल्या फिंगरप्रिंटच्या आधारे सिंडीने आतल्या भागात प्रवेश केला. "वेलकम सिंडी!" ह्या स्वागतपर शब्दाने सिंडी अगदी दचकली. घाबरघुबर होऊन तिने त्या दालनाच्या सर्व भागावर नजर फिरवली. पण तिथल्या  मंद प्रकाशामुळे तिला फारसं काही दिसत नव्हतं. 'तू तयार असशील तर आपले स्थान ग्रहण करू शकतेस!" पुन्हा एकदा आवाज आला. एव्हाना तिची नजर अंधाराला सरावली असल्याने तिने आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर तिथे असलेले दोन छोटे स्पीकर  तिला दिसले. आता ती काहीशी धिटावली होती. एका मोठ्या स्क्रीनपुढे तिचे बसण्याचे  आसन होते. तिने पाण्याचा एक घोट घेऊन स्थानग्रहण केले. तिला तिचे फिंगरप्रिंट समोरच्या टेबलवर उमटविण्याचा संदेश पुन्हा ह्या स्पीकरने दिला. तिने बोटठसे उमटविताच स्क्रीन उजळून निघाली. "वेलकम सिंडी!" स्क्रीनवर अक्षरे उमटली. "सारखं सारखं वेलकम  काय चाललंय, कामाचं बोला!" आपला हा विचार तिने मनातच दाबून ठेवला. ह्या पुढील सूचना आता स्क्रीनवर येऊ लागल्या होत्या. सिंडीला एक विशिष्ट प्रकारचा गॉगल घालायची आणि हेडफोन लावायची सूचना देण्यात आली होती. हे सत्र सतत तीन तास चालणार होते आणि त्या अवधीसाठी सिंडी तयार असल्याचा होकार स्क्रीनने तिच्याकडून घेतला. एव्हाना त्या कक्षात मंद संगीत सुरु झाले होते.  गॉगल आणि हेडसेट घालून सज्ज झालेल्या सिंडीला तयार असल्यास समोरच्या कीबोर्डवरील इंटर बटण दाबण्याची सूचना स्क्रीनवरून आली. मनाचा हिय्या करून सिंडीने इंटर बटण दाबलं. सर्वप्रथम तिच्याभोवती सर्वत्र एक तारांचं कवच आलं. हे परीक्षण संपेपर्यंत हे कवच निघणार नाही हे ती समजून चुकली. हळूहळू तिला ह्या सर्व प्रकारात रस वाटू लागला होता! तिला अजून एक सौम्य झटका बसला आणि हेडसेटमधून हळूहळू मंद गूढ संगीत येऊ लागलं. गॉगलवर तिला हळूहळू अतिशय वेगाने पुढेमागे सरकणाऱ्या प्रतिमा दिसू लागल्या. हा सर्व प्रकार सिंडीचे भान हरपेपर्यंत चालला.
सिंडी आता एका कार्यालयात होती. तिच्या समोर एका महत्वाच्या प्रोजेक्टचे काम होते. सिंडी आपले सर्व कौशल्य पणाला लावून ह्या प्रोजेक्टची डेडलाईन पुरी करण्याचा प्रयत्न करीत होती. इतक्यात प्रोजेक्ट लीड धावतपळत सर्व टीमला बोलवायला आला. कंपनीचा मालक ह्या टीमला भेटण्यासाठी आला होता. सर्वजण धावतपळत त्याला भेटण्यास एका रुममध्ये गेले. कंपनीच्या मालकाने सर्व टीमची आतापर्यंतच्या केलेल्या कामाबद्दल स्तुती केली. आणि मग त्याने एका विशिष्ट भागाच्या संरचनेबद्दल (Design) खोलात जाऊन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. योगायोगाने म्हणा की काय पण सिंडीने ह्या भागावर काम केले होते. बॉसच्या पहिल्याच प्रश्नाला सिंडीने आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिलं. का कोणास ठाऊक, परंतु बॉसकडून त्याचे प्रत्युत्तर येण्यास थोडा वेळ लागला. ही चर्चा पुढे बराच वेळ रंगत गेली. मध्ये मध्ये बॉसचा प्रतिसाद धीम्या गतीने यायचा. हा भाग सोडला तर सिंडीने ह्या चर्चेचा मनापासून आनंद लुटला. आपल्या हुशारीचा खरोखर इथे वापर होतोय असे तिला वाटू लागले होते.
सिंडी पुन्हा भानावर आली. मंद प्रकाशातील तो कक्ष पाहून ती काहीशी अचंबित झाली होती. तिचे डोके काहीसं जड झालं होतं. दुपारचे दोन वाजून गेले होते. "तुमचे आजचे आणि किंबहुना ह्या आठवड्याचे काम संपलं आहे! पुढील कामाच्या दिवसाच्या माहितीसाठी तुम्हांला संपर्क केला जाईल!" मंद प्रकाशातील आवाजाचे हे बोलणे तिच्या कानाने टिपले.
सितुला बराच डेटा परीक्षणासाठी मिळाला होता. परीक्षणाचा पहिला टप्प्याचे तो कसे विश्लेषण करतो ह्यावर पुढच्या सर्व प्रयोगाचे भवितव्य ठरणार होतं!