सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही.
वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले.
पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते.
नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली.
No comments:
Post a Comment