Monday, September 30, 2013

दो नैना और एक कहानी!


मागील वर्षी ह्याच सुमारास गुलजार ह्यांच्या काही गीतांचे रसग्रहण करण्याचं धाडस मी केलं होत. कितपत चांगलं जमलं हे ठाऊक नाही. वर्ष गेलं, गुलजार ह्यांच्या रचना कानावर पडत राहिल्या होत्या. अचानक परवाच्या साप्ताहिक सुट्टीत  त्यांचे अजून एक अतिसुंदर गीत कानी पडलं. गीत ऐकण्यास तर अत्यंत सुखद, पण जेव्हा त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा काही सोपा प्रकार नाही हे जाणवलं. गुलजार ह्यांना अभिप्रेत असलेला अर्थ तेच जाणोत पण त्यांनी आम्हां पामरांना आपल्या मतीनुसार हवा तसा अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य दिले आहे असे गृहीत धरून केलेला हा प्रयत्न. 
मासूम हा १९८२ सालचा एक गाजलेला चित्रपट. कथेसाठी, नसिरुद्दीन, शबाना, उर्मिला आणि जुगलच्या अभिनयासाठी आणि त्यातील गीतांसाठी. आरती मुखर्जी ह्या बंगाली गायिकेने गायलेलं ' दो नैना और एक कहानी' हे गीत. नसिरुद्दीन आणि शबानाचा दृष्ट लागण्यासारखा सुखी संसार. त्यात नसिरुद्दीन आणि सुप्रिया पाठकचे प्रेमप्रकरण! आणि मग जुगलचे आगमन. सुप्रिया पाठकचा दुर्दैवी मृत्यू. आणि मग आपलं पित्याचं कर्तव्य निभावण्यासाठी नसीरने जुगलला घरी आणल्यामुळे निर्माण झालेलं वादळ. आकाशपाताळ एक करण्याचा शबानाला पूर्णपणे हक्क! आता पूर्ण आठवत नाही पण बहुदा तिची प्रतिक्रिया संयमी! मनात विचारांचे आणि दुःखाचे वादळ असूनसुद्धा! आपली कुटुंबातील दैनंदिन कर्तव्य यांत्रिकपणे पार पाडण्याचे काम ती पार पाडत असते. नसीरची तर अजूनही जास्त कुचंबणा. शबाना आपल्या दोन मुलींवर प्रेमाचा वर्षाव करीत असताना जुगल एका कोपऱ्यात राहून बाह्यस्वरूपी अलिप्तपणे आपलं जीवन जगत असतो. परंतु रात्र मोठी कठीण असते. ती माणसाला भावुक बनविते आणि आठवणींचा कल्लोळ माणसाच्या मनात निर्माण करते. शबाना आपल्या मुलींसाठी अंगाईगीत गात असताना जुगलच्या कानावर हे गीत पडते. तो  आपल्या अभ्यासिकेतून बाहेर येतो. गाणे अर्थातच त्याच्या मनात आपल्या आईच्या आठवणी जागृत करते. गीत गातेय शबाना पण ते जुगलच्या मनातील विचाराशी अधिक मिळतजुळत आहे. 
 
दो नैना, एक कहानी
थोडा सा बादल,थोडा सा पानी
और एक कहानी
जुगलच्या दोन डोळ्यांत त्याच्या आईची एक कथा लपलेली आहे. तिच्या आठवणीने डोळ्यात जितके अश्रू आहेत तितकेच किंबहुना त्याहून जास्त आठवणींमुळे येऊ पाहणारे अश्रू (ओथंबलेल्या ढगांची उपमा) आत दडून राहिले आहेत. 
 
छोटी सी दो झीलों में वो बहती रहती हैं
कोई सुने या ना सुने कहती रहती हैं
कुछ लिख के और कुछ ज़ुबानी
आईची ही गोष्ट जुगलच्या डोळ्यांत सतत वास्तव्य करून राहिली आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ असो वा नसो ही आठवण, ही गोष्ट काही थांबत नाही. ह्यातील काही भाग लिखित तर काही केवळ बोलला गेलेला आहे. 

थोड़ी सी हैं जानी हुयी, थोड़ी सी नयी
जहा रुके आँसू वही पूरी हो गयी
हैं तो नयी फिर भी हैं पुरानी
ही गोष्ट काहीशी परिचित आहे तर काहीशी अनोळखी! बहुदा शबानाला आई म्हणून स्वीकारण्याच्या जुगलच्या प्रयत्नासाठी 'थोड़ी सी नयी' हा शब्दप्रयोग असावा! जिथे डोळ्यांतील अश्रू थांबतात तिथेच ही गोष्ट थांबते. म्हणायला गेलं तर ही कहाणी नवीन (शबाना) आहे आणि म्हटले तर ही सुप्रीयाचीच जुनी गोष्ट आहे. जी राहून राहून मला आठवते. 

एक ख़त्म हो तो दूसरी रात आ जाती हैं
होठों पे फिर भूली हुई बात आ जाती हैं
दो नैनों की हैं ये कहानी
रात्री बघा कशा वैरी असतात. एका रात्रीची गोष्ट, तिच्या आठवणी संपत नाहीत तोवर दुसरी रात्र येवून थडकते. आणि मग ओठावर पुन्हा तीच जुनी विसरू पाहायचा प्रयत्न केलेली गोष्ट येवून पोहोचते! अशी ही दोन डोळ्याची ही गोष्ट!
 
आता गाण्यात सुप्रिया पाठकच्या आठवणी दाखवल्या म्हणून ही जुगलची गोष्ट असल्याचं गृहीतक मी करू पाहतो. पण जर केवळ गीत वाचलं तर ही शबानाची आणि  हे वादळ येण्याआधी तिच्या नसीरसोबतच्या मधुर भावजीवनाची सुद्धा ही गोष्ट असू शकते. गुलजारचे श्रेष्ठत्व ह्यातच, एका गाण्यातून आपल्यासाठी कल्पनेचे मनोरे रचण्यासाठी ते पूर्ण मोकळीक देतात. त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ कधीतरी जाणून घ्यायची इच्छा मनी बाळगूयात! आणि हो आरती मुखर्जीचा आवाज! तिच्या आवाजातील ओलावा ह्या गाण्यासाठी एकदम योग्य!
 

Sunday, September 29, 2013

GAMBIT


बुद्धिबळाच्या खेळात अनेक धूर्त चाली रचल्या जातात. खेळाच्या सुरुवातीला आपल्या प्याद्याचा बळी देऊन स्वतःस चांगली स्थिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण बुद्धिबळ असो वा जीवन असो चांगली धोरणात्मक परिस्थिती मिळविण्यासाठी कधीकधी आपल्याकडील तुलनात्मक दृष्ट्या कमी किमतीच्या वस्तूचा त्याग करणे योग्य ठरते.
प्यादे निर्जीव असल्याने त्याचा बळी देताना त्याच्या परवानगीचा प्रश्न उदभवत नाही. परंतु हीच चाल ज्यावेळी राजकारणात खेळली जाते त्यावेळी अशा कित्येक प्याद्यांचा, त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा मोठ्या राजकारणी लोकांच्या प्रतिमाबांधणीसाठी अथवा त्यांची प्रतिमा उजळण्यासाठी वापर केला जातो. मग असे हे प्यादे कधी चुकीचे विधान करत जे मोठा माणूस येवून सुधारतो आणि आपली प्रतिमा उजळ बनवून जातो. किंवा गोत्यात सापडलेल्या राजकीय वजनदार व्यक्तीच्या कृष्णकृत्याचे खापर कोणत्या तरी प्याद्यावर फोडले जाते. काळानुसार प्यादीसुद्धा धूर्त बनत चालली आहेत. आपला बळी जाऊन देण्याआधी त्याचा दुसऱ्या कोणत्या तरी स्वरुपात मोबदला वसूल करण्यास ते चुकत नाहीत!
कधी कधी ह्याचं उलट रूपसुद्धा पहावयास मिळत. जर मोठा आर्थिक फायदा होणार असेल तर आपल्या प्रतिमेचा विचार काही काळ मागे टाकला जातो. जसे की कांदा. तेल, साखर ह्यांचे भाव वाढत जाणार अशी विधाने करून जर अप्रत्यक्षरीत्या आर्थिक फायदा होणार असेल तर लोकांना आपल्याविषयी येणाऱ्या संतापाची चिंता करू नये. लोकांची स्मरणशक्ती कमी असते, ते काही काळाने सर्व काही विसरणार!
एकंदरीत बुद्धीबळाचा खेळ अगदी वरच्या पातळीवर खेळला जात आहे हेच खरे!

 

Wednesday, September 25, 2013

एक खंत!



वसईतील जुनी पिढीची जीवनपद्धती निरखून पाहिल्यास काही मनोरंजक गोष्टी जाणवतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या हिशोबाने ह्या व्यक्ती विविध जीवनपद्धती अंगीकारत आहेत असे जरी वाटत असले तरी त्यातील बऱ्याच जणांना साधेपणा एका मोठ्या वर्तुळात बसविता येते.
मी माझ्या वडिलांचे राहणीमान लहानपणापासून पाहत आलो आहे. संध्याकाळी ते रोजनिशी लिहितात. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या जीवनातील दैनदिन घडामोडींचे इत्यंभूत वर्णन ह्या रोजनिशीत आढळते.  मी ही त्यांचा आदर्श ठेवून शाळेत असताना आणि त्यानंतर पुन्हा १९९७ मध्ये रोजनिशी लिहिण्यास सुरुवात केली. परंतु ९७ सालचा प्रयत्न नंतरच्या संगणकाच्या आक्रमणाने फोल ठरला.
वडिलांच्या रोजनिशीतील नोंदीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा दैनदिन खर्च सुद्धा ते ह्या रोजनिशीत नोंदवून ठेवतात. मी १९९७ साली माझाही खर्च लिहित होतो. त्यावेळी मी केमटक्सच्या पवई ऑफिसला होतो. होळी बसने स्टेशनला जायचो. सकाळी होळी ते स्टेशन तिकीट दीड रुपया आणि रात्री स्टेशन ते रमेदी तिकीट पावणेदोन रुपया असे. दीड रुपयाचा अशियन एज घ्यायचो. बोरीवलीवरून कंपनी बस ऑफिसात नेई. बाकी दुपारचा डबा घरून नेत असल्याने जेवणाचा खर्च नसे. एकंदरीत दिवसाचा खर्च पाच सहा रुपयात भागे. आज रमेदी ते पारनाका रिक्षाला  सात रुपये लागतात. असो थोडे विषयांतर झाले. थोडक्यात म्हणजे वडिलांच्या आयुष्याची नोंद त्यांच्या रोजनिशीत सापडते. अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी फाईलमध्ये विषयानुसार केलेले कागदपत्राचे वर्गीकरण! आणि ह्या सर्व फाईलच्या जागा सुद्धा ठरलेल्या असतात. त्यात थोडीसुद्धा ढवळाढवळ केलेली त्यांना खपत नाही. 
आता माझ्याकडे वळूयात. माझा दररोजचा, आठवड्याचा, महिन्याचा किंवा वर्षाचा खर्च किती आहे ह्याची माझ्याकडे कोठेच नोंद नाही. हा म्हणजे म्हणायला गेलं  बँकेच्या माहिती मायाजालावरील नोंदीवरून मी विविध कालावधीत किती पैसे काढले हे पटकन माहित करून घेवू शकतो. परंतु त्या खर्चाच्या विषयानुसार वर्गीकरणाविषयी मला अजिबात जाणीव नाही. मी फक्त मोठे खर्च लक्षात ठेवतो. 
कागदपत्राचे वर्गीकरण म्हणायला गेलं तर हे कागदपत्र वसईला आहे की बोरिवलीला इथून माझी सुरुवात होते. बऱ्याच वेळा कागदपत्र हुडकण्यासाठी (अरे वा बरेच दिवसांनी हा शब्द वापरला!) मी भरपूर वेळ घालवितो. आता माझ्या ह्या अव्यवस्थितपणाचे माझ्याकडे स्पष्टीकरण सुद्धा असते. मी सतत कामात व्यग्र असतो आणि त्यामुळे जरी मला थोडाफार मोकळा वेळ मिळाला तरी ज्या गोष्टी मेंदूला विरंगुळा देतील त्या करण्याला प्राधान्य देतो. जरी एखाद्या वार्षिक सुट्टीत ह्या सर्व कागदपत्राचे वर्गीकरण केले तरी पुढे वर्षभर त्यांचे योग्य फाईलमध्ये ठेवण्याची जी शिस्त लागते ती माझ्यात नाही. मला फक्त माझा पासपोर्ट आणि PAN कार्ड कुठे आहे ते माहित असतं. 
 मला नक्की काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळले नसल्यास चिंता करू नका. ते मलाही समजत नाहीय. बघू अजून पुढे प्रयत्न करूयात. वडील गावातील बऱ्याच लोकांशी संपर्क ठेवून आहेत. त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या सुख दुःखाच्या प्रसंगाला ते हजर राहण्याची काळजी घेतात. माझी स्थिती अगदी उलट आहे. फक्त खास मित्रांच्या अगदी महत्वाच्या प्रसंगांना हजर राहताना सुद्धा माझी मारामार होते. स्पष्टीकरण तेच! कामाचे!
 
थोडक्यात काय वडिलांनी ठराविक गोष्टी परिपूर्णपणे केल्या. मी अनेक मोठमोठ्या गोष्टी करायचा प्रयत्न करूनसुद्धा मला बऱ्याच वेळी ,  बऱ्याच ठिकाणी अपूर्णता जाणवते. कथित प्रगतीचा शोध असंतुलित मनःस्थितीकडे नेतो असे म्हणावे की काय?  प्रगती आणि मनःशांतीच्या मार्गावर एकत्रितपणे पुढे जाणे ज्यांना जमले ते खरे आधुनिक माहात्मे!
  
 बऱ्याच दिवसांनी लेखाला योग्य शीर्षकही सुचत नाहीय!

Monday, September 23, 2013

सकाळचा चहा आणि शब्दांच्या पलीकडलं !


पूर्वी भावना खूप घन पण शब्द मोजके असायचे. भावना व्यक्त करावी ती डोळ्यातून किंवा कृतीतून.  भावना तशा संवेदनशील असतात, त्यांना फुरसतीचे क्षण लागतात, आठवणीचा मनोरा लागतो. हल्ली जमाना बदलला. भावनांना जपायला, जोपासायला बऱ्याच वेळा संधीच मिळत नाही. भावनांना व्यक्त करायला शब्दांचा प्रमाणाबाहेर आधार घेतला भावनांचा गाभा कोठेतरी हरवतो.
माणूस सुदैवी असेल तर जन्मतः त्याच्याभोवती कोडकौतुक करणाऱ्या नातेवाईकांचे कोंडाळे असते. प्रत्येकाच्या नशिबानुसार कोडकौतुक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत साथ देतात. आईला तर आपला साठीला पोहोचलेला, निवृत्त झालेला मुलगा सुद्धा लहानच वाटत असतो. आयुष्यात लग्न ही घटना माणसाच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. पूर्वी हे बदल फक्त स्त्रियांच्या आयुष्यात घडायचे परंतु हल्ली विभक्त कुटुंबात पुरुषांना सुद्धा ह्या बदलांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते.
कितीही मोठे झाले तरी मनुष्याच्या मनाचा एक कोपरा कोठेतरी कौतुकाच्या / लाडाच्या अपेक्षेत असतो. हे कौतुक क्षणभराचे असले तरी त्याला पुरते. लग्नानंतर सुरुवातीचा नाविन्याचा काळ संपला की मग कसोटीचा काळ सुरु होतो.  प्रत्येक जोडीदाराला स्वतःच्या समस्या तर असतातच. पण काही क्षण ह्या समस्या, त्यांचा विचार बाजूला ठेवून जोडीदाराला विशेष वाटून द्यायची गरज असते. हे क्षण शोधले तर सापडतात!
सकाळचा चहा हा असाच एक क्षण! दिवसभर घरातील कामाचा रगडा उरकणाऱ्या गृहिणीला सकाळी उठल्यावर हातात चहाचा कप मिळाल्यास तिला आपल्या कामाची दाद देणारा साथीदार लाभला आहे ही भावनाच सुखदायक असते.  स्त्रिच्या हृदयाची योग्य तार छेडल्यास ती संसाराला स्वर्ग बनवू शकते. सकाळी पतीने बनविलेल्या चहाचे घुटके घेत घेत ती दिवसभराच्या कामाचे नियोजन करीत असते. हुशार नवरे चहातून निरोपही पाठवत असतात, कधी चहात साखर कमी असते तर कधी जास्त. दुधाचे योग्य (पत्नीला) आवडणारे प्रमाण जमणे महाकठीण. काही कुटुंबाचा हा चहा विविध शहरात, विविध हवामानात झालेला असतो. कधी थंड हवेच्या प्रदेशात सात वाजताच्या किट्ट अंधारात झालेला असतो तर उन्हाळ्यात पाच वाजताच्या फटफटीत प्रकाशात! पतीचे आई वडील घरी आले असताना चहा करणारा पती पाहून पत्नी धन्य होते तर पतीची आई धन्य होते की नाही हे तिला हा चहा मिळाला की नाही ह्यावर अवलंबून असतं. 
हा झाला जोडप्यांचा एक प्रकार! दुसऱ्या प्रकारात नवऱ्याचं प्रेम त्यांच्या पत्नीवरील मालकीहक्काच्या भावनेतून प्रदर्शित होत असतं. पत्नीने केलेला सकाळचा फक्कड चहा पतीला जितका आनंद देतो तितकाच किंबहुना त्यातून अधिक आनंद त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघत चपातीचे पीठ मळणाऱ्या पत्नीला मिळतो. असा हा सकाळचा चहा!

Saturday, September 21, 2013

पृथ्वीचा आयुष्यकाल



आपण सारे पामर दैनदिन समस्यांनी इतके ग्रासलेले असतो की आपणास वैश्विक समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. साधू संत लोक हे ज्या प्रमाणे वैश्विक समस्यांकडे लक्ष देत असतात त्याचप्रमाणे संशोधक हा वर्ग देखील दैनदिन समस्या दुर्लक्षून वैश्विक समस्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. मी अशा समस्यांसंबंधित बातम्या ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपण कसे क्षुद्र समस्यांचा विचार करीत आहोत ह्या विचाराने मला काहीसे खजील व्हायला होते.
अशीच एक बातमी आठवड्याच्या मध्यावर वाचण्यात आली. पृथ्वीचा आयुष्यकाल केवळ २.२५ बिलियन वर्षे बाकी आहे. १ बिलियन म्हणजे १००० मिलियन. आणि १ मिलियन म्हणजे १० लाख. एकंदरीत २.२५ गुणिले दहा हजार लाख वर्षांनी पृथ्वी संपुष्टात येणार आहे. आता २.२५ बिलियन वर्षांनी होणार तरी काय? तर सूर्याची उष्णता वाढत जावून किंवा सूर्य प्रसरण पावून पृथ्वीला गिळंकृत करणार आहे. ह्या बातमीवर वाचकांच्या प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित / विनोदी होत्या.
१> मनुष्यजात पृथ्वीला इतके वर्ष सुद्धा ठिकाणावर ठेवणार नाही, त्याआधीच आपण पृथ्वीचा आणि आपल्या स्वतःचा विनाश ओढवून घेवू
२> मी एक सदनिका विकत घ्यायचे ठरविले होते पण आता ही बातमी वाचून विचार बदलला!
बातमीत पुढे मनुष्यप्राणी मग पर्यायी ग्रहाचा कसा शोध घेईल आणि आपल्यापुढे असलेले पर्याय कोणते ह्याचा उहापोह करण्यात आला होता. अपेक्षेनुसार मंगळ ग्रह उपलब्ध पर्यायात पहिल्या क्रमांकावर होता. पृथ्वीपासूनचे तुलनात्मक दृष्ट्या कमी अंतर हा एक ह्यात महत्वाचा घटक होता. परंतु अजून काही वर्षांनी (ह्यातील वर्ष मोजण्याचे एकक ओघाने पुन्हा बिलियन मध्येच आले!) मंगळावर सुद्धा हीच परिस्थिती ओढविणार वगैरे वगैरे!
मी ह्यावर अजून विचार करू लागलो.

उष्ण कटिबंधातील (ह्यात आपला भारत आलाच! ) देशांना ह्याची झळ पोहोचण्यास प्रथम सुरुवात होणार. हा भाग मनुष्यवस्तीसाठी अधिकाधिक प्रतिकूल बनत जाणार. मग ह्या भागातील लोक शीत कटिबंधातील भागात स्थलांतर करण्याचा विचार / प्रयत्न करणार जे शीत कटिबंधातील लोकांना नक्कीच आवडणार नाही. मग पृथ्वीवर संघर्षाचे / युद्धाचे बरेच प्रसंग ओढवणार! ह्यात उष्ण कटिबंधातील बलवान लोकांना शीत कटिबंधातील लोकांकडून फितविले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही! फितविले जाणार म्हणजे फक्त त्यांनाच शीत कटीबंधातील देशात प्रवेश देणार आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जाणार!
 
उष्ण कटिबंधातील सामान्य लोकांना मग  दुसरे काहीतरी मार्ग शोधावे लागणार. जमिनीखाली वसाहती निर्माण करणे असा बालिश विचार मी केला. सूर्याने पृथ्वीलाच गिळले तर जमिनीखाली तू काय जिवंत राहणार? मनाने मला प्रश्न केला. पण जमिनीखाली अस्तित्व टिकविण्यासाठी काही अधिक (लाखो) वर्षे मिळतील हे मात्र नक्की! मग जमिनीखालील वसाहतीतील आयुष्य कसे असेल ह्याचा विचार करण्यात मी मग्न झालो. ह्या आयुष्यात माणसाच्या खेळ आणि शारीरिक व्यायामासंबंधित कार्यक्रमावर बंधने येतील हे नक्की. पृष्ठभागावरील वाढलेल्या उष्णतेचा वापर ही जमिनीखालील वसाहत आपल्या गरजा भागविण्यासाठी करील!
 
असो परत मुख्य मुद्द्याकडे येऊयात. समजा मनुष्य प्राण्याने मंगळ ग्रहाची स्थलांतरासाठी निवड केली तरीही तिथे मनुष्यासाठी योग्य वातावरण नाही हे आपणास माहित आहे आणि लेखातही त्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे जो कोणी मंगळावरील उपलब्ध वायुंचा ऑक्सिजन मध्ये रुपांतर करण्यात यश मिळवेल त्याला नोबल पारितोषक नक्कीच मिळेल! पण हे न जमल्यास पृथ्वीवरील वायू प्रचंड प्रमाणात मंगळावर पोहोचवावे लागतील! आता राहता राहिला तो मंगळावर जाण्यासाठी निवड करण्यात येणाऱ्या सुदैवी मानवांचा विषय. ह्यासाठी निकष कोणते लावावेत हा कठीण प्रश्न. धनवान लोक जे ह्या प्रोजेक्टच्या खर्चात मोलाचा वाटा उभारतील त्यांना प्रथम निवडले जाईल. मग बुद्धिवान लोक, कलाकार, खेळाडू, सत्ताधारी लोक ह्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील. मनात अजून एक प्रश्न आला कि पृथ्वीवरील देश रचना पुन्हा तशीच मंगळावर निर्माण होईल काय? पृथ्वीवरील भ्रष्टाचार, अतिरेकी ह्या समस्या तिथेही उद्भवतील का? इतक्यात जाणविले की वर्षाच्या सुरुवातीला जवळपास हाच विषय मी लिहिला होता.
 
इतक्यात स्वयंपाकघरातून हाक ऐकू आली. "संकष्टी असली म्हणून काय झाले? भाज्या तर आणायच्या आहेत!" २.२५ बिलियन वर्षानंतरच्या प्रश्नाचा विचार करण्याचे काही काळ प्रलंबित करून मी बाजारचा रस्ता धरला!



 

Thursday, September 19, 2013

नंदन नीलकेनीच्या ऐकीव राजकीय प्रवेशानिमित्त!


नंदन निलकेणी हे कर्नाटकमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता असल्याची बातमी काल वाचनात आली. त्या निमित्ताने हे काही विचार
१> नंदन निलकेणी ह्यांच्या विषयी मला अतीव आदर आहे. व्यावसायिक जगात अत्यंत यशस्वी असलेला हा माणूस समोर उभ्या असलेल्या सर्व संधींचा त्याग करून सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत कठीण आव्हान (आधार कार्डचे) स्वीकारतो. ह्या आधार कार्डच्या अंमलबजावणीच्या कालावधीत राजकीय नेते, बाबू लोक ह्या सर्वांशी यशस्वीपणे संवाद साधू शकतो. आणि हे एक अत्यंत क्लिष्ट असे प्रोजेक्ट एक यशस्वी स्थितीत आणून ठेवण्याची किमया घडवू शकतो.
२> सार्वजनिक क्षेत्रातील एक क्लिष्ट योजना यशस्वीपणे पार पाडल्यावर आता ते राजकीय जीवनात प्रवेश करू इच्छितात त्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!
३> राजकीय पक्षांची मनोवृत्ती - राजकीय पक्षांचे टक्केवारीचे राजकारण असते. त्यांना आपण व्यावसायिक क्षेत्रातील यशस्वी लोकांना आपण संधी देतो हे दाखविणे गरजेचे असते. त्यांनाही अशी उदाहरणे आवश्यक असतात. फक्त यात लोकसभेसारख्या निवडणुकीला त्यांना व्यावसायिक जीवनातील अत्युच्च पातळीवर यशस्वी लोकांची उदाहरण म्हणून आवश्यकता असते.
४> निवडणूक जवळ आली की आपण सोशल मिडियावर संदेश वाचतो कि आपला मतदानाचा हक्क बजावा, सुट्टीवर फिरायला जाऊ नका वगैरे वगैरे. त्याच वेळी आपण बऱ्याच वेळा हे ही वाचतो कि मत देण्यासाठी योग्य उमेदवारच आहेत कोठे? आता आपण राजकीय पक्षांच्या मानसिकतेचा विचार करूयात. उमेदवार निवडताना त्याची निवडणूक जिंकण्याची क्षमता हा बहुतांशी एकमेव घटक विचारात घेतला जातो. पूर्वी राजकीय पक्षांना पक्की विचारसरणी होती आणि लोक त्या विचारसरणीला मतदान करीत.  ही विचारसरणी जातीय, आर्थिक, संरक्षण धोरण ह्या सारख्या घटकांचे मिश्रण असे. आता विचारसरणी वगैरे प्रकार संपुष्टात आले. तरीही काहीजणांची राजकीय पक्षांप्रती असणारी अनुवांशिक निष्ठा कायम आहे. राजकीय पक्ष धूर्त असतात. ते ह्या गटावर फारसे लक्ष देत नाहीत. जे तळ्यात मळ्यात करणारे असतात त्यांच्यावर लक्ष दिले जाते. आता तळ्यात मळ्यात असणाऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी एखादा विशेष घटक असावा लागतो जो नंदन निलकेणी पुरवू शकतात
५> आता वळूयात राजकीय परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या बऱ्याच साध्या सुशिक्षित लोकांकडे! मागे काही IIT मधून पदवी घेतलेल्या तरुण मंडळींनी राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी ठरल्याचे काही वाचनात आले नाही. केवळ सुशिक्षित आहे म्हणून लोक तुम्हांला मतदान करतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.  तुमच्याकडे निस्वार्थपणे केलेल्या सामाजिक कार्याची थोडीफार पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे. तरच लोकांचा तुमच्यावर विश्वास बसू शकतो.
६> सुशिक्षित लोकांनी (आता सुशिक्षित ह्या शब्दाची व्याख्या हा वादाचा मुद्दा! ) राजकारणात पडणे खरोखर आवश्यक आहे हे आपण सर्व मान्य करतो.
७> आता राजकीय जीवनात प्रवेश करण्याआधी आपली आर्थिक बाजु पक्की करावी. वयाच्या पन्नास, पंचावन्न वयापर्यंत शांतपणे नोकरी करून हे साध्य करावे. मग स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यास सुरुवात करावी. सर्वांनाच आमदार, खासदार होता येणार नाही हे लक्षात घ्यावे आपल्यासोबत काम करणारा सुशिक्षित माणुस आपला प्रतिस्पर्धी नाही हे लक्षात घ्यावे. तो पुढे गेला तरी त्यात आनंद बाळगावा. केवळ इथली परिस्थिती चांगली नाही म्हणून परदेशगमन करणे हे फार काळ चालणार नाही हा आपला देश आहे आणि तो आपल्यालाच सुधारावा लागेल.
 
हे सर्व विचार मनात आणण्य़ासाठी कारणीभूत नंदन निलकेनींचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा शुभेच्छा!



Monday, September 16, 2013

होणार जावई मी त्या घरचा! वकाव!

एका मराठी वाहिनीवर नवीन कार्यक्रम  सुरु झाला 'आम्ही सारे निर्माते'. मी बाह्या सरसावून हा कार्यक्रम पाहण्यासाठी बसलो. एक हरहुन्नरी माणूस पहिला स्पर्धक म्हणून कार्यक्रमात हजर झाला. 
 
सुत्रधार - "नमस्कार क्ष वाहिनीवर आपलं स्वागत आहे"
स्पर्धक - "धन्यवाद!"
सुत्रधार - "आपल्याला ह्या नवीन मालिकेद्वारे कोणता सामाजिक संदेश द्यायचा आहे?"
स्पर्धक - "सर्वच पुरुष काही गुंड, मवाली नसतात, परंतु हल्लीच्या वातावरणात चांगल्या पुरुषांना सुद्धा घरी, बाहेर काहीसे घाबरून राहावे लागत आहे. त्यांच्या व्यथांना ह्या मालिकेद्वारे व्यक्त करण्याचा माझा मानस आहे". 
सुत्रधार - (काहीसा भारावून जाऊन) "अरे वा! एका काहीशा दुर्लक्षित सामाजिक समस्येला तुम्ही सादर करीत आहात, ह्याबद्दल तुमचे अभिनंदन! बाकी एकंदरीत हा विषय हाताळण्यासाठी मालिकेऐवजी चित्रपट हे योग्य माध्यम ठरले असते असे तुम्हांला नाही वाटत?" असो तुम्ही हा विषयाची गहनता विविध भागात कशी उलगडत नेणार आहात हे थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगाल का?
स्पर्धक - (काहीसा गोंधळात पडून, आपल्या टिपण्णीची वही चाळून!) "इथे मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. सामाजिक संदेश कितीही उदात्त असला तरी आम्हांला प्रेक्षकांची आवडही लक्षात घ्यावी लागेल. त्यामुळे एकंदरीत सामाजिक संदेशासाठी मालिकेचा बारा मिनिटाचा भाग राखून ठेवण्यात आला आहे!"
सुत्रधार - "अरे वा! दररोजच्या अर्ध्या तासाच्या भागात बारा मिनिटाचा सामाजिक संदेश! तुमचं कौतुक करावं तितक थोडं आहे!
स्पर्धक - (निर्विकारपणे) सव्वीस एपिसोडमध्ये बारा मिनिटे!
सुत्रधार - (हिरमुसून जाऊन!) असो, बाकी एकंदरीत मालिकेची पूर्वतयारी कशी सुरु आहे?
स्पर्धक - (एखादे गुपित सांगावे ह्या आवेशात!) मला यशस्वी मालिकेचे काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेले एक सूत्र मिळाले आहे ते मी वापरणार आहे!
सुत्रधार - (सर्व मरगळ झटकून टाकत!) त्यातील काही भाग आमच्याशी शेअर कराल का?
स्पर्धक - (बराच वेळ भाव खाऊन तयार होतो) "ही आहे ती यादी!"
१> मालिकेचे नाव एक वाक्य असावे. मालिकेचे शीर्षकगीत लक्षवेधी असावे आणि त्यात जमल्यास कुठून तरी ढापूगिरी करावी!
२> चकचकीत बंगला आणि त्यात अलिशान दिवाणखाना, बेडरूम असावी 
३> एक सासू, एक सासरा, किमान तीन भाऊ. त्यांच्या पत्नी, दोन तीन नोकर असावेत 
४> एक खलनायिका आणि खलनायक असावेत. त्यांच्या दुष्ट कारवाया कोणाच्याही बुद्धीला अजिबात पटणार नाहीत अशा असाव्यात. 
५> मालिकेच्या कालावधीतील प्रत्येक सणाचे मालिकेत चित्रण असावे. 
६> महागड्या साड्या भाड्याने देणाऱ्या दुकानाशी आधीच संधान बांधून ठेवावे. 
७> दर दोन तीन भागामागे स्वयंपाकघरातील चित्रण असावे. त्यासाठी काही चकचकीत भांडी, भाज्या आणाव्यात. 
८> महागड्या ऑफिसात मठ्ठ साहेब आणून बसवावेत
९> ज्याचा चेहरा निर्विकार ह्या प्रकारात  मोडेल असा एक नायक घ्यावा! जिला फक्त सुंदर हसता येईल अशी नायिका घ्यावी
१०> ह्या मालिका लहान मुलासमवेत सर्व कुटुंब बघणार ह्याचा विचार न करता प्रणयदृश्याची बिनधास्त अधूनमधून पेरणी करावी. 
११> मध्येच नायकाला आपली मारामारीची कौशल्य दाखवायची असल्यास कोठून तरी गुंड आणून उगाच कारण नसता त्यांना ठोकावे. ह्या मारामारीत किमान ३ - ४ डझन अंडी, दहा पंधरा रंगीत पाण्याच्या बाटल्या, महागड्या  भाज्या ह्यांचा नाश करावा!
१२> आठवण झाल्यास मधूनच एक तासाचे विशेष भाग प्रसारित करावेत. 
१३> मालिकेतील पहिल्या / दुसऱ्या ब्रेकची वेळ नक्की ठेवावी. जेणेकरून महिलावर्गाला भाजीला ढवळा मारणे, दुर्लक्षित नवऱ्याला जेवण हवे आहे काय हे विचारणे हे शक्य होते. पुरुषवर्गाला सुद्धा ह्या ब्रेकमध्ये क्रिकेटचा धावसंख्या जाणून घेणे शक्य होते. हल्ली हल्ली तर ह्या ब्रेकमध्ये whatsapp वर महिलावर्ग पुढील दहा मिनिटात काय होणार ह्याची सुद्धा चर्चा करतो!
स्पर्धक अतिउत्साहात हे एकदम सारे बोलून टाकतो. बोलून झाल्यावर त्याची नजर सुत्रधाराकडे जाते. सूत्रधार चक्कर येउन जमिनीवर आडवा झालेला असतो!

Thursday, September 12, 2013

गणिती पाढे


२९ चा पाढा पाठ करण्यासाठी आपण सर्वांनी केलेली मेहनत चांगलीच लक्षात राहते. साधारणतः शाळेत ३० पर्यंत पाढे पाठ करून घेतले जात. हल्ली काय स्थिती आहे ते माहित नाही. माझ्या मुलाने पण १५ नंतर पाढे पाठ करायचे सध्या सोडून दिले आहे आणि गड्याला शाळेत ओरडा बसल्याची लक्षणे नाहीत. कारण जर तसे काही झाले असते तर तो बरोबर माझ्याकडे स्वतःहून येऊन बसला असता.
पाढे पाठ करणे म्हणजे नक्की काय? ह्या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याआधी आपण डेटाबेस (माहितीभांडार) मधील एखाद्या शृंखलेतील क्रमानुसार जाऊन मिळविलेली माहिती (sequential access) आणि त्याच शृंखलेतील थेट जाऊन मिळविलेली माहिती (direct access) ह्या दोन संकल्पनांचा विचार करूयात. पहिल्या पर्यायात (Sequential Access) मध्ये आपणास एखाद्या मधल्याच संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या आधीच्या सर्व संख्याद्वारे जाणारा मार्ग पत्करावा लागतो. त्यामुळे तुलनेने ही प्रक्रिया मंद होते. परंतु Direct Access मध्ये इंडेक्स नावाचा प्रकार असतो जो आपणास कोणत्याही क्रमाकांपर्यंत थेट घेऊन जातो त्यामुळे ही प्रक्रिया जलद होते. परंतु ह्यात इंडेक्सला सतत चांगल्या स्थितीत ठेवावे लागते आणि त्यामुळे खर्च थोडा वाढतो.
पाढ्यांचे सुद्धा असेच आहे. शास्त्रीय दृष्ट्या पाढे पाठ करणे म्हणजे सर्व आकडे आपल्या डोक्यात असणे आवश्यक आहे अगदी इंडेक्स वापरणाऱ्या Direct Access प्रमाणे! म्हणजे १७ x ७ विचारले की थेट ११९ तोंडातून बाहेर पडले पाहिजे. परंतु हल्लीच्या जमान्यात हा प्रकार हळूहळू कमी होत चालला आहे. तंत्रज्ञान आपली पाठांतर शक्ती कमी करीत आहे. त्यामुळे हल्लीची बहुतांश पिढी Sequential Access ह्या प्रकाराचा पाढे पाठ करण्यासाठी वापर करते. म्हणजे १७ x ७ माहित करण्यासाठी त्यांना तो पर्यंतचा सर्व पाढा म्हणावा लागतो.
असो ह्यात काही युक्त्या असू शकतात का?  थोड्या प्रमाणात हो! बघुयात प्रयत्न करून! एक गृहीतक असे की किमान १० पर्यंतचे पाढे थेट पाठ असणे आवश्यक आहे.

१> दशक आकड्याच्या आसपासचे क्रमांक. जसे की ११, १९, २१, २९.
ह्यात ११ चा पाढा पाठ करणे सोपे असल्याने त्याला वगळूयात. १९ आणि २९ चे पाढे लक्षात ठेवण्यासाठी तुमचा मनातील बेरीज वजाबाकीचा वेग थोडा जास्त असावा. जसे की १९ x ७ विचारले असता, २० x ७ = १४० करून त्यातून  पटकन सात वजा करून १३३ असे उत्तर द्यावे. हेच तंत्र २९ च्या पाढ्यासाठी वापरावे.
२१ साठी तो क्रमांक २० च्या पाढ्यातील क्रमांकात मिळवावा.

२> १५, २५ हे तुलनेने सोपे पाढे. २५ तर अधिक सोपा. तुम्हांला मनातल्या मनात पाव शतकाच्या उड्या मारता आल्या पाहिजेत. १५ साठी ३० च्या पाढ्याची मदत घ्यायला हरकत नाही. जसे की १५ x ७ विचारले असता ३० x ३ करून त्यात पटकन १५ मिळवावेत.

३> बाकीच्या पाढ्यासाठी एकदम सोपे असे तंत्र नाही. परंतु ह्यासाठी (क्ष + य) * क = क क्ष + य क ह्या समीकरणाचा वापर करावा. म्हणजे २७ x ७ = (२० + ७) * ७ = १४० + ४९ = १८९ ह्यात चार  पायऱ्या आहेत
१> २७ ची केलेली २०+७ अशी फोड. आता २७ ची २० + ७ अशी फोड करावी की ३० -३ अशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न!
२> २० * ७
३> ७ * ७
४> २ आणि ३ ची बेरीज.

बघायला गेलं तर प्रत्येक वैयक्तिक पायरी सोपी आहे. परंतु आपल्या मेंदूला अशी योग्य फोड करून पटकन ती आकडेवारी करण्याची सवय असणे आवश्यक आहे. बाकी गणितातील बहुतांशी गोष्टीप्रमाणे हे ही सरावाने साध्य होवू शकते.

आता हेच तंत्र वापरून ९९ चा पाढा पटकन मनात बनवा आणि आपण जर शाळेत असाल तर मित्रमंडळीना प्रभावित करून दाखवा. बाकी ९ आणि ९९ धमाल आहेत, म्हणजे त्यांचे पाढे एकदा का ५ पर्यंत बनविलेत की पुढील भागासाठी आधीचेच क्रमांक उलटे करीत जायचं.

९९
१९८
२९७
३९६
४९५
आता
५९४  (४९५ ला उलट करून)
६९३  (३९६)
७९२  (२९७)
८९१  (१९८)
आहे की नाही गंमत!
 

Tuesday, September 10, 2013

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्ण​न भाग २


अमेरिकेत गेलेल्या IT क्षेत्रातील तंत्रज्ञाच्या सुविद्य पत्नी बर्यापैकी चांगला कंपू बनवून असतात .  प्राजक्ताचा सुद्धा फिनिक्स मध्ये असा कंपू होता. फ्लोरिडात गेल्यावर सुद्धा ह्या कंपूतील बऱ्याचजणी तिच्या संपर्कात होत्या. परतीच्या मार्गावर प्राजक्ता फिनिक्सला उतरणार हे कळल्यावर त्यांना कोण आनंद झाला.  आपल्या पत्नींनी बनविलेल्या कंपूविषयी नवरेवर्गांच्या संमिश्र भावना असतात. ह्या कंपूमुळे सोमवार - शुक्रवार ह्या दिवसांत आपली पत्नी शांत असते त्यामुळे नवरे खुश असतात परंतु साप्ताहिक सुट्टीच्या वेळी ह्या कंपूमुळे नसते उद्योग त्यांच्या मागे लागतात, त्यामुळे नवरे बऱ्याच वेळा वैतागतात. परंतु हा वैताग बऱ्याच वेळा बोलून दाखवता  येत नाही. तसाच काहीसा प्रकार इथे झाला. प्राजक्ता आणि वर्गाने फिनिक्स विमानतळावर भेटण्याचा कार्यक्रम परस्पर ठरवला. ह्यात नवरे वर्गाला शुक्रवारी दुपारच्या वेळात कार्यालयातून सुट्टी घेवून विमानतळावर यायला जमेल असे गृहीतक होते. आणि ते गृहीतक दोन नवऱ्यांनी अचूक ठरविले.

फिनिक्स विमानतळावर आम्हाला आमच्या चेक इन सामानाचे दर्शन झाले. ते ताब्यात घेऊन उद्वाहकात टाकून एक मजला वर चढविले आणि पुन्हा चेक इन केले. आमचे विमान फिनिक्सला वेळेआधी पोहोचल्यामुळे लॉस अंजेलीसचे विमान सुटायला अजून ६ तास बाकी होते. त्यामुळे वेळेआधी सहा तास चेक इन करणाऱ्या माझ्याकडे त्या चेक इन कक्षातील इसमाने अजून एक नजर दिली. मला एकंदरीत ह्या प्रवासात अशा अनेक नजरांना सामोरे जावे लागेल ह्याचा एव्हाना मला अंदाज आलाच होता. त्यामुळे मी त्या नजरेकडे दुर्लक्ष गेले. एकंदरीत हे सामान माझ्याकडे दहा मिनिटे होते. हीच उठाठेव त्या दोन्ही स्वतःला सहभागी म्हणविणाऱ्या विमान कंपन्यांनी केली असती तर काय झाले असते असा विचार माझ्या मनात येऊन गेला. विमानतळावर भातजन्य काही आशियन भोजन पदार्थ उपलब्ध होते. त्यातील एकाची आम्ही निवड करून वेळ भागविली. एव्हाना आमच्या मित्रमंडळीचे आगमन झाले होते. आमच्यासाठी भेटवस्तू, काही चॉकोलेटस अशा वस्तू घेऊन ते आले होते. माझ्या दोन मित्रांनी सुद्धा अनपेक्षितरित्या विमानतळावर येऊन आम्हाला सुखद धक्का दिला. प्राजक्ताची एक मैत्रीण, रजिता तिच्यासाठी निवडुंगाचे  एक छोटे रोप घेऊन आली होती. फिनिक्समधील निवडुंगाची विविधता बघता ही एक योग्य भेट होती. पुढे हे रोप प्राजक्ताने वसईत बरेच दिवस टिकविले परंतु एका पावसात त्याला सुरक्षित वातावरणात घेऊन न जाता आल्याने ते बिचारे दगावले. आमच्याकडे भरपूर वेळ असला तरी मंडळी घाईत होती. त्यामुळे ४५ मिनिटांच्या आसपास त्यांना आमचा निरोप घ्यावा लागला. विमानतळावर खरेदीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असले तरी आता अजून सामान कोंबायला वाव नसल्याने प्राजक्ताचा नाईलाज झाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
मराठीत किंबहुना प्रत्येक भाषेतील म्हणी अगदी समर्पक असतात. मनुष्यजातीच्या इतिहासात माणसे विविध प्रसंगात सापडली असतील तेव्हा त्यांना या म्हणी सुचल्या असतील. आपण ज्यावेळी तशाच प्रसंगात सापडतो तेव्हा आपल्याला ह्या म्हणी आठवतात. 'दुष्काळात तेरावा महिना' ही एक अशीच म्हण! सहा तासाचा थांबा काही कमी नव्हता म्हणून फ्लोरिडाहून विमान लवकर आले आणि आता लॉस अंजेलीसचे विमान काही वेळ उशिरा सुटणार असल्याची बातमी येऊन पोहोचली. अगदी काही निर्वाणा वगैरे परिस्थिती अजून आमची झाली नव्हती. त्यामुळे काही वेळ अजून घालविण्यात आम्ही यश मिळविले. शेवटी एकदाचे ते लॉस अंजेलीसला जाणारे विमान येऊन गेटवर लागले, आता आम्ही थोडे चिंतेत होतो. लॉस अंजेलीसवरून सुटणारे विमान चुकणार तर नाही ना ह्याची चिंता आम्हाला भेडसावू लागली होती. हा दोन तासाचा प्रवास तसा पटकन गेला. ह्यात लक्षात राहण्यासारखी एकच गोष्ट, आम्हाला दोघांना आजूबाजूच्या सीट्स मिळाल्या नव्हत्या. प्राजक्ताला एका अमेरिकन माणसाच्या बाजूची सीट मिळाली होती. आणि त्या दोघांचे हास्यविनोद चालू होते. आणि त्यामुळे माझी जिया जले … वगैरे परिस्थिती झाली होती. बाकी लग्नाला एकच वर्ष झाल्याने हे ठीक होते असे  मागे वळून पाहता मी म्हणू इच्छितो.
TOM BRADLEY विमानतळावर ही गर्दी उसळली होती. किंवा ती नेहमीच असावी आणि आम्ही दुसऱ्यांदाच तिथे आल्याने आम्हाला असे वाटले असावे. सर्व पावले आम्ही ज्या टर्मिनलकडे जाऊ पाहतो आहोत तिथेच चालली असावीत असा आम्हांला भास होत होता. त्या गर्दीचा मुकाबला करीत आम्ही अजून एका आगमन कक्षात जाऊन पोहोचलो. तिथे बोर्डिंग पास घेताना I९४ कागदपत्र तेथील अधिकाऱ्याला सोपविताना अमेरिकेची ही वारी संपुष्टात आल्याचे काही प्रमाणात आम्हाला दुःख झाले. सिंगापूर एयरलाईन्सचा एयर इंडियाबरोबर कोड शेयर होता असे मला पुसटसे आठवते. म्हणजे ह्या मार्गावर उड्डाण करण्याचे खरे हक्क कडे होते परंतु एयर इंडियाने काही पैशाच्या मोबदल्यात हे हक्क सिंगापूर एयरलाईन्सला विकले होते. एकंदरीत भारतात पोहोचल्याची चाहूल इथूनच मला लागली. त्या टर्मिनलच्या पुढे एखाद्या गावच्या एस टी डेपोप्रमाणे गर्दी उसळली  होती. एकदाचा आम्ही विमानात प्रवेश मिळविला.
TOM BRADLEY हे भव्य विमानतळ असावे ह्याची जाणीव मला उड्डाण होण्याच्या वेळी झाली. गेटवरून विमान निघाल्यापासून मुख्य धावपट्टीवर येईस्तोवर बहुदा पाच दहा मिनिटे गेली असावीत. विमान एकदा मुख्य धावपट्टीवर पोहोचले की अंतिम धाव सुरु करण्याआधी एक क्षणभर विसावते. त्यावेळी प्रत्येकवेळा माझ्या मनात ह्या क्षणी या महाकाय वाहनास उड्डाण करण्यापासून जर प्रवृत्त करायचे असेल तर काय करावे लागेल असा विचार माझ्या मनात येतो! असो विमानाने एकदाचे उड्डाण केले. पौर्णिमेची रात्र होती बहुदा. आकाशातील ढगांवरून हे विमान उडत होते आणि चंद्राची शीतल किरणे त्या ढगांवर पसरली होती. पुढील अनेक तास हेच दृश्य मला दिसणार होते.  विमानप्रवासातील काही गोष्टींचा मला सदैव अचंबा वाटत आला आहे. जसे की दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणात हवाई सुंदऱ्या काळ वेळ  पाहता आपल्याला एकदम ताटभर नव्हे प्लेटभर जेवण का आणून देतात? आणि प्रवाशातील काहीजण / अनेकजण पुढे बराच काळ आपल्याला काही खायला मिळणार नाही असे समजून त्यावर तुटून का पडतात? असो स्थळ काळाचे भान एव्हाना संपले होते आणि त्या रात्रीच्या पहिल्या जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला होता. जबरदस्तीने सर्वांना खिडक्या आणि सीटवरील  दिवे बंद करायला लावून झोपेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यात येत होता. इतका वेळ कसा व्यतीत करावयाचा ह्याची चिंता मला पडली होती. समोरील सीटवर असलेल्या स्क्रीनवर गेम खेळण्यात आणि उपलब्ध असलेले थोडेफार चित्रपट पाहण्यात मी सुरुवातीचा काही वेळ घालविला. प्राजक्ता एकंदरीत प्रवासी म्हणून असलेल्या आणि गृहीत धरलेल्या हक्कांविषयी अगदी जागरूक होती. त्यामुळे तिने जवळजवळ दर तासाला हवाईसुंदरीकडे कोमट पाण्याची विनंती करण्याचा सपाटा चालविला. त्या हवाईसुंदरींच्या संयमाचे कौतुक करावे तितके थोडे! त्यांनी तिच्या प्रत्येक विनंतीचा मान राखित प्रत्येक वेळी कोमट पाणी आणून दिले. मधल्या कालावधीत मी खेळत असलेल्या गेममध्ये नैपुण्य संपादित करीत माझे वैयक्तिक उच्चांक नोंदवले. विमानात दाखविले जाणारे टुकार हिंदी चित्रपट मला झेपण्याच्या पलीकडे होते. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला. बहुदा तासभर असेल परंतु तितक्यात पुन्हा खाण्याची किंवा शीतपेयाची वेळ झाली होती. मदिराप्राशन करणारे सुखी जीव निद्राधीन झाले होते. असाच कधीतरी आकाशात सूर्य उगवला. दात घासण्याची तीव् इच्छा खळखळून चूळ मारण्यावर भागवून न्यावी लागली. आता मात्र जमिनीवर पाय टेकण्याची फार ओढ लागली होती. खूप वेळ नुसते खाऊन बसून राहिल्यावर दुसरे होणार तरी काय? शेवटी कसेबसे ते तेरा तास भरले आणि विमान चायनीज तैपईला उतरले. तिथे सराईत प्रवाशी ब्रश वगैरे घेवून न्हाणीघराच्या दिशेने कूच करते झाले. आम्ही फक्त ब्रश केले. ह्या विमानतळावर फारसे काही विशेष घडले नाही. म्हणायला तिथे चवीसाठी चहाचे नमुने ठेवण्यात आले होते. आम्ही त्यात फारसा रस दाखविला नाही.
सिंगापूरला उड्डाण करण्याचे गेट शोधून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. चायनीज तैपई ते सिंगापूर हा प्रवास काही खास घटनेशिवाय झाला. बाहेर सूर्याची प्रखर किरणे विमानाला तापून काढत होती. तारीख कोणती असावी असा प्रश्न विचारून मेंदूला त्रास करून घेण्याची तसदी मी घेतली नाही.
सिंगापूरला आम्ही हॉटेल बुक केले होते. तिथे जाण्यासाठी एका टर्मिनलवरून मिनी ट्रेनने आम्ही दुसऱ्या टर्मिनलवर गेलो. तिथे हॉटेलमध्ये शिरून सचैल स्नान केले. अंघोळीनंतर अगदी गाढ झोप लागली. नशीब म्हणून अलार्म लावला होता. त्याच्या आवाजाने जाग आल्यावर एक क्षणभर आपण कोठे आहोत आणि किती वाजले असावेत ह्याचे भान राहिले नाही. बाहेर येवून आम्ही सिंगापूर दर्शनच्या रांगेत उभे राहिलो. तिथे आमचे पासपोर्ट ताब्यात घेवून ही विनामुल्य सफर घडविण्यात आली. त्यांना पासपोर्ट देताना आम्हाला काहीसे जीवावर आले होते. बाकी सफर उत्तम झाली. सन्तोसा बीचशिवाय विशेष उल्लेखनीय काही नव्हते. जर माझी स्मरणशक्ती माझी उत्तम सेवा करीत असेल तर त्या बीचवरील पांढरी वाळू विशेष लक्षात राहिली. (हे इंग्लिश वाक्याचे मराठीत जसेच्या तसे भाषांतर!) एकंदरीत थकलेल्या मनःस्थितीमुळे आम्ही ही सफर फारशी काही मजेत अनुभवली नाही. परत आल्यावर आम्हाला आमचे पासपोर्ट परत करण्यात आले. कोणी सिंगापूरमध्ये परस्पर गायब होऊ नये म्हणून ही काळजी. मग आम्ही विमानतळावर चिकन करी आणि भात असे जेवण घेतले. ह्या नऊ तासाच्या थांब्याची एक गंमत. एक मित्र एकटाच परत येताना ह्या गेटसमोर नऊ तासाचा थांबा म्हणून झोपून गेला. इतका गाढ कि विमान उड्डाणाची वेळ झाली तरी त्याची झोप काही उडाली नाही. एअरलाईन्सने केलेला त्याचा नावाचा घोष सुद्धा त्याला उठवू शकला नाही. शेवटी त्याचे सामान बाहेर काढून विमान उड्डाण करते झाले. त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला आलेले नातेवाईक बराच काळ चिंताग्रस्त होते.
असो आम्ही सिंगापूर विमानतळावर एल्विसचा एक शो चालला होता तोही पाहिला. आणि शेवटी एकदाचे आम्ही  मुंबईला जाणाऱ्या विमानात बसलो. आता माझे स्थळकाळाचे भान काहीसे परत आले होते. रविवारची संध्याकाळ झाली होती. पुन्हा एकदा हवाईसुंदरी, जेवण, गेम्स अशा सर्व चक्राचा मुकाबला करीत आम्ही सोमवारी सकाळी साडेबारा वाजता मुंबईला आगमन करते झालो. आम्ही अशा मनःस्थितीत पोहोचलो होतो कि अजून आम्हाला कोणी परत अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसण्यास सांगितले असते तर ते ही आम्ही केले असते! असा एक धमाल प्रवास! एखादा धीम्या गतीचा चित्रपट ज्यात नायक नायिकेचे भावबंध ५३ तासात उलगडत जातात, असा सुद्धा बनू शकतो!

 

Sunday, September 8, 2013

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन भाग १


ब्लॉगचे शीर्षक वाचून हे एखाद्या अतिजलद जहाजाने केलेल्या प्रवासाचे वर्णन असावे असा तुमचा समज झाल्यास त्यात काही चुकीचे नाही. परंतु तसली काही परिस्थिती नसून २००२ साली मी सपत्निक केलेल्या एका प्रदीर्घ विमानप्रवासाची ही हकीकत आहे. आणि हो,  हा नियोजित ५३ तासांचा प्रवास होता. ह्यात कोठेही विमान रद्द झाले नाही किंवा खोळंबले नाही किंवा आम्ही ते चुकविले नाही. बाकी म्हणावं तर विमानांचा वेगही २००२ साली अगदी कमी होता असेही नाही!
प्रस्तावना खूप झाली. झाले असे की माझी नेमणूक सर्वप्रथम फिनिक्स, अरिझोना इथे करण्यात आली होती. माझ्या तत्कालीन कंपनीच्या धोरणानुसार त्या कंपनीच्या भारतीय शाखेने आमचे मुंबई ते फिनिक्स असे दोन्ही मार्गांचे तिकीट घेतले. फिनिक्स हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या जवळ असल्याने आम्ही मुंबईहून निघताना सिंगापूर - टोकियो - लॉस अंजेलीस - फिनिक्स असा प्रवास केला होता. त्या तिकीटावरील तारीख आणि वेळ ह्यांचा मेळ बसविताना नाकी नऊ आल्याने आम्ही शेवटी फिनिक्सला किती वाजता पोहोचणार ह्याचा फक्त विचार केला होता. हा प्रवास तसा व्यवस्थित झाला.
फिनिक्स मधील वास्तव्य तसे सुखदायक चालले होते. तेथील टीम अनुभवी आणि स्थिर अशी होती. त्यामुळे नवीन आज्ञावली विकसनाचे काम आणि प्रोडक्शन सपोर्ट (आग विझवण्याचे काम!) ह्यात काही चिंतेचे प्रसंग येत नसत. लग्नानंतर आमचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यामुळे अमेरिकेत अगदी शून्यातून घर वसवायची संधी मिळाल्याने आम्ही खुशीत होतो. परंतु म्हणतात ना कधी कधी सुखाला दृष्ट लागते. आमच्या बाबतीतही असेच झाले. तीन महिन्यानंतरच त्या प्रोजेक्टच्या संघरचनेत काहीसा बदल करण्याचे ठरविण्यात आले आणि भारतातील संघ मुंबईऐवजी चेन्नईला स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले. ह्या सर्व बदलात माझी फिनिक्सची जागा धोक्यात आली. त्यामुळे माझ्यासाठी नवीन जागेचा शोध सुरु झाला आणि सुदैवाने माझी नेमणूक फ्लोरिडात करण्यात आली. कंपनीच्या धोरणानुसार फिनिक्स ते फ्लोरिडा हे तिकीट त्यांच्या अमेरिकन शाखेने बुक केले.
फ्लोरिडातील नेमणूक काही फारशी दीर्घ स्वरूपाची नव्हती. परंतु रखरखीत फिनिक्सपेक्षा काहीसे पावसाची कृपा असलेले हिरवेगार फ्लोरिडा बरे असा आम्ही समज करून घेतला. फ्लोरिडात नवीन कामाचे स्वरूप समजावून घेवून ते काम मुंबईहून करायचे होते. साधारणतः दोन महिन्यात ते काम आटोपण्याची चिन्हे दिसू लागली. फिनिक्स आणि फ्लोरिडातील वास्तव्यातील काही मनोरंजक कहाण्या नंतर कधीतरी!
आता परतीचे तिकीट आरक्षित करण्याची वेळ आली. आम्ही अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर होतो आणि तेथून मुंबई युरोपमार्गे २० तासावर होती. त्यामुळे आम्हाला तसेच तिकीट मिळेल असा सोयीस्कर समज आम्ही करून घेतला होता.
प्रथम मी कंपनीच्या भारतीय शाखेला फोन केला. "आपले परतीचे तिकीट फिनिक्सहून आरक्षित आहे, त्या विमानकंपनीला फोन करून आपण तारीख निश्चित करा" असे मला सौजन्यपूर्ण भाषेत समजाविण्यात आले. "परंतु मी सध्या फ्लोरिडात आहे", मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही तिथे कसे पोहोचलात?" काहीशा  आश्चर्यपूर्ण स्वरात समोरील ललना उद्गारली. "विमानाने!" असे उत्तर देण्याचा मोह मी अतिप्रयत्नपूर्व टाळला. तिला मी सर्व परिस्थिती थोडक्यात सांगितली. बहुधा तिला (अथवा तिच्या मेंदूला) हा सर्व प्रकार  झेपला नसावा. तिने मला सविस्तर ई -मेल लिहिण्यास सांगितले.
पुढील दोन दिवसात एकंदरीत प्रकार आमच्या ध्यानात आला होता. भारतीय शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या फक्त अमेरिकेतील अंतर्गत प्रवासाची जबाबदारी अमेरिकन शाखा करीत असे. भारत ते अमेरिका हा प्रवासटप्पा भारतीय शाखेच्या अखत्यारीत येत असे. आणि भारतीय शाखेने तर आमचे फिनिक्सहून तिकीट आरक्षित केले होते. हे तिकीट रद्द करून पूर्व किनारपट्टीवरून नव्याने तिकीट आरक्षित करण्यासाठी लाल फीत आणि रद्द करण्याचा खर्च मध्ये येत होते. तसे म्हटले तर हे दोन्ही अडथळे दूर करता येतात, पण त्यासाठी एकतर तुम्ही मोठ्या पदावर असायला हवे किंवा तितका समजूतदार व्यवस्थापक असावा लागतो. माझ्या बाबतीत हे दोन्ही प्रकार नव्हते त्यामुळे आमचा प्रवास मार्ग निश्चित झाला होता. त्यातही एक धमाल होती. फ्लोरिडा (फोर्ट लॉदरडेल) ते फिनिक्स ह्या प्रवासात सुद्धा आम्हाला टेक्सास असा थांबा सुचविण्यात आला होता. त्या अमेरिकन शाखेच्या तिकीट आरक्षित करणाऱ्या बाईस मी माझा एकंदरीत प्रवासमार्ग ऐकवला.   फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स - लॉस अंजेलीस - चायनीज तैपई - सिंगापोर - मुंबई, आणि ह्यात अजून एक थांबा न वाढविण्याची कळकळीची विनंती केली. बहुदा देवाने माझी प्रार्थना ऐकली असावी आणि मग तिने मला फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स असे थेट तिकीट देण्याचे कबूल केले. आता ह्यातील प्रवासाचा आणि थांब्यांचा कालावधी ऐका
 फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स (प्रवास पाच तास, फिनिक्स थांबा सहा तास)
फिनिक्स - लॉस अंजेलीस (प्रवास दोन तास, लॉस अंजेलीस थांबा चार तास)
लॉस अंजेलीस - चायनीज  तैपई (प्रवास तेरा तास, चायनीज  तैपई थांबा चार तास)
 चायनीज  तैपई - सिंगापूर  (प्रवास पाच तास, सिंगापूर  थांबा नऊ तास)
सिंगापूर- मुंबई (प्रवास ४ - ५ तास)
तसे पाहिले तर बाकीचे सर्व फिनिक्सवरून निघताना ४२ तासांचा प्रवास करीतच त्यात फक्त (!) अकरा तासांची भर पडली होती अशी माझी कंपनीतर्फे समजूत काढण्यात आली. आणि सिंगापूरला हॉटेल बुक करण्याचा सल्लाही देण्यात आला. "कंपनी हा हॉटेल खर्च देईल ना?" मी उगाचच विचारले! मग विषय बदलून मला ह्या नऊ तासात सिंगापूर दर्शन करण्याचा सल्ला देण्यात आला.
२२ ऑगस्ट २००२ रोजी अमेरिकन पूर्व किनारपट्टीच्या वेळेनुसार आम्ही सकाळी साडेसात वाजता आमचे हॉटेल सोडले. विमानतळावर सोडण्यासाठी एका भारतीय टक्सीवाल्याला आम्ही बोलावलं होत. तिकीट आरक्षित  करताना मी फ्लोरिडालाच आम्हाला मोठ्या सामानाच्या bags चेक  इन करता येईल ह्याची खात्री करून घेतली होती. परंतु प्रत्यक्ष विमानतळावरील चेकइन कक्षात मला दुसरीच माहिती मिळाली. तुम्हाला ह्या bags फिनिक्सला ताब्यात घेवून परत चेकइन कराव्या लागतील असे सांगण्यात आले. सहसा डोक्यात राख न घालून घेणारा अशी माझी स्वतःविषयी समजूत आहे. परंतु एकंदरीत ह्या प्रकाराने मी इतका संतापलो होतो की मी सभ्यपणा राखून जितका त्याच्याशी वाद घालता येईल तितका घातला. ह्यात माझ्या पत्नीने भरलेल्या वजनदार bagsचा विचार किती कारणीभूत होता हे माहित नाही! इतके होऊन सुद्धा त्या सभ्य गृहस्थाने मला असा मार्ग शोधून देणारा माझा ट्रेव्हल अजेंट बदलायचा सल्ला दिला. माझ्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या त्या सभ्य गृहस्थाला उत्तर देण्याचे मी कसोशीने टाळले.
अमेरिकेतील अंतर्गत प्रवासात खाण्यापिण्याची मारामार असते. त्यामुळे त्या विमानकंपनीने आम्हाला विमानात शिरण्याआधी काही अल्पोपहाराचे पदार्थ घेण्याचे सुचविले. परंतु आम्ही विमानात मिळणाऱ्या शेंगदाणे आणि कोकवर गुजराण करण्याचे ठरविले. बाकी विमानाने उड्डाण करण्याआधी मी प्राजक्ताला म्हणालो, "लग्नाच्या पहिल्या वर्षातच तुला पूर्ण अमेरिका पूर्व-पश्चिम अशी दाखवत आहे हो, नीट पाहून घे!" आणि तिच्या नजरेच्या तीक्ष्ण प्रतिसादाकडे पाहण्याची हिम्मत नसल्याने मी दुसरीकडे नजर वळविली. बाकी हा प्रवास ठीक चालला होता. वैमानिक अधून मधून खालून दिसणाऱ्या भूभागाविषयी बोलत होते. समोरील स्क्रीनवर हाणामारीचा एक चित्रपट चालला होता. फिनिक्सचा खरा पाच तासांचा प्रवास ह्या पट्ठ्याने लवकर संपवित आणला. फिनिक्सच्या आसपास अधूनमधून वणवे लागतात. असाच एक वणवा त्यावेळी लागला होता. वैमानिकाने त्याविषयी माहिती दिली. अशा वेळी साधारणतः अतिशोयक्ती अलंकार वापरले जातात त्यामुळे वैमानिकाच्या म्हणण्यानुसार हा गेल्या वीस वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा होता. जोपर्यंत हा विमानापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत हा गेल्या शंभर वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा का नसेना असा स्वार्थी विचार आम्ही केला. फिनिक्सचे स्काय हार्बर दिसू लागले होते. माणसाचे मन कसं असतं पहा ना, फिनिक्स मध्ये आम्ही तर काही महिनेच घालविले होते परंतु तिथे पुन्हा उतरताना आपल्याच गावी उतरण्याची भावना आमच्या मनी दाटली होती. हे सर्व प्रवासवर्णन एका भागात संपवायचा विचार होता परंतु आता दुसरा भाग करावा लागेल असे दिसतंय! फिनिक्स ते मुंबई पुढच्या भागात!

 

Saturday, September 7, 2013

तपोवन - भाग १२


शत्रुघ्नने दोन दिवसातच सर्व मोर्चेबांधणी केली होती. सिद्धार्थच्या साम्राज्याच्या दक्षिण सीमेभोवती शत्रूसैन्याने वेढा  घातला होता. तिथे सिद्धार्थची सेना कमकुवत असल्याची बातमी त्यांना मिळाली होती. एकदा का दक्षिण सीमेवरील सिद्धार्थच्या सेनेचे कवच भेदले की थेट राजधानीपर्यंत मुसंडी मारण्याचा शत्रुघ्नचा डाव होता. राजा प्रद्द्युत जरी ह्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला नसला तरी त्याच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली पूर्ण सेना ह्यात सहभागी झाली होती.
महर्षी अगस्त्य ह्यांच्या आश्रमातून निघालेला घोडेस्वार थेट राज्याच्या दक्षिण सीमेपर्यंत निघाला होता. सीमारेषेवरील एका गावात त्याने मुक्काम ठोकला होता. युद्धाच्या वातावरणनिर्मितीने गाव तसं ओस पडलं होता. तरीसुद्धा दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे काहीजण त्या गावातच राहिले होते. असेच एक वयोवृद्ध जोडपं होत जयदेव आणि आम्रपाली ह्याचं. योगायोगानं घोडेस्वाराच्या नजरेला अंगणात लाकडाच्या काटक्या  वेचणारी वृद्ध आम्रपाली पडली होती.  सततच्या घोडदौडीने दमलेल्या त्या स्वाराने तिथे पायउतार व्हायचे ठरविले. "आजी, पाणी मिळेल का मला घोटभर?" स्वार आम्रपालीला विचारता झाला.  "मिळेल की", आम्रपालीच्या स्वरातील माया घोडेस्वाराला हेलावून गेली. त्यांच्या त्या कुटीत पाणी पिणाऱ्या स्वाराकडे आम्रपाली टक लावून पाहत होती. तिने केलेला रात्रीच्या जेवणाचा आणि मुक्कामाचा आग्रह स्वाराला मोडता आला नाही. आम्रपालीच्या मनात विचारचक्र सुरूच होते. तिने उगाचच जयदेवना काहीतरी निमित्त काढून बाहेर पाठविले. जयदेव बाहेर  गेल्याची खात्री होताच आम्रपाली म्हणाली, "मुली, कशाला इतका जीव घालते आहेस?" "अजून कोणी आहे का इथे?" स्वाराने अगदी दचकून प्रश्न केला. "मी तुझ्याशीच बोलते आहे मुली", आम्रपाली म्हणाली. आता मात्र सीमंतिनीने इतका वेळ धारण केलेला मनोनिग्रह गळून पडला. आम्रपालीच्या अनुभवी नजरेपुढे आपले नाटक चालले नाही ह्याची तिला खात्री पटली. मग तिने आपल्या खऱ्या रुपाची कबुली दिली.
तोवर जयदेव परतले होते. आता त्या दोघांसमोर सीमंतिनीने आपल्या योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. एका तरुण स्वाराच्या रुपात शत्रूसैन्यात शिरून शत्रूच्या व्युहरचनेची माहिती मिळवून ती सिद्धार्थपर्यंत पोहोचविण्याचा सीमंतिनीचा विचार होता. तिची ही धाडशी योजनेची माहिती ऐकून त्या दोघांचा जीव हेलावला. आपल्या प्रेमापायी किती धोका पत्करायला तयार झाली होती ती! अचानक जयदेव आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले, "मुली, मी सुद्धा येतो तुझ्यासमवेत!" तिथे शत्रूच्या छावणीत जावून काय करायचे ह्याची योजना केव्हाच त्यांनी मनात बनविली होती. पुन्हा स्वाराचा वेष परिधान करून सीमंतिनी जयदेव सोबत जावयास निघाली त्यावेळी अचानक तिच्या मनात आम्रपालीचा विचार आला. आयुष्याच्या संध्याकाळी ही स्त्री आपले सर्वस्व असलेला आपल्या पतीला एका अनोळखी मुलीच्या मदतीसाठी जाऊ द्यायला तयार झाली होती. अशा प्रवासावर की जिथुन परत येण्याची शाश्वती नव्हती. मग तिने पटकन एक निरोप सिद्धार्थसाठी लिहून तो आम्रपालीच्या हाती सोपविला. जर आम्ही दोघ परत येवू शकलो नाहीत तर ही चिठ्ठी सिद्धार्थाच्या हाती सोपविण्यास सांगितलं. त्यातील मुख्य मुद्दा आम्रपालीची काळजी घेण्याविषयीचा होता आणि शेवटी एका वाक्यात सीमंतिनीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
एव्हाना संध्याकाळ सरत आली होती. थंड वारे वाहू लागले होते. शत्रूसैन्य ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारीत बसले होते. नक्की युद्ध कधी सुरु होणार ह्याविषयी काहीच माहिती मिळत नव्हती. अचानक जयदेव ह्यांचा खणखणीत आवाज त्या छावणीत दुमदुमला. देवांनी केलेल्या असुरांच्या पराभवाची गाणी गाण्यास त्यांनी सुरुवात केली होती.  त्यांच्या आवाजातील खंबीरतेने सर्व सैन्याचे लक्ष वेधून घेतले आणि हळूहळू सर्वजण त्यांच्याभोवती गोळा होवू लागले. त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुण मुलाने त्यांना डफलीवर साथ द्यायचा प्रयत्न केला परंतु त्यातील बेसुरतेने वैतागून सैन्याने त्या तरुण मुलास थांबण्यास सांगितले.  जयदेव ह्यांच्या आवाजातील जादूने सैन्यावर मोहिनी पसरली होती. जयदेव ह्यांनी सीमंतिनीला नजरेने एका मुख्य तंबूच्या दिशेने खुणावलं. तो सेनापतीचा तंबू आहे हे कळावयास तिला वेळ लागला नाही. आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही हे पाहून सीमंतिनी त्या तंबूच्या दिशेने हळूच निसटली. एव्हाना सेनापती सुद्धा ह्या गायन कार्यक्रमात दाखल झाले होते. आणि त्याचाच फायदा घेत सीमंतिनी त्यांच्या तंबूत शिरली. वेळ फार थोडा होता. तिने भरभर सर्व तंबूतील सामानाची तपासणी करण्यास सुरुवात केली आणि अचानक तिची नजर एका नोंद वहीकडे गेली. त्यातील पहिली एक दोन पाने पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. व्युहरचनेची त्यात पूर्ण माहिती होती. आक्रमणास दुसऱ्या दिवशी पहाटेच सुरुवात होणार होती. ती पूर्ण वही नेण्याचा मोह तिने फार कसोशीने टाळला. त्यातील फक्त व्युहरचनेचे पान फाडून तिने आपल्यासोबत घेतले. तंबूतील विखुरलेल्या गोष्टी तिने जागच्या जागी ठेवल्या. आणि मग तिथूनच मागच्या मार्गाने तिने पलायन केले. योजनेनुसार जयदेव ह्यांनी तिला संधी मिळताच त्यांची वाट न पाहता निघून जाण्यास सांगितलं होते.
जयदेव ह्यांनी बराच वेळ आपला कार्यक्रम सुरु ठेवला. मग भोजनाची वेळ झाली तसे त्यांना सेनापतीने आपल्यासोबत जेवण्याचे निमंत्रण दिले. त्यांना नम्रपणे नकार देवून त्यांनी निघण्याची परवानगी मागितली. एक चांगलीशी बिदागी देवून त्यांना निरोप देण्यात आला. मग रात्रीच्या उशिराच्या प्रहरी शत्रुघ्न सैन्याला येवुन मिळाला तेव्हा युद्ध अगदी जवळ येवून पोहोचले आहे ह्याची सर्वांना खात्री पटली.
सीमंतिनीने आम्रपालीच्या कुटीजवळील आपला घोडा घेतला आणि ती मोठ्या वेगाने राजधानीकडे प्रस्थान करू लागली. राजधानीत सर्व निद्राधीन झाले होते. सिद्धार्थाच्या महालाच्या बाहेर सीमंतिनी घोड्यावरून पायउतार झाली.  सिद्धार्थचा कक्ष कुठे असावा ह्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. अचानक तिचे लक्ष एका मोठ्या खिडकीतून दिसणाऱ्या राजा अंशुमत ह्यांच्या प्रतिमेकडे गेले. हा सिद्धार्थचा कक्ष असावा अशी तिने अटकळ बांधली. सुरक्षारक्षक काहीसे निद्राधीनच होते. त्याचाच फायदा उठवून सीमंतिनीने त्या कक्षात प्रवेश मिळविला. आत सर्व काही शांत होते. एक राजेशाही मंचक कक्षाच्या दुसऱ्या टोकाला होता. स्वाराच्या वेषातील सीमंतिनी त्या दिशेने चालू लागली. अचानक कोणीतरी तिला जोराने बिछान्यावर ढकलले आणि दुसऱ्या क्षणी आपल्या छातीवर असलेल्या तलवारीच्या टोकाने सीमंतिनी भयभीत झाली. तिचे लक्ष आपल्यावर आक्रमण करणाऱ्या युवकाकडे गेले आणि ती हळूच म्हणाली, "मी सीमंतिनी आहे सिद्धार्थ!" राजबिंड्या  सिद्धार्थचे ते मोहक रूप तिला त्याही स्थितीत तिला मोहवून गेले. सिद्धार्थला आवाजाची खुण पटली आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. "सीमंतिनी, तू आणि इथे, ह्या वेळी आणि ह्या अशा वेषात काय करीत आहेस?" सिद्धार्थ विचारता झाला. "तू प्रथम माझ्यावरील तलवार  घेशील तरच मी उत्तर देवू शकीन", सीमंतिनी उत्तरली. सिद्धाथने तलवार तर बाजूला केली. परंतु अजूनही त्याचा संशय पूर्णतः दूर झाला नव्हता. हिचा कोणी कटासाठी वापर तर करून घेत नाहीये ना? असा विचार त्याच्या मनात आला. तोवर सीमंतिनीने आपले  केस मोकळे  केले होते. आणि आपली सर्व वीर कथा त्याला थोडक्यात सांगितली. तिच्या प्रत्येक वाक्यानुसार सिद्धार्थच्या चेहऱ्यावर तिच्याविषयीच्या कौतुकाचे भाव उमटत होते. सीमंतिनीने त्याला व्युहरचनेचे पान सोपवले आणि सिद्धार्थला तिने पार पडलेल्या अमोल कामगिरीचे महत्व समजले. सीमंतिनीला त्याने पाण्याचा एक पेला हाती सोपविला आणि तो व्यूहरचनेचे निरीक्षण करू लागला. काही वेळ निरीक्षण केल्यावर त्याने प्रश्न विचारण्यासाठी सीमंतिनीकडे नजर वळविली. ती तोवर त्याच्या मंचकावर निद्राधीन झाली होती. गवाक्षातून डोकावणारी पहाटेची चंद्राची शीतल किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती आणि त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. पहाट व्हायला आता जास्त वेळ बाकी राहिला नव्हता. ह्या व्यूहरचनेनुसार शत्रूवर आक्रमण करणे काहीसे सोपे जाणार असले तरी युद्ध किती काळ चालेल ह्याचा भरवसा नव्हता. सिद्धार्थच्या मनात हे सर्व विचारचक्र सुरु असले तरी चंद्रकिरणांनी खुललेल्या सीमंतिनीच्या सुंदर चेहऱ्याकडे बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. तिच्या अंगावर त्याने पांघरूण ओढले आणि कक्षाबाहेर जाण्यासाठी त्याची पावले वळली. दोन पावले पुढे जाताच एक विचार त्याच्या मनात आला. हळूच येवून त्याने क्षणभर त्या सौंदर्यवतीच्या ओठावर ओठ टेकविले आणि आपल्या ह्या कृतीने लाजून तो भरभर महालाबाहेर प्रस्थान करता झाला. इथे झोपेचे सोंग  घेतलेल्या सीमंतिनीच्या आनंदाला सीमा उरली नव्हती!