बुद्धिबळाच्या खेळात अनेक धूर्त चाली रचल्या जातात. खेळाच्या सुरुवातीला आपल्या प्याद्याचा बळी देऊन स्वतःस चांगली स्थिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण बुद्धिबळ असो वा जीवन असो चांगली धोरणात्मक परिस्थिती मिळविण्यासाठी कधीकधी आपल्याकडील तुलनात्मक दृष्ट्या कमी किमतीच्या वस्तूचा त्याग करणे योग्य ठरते.
प्यादे निर्जीव असल्याने त्याचा बळी देताना त्याच्या परवानगीचा प्रश्न उदभवत नाही. परंतु हीच चाल ज्यावेळी राजकारणात खेळली जाते त्यावेळी अशा कित्येक प्याद्यांचा, त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा मोठ्या राजकारणी लोकांच्या प्रतिमाबांधणीसाठी अथवा त्यांची प्रतिमा उजळण्यासाठी वापर केला जातो. मग असे हे प्यादे कधी चुकीचे विधान करत जे मोठा माणूस येवून सुधारतो आणि आपली प्रतिमा उजळ बनवून जातो. किंवा गोत्यात सापडलेल्या राजकीय वजनदार व्यक्तीच्या कृष्णकृत्याचे खापर कोणत्या तरी प्याद्यावर फोडले जाते. काळानुसार प्यादीसुद्धा धूर्त बनत चालली आहेत. आपला बळी जाऊन देण्याआधी त्याचा दुसऱ्या कोणत्या तरी स्वरुपात मोबदला वसूल करण्यास ते चुकत नाहीत!
कधी कधी ह्याचं उलट रूपसुद्धा पहावयास मिळत. जर मोठा आर्थिक फायदा होणार असेल तर आपल्या प्रतिमेचा विचार काही काळ मागे टाकला जातो. जसे की कांदा. तेल, साखर ह्यांचे भाव वाढत जाणार अशी विधाने करून जर अप्रत्यक्षरीत्या आर्थिक फायदा होणार असेल तर लोकांना आपल्याविषयी येणाऱ्या संतापाची चिंता करू नये. लोकांची स्मरणशक्ती कमी असते, ते काही काळाने सर्व काही विसरणार!
एकंदरीत बुद्धीबळाचा खेळ अगदी वरच्या पातळीवर खेळला जात आहे हेच खरे!
No comments:
Post a Comment