Sunday, September 8, 2013

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन भाग १


ब्लॉगचे शीर्षक वाचून हे एखाद्या अतिजलद जहाजाने केलेल्या प्रवासाचे वर्णन असावे असा तुमचा समज झाल्यास त्यात काही चुकीचे नाही. परंतु तसली काही परिस्थिती नसून २००२ साली मी सपत्निक केलेल्या एका प्रदीर्घ विमानप्रवासाची ही हकीकत आहे. आणि हो,  हा नियोजित ५३ तासांचा प्रवास होता. ह्यात कोठेही विमान रद्द झाले नाही किंवा खोळंबले नाही किंवा आम्ही ते चुकविले नाही. बाकी म्हणावं तर विमानांचा वेगही २००२ साली अगदी कमी होता असेही नाही!
प्रस्तावना खूप झाली. झाले असे की माझी नेमणूक सर्वप्रथम फिनिक्स, अरिझोना इथे करण्यात आली होती. माझ्या तत्कालीन कंपनीच्या धोरणानुसार त्या कंपनीच्या भारतीय शाखेने आमचे मुंबई ते फिनिक्स असे दोन्ही मार्गांचे तिकीट घेतले. फिनिक्स हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या जवळ असल्याने आम्ही मुंबईहून निघताना सिंगापूर - टोकियो - लॉस अंजेलीस - फिनिक्स असा प्रवास केला होता. त्या तिकीटावरील तारीख आणि वेळ ह्यांचा मेळ बसविताना नाकी नऊ आल्याने आम्ही शेवटी फिनिक्सला किती वाजता पोहोचणार ह्याचा फक्त विचार केला होता. हा प्रवास तसा व्यवस्थित झाला.
फिनिक्स मधील वास्तव्य तसे सुखदायक चालले होते. तेथील टीम अनुभवी आणि स्थिर अशी होती. त्यामुळे नवीन आज्ञावली विकसनाचे काम आणि प्रोडक्शन सपोर्ट (आग विझवण्याचे काम!) ह्यात काही चिंतेचे प्रसंग येत नसत. लग्नानंतर आमचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यामुळे अमेरिकेत अगदी शून्यातून घर वसवायची संधी मिळाल्याने आम्ही खुशीत होतो. परंतु म्हणतात ना कधी कधी सुखाला दृष्ट लागते. आमच्या बाबतीतही असेच झाले. तीन महिन्यानंतरच त्या प्रोजेक्टच्या संघरचनेत काहीसा बदल करण्याचे ठरविण्यात आले आणि भारतातील संघ मुंबईऐवजी चेन्नईला स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले. ह्या सर्व बदलात माझी फिनिक्सची जागा धोक्यात आली. त्यामुळे माझ्यासाठी नवीन जागेचा शोध सुरु झाला आणि सुदैवाने माझी नेमणूक फ्लोरिडात करण्यात आली. कंपनीच्या धोरणानुसार फिनिक्स ते फ्लोरिडा हे तिकीट त्यांच्या अमेरिकन शाखेने बुक केले.
फ्लोरिडातील नेमणूक काही फारशी दीर्घ स्वरूपाची नव्हती. परंतु रखरखीत फिनिक्सपेक्षा काहीसे पावसाची कृपा असलेले हिरवेगार फ्लोरिडा बरे असा आम्ही समज करून घेतला. फ्लोरिडात नवीन कामाचे स्वरूप समजावून घेवून ते काम मुंबईहून करायचे होते. साधारणतः दोन महिन्यात ते काम आटोपण्याची चिन्हे दिसू लागली. फिनिक्स आणि फ्लोरिडातील वास्तव्यातील काही मनोरंजक कहाण्या नंतर कधीतरी!
आता परतीचे तिकीट आरक्षित करण्याची वेळ आली. आम्ही अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर होतो आणि तेथून मुंबई युरोपमार्गे २० तासावर होती. त्यामुळे आम्हाला तसेच तिकीट मिळेल असा सोयीस्कर समज आम्ही करून घेतला होता.
प्रथम मी कंपनीच्या भारतीय शाखेला फोन केला. "आपले परतीचे तिकीट फिनिक्सहून आरक्षित आहे, त्या विमानकंपनीला फोन करून आपण तारीख निश्चित करा" असे मला सौजन्यपूर्ण भाषेत समजाविण्यात आले. "परंतु मी सध्या फ्लोरिडात आहे", मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही तिथे कसे पोहोचलात?" काहीशा  आश्चर्यपूर्ण स्वरात समोरील ललना उद्गारली. "विमानाने!" असे उत्तर देण्याचा मोह मी अतिप्रयत्नपूर्व टाळला. तिला मी सर्व परिस्थिती थोडक्यात सांगितली. बहुधा तिला (अथवा तिच्या मेंदूला) हा सर्व प्रकार  झेपला नसावा. तिने मला सविस्तर ई -मेल लिहिण्यास सांगितले.
पुढील दोन दिवसात एकंदरीत प्रकार आमच्या ध्यानात आला होता. भारतीय शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या फक्त अमेरिकेतील अंतर्गत प्रवासाची जबाबदारी अमेरिकन शाखा करीत असे. भारत ते अमेरिका हा प्रवासटप्पा भारतीय शाखेच्या अखत्यारीत येत असे. आणि भारतीय शाखेने तर आमचे फिनिक्सहून तिकीट आरक्षित केले होते. हे तिकीट रद्द करून पूर्व किनारपट्टीवरून नव्याने तिकीट आरक्षित करण्यासाठी लाल फीत आणि रद्द करण्याचा खर्च मध्ये येत होते. तसे म्हटले तर हे दोन्ही अडथळे दूर करता येतात, पण त्यासाठी एकतर तुम्ही मोठ्या पदावर असायला हवे किंवा तितका समजूतदार व्यवस्थापक असावा लागतो. माझ्या बाबतीत हे दोन्ही प्रकार नव्हते त्यामुळे आमचा प्रवास मार्ग निश्चित झाला होता. त्यातही एक धमाल होती. फ्लोरिडा (फोर्ट लॉदरडेल) ते फिनिक्स ह्या प्रवासात सुद्धा आम्हाला टेक्सास असा थांबा सुचविण्यात आला होता. त्या अमेरिकन शाखेच्या तिकीट आरक्षित करणाऱ्या बाईस मी माझा एकंदरीत प्रवासमार्ग ऐकवला.   फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स - लॉस अंजेलीस - चायनीज तैपई - सिंगापोर - मुंबई, आणि ह्यात अजून एक थांबा न वाढविण्याची कळकळीची विनंती केली. बहुदा देवाने माझी प्रार्थना ऐकली असावी आणि मग तिने मला फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स असे थेट तिकीट देण्याचे कबूल केले. आता ह्यातील प्रवासाचा आणि थांब्यांचा कालावधी ऐका
 फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स (प्रवास पाच तास, फिनिक्स थांबा सहा तास)
फिनिक्स - लॉस अंजेलीस (प्रवास दोन तास, लॉस अंजेलीस थांबा चार तास)
लॉस अंजेलीस - चायनीज  तैपई (प्रवास तेरा तास, चायनीज  तैपई थांबा चार तास)
 चायनीज  तैपई - सिंगापूर  (प्रवास पाच तास, सिंगापूर  थांबा नऊ तास)
सिंगापूर- मुंबई (प्रवास ४ - ५ तास)
तसे पाहिले तर बाकीचे सर्व फिनिक्सवरून निघताना ४२ तासांचा प्रवास करीतच त्यात फक्त (!) अकरा तासांची भर पडली होती अशी माझी कंपनीतर्फे समजूत काढण्यात आली. आणि सिंगापूरला हॉटेल बुक करण्याचा सल्लाही देण्यात आला. "कंपनी हा हॉटेल खर्च देईल ना?" मी उगाचच विचारले! मग विषय बदलून मला ह्या नऊ तासात सिंगापूर दर्शन करण्याचा सल्ला देण्यात आला.
२२ ऑगस्ट २००२ रोजी अमेरिकन पूर्व किनारपट्टीच्या वेळेनुसार आम्ही सकाळी साडेसात वाजता आमचे हॉटेल सोडले. विमानतळावर सोडण्यासाठी एका भारतीय टक्सीवाल्याला आम्ही बोलावलं होत. तिकीट आरक्षित  करताना मी फ्लोरिडालाच आम्हाला मोठ्या सामानाच्या bags चेक  इन करता येईल ह्याची खात्री करून घेतली होती. परंतु प्रत्यक्ष विमानतळावरील चेकइन कक्षात मला दुसरीच माहिती मिळाली. तुम्हाला ह्या bags फिनिक्सला ताब्यात घेवून परत चेकइन कराव्या लागतील असे सांगण्यात आले. सहसा डोक्यात राख न घालून घेणारा अशी माझी स्वतःविषयी समजूत आहे. परंतु एकंदरीत ह्या प्रकाराने मी इतका संतापलो होतो की मी सभ्यपणा राखून जितका त्याच्याशी वाद घालता येईल तितका घातला. ह्यात माझ्या पत्नीने भरलेल्या वजनदार bagsचा विचार किती कारणीभूत होता हे माहित नाही! इतके होऊन सुद्धा त्या सभ्य गृहस्थाने मला असा मार्ग शोधून देणारा माझा ट्रेव्हल अजेंट बदलायचा सल्ला दिला. माझ्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या त्या सभ्य गृहस्थाला उत्तर देण्याचे मी कसोशीने टाळले.
अमेरिकेतील अंतर्गत प्रवासात खाण्यापिण्याची मारामार असते. त्यामुळे त्या विमानकंपनीने आम्हाला विमानात शिरण्याआधी काही अल्पोपहाराचे पदार्थ घेण्याचे सुचविले. परंतु आम्ही विमानात मिळणाऱ्या शेंगदाणे आणि कोकवर गुजराण करण्याचे ठरविले. बाकी विमानाने उड्डाण करण्याआधी मी प्राजक्ताला म्हणालो, "लग्नाच्या पहिल्या वर्षातच तुला पूर्ण अमेरिका पूर्व-पश्चिम अशी दाखवत आहे हो, नीट पाहून घे!" आणि तिच्या नजरेच्या तीक्ष्ण प्रतिसादाकडे पाहण्याची हिम्मत नसल्याने मी दुसरीकडे नजर वळविली. बाकी हा प्रवास ठीक चालला होता. वैमानिक अधून मधून खालून दिसणाऱ्या भूभागाविषयी बोलत होते. समोरील स्क्रीनवर हाणामारीचा एक चित्रपट चालला होता. फिनिक्सचा खरा पाच तासांचा प्रवास ह्या पट्ठ्याने लवकर संपवित आणला. फिनिक्सच्या आसपास अधूनमधून वणवे लागतात. असाच एक वणवा त्यावेळी लागला होता. वैमानिकाने त्याविषयी माहिती दिली. अशा वेळी साधारणतः अतिशोयक्ती अलंकार वापरले जातात त्यामुळे वैमानिकाच्या म्हणण्यानुसार हा गेल्या वीस वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा होता. जोपर्यंत हा विमानापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत हा गेल्या शंभर वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा का नसेना असा स्वार्थी विचार आम्ही केला. फिनिक्सचे स्काय हार्बर दिसू लागले होते. माणसाचे मन कसं असतं पहा ना, फिनिक्स मध्ये आम्ही तर काही महिनेच घालविले होते परंतु तिथे पुन्हा उतरताना आपल्याच गावी उतरण्याची भावना आमच्या मनी दाटली होती. हे सर्व प्रवासवर्णन एका भागात संपवायचा विचार होता परंतु आता दुसरा भाग करावा लागेल असे दिसतंय! फिनिक्स ते मुंबई पुढच्या भागात!

 

No comments:

Post a Comment