Tuesday, September 10, 2013

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्ण​न भाग २


अमेरिकेत गेलेल्या IT क्षेत्रातील तंत्रज्ञाच्या सुविद्य पत्नी बर्यापैकी चांगला कंपू बनवून असतात .  प्राजक्ताचा सुद्धा फिनिक्स मध्ये असा कंपू होता. फ्लोरिडात गेल्यावर सुद्धा ह्या कंपूतील बऱ्याचजणी तिच्या संपर्कात होत्या. परतीच्या मार्गावर प्राजक्ता फिनिक्सला उतरणार हे कळल्यावर त्यांना कोण आनंद झाला.  आपल्या पत्नींनी बनविलेल्या कंपूविषयी नवरेवर्गांच्या संमिश्र भावना असतात. ह्या कंपूमुळे सोमवार - शुक्रवार ह्या दिवसांत आपली पत्नी शांत असते त्यामुळे नवरे खुश असतात परंतु साप्ताहिक सुट्टीच्या वेळी ह्या कंपूमुळे नसते उद्योग त्यांच्या मागे लागतात, त्यामुळे नवरे बऱ्याच वेळा वैतागतात. परंतु हा वैताग बऱ्याच वेळा बोलून दाखवता  येत नाही. तसाच काहीसा प्रकार इथे झाला. प्राजक्ता आणि वर्गाने फिनिक्स विमानतळावर भेटण्याचा कार्यक्रम परस्पर ठरवला. ह्यात नवरे वर्गाला शुक्रवारी दुपारच्या वेळात कार्यालयातून सुट्टी घेवून विमानतळावर यायला जमेल असे गृहीतक होते. आणि ते गृहीतक दोन नवऱ्यांनी अचूक ठरविले.

फिनिक्स विमानतळावर आम्हाला आमच्या चेक इन सामानाचे दर्शन झाले. ते ताब्यात घेऊन उद्वाहकात टाकून एक मजला वर चढविले आणि पुन्हा चेक इन केले. आमचे विमान फिनिक्सला वेळेआधी पोहोचल्यामुळे लॉस अंजेलीसचे विमान सुटायला अजून ६ तास बाकी होते. त्यामुळे वेळेआधी सहा तास चेक इन करणाऱ्या माझ्याकडे त्या चेक इन कक्षातील इसमाने अजून एक नजर दिली. मला एकंदरीत ह्या प्रवासात अशा अनेक नजरांना सामोरे जावे लागेल ह्याचा एव्हाना मला अंदाज आलाच होता. त्यामुळे मी त्या नजरेकडे दुर्लक्ष गेले. एकंदरीत हे सामान माझ्याकडे दहा मिनिटे होते. हीच उठाठेव त्या दोन्ही स्वतःला सहभागी म्हणविणाऱ्या विमान कंपन्यांनी केली असती तर काय झाले असते असा विचार माझ्या मनात येऊन गेला. विमानतळावर भातजन्य काही आशियन भोजन पदार्थ उपलब्ध होते. त्यातील एकाची आम्ही निवड करून वेळ भागविली. एव्हाना आमच्या मित्रमंडळीचे आगमन झाले होते. आमच्यासाठी भेटवस्तू, काही चॉकोलेटस अशा वस्तू घेऊन ते आले होते. माझ्या दोन मित्रांनी सुद्धा अनपेक्षितरित्या विमानतळावर येऊन आम्हाला सुखद धक्का दिला. प्राजक्ताची एक मैत्रीण, रजिता तिच्यासाठी निवडुंगाचे  एक छोटे रोप घेऊन आली होती. फिनिक्समधील निवडुंगाची विविधता बघता ही एक योग्य भेट होती. पुढे हे रोप प्राजक्ताने वसईत बरेच दिवस टिकविले परंतु एका पावसात त्याला सुरक्षित वातावरणात घेऊन न जाता आल्याने ते बिचारे दगावले. आमच्याकडे भरपूर वेळ असला तरी मंडळी घाईत होती. त्यामुळे ४५ मिनिटांच्या आसपास त्यांना आमचा निरोप घ्यावा लागला. विमानतळावर खरेदीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असले तरी आता अजून सामान कोंबायला वाव नसल्याने प्राजक्ताचा नाईलाज झाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
मराठीत किंबहुना प्रत्येक भाषेतील म्हणी अगदी समर्पक असतात. मनुष्यजातीच्या इतिहासात माणसे विविध प्रसंगात सापडली असतील तेव्हा त्यांना या म्हणी सुचल्या असतील. आपण ज्यावेळी तशाच प्रसंगात सापडतो तेव्हा आपल्याला ह्या म्हणी आठवतात. 'दुष्काळात तेरावा महिना' ही एक अशीच म्हण! सहा तासाचा थांबा काही कमी नव्हता म्हणून फ्लोरिडाहून विमान लवकर आले आणि आता लॉस अंजेलीसचे विमान काही वेळ उशिरा सुटणार असल्याची बातमी येऊन पोहोचली. अगदी काही निर्वाणा वगैरे परिस्थिती अजून आमची झाली नव्हती. त्यामुळे काही वेळ अजून घालविण्यात आम्ही यश मिळविले. शेवटी एकदाचे ते लॉस अंजेलीसला जाणारे विमान येऊन गेटवर लागले, आता आम्ही थोडे चिंतेत होतो. लॉस अंजेलीसवरून सुटणारे विमान चुकणार तर नाही ना ह्याची चिंता आम्हाला भेडसावू लागली होती. हा दोन तासाचा प्रवास तसा पटकन गेला. ह्यात लक्षात राहण्यासारखी एकच गोष्ट, आम्हाला दोघांना आजूबाजूच्या सीट्स मिळाल्या नव्हत्या. प्राजक्ताला एका अमेरिकन माणसाच्या बाजूची सीट मिळाली होती. आणि त्या दोघांचे हास्यविनोद चालू होते. आणि त्यामुळे माझी जिया जले … वगैरे परिस्थिती झाली होती. बाकी लग्नाला एकच वर्ष झाल्याने हे ठीक होते असे  मागे वळून पाहता मी म्हणू इच्छितो.
TOM BRADLEY विमानतळावर ही गर्दी उसळली होती. किंवा ती नेहमीच असावी आणि आम्ही दुसऱ्यांदाच तिथे आल्याने आम्हाला असे वाटले असावे. सर्व पावले आम्ही ज्या टर्मिनलकडे जाऊ पाहतो आहोत तिथेच चालली असावीत असा आम्हांला भास होत होता. त्या गर्दीचा मुकाबला करीत आम्ही अजून एका आगमन कक्षात जाऊन पोहोचलो. तिथे बोर्डिंग पास घेताना I९४ कागदपत्र तेथील अधिकाऱ्याला सोपविताना अमेरिकेची ही वारी संपुष्टात आल्याचे काही प्रमाणात आम्हाला दुःख झाले. सिंगापूर एयरलाईन्सचा एयर इंडियाबरोबर कोड शेयर होता असे मला पुसटसे आठवते. म्हणजे ह्या मार्गावर उड्डाण करण्याचे खरे हक्क कडे होते परंतु एयर इंडियाने काही पैशाच्या मोबदल्यात हे हक्क सिंगापूर एयरलाईन्सला विकले होते. एकंदरीत भारतात पोहोचल्याची चाहूल इथूनच मला लागली. त्या टर्मिनलच्या पुढे एखाद्या गावच्या एस टी डेपोप्रमाणे गर्दी उसळली  होती. एकदाचा आम्ही विमानात प्रवेश मिळविला.
TOM BRADLEY हे भव्य विमानतळ असावे ह्याची जाणीव मला उड्डाण होण्याच्या वेळी झाली. गेटवरून विमान निघाल्यापासून मुख्य धावपट्टीवर येईस्तोवर बहुदा पाच दहा मिनिटे गेली असावीत. विमान एकदा मुख्य धावपट्टीवर पोहोचले की अंतिम धाव सुरु करण्याआधी एक क्षणभर विसावते. त्यावेळी प्रत्येकवेळा माझ्या मनात ह्या क्षणी या महाकाय वाहनास उड्डाण करण्यापासून जर प्रवृत्त करायचे असेल तर काय करावे लागेल असा विचार माझ्या मनात येतो! असो विमानाने एकदाचे उड्डाण केले. पौर्णिमेची रात्र होती बहुदा. आकाशातील ढगांवरून हे विमान उडत होते आणि चंद्राची शीतल किरणे त्या ढगांवर पसरली होती. पुढील अनेक तास हेच दृश्य मला दिसणार होते.  विमानप्रवासातील काही गोष्टींचा मला सदैव अचंबा वाटत आला आहे. जसे की दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणात हवाई सुंदऱ्या काळ वेळ  पाहता आपल्याला एकदम ताटभर नव्हे प्लेटभर जेवण का आणून देतात? आणि प्रवाशातील काहीजण / अनेकजण पुढे बराच काळ आपल्याला काही खायला मिळणार नाही असे समजून त्यावर तुटून का पडतात? असो स्थळ काळाचे भान एव्हाना संपले होते आणि त्या रात्रीच्या पहिल्या जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला होता. जबरदस्तीने सर्वांना खिडक्या आणि सीटवरील  दिवे बंद करायला लावून झोपेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यात येत होता. इतका वेळ कसा व्यतीत करावयाचा ह्याची चिंता मला पडली होती. समोरील सीटवर असलेल्या स्क्रीनवर गेम खेळण्यात आणि उपलब्ध असलेले थोडेफार चित्रपट पाहण्यात मी सुरुवातीचा काही वेळ घालविला. प्राजक्ता एकंदरीत प्रवासी म्हणून असलेल्या आणि गृहीत धरलेल्या हक्कांविषयी अगदी जागरूक होती. त्यामुळे तिने जवळजवळ दर तासाला हवाईसुंदरीकडे कोमट पाण्याची विनंती करण्याचा सपाटा चालविला. त्या हवाईसुंदरींच्या संयमाचे कौतुक करावे तितके थोडे! त्यांनी तिच्या प्रत्येक विनंतीचा मान राखित प्रत्येक वेळी कोमट पाणी आणून दिले. मधल्या कालावधीत मी खेळत असलेल्या गेममध्ये नैपुण्य संपादित करीत माझे वैयक्तिक उच्चांक नोंदवले. विमानात दाखविले जाणारे टुकार हिंदी चित्रपट मला झेपण्याच्या पलीकडे होते. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला. बहुदा तासभर असेल परंतु तितक्यात पुन्हा खाण्याची किंवा शीतपेयाची वेळ झाली होती. मदिराप्राशन करणारे सुखी जीव निद्राधीन झाले होते. असाच कधीतरी आकाशात सूर्य उगवला. दात घासण्याची तीव् इच्छा खळखळून चूळ मारण्यावर भागवून न्यावी लागली. आता मात्र जमिनीवर पाय टेकण्याची फार ओढ लागली होती. खूप वेळ नुसते खाऊन बसून राहिल्यावर दुसरे होणार तरी काय? शेवटी कसेबसे ते तेरा तास भरले आणि विमान चायनीज तैपईला उतरले. तिथे सराईत प्रवाशी ब्रश वगैरे घेवून न्हाणीघराच्या दिशेने कूच करते झाले. आम्ही फक्त ब्रश केले. ह्या विमानतळावर फारसे काही विशेष घडले नाही. म्हणायला तिथे चवीसाठी चहाचे नमुने ठेवण्यात आले होते. आम्ही त्यात फारसा रस दाखविला नाही.
सिंगापूरला उड्डाण करण्याचे गेट शोधून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. चायनीज तैपई ते सिंगापूर हा प्रवास काही खास घटनेशिवाय झाला. बाहेर सूर्याची प्रखर किरणे विमानाला तापून काढत होती. तारीख कोणती असावी असा प्रश्न विचारून मेंदूला त्रास करून घेण्याची तसदी मी घेतली नाही.
सिंगापूरला आम्ही हॉटेल बुक केले होते. तिथे जाण्यासाठी एका टर्मिनलवरून मिनी ट्रेनने आम्ही दुसऱ्या टर्मिनलवर गेलो. तिथे हॉटेलमध्ये शिरून सचैल स्नान केले. अंघोळीनंतर अगदी गाढ झोप लागली. नशीब म्हणून अलार्म लावला होता. त्याच्या आवाजाने जाग आल्यावर एक क्षणभर आपण कोठे आहोत आणि किती वाजले असावेत ह्याचे भान राहिले नाही. बाहेर येवून आम्ही सिंगापूर दर्शनच्या रांगेत उभे राहिलो. तिथे आमचे पासपोर्ट ताब्यात घेवून ही विनामुल्य सफर घडविण्यात आली. त्यांना पासपोर्ट देताना आम्हाला काहीसे जीवावर आले होते. बाकी सफर उत्तम झाली. सन्तोसा बीचशिवाय विशेष उल्लेखनीय काही नव्हते. जर माझी स्मरणशक्ती माझी उत्तम सेवा करीत असेल तर त्या बीचवरील पांढरी वाळू विशेष लक्षात राहिली. (हे इंग्लिश वाक्याचे मराठीत जसेच्या तसे भाषांतर!) एकंदरीत थकलेल्या मनःस्थितीमुळे आम्ही ही सफर फारशी काही मजेत अनुभवली नाही. परत आल्यावर आम्हाला आमचे पासपोर्ट परत करण्यात आले. कोणी सिंगापूरमध्ये परस्पर गायब होऊ नये म्हणून ही काळजी. मग आम्ही विमानतळावर चिकन करी आणि भात असे जेवण घेतले. ह्या नऊ तासाच्या थांब्याची एक गंमत. एक मित्र एकटाच परत येताना ह्या गेटसमोर नऊ तासाचा थांबा म्हणून झोपून गेला. इतका गाढ कि विमान उड्डाणाची वेळ झाली तरी त्याची झोप काही उडाली नाही. एअरलाईन्सने केलेला त्याचा नावाचा घोष सुद्धा त्याला उठवू शकला नाही. शेवटी त्याचे सामान बाहेर काढून विमान उड्डाण करते झाले. त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला आलेले नातेवाईक बराच काळ चिंताग्रस्त होते.
असो आम्ही सिंगापूर विमानतळावर एल्विसचा एक शो चालला होता तोही पाहिला. आणि शेवटी एकदाचे आम्ही  मुंबईला जाणाऱ्या विमानात बसलो. आता माझे स्थळकाळाचे भान काहीसे परत आले होते. रविवारची संध्याकाळ झाली होती. पुन्हा एकदा हवाईसुंदरी, जेवण, गेम्स अशा सर्व चक्राचा मुकाबला करीत आम्ही सोमवारी सकाळी साडेबारा वाजता मुंबईला आगमन करते झालो. आम्ही अशा मनःस्थितीत पोहोचलो होतो कि अजून आम्हाला कोणी परत अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसण्यास सांगितले असते तर ते ही आम्ही केले असते! असा एक धमाल प्रवास! एखादा धीम्या गतीचा चित्रपट ज्यात नायक नायिकेचे भावबंध ५३ तासात उलगडत जातात, असा सुद्धा बनू शकतो!

 

No comments:

Post a Comment