Saturday, September 7, 2013

तपोवन - भाग १२


शत्रुघ्नने दोन दिवसातच सर्व मोर्चेबांधणी केली होती. सिद्धार्थच्या साम्राज्याच्या दक्षिण सीमेभोवती शत्रूसैन्याने वेढा  घातला होता. तिथे सिद्धार्थची सेना कमकुवत असल्याची बातमी त्यांना मिळाली होती. एकदा का दक्षिण सीमेवरील सिद्धार्थच्या सेनेचे कवच भेदले की थेट राजधानीपर्यंत मुसंडी मारण्याचा शत्रुघ्नचा डाव होता. राजा प्रद्द्युत जरी ह्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला नसला तरी त्याच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली पूर्ण सेना ह्यात सहभागी झाली होती.
महर्षी अगस्त्य ह्यांच्या आश्रमातून निघालेला घोडेस्वार थेट राज्याच्या दक्षिण सीमेपर्यंत निघाला होता. सीमारेषेवरील एका गावात त्याने मुक्काम ठोकला होता. युद्धाच्या वातावरणनिर्मितीने गाव तसं ओस पडलं होता. तरीसुद्धा दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे काहीजण त्या गावातच राहिले होते. असेच एक वयोवृद्ध जोडपं होत जयदेव आणि आम्रपाली ह्याचं. योगायोगानं घोडेस्वाराच्या नजरेला अंगणात लाकडाच्या काटक्या  वेचणारी वृद्ध आम्रपाली पडली होती.  सततच्या घोडदौडीने दमलेल्या त्या स्वाराने तिथे पायउतार व्हायचे ठरविले. "आजी, पाणी मिळेल का मला घोटभर?" स्वार आम्रपालीला विचारता झाला.  "मिळेल की", आम्रपालीच्या स्वरातील माया घोडेस्वाराला हेलावून गेली. त्यांच्या त्या कुटीत पाणी पिणाऱ्या स्वाराकडे आम्रपाली टक लावून पाहत होती. तिने केलेला रात्रीच्या जेवणाचा आणि मुक्कामाचा आग्रह स्वाराला मोडता आला नाही. आम्रपालीच्या मनात विचारचक्र सुरूच होते. तिने उगाचच जयदेवना काहीतरी निमित्त काढून बाहेर पाठविले. जयदेव बाहेर  गेल्याची खात्री होताच आम्रपाली म्हणाली, "मुली, कशाला इतका जीव घालते आहेस?" "अजून कोणी आहे का इथे?" स्वाराने अगदी दचकून प्रश्न केला. "मी तुझ्याशीच बोलते आहे मुली", आम्रपाली म्हणाली. आता मात्र सीमंतिनीने इतका वेळ धारण केलेला मनोनिग्रह गळून पडला. आम्रपालीच्या अनुभवी नजरेपुढे आपले नाटक चालले नाही ह्याची तिला खात्री पटली. मग तिने आपल्या खऱ्या रुपाची कबुली दिली.
तोवर जयदेव परतले होते. आता त्या दोघांसमोर सीमंतिनीने आपल्या योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. एका तरुण स्वाराच्या रुपात शत्रूसैन्यात शिरून शत्रूच्या व्युहरचनेची माहिती मिळवून ती सिद्धार्थपर्यंत पोहोचविण्याचा सीमंतिनीचा विचार होता. तिची ही धाडशी योजनेची माहिती ऐकून त्या दोघांचा जीव हेलावला. आपल्या प्रेमापायी किती धोका पत्करायला तयार झाली होती ती! अचानक जयदेव आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले, "मुली, मी सुद्धा येतो तुझ्यासमवेत!" तिथे शत्रूच्या छावणीत जावून काय करायचे ह्याची योजना केव्हाच त्यांनी मनात बनविली होती. पुन्हा स्वाराचा वेष परिधान करून सीमंतिनी जयदेव सोबत जावयास निघाली त्यावेळी अचानक तिच्या मनात आम्रपालीचा विचार आला. आयुष्याच्या संध्याकाळी ही स्त्री आपले सर्वस्व असलेला आपल्या पतीला एका अनोळखी मुलीच्या मदतीसाठी जाऊ द्यायला तयार झाली होती. अशा प्रवासावर की जिथुन परत येण्याची शाश्वती नव्हती. मग तिने पटकन एक निरोप सिद्धार्थसाठी लिहून तो आम्रपालीच्या हाती सोपविला. जर आम्ही दोघ परत येवू शकलो नाहीत तर ही चिठ्ठी सिद्धार्थाच्या हाती सोपविण्यास सांगितलं. त्यातील मुख्य मुद्दा आम्रपालीची काळजी घेण्याविषयीचा होता आणि शेवटी एका वाक्यात सीमंतिनीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
एव्हाना संध्याकाळ सरत आली होती. थंड वारे वाहू लागले होते. शत्रूसैन्य ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारीत बसले होते. नक्की युद्ध कधी सुरु होणार ह्याविषयी काहीच माहिती मिळत नव्हती. अचानक जयदेव ह्यांचा खणखणीत आवाज त्या छावणीत दुमदुमला. देवांनी केलेल्या असुरांच्या पराभवाची गाणी गाण्यास त्यांनी सुरुवात केली होती.  त्यांच्या आवाजातील खंबीरतेने सर्व सैन्याचे लक्ष वेधून घेतले आणि हळूहळू सर्वजण त्यांच्याभोवती गोळा होवू लागले. त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुण मुलाने त्यांना डफलीवर साथ द्यायचा प्रयत्न केला परंतु त्यातील बेसुरतेने वैतागून सैन्याने त्या तरुण मुलास थांबण्यास सांगितले.  जयदेव ह्यांच्या आवाजातील जादूने सैन्यावर मोहिनी पसरली होती. जयदेव ह्यांनी सीमंतिनीला नजरेने एका मुख्य तंबूच्या दिशेने खुणावलं. तो सेनापतीचा तंबू आहे हे कळावयास तिला वेळ लागला नाही. आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही हे पाहून सीमंतिनी त्या तंबूच्या दिशेने हळूच निसटली. एव्हाना सेनापती सुद्धा ह्या गायन कार्यक्रमात दाखल झाले होते. आणि त्याचाच फायदा घेत सीमंतिनी त्यांच्या तंबूत शिरली. वेळ फार थोडा होता. तिने भरभर सर्व तंबूतील सामानाची तपासणी करण्यास सुरुवात केली आणि अचानक तिची नजर एका नोंद वहीकडे गेली. त्यातील पहिली एक दोन पाने पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. व्युहरचनेची त्यात पूर्ण माहिती होती. आक्रमणास दुसऱ्या दिवशी पहाटेच सुरुवात होणार होती. ती पूर्ण वही नेण्याचा मोह तिने फार कसोशीने टाळला. त्यातील फक्त व्युहरचनेचे पान फाडून तिने आपल्यासोबत घेतले. तंबूतील विखुरलेल्या गोष्टी तिने जागच्या जागी ठेवल्या. आणि मग तिथूनच मागच्या मार्गाने तिने पलायन केले. योजनेनुसार जयदेव ह्यांनी तिला संधी मिळताच त्यांची वाट न पाहता निघून जाण्यास सांगितलं होते.
जयदेव ह्यांनी बराच वेळ आपला कार्यक्रम सुरु ठेवला. मग भोजनाची वेळ झाली तसे त्यांना सेनापतीने आपल्यासोबत जेवण्याचे निमंत्रण दिले. त्यांना नम्रपणे नकार देवून त्यांनी निघण्याची परवानगी मागितली. एक चांगलीशी बिदागी देवून त्यांना निरोप देण्यात आला. मग रात्रीच्या उशिराच्या प्रहरी शत्रुघ्न सैन्याला येवुन मिळाला तेव्हा युद्ध अगदी जवळ येवून पोहोचले आहे ह्याची सर्वांना खात्री पटली.
सीमंतिनीने आम्रपालीच्या कुटीजवळील आपला घोडा घेतला आणि ती मोठ्या वेगाने राजधानीकडे प्रस्थान करू लागली. राजधानीत सर्व निद्राधीन झाले होते. सिद्धार्थाच्या महालाच्या बाहेर सीमंतिनी घोड्यावरून पायउतार झाली.  सिद्धार्थचा कक्ष कुठे असावा ह्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. अचानक तिचे लक्ष एका मोठ्या खिडकीतून दिसणाऱ्या राजा अंशुमत ह्यांच्या प्रतिमेकडे गेले. हा सिद्धार्थचा कक्ष असावा अशी तिने अटकळ बांधली. सुरक्षारक्षक काहीसे निद्राधीनच होते. त्याचाच फायदा उठवून सीमंतिनीने त्या कक्षात प्रवेश मिळविला. आत सर्व काही शांत होते. एक राजेशाही मंचक कक्षाच्या दुसऱ्या टोकाला होता. स्वाराच्या वेषातील सीमंतिनी त्या दिशेने चालू लागली. अचानक कोणीतरी तिला जोराने बिछान्यावर ढकलले आणि दुसऱ्या क्षणी आपल्या छातीवर असलेल्या तलवारीच्या टोकाने सीमंतिनी भयभीत झाली. तिचे लक्ष आपल्यावर आक्रमण करणाऱ्या युवकाकडे गेले आणि ती हळूच म्हणाली, "मी सीमंतिनी आहे सिद्धार्थ!" राजबिंड्या  सिद्धार्थचे ते मोहक रूप तिला त्याही स्थितीत तिला मोहवून गेले. सिद्धार्थला आवाजाची खुण पटली आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. "सीमंतिनी, तू आणि इथे, ह्या वेळी आणि ह्या अशा वेषात काय करीत आहेस?" सिद्धार्थ विचारता झाला. "तू प्रथम माझ्यावरील तलवार  घेशील तरच मी उत्तर देवू शकीन", सीमंतिनी उत्तरली. सिद्धाथने तलवार तर बाजूला केली. परंतु अजूनही त्याचा संशय पूर्णतः दूर झाला नव्हता. हिचा कोणी कटासाठी वापर तर करून घेत नाहीये ना? असा विचार त्याच्या मनात आला. तोवर सीमंतिनीने आपले  केस मोकळे  केले होते. आणि आपली सर्व वीर कथा त्याला थोडक्यात सांगितली. तिच्या प्रत्येक वाक्यानुसार सिद्धार्थच्या चेहऱ्यावर तिच्याविषयीच्या कौतुकाचे भाव उमटत होते. सीमंतिनीने त्याला व्युहरचनेचे पान सोपवले आणि सिद्धार्थला तिने पार पडलेल्या अमोल कामगिरीचे महत्व समजले. सीमंतिनीला त्याने पाण्याचा एक पेला हाती सोपविला आणि तो व्यूहरचनेचे निरीक्षण करू लागला. काही वेळ निरीक्षण केल्यावर त्याने प्रश्न विचारण्यासाठी सीमंतिनीकडे नजर वळविली. ती तोवर त्याच्या मंचकावर निद्राधीन झाली होती. गवाक्षातून डोकावणारी पहाटेची चंद्राची शीतल किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती आणि त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. पहाट व्हायला आता जास्त वेळ बाकी राहिला नव्हता. ह्या व्यूहरचनेनुसार शत्रूवर आक्रमण करणे काहीसे सोपे जाणार असले तरी युद्ध किती काळ चालेल ह्याचा भरवसा नव्हता. सिद्धार्थच्या मनात हे सर्व विचारचक्र सुरु असले तरी चंद्रकिरणांनी खुललेल्या सीमंतिनीच्या सुंदर चेहऱ्याकडे बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. तिच्या अंगावर त्याने पांघरूण ओढले आणि कक्षाबाहेर जाण्यासाठी त्याची पावले वळली. दोन पावले पुढे जाताच एक विचार त्याच्या मनात आला. हळूच येवून त्याने क्षणभर त्या सौंदर्यवतीच्या ओठावर ओठ टेकविले आणि आपल्या ह्या कृतीने लाजून तो भरभर महालाबाहेर प्रस्थान करता झाला. इथे झोपेचे सोंग  घेतलेल्या सीमंतिनीच्या आनंदाला सीमा उरली नव्हती!

No comments:

Post a Comment