वसईतील जुनी पिढीची जीवनपद्धती निरखून पाहिल्यास काही मनोरंजक गोष्टी जाणवतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या हिशोबाने ह्या व्यक्ती विविध जीवनपद्धती अंगीकारत आहेत असे जरी वाटत असले तरी त्यातील बऱ्याच जणांना साधेपणा एका मोठ्या वर्तुळात बसविता येते.
मी माझ्या वडिलांचे राहणीमान लहानपणापासून पाहत आलो आहे. संध्याकाळी ते रोजनिशी लिहितात. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या जीवनातील दैनदिन घडामोडींचे इत्यंभूत वर्णन ह्या रोजनिशीत आढळते. मी ही त्यांचा आदर्श ठेवून शाळेत असताना आणि त्यानंतर पुन्हा १९९७ मध्ये रोजनिशी लिहिण्यास सुरुवात केली. परंतु ९७ सालचा प्रयत्न नंतरच्या संगणकाच्या आक्रमणाने फोल ठरला.
मी माझ्या वडिलांचे राहणीमान लहानपणापासून पाहत आलो आहे. संध्याकाळी ते रोजनिशी लिहितात. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या जीवनातील दैनदिन घडामोडींचे इत्यंभूत वर्णन ह्या रोजनिशीत आढळते. मी ही त्यांचा आदर्श ठेवून शाळेत असताना आणि त्यानंतर पुन्हा १९९७ मध्ये रोजनिशी लिहिण्यास सुरुवात केली. परंतु ९७ सालचा प्रयत्न नंतरच्या संगणकाच्या आक्रमणाने फोल ठरला.
वडिलांच्या रोजनिशीतील नोंदीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा दैनदिन खर्च सुद्धा ते ह्या रोजनिशीत नोंदवून ठेवतात. मी १९९७ साली माझाही खर्च लिहित होतो. त्यावेळी मी केमटक्सच्या पवई ऑफिसला होतो. होळी बसने स्टेशनला जायचो. सकाळी होळी ते स्टेशन तिकीट दीड रुपया आणि रात्री स्टेशन ते रमेदी तिकीट पावणेदोन रुपया असे. दीड रुपयाचा अशियन एज घ्यायचो. बोरीवलीवरून कंपनी बस ऑफिसात नेई. बाकी दुपारचा डबा घरून नेत असल्याने जेवणाचा खर्च नसे. एकंदरीत दिवसाचा खर्च पाच सहा रुपयात भागे. आज रमेदी ते पारनाका रिक्षाला सात रुपये लागतात. असो थोडे विषयांतर झाले. थोडक्यात म्हणजे वडिलांच्या आयुष्याची नोंद त्यांच्या रोजनिशीत सापडते. अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी फाईलमध्ये विषयानुसार केलेले कागदपत्राचे वर्गीकरण! आणि ह्या सर्व फाईलच्या जागा सुद्धा ठरलेल्या असतात. त्यात थोडीसुद्धा ढवळाढवळ केलेली त्यांना खपत नाही.
आता माझ्याकडे वळूयात. माझा दररोजचा, आठवड्याचा, महिन्याचा किंवा वर्षाचा खर्च किती आहे ह्याची माझ्याकडे कोठेच नोंद नाही. हा म्हणजे म्हणायला गेलं बँकेच्या माहिती मायाजालावरील नोंदीवरून मी विविध कालावधीत किती पैसे काढले हे पटकन माहित करून घेवू शकतो. परंतु त्या खर्चाच्या विषयानुसार वर्गीकरणाविषयी मला अजिबात जाणीव नाही. मी फक्त मोठे खर्च लक्षात ठेवतो.
कागदपत्राचे वर्गीकरण म्हणायला गेलं तर हे कागदपत्र वसईला आहे की बोरिवलीला इथून माझी सुरुवात होते. बऱ्याच वेळा कागदपत्र हुडकण्यासाठी (अरे वा बरेच दिवसांनी हा शब्द वापरला!) मी भरपूर वेळ घालवितो. आता माझ्या ह्या अव्यवस्थितपणाचे माझ्याकडे स्पष्टीकरण सुद्धा असते. मी सतत कामात व्यग्र असतो आणि त्यामुळे जरी मला थोडाफार मोकळा वेळ मिळाला तरी ज्या गोष्टी मेंदूला विरंगुळा देतील त्या करण्याला प्राधान्य देतो. जरी एखाद्या वार्षिक सुट्टीत ह्या सर्व कागदपत्राचे वर्गीकरण केले तरी पुढे वर्षभर त्यांचे योग्य फाईलमध्ये ठेवण्याची जी शिस्त लागते ती माझ्यात नाही. मला फक्त माझा पासपोर्ट आणि PAN कार्ड कुठे आहे ते माहित असतं.
मला नक्की काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळले नसल्यास चिंता करू नका. ते मलाही समजत नाहीय. बघू अजून पुढे प्रयत्न करूयात. वडील गावातील बऱ्याच लोकांशी संपर्क ठेवून आहेत. त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या सुख दुःखाच्या प्रसंगाला ते हजर राहण्याची काळजी घेतात. माझी स्थिती अगदी उलट आहे. फक्त खास मित्रांच्या अगदी महत्वाच्या प्रसंगांना हजर राहताना सुद्धा माझी मारामार होते. स्पष्टीकरण तेच! कामाचे!
थोडक्यात काय वडिलांनी ठराविक गोष्टी परिपूर्णपणे केल्या. मी अनेक मोठमोठ्या गोष्टी करायचा प्रयत्न करूनसुद्धा मला बऱ्याच वेळी , बऱ्याच ठिकाणी अपूर्णता जाणवते. कथित प्रगतीचा शोध असंतुलित मनःस्थितीकडे नेतो असे म्हणावे की काय? प्रगती आणि मनःशांतीच्या मार्गावर एकत्रितपणे पुढे जाणे ज्यांना जमले ते खरे आधुनिक माहात्मे!
बऱ्याच दिवसांनी लेखाला योग्य शीर्षकही सुचत नाहीय!
भौतिक बदलानुसार सर्वांच्या जीवनात चांगले-वाईट बदल होतच रहाणार.
ReplyDeleteबऱ्याच ठिकाणी झालेले " पेपरलेस वर्क " हे हि आपल्या जनरेशननी केलेल्या प्रगतीतला एक टप्पा आहे.
आदित्य जास्त खंत करू नकोस कारण तू कामात व्यग्र असूनसुद्धा बरेच चांगले लेखन करतोस. तुझ्या पुढच्या लिखाणासाठी "ऑल द बेस्ट" !