Friday, January 31, 2014

अव्यक्त भावनांचं कोंदण!


शांत मनी भावना नेहमी दाटून येतात. मनीच्या भावना आपल्याला सुखावतात. वय, सद्यकालीन परिस्थिती ह्याचा विसर पडतो. भावना वर्तमानकाळापासून दूर पळतात. भूतकाळ, भविष्यकाळ ह्यामध्ये हिंदोळे घेतात.
ज्याच्या मनी चांगल्या भावना तो पुरुष थोर जाणावा!


आधुनिक काळ तसा निष्ठुर! भावनांना मनात शांतपणे येऊ देण्यास तो फारशी संधी देत नाही. दिवसाच्या क्षणाक्षणाला गृहीत धरून वेळापत्रक बनविल्यावर होणार काय दुसरं? अशा ह्या आर्थिकप्राप्तीच्या विचाराने व्यापलेल्या युगात काही क्षण येतात जे सुंदर भावनांना मनी व्यापून जाण्याची संधी देतात. हे क्षण सांगून येत नाहीत. ज्यावेळी येतात त्यावेळी हा अलौकिक भावनांचा क्षण आहे हे समजण्यास काही वेळ लागतो आणि ज्या क्षणी हे समजते त्या क्षणी ह्या प्रसंगाला धरून ठेवण्याची धडपड सुरु होते. त्या धडपडीत भावनांना मुक्त प्रकट होण्यास काहीसा अडथळा होतो.  अशा क्षणीच्या भावनांचा  कधी शब्दाद्वारे व्यक्त केलेला , कधी व्यक्त करायचं राहून गेलेला ठेवा मनी जपून राहावा ही इच्छा प्रत्येकजण मनी बाळगतो!


मनाला कधी फार इच्छा होते. शरीरापासून मुक्त होऊन एका दाट जंगलातील एका शांत, लतिका, पुष्पांनी बहरलेल्या बागेत जावं. जंगलात  शांत बाग कोठून येणार असा विचार जयाच्या मनी आला तो नर अरसिक जाणावा! अशा ह्या शांत बागेतील एखाद्या उंच वृक्षावर बसून शरीराचे ओझे न बाळगावे लागल्याचा आनंद साजरा करीत झोके घ्यावेत.  दूर वर पसरलेल्या गगनाचा व्याप मोजण्याचा ध्यास बाळगावा! पर्वतांची उंची मोजण्याची इच्छा मनी बाळगावी! आकाशगंगेतील एखाद्या ग्रहावर साम्राज्य गाजविण्याची मनीषा धरावी! हवेत मुक्त विहार करणाऱ्या पवनाशी, पक्षांशी स्पर्धा करावी. फुलांचा नैसर्गिक सुगंध आयुष्यभरासाठी जवळ बाळगावा! दूरवर झाडीत विसावणाऱ्या वनराजाच्या सामर्थ्याशी प्रतिकार करण्याचा मानस धरावा! एक एक दाणा वाहून नेणाऱ्या मुंगीच्या चिकाटीची आस धरावी!  मनीच्या सर्व सुंदर भावनांना मुक्तपणे बागडू द्यावे. त्याचा महोत्सव करावा!








Saturday, January 25, 2014

गाणी - सोहमची, आईवडिलांची आणि आमच्या तिघांची !


हल्ली वसई बोरीवली अशा शनिवार रविवारी बऱ्याच फेऱ्या होतात. कधी आम्ही तिघंही असतो तर कधी मी आणि सोहमच, तर कधी मी एकटाच! माझी चालकाची जागा जशी पक्की तशी सोहमची माझ्या बाजूची! गाडी चालवताना माझं लक्ष समोर, त्यामुळे सोहमच्या हातात गाडीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांचे नियंत्रण! बाकी माझ्या स्वभावधर्माला अनुसरून गाडीत काही आधुनिक गाण्याचं चोखंदळपणे जमवलेली ध्वनीमुद्रित साठा वगैरे नाही. त्यामुळे जय FM ही परिस्थिती!
जेव्हा आम्ही तिघं असतो तेव्हा सोहम अल्पमतात येतो! माझ्याबरोबर राहून (किंवा वयाप्रमाणे!) प्राजक्ताची आवड आता हळूहळू जुन्या गाण्याकडे! त्यामुळे सोहम सेकंदाला एक ह्या वेगाने रेडिओ स्टेशन बदलत असताना, एखादं चांगलं जुनं गाण लागलं की मागून आवाज येतो, "अरे ते बदललं का, राहून दे ते! चांगलं गाणं होतं!" मग माझ्याकडे एक नाराजीचा कटाक्ष टाकून सोहम मागच्या स्टेशनकडे जातो!
सोहमचं वय ९ वर्षे! गेल्या काही वर्षात रात्रीच्या वेळात घरी केबल टीव्ही आणि FM रेडिओवर चालू असलेल्या आणि जबरदस्तीने ऐकाव्या लागलेल्या जुन्या गाण्यांनी त्याला तशी ही जुनी गाणी अगदीच अपरिचित नाहीत! मध्येच एकदा त्याने ह्या जुन्या गाण्यांचा उल्लेख 'झोप यायला लावणारी" गाणी असा केला तेव्हा गंमत वाटली. पण हळूहळू तो सुद्धा रात्री बाकी सर्व आवाज बंद करून ही जुनी गाणी ऐकण्याच्या आमच्या सवयीत सहभागी झाला.
पुन्हा एकदा गाडीप्रवासाकडे! हा प्रवास ज्यावेळी अगदी सकाळचा असतो तेव्हा पुन्हा आमचा कल मराठी अभंग, भक्तीसंगीत वगैरे प्रकार ऐकण्याकडे असतो. बिचारा अल्पमतातील सोहम ते ही सहन करतो. पण एकदा सकाळी आठ वगैरे वाजले की तो मग वादविवाद स्पर्धेत येतो. त्याला नवीन गाणीही ऐकायची असतात. आम्हीही सुजाण पालकांप्रमाणे मग काही नवीन गाणी ऐकतो.
तर मग आता काही जुनी गाणी सोहमही गुणगुणतो! तेव्हा त्याचा कान तयार झाला असे प्राजक्ता म्हणते! ह्यात मग किशोर प्रामुख्याने येतो. 'चिंगारी कोई भडके' हे किशोरच्या आवाजातील गाणे त्याला आवडते. पण हे गाणे म्हणायला त्याची मला मात्र बंदी आहे!  असो, अजूनही मी माझ्या आवाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न सोडणार नाही! मध्येच तो "प्यार में कभी कभी ऐसा भी होता हैं!" हे B4U वर बऱ्याच वेळा वाजवलं जाणारं गाणं गुणगुणायला लागला तेव्हा प्राजक्ता माझ्याकडे बघायला लागली. आमच्या जुन्या गाण्याच्या व्याख्येत हे गाणं काही शंभर टक्के बसत नव्हतं. मग काही वेळाने आम्हांला उलगडा झाला, त्याला त्या गाण्यातील येणारे "आमना सामना" हे शब्द जरा जास्तच भावले होते! बाकी काही नाट्यसंगीतातील गाणीही त्याला परिचित झाली आहेत.
ही झाली सोहमची गोष्ट! पण त्याच्याबरोबर राहून मी ही काही प्रमाणात बदललो! आधी जुनी गाणी म्हणजे अगदी नको म्हणणारा मी, काही नवीन गाणीही हल्ली भावून घेतो. "चलाओ ना नैनो के बाण रे" हे आमच्या दोघांचे सामायिकरुपात आवडीचे क्रमांक एकचे गाणे! त्यानंतर "चली रे" "बदतमीझ दिल" "रघुपती राघव राजाराम" "मुझे तो तेरी लत लग गयी!" "तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी" "तेरा प्यार प्यार हुक्का बार" आणि अजून काही ही त्याची खास आवडीची गाणी! स्टेशन बदलत असताना ह्या गाण्याचे सूर ऐकू आले की लगेच आम्ही तिथे थांबतो! नजरेने माझी संमती घेतली जाते! गडी खुश होतो, आणि नकळत मीही! मूड खरोखर चांगला असेल तर पाय वेगवर्धकावर जातो आणि गाडी ९० - १०० च्या आसपास जाते. मग तो वेगनिदर्शकाकडे नजर टाकून मला भानावर आणतो! मग एकटा ऑफिसला जाताना मीही अधूनमधून ही गाणी ऐकतो!
थोडक्यात हल्ली आमच्या गाण्याच्या तीन याद्या  झाल्या आहेत. फक्त प्राजक्ता आणि माझ्या आवडीची गाणी, फक्त सोहमच्या आवडीची गाणी, आणि आमच्या तिघांच्या आवडीची गाणी!
दोन लक्षात घेण्यासारखे मुद्दे!
१> संगीताचं बाह्यस्वरूप काळानुसार बदलणार! त्याला इलाज नाही. पण हृदयाला साद घालणारी गाणी सदैव बनत राहणार! डोळे नव्हे कान उघडे ठेवून आपल्याला त्या गाण्यांचा शोध घेता आला पाहिजे!
२> वडील आणि मुलगा एकत्र एका गाण्याचा आनंद घेत आहेत ही गेल्या पिढीत अगदी दुर्मिळ असणारी गोष्ट हल्ली जास्त प्रकर्षाने जाणवते! ह्या संधीचा फायदा घेत किशोर, लता, महमद रफी, मुकेश, सुमन कल्याणपूर मंडळीचा चाहता वर्ग पुढच्या पिढीकडे जमलं तर पोहोचवूयात!

Monday, January 20, 2014

जाणता अजाणता - अंतिम भाग!


शरीराने शंतनु ऑफिसात असला तरी त्याचं मन मात्र भरकटत होतं. हा सर्व प्रकार मुन्नारला आल्यापासून सुरु झाला म्हणजे इथलाच कोणता तरी घटक ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असणार असाच त्याचा समज झाला होता. तन्वीच्या पूर्वायुष्यातील कोणती तरी घटना ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असली तर? असा विचारही त्याच्या मनात डोकावला होता. पण असं असतं तर तन्वीने हे आपणास केव्हाच सांगितलं असतं इतका मात्र त्याचा तिच्यावरचा विश्वास शाबूत होता. इथे नोकरीचा जम तर चांगलाच बसत चालला होता आणि भविष्यही उज्ज्वल दिसत होतं. पण तन्वी आणि तिची मानसिक स्थितीसुद्धा महत्त्वाची होती. ह्या सगळ्या प्रकाराने तिचे मनःस्वास्थ्य बिघडलं तर? मग आपली कितीही प्रगती झाली तर काय उपयोगाची? शंतनुचे हे भरकटत चाललेले विचारचक्र त्याच्या साहेबांच्या येण्यानं थांबलं. "काय शंतनु इतका वेळ असाच बसून राहिला आहेस?" साहेब विचारात होते. एका क्षणी त्यांना हा सारा प्रकार सांगावा असेही त्याच्या मनाने घेतलं. पण हा सगळा प्रकार तिसऱ्या कोणाला सांगण्याआधी तन्वीला विश्वासात घेणं आवश्यक होतं. त्यामुळे शंतनुने तो विचार प्रयत्नपूर्वक मागे लोटला. "नाही हो साहेब, इथल्या ह्या पावसाळी हवेने माझं डोकं धरलंय?" तो म्हणाला. त्याच्या ह्या स्पष्टीकरणावर बॉसचा अजिबात विश्वास बसला नसला तरी त्याला आपल्याशी ही गोष्ट सध्या शेयर करायची नाहीय हे बॉसने ताडलं. बॉस व्यावहारिक होता. सध्यातरी शंतनु कामाच्या बाबतीत जोरात होता. त्याचे असे काही ताणग्रस्त क्षण पेलायची त्याची तयारी होती.
शंतनु संध्याकाळी थोडासा लवकरच घरी आला. तन्वीने दुपारी जागल्यापणीच एक दोन डुलक्या काढल्या होत्या. सकाळी ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विचारपूर्वक ठरविलेल्या मार्गाची तिने दिवसा एक दोनदा उजळणी केली होती.  घरात मल्याळी अबोला पुन्हा एकदा साथीला होता पण भावना मात्र मराठीच होत्या. आणि डोळ्यात सतत डोकावू पाहणाऱ्या अश्रूंची भाषा तर जगभर सारखीच असते. चहाचे कप घेऊन तन्वी दिवाणखान्यात आली. एक कप शंतनुसमोर टीपॉयवर ठेवून आपला कप घेऊन ती खिडकीपाशी आली. आज ढगाळ हवा होती. वातावरणात उकाडाही होता. शंतनुविषयी तन्वीची एक तशी जुनीच तक्रार होती. भांडण झालं की दूर करण्यासाठी तो केव्हा पूर्ण पुढाकार घेत नसे. "आज मला तुझी फार गरज आहे, शंतनु!" चहाचा घोट घेता घेता तन्वी मनात विनवणी करीत होती. आणि इतक्यात शंतनुच्या दोन्ही हातांची अलगद पकड तिच्या कमरेभोवती पडली. अगदी नाजूक मनःस्थितीत असणाऱ्या तन्वीच्या मनाचे सर्व बांध त्या क्षणी मोडून पडले. बराच वेळ मग ती शंतनुच्या मिठीत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती.
"शंतनु, मला कसंही करून ह्या सर्व प्रकारातून बाहेर पडायचं आहे रे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीय! एकदा त्या दुनियेत माझा प्रवेश झाला की तिथल्या माझ्या वागण्यावर माझे अजिबात नियंत्रण नसतं. इतकंच काय तर तिथल्या कालावधीत माझ्या मनातील भावनाही मला पूर्णपणे आठवत नाहीत." शंतनु तिच्याशी पूर्ण सहमत होता. "तन्वी, खरतरं तू झोपली असताना जागं राहून मला तुझ्यावर लक्ष ठेवायला हवं, पण मी पडलो मुलखाचा झोपाळू!जर मला जागं राहता आलं असतं तर ज्या वेळी तो नकुल तुझ्या स्वप्नात येतो ते मी तुझ्या हावभावांवरून मी ओळखलं असतं!" "आणि मग तू काय केलं असतं रे शंतनु?" तन्वीचा हा प्रश्न शंतनुला फारसा आवडला नाही कारण त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नव्हते. "बाकी तन्वी, तुला एक प्रयत्न करून पाहायला हवा. त्या स्वप्नात तुला तुझे हे विश्व आठवता यायला हवं! तुझ्या ह्या विश्वातील चांगल्या गोष्टी (स्वतःकडे मिश्किल नजरेने पाहत) तुला त्याच्याशी लढल जाणारं हे मनोयुद्ध जिंकायला मदत करेल!" आपल्या मनातील सकाळचेच विचार काही प्रमाणात शंतनुच्या तोंडून ऐकून तन्वीला खूप बरं वाटलं. आणि त्याचा तो मिश्किलपणा, तो जर ह्याने परत प्राप्त केला असेल तर मला खूप बरं वाटेल शंतनु! सुखावलेली तन्वी विचार करीत होती.
रात्रीचे जेवण शांतपणे पार पडले. तणावपूर्ण दिवसानंतर मनोमिलन झाल्याने एक प्रकारची मनःशांती दोघेही अनुभवत होते. फरक इतकाच होता  ऑफिसातील कामाने दमलाभागला एक जीव शंतनु होता आणि कितीही झालं तरी ऑफिसातील विचार अधूनमधून त्याच्या मनातील तन्वीबद्दलच्या विचारांशी त्याच्या मनाचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. तन्वीलाही हे अपेक्षितच होते. काही वेळातच शंतनु झोपी गेला. तन्वी त्या तीन भेटीतील आठवणाऱ्या वातावरणाची उजळणी करण्याचा प्रयत्न करीत होती. मंद मेणबत्तीचा प्रकाश मिणमिणत होता.
आजचं वातावरण अगदी वेगळं होतं. नेहमीचा राजदरबार, महाराज ह्याचं विश्व गायब झालं होतं.  तिथं आता एक रम्य संध्याकाळ होती. सुर्य अस्ताला निघाला होता. एका छोट्या टेकडीवर तन्वी बसली होती. समोर दूरवर एक सुंदर नगर दिसत होते. आणि हो हे नगर पुराणकाळातील नव्हतं. आधुनिकतेच्या काही खुणाही तिथे दिसत होत्या. त्या तांबड्या आकाशात बगळ्यांची एक रांग आकाशात दूरवर कोठेतरी जात होती. ह्या बगळ्यांचं कसं बरं असतं असा एक विचार तिच्या मनात येऊन गेला. आपण इथे एकटेच काय करतो आहोत ह्याचा एव्हाना तन्वी अचंबा करू लागली होती. इतक्यात दूरवरून येणाऱ्या एका मोटारीच्या आवाजाने तिचे लक्ष वेधलं गेलं. ती कार तर एकदम मस्त होती. आणि चालविणाऱ्याचे सारथ्यकौशल्य वाखाणण्याजोगं होतं. टेकडीवरील थोडीफार वळणं झपाट्याने पार करीत तो कारला घेऊन तन्वीजवळ येऊन पोहोचला देखील. ती कार होंडा सिटी होती. आणि त्यातून अगदी आधुनिक वेशातील एक देखणा तरुण तिच्यासमोर उतरला. क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. आणि मग अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे हा तर नकुल! नकुलने अगदी आधुनिक  कपडे परिधान केले होते. हातात चकाकते घड्याळ होतं. अरे हे तर टायटनचे घड्याळ! अगदी शंतनु घालतो तसं! शंतनु! कोण हा शंतनु? तन्वीच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. शंतनु म्हटल्यावर अगदी ओळखीचं वाटत होतं. पण नक्की कोण हे आठवत नव्हतं.
"ओळखलं, मला?" नकुल विचारत होता. "आपण कोण?" आपल्याच दोन रूपांमधील तर्कसंगती लावण्याच्या प्रयत्नात असलेली तन्वी त्याचवेळी नकुलच्या ह्या दुसऱ्या रूपाचे प्रयोजन काय ह्याचा विचार करीत होती. "अरे हो, आपण नकुल नाही का?" तन्वी म्हणाली. त्याचवेळी तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचाही ड्रेस अगदी आधुनिक होता. टी शर्ट आणि जीन्स! "अरे अशीच जीन्स शंतनुने आपल्याला घेऊन दिली होती" आता शंतनु तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. "लवकर ओळखलं म्हणायचं," नकुल हसतच म्हणाला. त्याच्या हास्यात तन्वीला काहीसा खलनायकपणा दिसला. "आपण फिरायला जाऊयात?" नकुल विचारत होता. शंतनुला असं विचारायची कधीच गरज पडली नव्हती. "अरे, हा कोण शंतनु, हा सारखा सारखा माझा पिच्छा का पुरवतोय?" तन्वी काहीशी त्रस्त झाली होती. नकुलचे बारीक लक्ष तिच्याकडे होते. "तिथे शहरात आभूषणांच मस्त प्रदर्शन भरलं आहे?" एव्हाना तन्वी पुरती त्रस्त झाली होती. "हो, येते मी" असं म्हणत ती उठली. तो रस्ता ओळखीचा वाटत होता. "अरे हा तर कोल्हापुरातील रस्त्यासारखाच वाटतोय!" मनातल्या मनात तन्वी म्हणाली. आता हळूहळू तर्कसंगती लागत होती. नकुलने गाडी पार्क केली. हे प्रदर्शन अगदी अप्रतिम होतं. एकाहून एक अतिसुंदर दागिन्यांची तिथे रांग लागली होती. पण नकुल कोणत्याही ठिकाणी तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. एका ठिकाणी तन्वीला एक मोत्यांची माळ खूप आवडली. "मला ही माळ हवीय!" ती म्हणाली. आता मात्र नकुलचा संयम सुटला. "नाही, आपल्याला हिऱ्यांच्या विभागात जायचं आहे" जवळजवळ रागावतच तो म्हणाला. तन्वी घाबरली. "शंतनु असा कधी रागवायचा नाही." नकुलच्या मागे तन्वी भीतीनेच चालली होती. शेवटी एकदाचे ते हिऱ्यांच्या विभागात पोहोचले. बहुदा काय विकत घ्यायचं आहे हे नकुलला माहित असावं. तो थेट तिथपर्यंत पोहोचला. तिथे एक अतिशय मौल्यवान हिर्याने जडवलेली अंगठी होती. ती त्याने उचलली. तन्वीच्या समोर ती अंगठी आणून नकुल म्हणाला, "तन्वी, तू माझ्याशी लग्न करशील?" आता हा अगदी शेवटचा  बिंदू होता. शंतनूने कसं तिला हळुवारपणे मागणी घातली होती. आणि त्या क्षणी तिला सर्व काही आठवलं. कोल्हापूर, मुन्नार, शंतनु आणि सकाळचा निर्धार, अगदी सारं काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ!
"नकुल मला माझ्या शंतनुकडे जाऊ देत!" विनवणी करीत ती म्हणाली. "शेवटी माझा अंदाज खरा ठरला तर!" काहीसा त्रस्त होऊन  नकुल म्हणाला. "तन्वी, मी तुला अगदी सुखात ठेवीन! माझ्या विश्वात तुझ्या साऱ्या काही इच्छा पुऱ्या होतील! मी तुला दुःखाचा लवलेशही लागू देणार नाही!" तन्वी अगदी काळजीपूर्वक नकुलकडे पाहत होती. त्याची नजर तिने ओळखली होती. ह्याचं हे बोलणं आपण ऐकल नाही तर दुसऱ्या मार्गाचा तो वापर करणार अशी तिला चिन्ह दिसत होती. एकंदरीत प्रकरण हुशारीनं हाताळायचं तिने ठरविलं.
"अरे इतकी घाई कशाला? आताच तर आपण एकमेकाला ओळखू लागलो आहोत. आणि मला ह्या विश्वाशी जरा सरावू तर दे!" तन्वी जरा वेळ काढायला पाहत होती आणि त्याचवेळी नकुलच्या चेहऱ्यावरील हावभाव निरखत होती. आता ह्या क्षणी तन्वीला दोन विश्वाच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव झाली होती. आणि आपले डावपेच खेळायला ती पूर्ण तयार होती. "पण नकुल, मला कायमचं ह्या दुनियेत कायमचं राहता येईल का? प्रत्येक वेळी मला शंतनुच्या विश्वात जावं तर लागेलच ना?" नकुलला हा प्रश्न काहीसा अनपेक्षित होता. क्षणभर थांबून तो उत्तरला, "तुला शरीराने कायमच शंतनुच्या विश्वात राहावं लागेल. फक्त एक घडू शकत. तू मनानं कायमची ह्या विश्वात राहू शकतेस. जागेपणी आणि झोपेतसुद्धा!" "मग माझ्या शंतनुच्या दुनियेतील वागण्यावर त्याचा परिणाम नाही होणार का?" "हो अर्थातच होईल! तू त्या दुनियेत वावरताना सुद्धा माझ्या दुनियेतील संदर्भ  घेऊनच वावरशील!" "म्हणजे मी त्या दुनियेच्या हिशोबाने वेडी समजली जाईल तर!" तन्वी म्हणाली. "अगं शहाणपणा आणि वेडेपणा ह्या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत! शंतनुच्या दुनियेतील शहाणपणाच वागणं दुसरे कोणते संदर्भ लावले तर वेडेपणाचच होईल की!" आपला बुद्धिभ्रम करण्याचा नकुलचा प्रयत्न तन्वी चांगलाच ओळखली होती.
"चल, ते सर्व राहू दे! बाहेर हवा कशी मस्त पडली आहे! आपण फिरून येवूयात की!" तन्वी म्हणाली. "तो पहा, तिथे कसा उंच पहाड दिसतोय, आणि आता चंद्र तर उगवतच असेल!" "पण तिथवर पोहोचायला वेळ लागेल की" नकुल कुरकुरला! "नकुल, तू ठरवलं तर एका क्षणात आपण तिथं पोहोचू शकू, मी ओळखून आहे!" तन्वीच्या ह्या वाक्यावर नकुल चमकला. "म्हणजे हिला सर्व काही समजलं आहे की!" दुसऱ्या क्षणी ते दोघे त्या उंच पहाडावर होते. सूर्य मावळला असला तरी त्याची तांबडी प्रभा आकाशात रेंगाळत होती. हवेत मस्त थंडावा होता. पूर्वेला अपेक्षेनुसार चंद्राचे आगमन झाले होते. बाजूला खोलवर दरी होती. त्या दरीकडे पाहताना तन्वीच्या मनात एक नाही दोन विचार चमकून गेले. आता तन्वी परिस्थितीच्या पूर्ण नियंत्रणात होती. तिनं मागे वळून पाहिलं. एक आलिशान प्रासाद तिथं उभा होता. नकुलचा हात तिने हळूच हातात घेतला. तिचं मन वेगाने धावत होते. तिच्यापुढे एक संधी होती. प्रणयाराधन करण्यात नकुलचा हात धरणारं कोणी नव्हतं. तो तिला प्रणयातील उत्कटता दाखवू शकला असता. अगदी शेवटापर्यंत हा क्षण तिने आयुष्यभर लक्षात ठेवला असता आणि हे कोणालाच कधी कळलं नसतं. आणि ह्यातून कधी आणि कसं बाहेर पडायचं ही ती ठरवू शकणार होती.
..............


काही वेळानं तन्वीने नकुलला एक सुंदर फुल दाखवलं. "नकुल, मला ते फुल हवंय!" नकुल एकदम खुशीत होता. तो तत्काळ ते फुल आणण्यासाठी पुढे सरसावला. तिथल्या निसरड्या वाटेकडे त्याचं दुर्लक्ष झालं. आणि अचानक त्याच्या नजरेसमोर खोल दरी दिसली. खोल दरीत पडत असताना तो कायम तन्वीच्या डोळ्यात पाहत होता. "तू मला फ़सविलस" हेच भाव त्याच्या डोळ्यात होते.
सकाळ प्रसन्न होती. तन्वी अगदी मजेत होती. शंतनुने तिची ही ख़ुशी पाहून हा विषय काढायचं टाळल. पुढे बरेच दिवस असच चाललं. तन्वी अगदी नेहमीसारखी झाली होती. अगदी कोल्हापुरासारखी! दोन आठवड्यांनी न राहवून शंतनुने हा विषय काढला. तन्वी हसतहसत म्हणाली, "नकुल केव्हाच इतिहासजमा झालाय, शंतनु!" त्याला बिलगताना "नकुल केवळ आभासी दुनियेत भेटला म्हणून बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, हा विचार तिच्या डोक्यात आलाच!"
(समाप्त!)
वाचकहो, जमल्यास प्रतिक्रिया द्या!

Saturday, January 18, 2014

जाणता अजाणता - भाग ७


आपला राग एका शब्दात व्यक्त करून शंतनु झोपी गेला किंबहुना त्यानं झोपी गेल्याचं नाटक केलं. इथे तन्वी मात्र विमग्न परिस्थितीत तशीच बसून होती. ह्या सर्व प्रकारात आपला दोष काय हेच तिला कळत नव्हतं. एका क्षणी मात्र तिने अबलेची भूमिका घेण्याचं नाकारलं. शंतनुला गदगदा हलवून ती म्हणाली, "ह्यात कोणती प्रतारणा, शंतनु? माझ्या स्वप्नात जे काही येतं, त्यावर माझं नियंत्रण असतं का? आणि ह्याचा मला देखील त्रास होतोच आहे ना? तू ऑफिसात असताना मी एकटी कसे दिवस काढत असते ते माझं मला ठाऊक!" शंतनुला काही प्रमाणात त्याची चूक कळून चुकली होती. पण तो बराच दुखावला गेला होता. "उगाच का हिच्या मनात असे विचार येतात" त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. मध्येच एकदा तिची समजूत काढण्याची त्याला इच्छा झाली. पण त्याच्या अहंकाराने त्याला रोखले.
सकाळी पाचच्या सुमारास त्याला जरी झोप लागली तरी तन्वी मात्र तशीच जागी होती. नकुलचा तिला अतिशय राग आला होता आणि भीतीही वाटू लागली होती. त्याने तिची झोप उडवून टाकली होती. खरतरं प्रेमात झोप उडवून टाकणं हा किती रोमांकित क्षण! पण इथले संदर्भ फार वेगळे होते. एका क्षणाच्या कल्पनेच्या दुनियेतील सुखाने किंबहुना सुखाच्या भासाने तिचं प्रत्यक्षातील सुंदर घरकुल पणाला लागलं होतं. नकुलच्या तिच्या आयुष्यातील आगमनाच्या प्रयोजनाचा थांगपत्ता तिला लागला नव्हता आणि लागण्याची शक्यताही नव्हती. तो जसा अगेला अचानक तिच्या आयुष्यात आला तसा केव्हाही निघून जाण्याची शक्यताच जास्त होती. त्याने निर्माण केलेलं विश्व कितीही सुखदायक असलं तरी त्या विश्वाच्या शाश्वतेची खात्री नव्हती. ह्यातून बाहेर पडण्याचीच तिला आता तीव्र इच्छा होऊ लागली होती. पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तिच्या शंतनुची गरज होती. आणि तो शंतनुच ह्या क्षणी दुखावला होता.
सकाळचा गार वारा तन्वीच्या अंगाला सुखावत होता. मन मात्र दुखावलेलच होतं. तिच्या मनानं आता काहीस समजुतदारपणाचं वळण घेतलं होतं. "शंतनुचं सुद्धा फारस काही चुकलं नाही म्हणायचं! त्याला अजूनही मी खूप हवीहवीशी वाटतेय, त्याच्या मनात माझ्याविषयी स्वामित्वाची भावना आहे आणि म्हणून तो इतका चिडला!" ह्या विचारचक्राने तन्वीला काहीसं बरं वाटलं. ह्या बरेपणाच्या भावनेत तिला एक डुलकी लागली.
तन्वीला जाग आली तेव्हा शंतनु घरात नव्हता. एकंदरीत लक्षणावरून तो ऑफिसात गेल्याचीच चिन्हं दिसत होती. तन्वीने त्याच्या ऑफिसातील क्रमांकावर फोन लावला. "पोहोचलास का?" शंतनुला एका शब्दात उत्तर द्यायची संधी देणारा प्रश्न तन्वीने केला. "हुं" अशा एका हुंकारात शंतनुने उत्तर देऊन फोन ठेवला.
चहाचा कप घेऊन तन्वी शांतपणे बसली होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती केव्हातरी काहीशी परिचित होणार होती. नकुल कोण आहे, तो नेहमी आपल्या स्वप्नात का येतो ह्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि कधी मिळेल ह्याची खात्रीही नव्हती. पण त्याचं स्वप्नातील वागणं कधीतरी एका विशिष्ट प्रकाराकडे झुकणार होतं. आणि मग एकदा का त्याच्या वागण्याचा उलगडा झाला की मग तन्वी त्याच्याशी मुकाबला करणार होती. विचारांच्या ह्या शृंखलेने तन्वीला बरंच बरं वाटू लागलं होतं. पण मग एक विचार तिच्या मनात आला. आपण प्रत्यक्ष जीवनातील तन्वीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकतो पण त्या दुनियेतील तन्वीच्या वागण्याचा काय भरवसा? स्वप्नातील दुनियेतील भावना ह्या तन्वीला कळतात, पण इथला खंबीरपणा त्या तन्वीपर्यंत कसा पोहोचवायचा? ती नकुलच्या आकर्षणात अशीच वाहवत गेली तर? ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तन्वीकडे नव्हते. "गेली तर तर गेली ती तन्वी त्या नकुलच्या आकर्षणात वाहवत!" तन्वी स्वतःशीच पुटपुटली. शंतनुने जर ह्या दुनियेतील तन्वीला पूर्ण साथ दिली तर मग त्या तन्वीचे आणि नकुलचे काही का होईना! पहिल्यांदाच तन्वीने दोन्ही तन्वीच्या मतलबाची वेगवेगळी विभागणी केली होती. आणि हो तिथल्या आठवणी मला सुखावतात! वाटली शंतनुला ही प्रतारणा तर वाटू देत! ह्या विचाराने मात्र तन्वी थोडी घाबरून गेली. पण काहीसा बिनधास्तपणाच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो हे तिने जाणले. जवळच्या हॉटेलचे मेनू कार्ड घेऊन बदललेली तन्वी मल्याळम भाषेत मसालाडोसा कसा ऑर्डर करायचा ह्याचा विचार करू लागली!


 

Thursday, January 16, 2014

जाणता अजाणता - भाग ६


सायंकाळी निसर्गाने वेगळंच रूप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाने बिचारे वृक्षवल्ली भयभीत झाले होते. वारा जसं नाचवेल तसं नाचण्याव्यतिरिक्त त्यांना पर्यायच नव्हता. तन्वी सुद्धा काहीशी भयभीत झाली होती. ह्या अनोळखी प्रदेशात अशा वातावरणात एकट राहायची तिला जशी भिती वाटत होती त्याचप्रमाणे तिचं मन शंतनुच्या काळजीनेही व्याकुळ झालं होतं. हा बिचारा ह्या वातावरणात कसा येईल? काळ्या मेघांनी व्यापलेल्या आकाशामुळे नेहमीपेक्षा लवकरच अंधार झाला होता. तन्वी अचानक भानावर आली. तिने देवघरात जाऊन दिवा लावला. आणि पुन्हा खिडकीत येऊन बसली. दुरूनच तिला एक तरुण रेनकोट घालून जोरात पळत येताना दिसला. आपल्या विचारातच मग्न असलेली तन्वी त्याच्या पळण्याकडे  पाहत होती. तो तरुण तिच्याच घराकडे जेव्हा आला तेव्हा ती अचानक दचकली. जरा निरखून पाहिल्यावर मात्र तिला कळलं "अरे हा तर शंतनु आहे!" लगबगीने ती दाराकडे गेली. शंतनु अगदी ओलाचिंब होऊन तिच्यासमोर होता. तन्वीला त्याचं ओलाचिंब रूप खूप भावलं, क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. "अग पाहत काय बसली? लवकर माझी बॅग घे आणि मला एक कोरडा टॉवेल आणून दे"! शंतनुच्या ह्या ओरडण्याने तन्वी भानावर आली.
मग मात्र तन्वीने शंतनुची चांगलीच काळजी घेतली. बाथरूममध्ये लगेच गरम पाणी चालू केले. त्याची काही कागदपत्रे प्लास्टिकच्या  बॅगेतून सुद्धा थोडीशी भिजली होती. ती तिने सुकवायला घेतली. नशिबाने त्यात काही महत्वाचे कागदपत्र नव्हते. शंतनु आंघोळ करून परत येईपर्यंत गरमागरम चहा आणि त्याचे आवडते नुडल्स तयार होते. वाफाळते नुडल्स पाहून शंतनुने तशीच तिथे धाव घेतली. "थांब, शंतनु, केस जरा नीट पुसू दे, मला!" तन्वी काहीशी किंचाळलीच! शंतनुला तिची चिंताग्रस्त मुद्रा आवडून गेली. नुडल्सची प्लेट हातात घेत त्याने तिला केस पुसून दिले. त्याला तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. केस बऱ्यापैकी सुकले हे जाणवल्यावर तन्वीच्या डोक्यात अजून एक किडा वळवळला. "एक मिनिटं" असे म्हणून तिने शंतनुकडून आपली सुटका करून घेतली. खरोखर एका मिनिटात परत आलेल्या तन्वीला पाहून खुशीत आलेल्या शंतनूची ख़ुशी क्षणभरच टिकली.  त्याच्या छातीला लावल्या गेलेल्या बामच्या उग्र वासाने "तन्वी" असे जोरात ओरडून त्याने तिला दूर लोटलं. नुडल्सची प्लेट बाजूला सारून त्याने एका हातानं बामचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न केला. आपलं हे रूप तन्वी कौतुकाने पाहतेय हे पाहून मात्र त्याचा राग बराच निवळला.
मध्येच केव्हातरी वीजपुरवठा खंडित झाला. मेणबत्तीच्या प्रकाशात खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या सोबतीने तन्वी आणि शंतनु एक अविस्मरणीय जेवण घेत होते. हे वातावरण एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या वातावरणाच्या तोडीचे आहे आणि तन्वीने केलेली कांदा भजी तिथल्या कोणत्याही स्टार्टरला लाजवेल असेच शंतनुला राहून राहून वाटत होते.
रात्र बहरत होती. तन्वी अगदी खुशीत आली होती. दिवसाच्या भितीचा कोठेच मागमूस नव्हता. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून शंतनु झोपी गेला. "बिचारा दमला असेल", आपल्या ह्या विचाराने तन्वी स्वतःशीच खुदकन हसली. "लबाड कुठली" असा विचार तिच्या मनात आला. "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणं मनातल्या मनात गुणगुणताना असाच कधीतरी तिचा डोळा लागला.
तिथलं वातावरण अगदी भीतीदायक होतं. अक्राळविक्राळ राक्षससदृश्य सैनिकांनी तन्वीला घेरलं होतं. तन्वी त्यांच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु ह्यांच्या तावडीतून सुटणं कठीण आहे हे लक्षात येऊन ती हताश होऊन खाली बसली. तिची नजर पलीकडे गेली. सर्वत्र असाच गोंधळ चालू होता. राजाचे काही सैनिक ह्या आक्रमणाला तोंड द्यायचा प्रयत्न करीत होते. परंतु एकंदरीत परीस्थिती कठीण दिसत होती. अचानक तिची नजर एका शूर योद्ध्याकडे गेली. त्याने शत्रूसैनिकांचा बिमोड करायला लावला होता. तन्वीने तशाही परिस्थितीत त्याला ओळखले. "नकुल" तिने त्याला हाक मारली. नकुलने तिच्याकडे वळून पाहिलेसुद्धा, एक क्षणभर थांबला देखील तो! पण मग मात्र तो तसाच पुढे गेला, शत्रूच्या घोळक्यात अडकलेल्या एका सरदाराची सुटका करायला! "नकुल, मला वाचव, नकुल!" तन्वी जोरात ओरडली.
तन्वीच्या ह्या हाकेने शंतनु खडबडून जागा झाला. "तन्वी, काय झालं? ठीक आहेस ना? आणि हा नकुल कोण?" शंतनु विचारत होता. तन्वी आता भानावर आली होती. "हा नकुल कोण" हे शंतनुचे शेवटचे शब्द तिच्या कानी पडले. इतके दिवसाचं हे रहस्य आता उघड करणं भाग होतं. "मला एक ग्लास पाणी आणशील, शंतनु!" तन्वीची ही विनंती शंतनुने मान्य केली. ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन तन्वीने ग्लास बाजूला ठेवला. एक क्षणभर  उसंत घेतली.
पुढे बराच वेळ तन्वी शंतनुला तिच्या आयुष्यातील हा विश्वास न बसण्याजोगी कहाणी शंतनुला सांगत होती. शंतनु हादरला होता. शंतनुच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याचा तन्वी आटोकाट प्रयत्न करीत होती. आपल्या मनात नकुलविषयी निर्माण झालेली भावना मात्र न सांगण्याची दक्षता तिने घेतली होती. परंतु तिच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाचा भाव आणि त्या दिवशी तिचे झोपेतील लाजणे ह्या सर्वांची संगती लावण्याचा शंतनुचा प्रयत्न चालू होता. अशीच केव्हातरी तन्वीची कहाणी आताच्या स्वप्नापर्यंत येऊन थांबली. आणि तिने  शंतनुच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा इतका गंभीर चेहरा तिने कधीच पाहिला नव्हता. बराच वेळ दोघेही शांत होते. "शंतनु, काहीतरी बोल ना!" ती  न राहवून बोलली. "ही प्रतारणा आहे" शंतनुचे हे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे तिच्या कानात शिरले!  

Tuesday, January 14, 2014

जाणता अजाणता - भाग ५


पुन्हा एक अबोल सकाळ! मुन्नारला आल्यावर अबोला सुद्धा मल्याळी भाषेत असतो कि काय असा भास राहून राहून शंतनुला होत होता. झोपेतील तन्वीच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्न मुद्रा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हती. परंतु हा विषय काढायचा कसा हेच त्याला समजत नव्हते. ती झोपेत होती, त्यावेळी नक्की काय चाललं होतं ते तिला विचारून सुद्धा आठवलं नाही म्हणजे? त्याचं एक मन त्याला सांगत होतं. नास्ता स्वादिष्ट होताच पण शंतनुचे लक्ष होते कुठे त्याच्याकडे? "तन्वी, कशी आहेस?" चहाचा कप टीपॉय वर ठेवून तसंच परत जाणाऱ्या तन्वीचा हात पकडून त्याने विचारलं. "काय झालं तुला शंतनू?, मी मजेत आहे!" ह्या वेळेला मात्र चेहऱ्यावर चांगलं हसू आणणं तन्वीला जमलं. "रात्री झोपेत अगदी प्रसन्न दिसत होतीस!" शंतनुच्या ह्या उद्गारावर मात्र तन्वी दचकली. "हो, का! असेल, हे वातावरण ना मला अगदी आवडतेय! मस्त थंडावा आणि धुळीचा लवलेशसुद्धा नाही!" कशीतरी तिने वेळ मारून नेली. शंतनुने मग जास्त ताणून धरलं नाही. उगाचच आपण संशय घेतोय अशी समजूत करून घेऊन तो ऑफिसात निघाला. आता बरंच काम होतं.
शंतनुच्या बोलण्याने तन्वी मनापासून हादरली होती. स्वप्नातील हे विश्व बाहेरच्या दुनियेत म्हणजे शंतनुपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती तर! कोण आहे हा नकुल? माझ्या भावना ओळखतो, मला ऑफिसात कर्तबगारी दाखवायची इच्छा होती ती त्याने राजदरबारात पूर्ण केली, माझ्या सौंदर्याचे शंतनुने कौतुक करावं ही अपूर्ण इच्छा त्याने एका छोट्या भेटीतील मोजक्या वाक्यात पूर्ण केली. माझा उतरलेला मूड त्याने गेल्या दोन रात्री बराच चांगला केला. अगदी तो माझाच भाग बनत चालला आहे. पण मग तो कालच्या भेटीत काहीसा उदास का वाटत होता बरं? एकटाच जाऊन तलावाच्या काठी बसला होता. माझ्यावर चिडला असेल का बरं? पण मी काय केलं त्याला राग येण्यासारखं? तन्वीचे विचारचक्र भरधाव चाललं होतं. आणि मग तिला शंतनुबरोबरची घालवलेली संध्याकाळ आठवली. ती सुद्धा त्या वातावरणात नाही म्हणायला फुलून निघाली होती. "नकुलला त्यामुळे तर राग आला नाही?" ह्या विचाराने मात्र ती अजून चिंताग्रस्त झाली. ऊतू जाणाऱ्या दुधाच्या आवाजाने तिचे हे विचारचक्र भंगले. एकदा स्वयंपाकघरात गेल्यावर मात्र तिला बरीच कामे दिसली आणि नकुलचा विचार काहीसा खंडित झाला.
आंघोळ वगैरे आटोपल्यावर तन्वी शांतपणे पेपर घेऊन बसली होती. दररोज पडणाऱ्या पावसानं हवेत थंडावा आला होता. उघड्या खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक येताच एक मस्त झोप काढावी अशी इच्छा तिच्या मनात आली. आणि ती बिछान्यावर पहुडली. झोप लागतच होती आणि पुन्हा एकदा ते डोंगर आणि घनदाट काळे मेघ दिसू लागले. इतक्यात दाराच्या वाजलेल्या बेलने तन्वी अचानक जागी झाली. शेजारणीने मोलकरणीला कामासाठी विचारायला पाठवलं होतं. तन्वीला भानावर यायला वेळ लागला. मोलकरणीचा महिन्याचा पगार सुवर्णमुद्रेच्या रुपात द्यावा कि काय ह्या विचारावर हसावं की रडावं हे तिला कळेना! मोलकरीणीशी बोलताना भाषेचा अडथळा येत होता. शेवटी मोलकरीण "Five Thousand" असे ठसक्यात म्हणाली. तेव्हा "मी साहेबांशी बोलून सांगते" असे इंग्लिश मध्ये सांगून तन्वीने तिला परत पाठविलं.
आता तन्वी अगदी बेचैन झाली. अगदी दिवसाच्या डुलकीमध्ये सुद्धा नकुल यायला लागला तर? आपल्यावर इतका हक्क का बजावायला बघतोय तो? संध्याकाळी शंतनु आला की त्याला हे सर्व सांगून टाकावं अशा निष्कर्षापर्यंत ती येऊन पोहोचली!

Saturday, January 11, 2014

जाणता अजाणता - भाग ४


तन्वीने आणलेले पोहे नेहमीइतके किंबहुना त्याहून अधिकच चविष्ट होते. पण शंतनुचे त्याकडे लक्षच नव्हते. तिच्या शांतपणात काहीसा वेगळेपणा आहे असेच त्याला राहून राहून वाटत होते. खुशीत असल्यावर नेहमी त्याच्या अवतीभोवती घुटमळणारी तन्वी आज त्याला टाळत होती असाच भास त्याला होत होता. त्यावर तो तसाच बराच वेळ विचार करीत बसला असता पण पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. अपेक्षेनुसार बॉसच फोनवर होता. "अधिकारीमंडळी येतच असतील अर्ध्या तासात, शंतनु लवकर ऑफिसात पोहोचतोयस ना!" त्याचे हे शब्द ऐकून शंतनु ताडकन उठला. "येतो मी!" निघताना तो तन्वीला म्हणाला. "गुड लक" तन्वी पुढे येत म्हणाली. कुठे तरी काही तरी बदलल्यासारखे त्याला राहून राहून वाटत होते.
शंतनु ऑफिसात निघाल्यावर तन्वीला हायसं वाटलं. तिला रात्रीच्या प्रकाराविषयी शांतपणे विचार करायचा होता. मनात एक छोटीशी खुशीची लहर जरी उमटून गेली असली तरी बेचैनीसुद्धा निर्माण झाली होती. नकुलचा देखणेपणा तिला राहून राहून मोहवीत होता. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने स्वतःला कामात झोकून द्यायचं ठरविलं. त्या छोट्याशा घराला तिनं झाडून पुसून काढलं. नवीन सामान आणल्यावर ते  कुठं लावायचं ह्याचाही विचार करून पाहिला. एका कोपऱ्यात जुनी फिल्मी मासिकं पडली होती. त्यातील हृतिकचा फोटो पाहून ती पुन्हा सैरभैर झाली. इतक्यात तिचा फोन वाजला. "अग आमचं प्रपोजल बँकेने स्वीकारलं! त्यांना बऱ्याच शंका होत्या पण त्या सर्वांचं निरसन केलं. बॉस तर भन्नाट खुश झालाय माझ्यावर!" शंतनु झपाटल्यागत  बोलत होता. "आज संध्याकाळी मी लवकर येतो, आपण बाहेर जेवायला जाऊयात!"इतकं बोलून त्यानं फोन ठेवला. तन्वीलाही बरं वाटलं. "ह्याचा इथं चांगला जम बसू दे, माझ्या इथे येण्याचं सार्थक होईल!" तिच्या मनात विचार येऊन गेला.
रात्री बाहेर जायच्या बेतानं मात्र जादू केली होती. तन्वीने दुपारचं जेवण आटपून घेतलं. रात्रीची पावभाजी गरम करून खाताना  रात्रीच्या निराशेचा विचार मात्र तिने मनाला शिवून दिला नाही. दुपारी झोपायचा विचार येताच तिच्या मनात का कोणास ठाऊक खळबळ निर्माण झाली. आपण झोपुयाच नको असे ठरवून तिने टीव्ही सुरु  केला. कोणत्यातरी जुन्या सौंदर्यस्पर्धेचे पुनर्प्रक्षेपण सुरु होते. त्यातील त्या सौंदर्यवती ललना पाहून तिच्या मनात एक विचार आला आणि त्या खुशीत असताना कधीशी तिला डुलकी लागली हे तिचे तिलाच कळलं नाही. जागं झाल्यावर दुपारची झोप विशेष काही न घडता गेली ह्याचं तिला बरं वाटलं.
मग मात्र ती नव्या उत्साहाने तयारीला लागली. शैम्पूने केस धुवून नवीन केशरचना केली. कोचीहून घेतलेली ठेवणीतील कांजीवरम साडीही काढली. बऱ्याच दिवसात आपण स्वतःकडे लक्षच दिलं नाही हे तिला जाणवलं. आणि लग्नाआधी आपल्या सौंदर्याची मनापासून स्तुती करणाऱ्या शंतनुने सुद्धा गेल्या काही दिवसात आपल्याला काही बोललं नाही ही खंत तिच्या मनाला स्पर्शून गेली. थोड्याच वेळात स्वतःला सावरून तिने आपली तयारी पूर्ण केली.
शंतनु आला तो खुशीच्या घोड्यावर स्वार होऊनच! "आपण कसं त्या अधिकारी मंडळीच्या शंकाचे समाधान केले, बॉस मध्येच काही चुकीचं बोलणार होता आणि मी कसं त्याला सावरलं" ह्याचं वर्णन करण्यातच त्याचं पूर्ण लक्ष होतं. तन्वीने दिलेला चहा घेता घेता तो म्हणाला, "चल आता आपण निघूयात". त्याच्यासाठी सजलेल्या तन्वीने अजून रात्र बाकी आहे अशी समजूत करून घेतली. तरीही कांजीवरम त्याच्या नजरेत भरायलाच हवी होती हे मात्र तिला ठामपणे वाटलं.
बॉसने शंतनुसाठी ड्रायव्हर सकट गाडी पाठवली होती. ड्रायव्हर तसा जाणकार होता. पाण्याने ओथंबून भरलेल्या काळ्या मेघांच्या अस्तित्वानं सायंकाळच्या वेळी खुलून उठणारं मुन्नारच्या हिरव्यागार वैभवाचे दर्शन देणारे काही बहुसंख्य लोकांना फारसे परिचित नसणारी ठिकाणही त्याला माहित होती. तिथे गेल्यावर मात्र शंतनूच्या डोक्यातील बॉस आणि पॉवरपॉइंटचे भूत निघाल. आणि एकदा ढगांचा जोरदार गडगडाट झाल्यावर त्यानं तन्वीला जवळही ओढून घेतलं, तेव्हा मात्र तिचे रोमरोम शहारून गेले. रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी वरच्या भागातील पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे ठरविलं. तेथील मेणबत्तीच्या प्रकाशातील जेवण तर तन्वीला स्वर्गसुखाची जाणीव करून गेलं. परतीच्या प्रवासात पावसाचं आगमन झालं. विजांच्या गडगडाटाने भयभीत झालेली तन्वी शंतनुला मागच्या सीटवर बिलगली. कारमध्ये तिने दिलेली गाण्यांची सीडी चालू होती आणि "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे चालू होतं. शंतनुचे हे शृंगारिक रूप रात्री बराच वेळ टिकलं होत. केव्हा तरी दमून तो झोपी गेला. ह्याहून जीवनात तृप्तता म्हणजे  अधिक काय असा विचार तन्वी करीत होती. अचानक कांजीवरम कडे तिचे लक्ष गेलं आणि ती अचानक बेचैन झाली. शंतनुने इतक्या वेळात एकदाही कांजीवरमचे सोडा तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले नव्हते. कौतुक करून घ्यायची तिची इच्छा अतृप्त राहिली होती. एका अप्रतिम परिपूर्ण संध्याकाळला गालबोट लागून गेलं होतं.
तन्वीला बऱ्याच वेळ झोप लागत नव्हती. नकुलच्या विचाराने हुरहूर तर जाणवत होतीच. मग केव्हातरी तिला झोप लागली.
राजदरबार भरला होता. महाराज सर्वांकडून कारभाराची इत्यंभूत माहिती घेत होते. तन्वीची नजर मात्र नकुलला शोधत होती. इतक्यात "खजिनदार - राजकोशाची स्थिती कशी आहे?" महाराजांचे गंभीर स्वर तिच्या कानी पडले. काहीशा अपराधी मुद्रेने तिने झटपट आर्थिक स्थितीचे विवेचन सादर केलं. त्यानंतर तिला राजदरबाराच्या कारभारात रस राहिला नव्हता. तो केव्हाचा संपेल ह्याचीच ती वाट पाहत होती. एकदाचा राजदरबार संपला. नकुल कोठेच दिसला नव्हता. ती तशीच त्याच्या शोधार्थ घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडली. काल नकुल जिथे भेटला होता तिथे ती पोहोचली. एका तलावाच्या काठी एकट्याच बसलेल्या पाठमोऱ्या नकुलला तिने झटकन ओळखलं. त्याचा मानेवर विसावणारा कुरळा केशसंभार तिला खूपच मोहक वाटून गेला.
मोहित होऊन ती त्याचे ते रूप आपल्या नजरेत साठवायचा प्रयत्न करीत असताना नकुलला तिची चाहूल लागली. मागे वळून त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मुद्रेवर स्मितहास्य आलं. पण त्याच्या नजरेतील दुःखी भाव मात्र तन्वीने बरोबर टिपले. बराच काळ दोघंही काही बोलली नाहीत. "आपण इतका काळ कुठं होतात ?" नकुलने विचारलं. तन्वीला ह्या प्रश्नाचा उलगडा झाला नाही. आकाशात मावळतीच्या सूर्याची तांबडी प्रभा पसरली होती. तिने तन्वीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. "आज आपले सौंदर्य आणि आपली वेशभूषा खूपच खुलून दिसत आहेत!" नकुल म्हणाला आणि मग शांतपणे उठून तो आपल्या निवासस्थानाकडे चालू लागला. आपल्या वेषभूषेकडे लक्ष गेल्यावर तन्वी दचकलीच. कांजीवरम खरोखरच त्या संधीप्रकाशात खुलून दिसत होती" आपल्या रूपाच्या कौतुकाने तन्वी अगदी बहरून गेली होती.
शंतनुला मध्येच जाग आली होती. घोटभर पाणी पिऊन झोपी जाणार तितक्यात त्याची नजर तन्वीच्या चेहऱ्याकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर अधीरपणा दिसत होता. त्याला आश्चर्य वाटलं पण असेल असेच काही असे म्हणून तो पुन्हा झोपी गेला. पण पुन्हा एकदा त्याच्या मनात तोच विचार आला. मग त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तन्वी अगदी लज्जेने खूष झाली होती. शंतनू आता मात्र चकित झाला होता. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. आता मात्र तन्वी अगदी समाधानाने गाढ झोपी गेली होती. अगदी आकाशीचा चंद्र मागण्याचा हट्ट धरलेल्या बालकाच्या हाती खरोखर तो चंद्र हाती लागल्यावर त्याला जितकं समाधान होईल तितकं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शंतनुची झोप मात्र पूर्ण उडाली होती!

Wednesday, January 8, 2014

जाणता अजाणता - भाग ३


शंतनुला पहाटेच जाग आली. तन्वी बाजूला नव्हती. अभ्यासिकेतील दिवा चालू होता. डोळे चोळत शंतनू तिथवर गेला. तन्वी टेबललैम्पच्या उजेडात तिच्या वहीत काही नोट्स काढीत होती. "तन्वी, इतक्या सकाळ सकाळी काय लिहितेयस?" शंतनूने तिला विचारलं. तन्वीने वही पुढे केली. मुन्नारच्या स्थलांतरासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टींची ती यादी होती. "आपण गणपतीच्या सुट्टीत इथे परत येऊ, फ्लैट भाड्याने द्यायचा की  नाही त्यावेळी ठरवू" तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. "तन्वी, तुझ्या नोकरीचं काय? समजा मी सुद्धा इथे दुसरी नोकरी शोधली तर आपल्या दोघांना अगदी मजेत राहता येईल" शंतनु म्हणाला. "नको राहू दे, मी चहा ठेवते आता!" असं म्हणून तन्वी तिथून पटकन उठून गेली. शंतनूची झोप आता पूर्ण उडाली होती. त्याने पटकन ब्रश केलं आणि तन्वीने आणून दिलेला चहा घेऊन तो स्वयंपाकघरात आला. बोलणं टाळायचं असेल तर कामात गढून जायची किंवा गढून जायचं नाटक करायची तिची सवय त्याला काही नवी नव्हती.  शंतनू असाच काही क्षण तिच्या मागे उभा राहिला. नेहमीप्रमाणे तन्वीला त्याची चाहूल लागलीच. न राहवून तिने मागं वळून पाहिलं आणि नजरेनेच काय म्हणून विचारलं.
"तन्वी, मनातलं खरं खरं सांगून टाक!" शंतनु म्हणाला. तन्वी मागं वळाली. खिडकीतून खालून जाणारा रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावर जर पुढे गेल्यावर दोन फाटे यायचे. त्यातील एक नेहमीचा गावात जाणारा रस्ता होता पण दुसरा रस्ता कोठे जातो हे तन्वीला माहित नव्हतं. "आपण त्या रस्त्यावरुन पुढे जाऊन पाहूयात ना!" तन्वीने बराच वेळा शंतनुकडे आग्रह धरला होता. "जाऊ कधीतरी एकदा, बाकी पुढे कुठे हरवून गेलो तर?" शंतनु म्हणाला होता. "शंतनु, तू सोबत असशील तर दाट जंगलात सुद्धा हरवायची भीती नाही रे!" तन्वी त्यावेळी म्हणाली होती. हे सारे तन्वीला आठवत होते. ती पुन्हा एकदा वळाली. शंतनु तसाच उभा होता. "शंतनु, आज आपल्याकडे दोन पर्याय आहेत. खरं सांगू ह्यातील कोणताही एक १०० टक्के बरोबर नसणार आहे. कोणताही एक स्वीकारला तर काही मनासारखं होईल तर काही मनाविरुद्ध! जो मार्ग आपण स्वीकारू त्यात काही जास्तच मनाविरुद्ध घडलं तर कितीही इच्छा झाली तरी आपण आज उपलब्ध असलेला दुसरा पर्याय त्यावेळी स्वीकारू शकणार नाहीत! आणि मी स्वार्थी आहे शंतनु! मी त्याग  केला ही भावना मला माझ्या करियरपेक्षा महत्वाची वाटतेय! एक काका आणि आई सोडले तर दोन्ही बाजूंचे नातेवाईक, आपण मुन्नारला जावे असेच म्हणणार! माझ्यावर इतकी मेहरबानी कर!" शंतनु निरुत्तर झाला.
पुढे बाकी सर्व घडामोडी अगदी झटपट झाल्या. आई आणि काकांच्या कटकटीकडे तन्वीने अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. सामानाची आवराआवर करून हवं असेललं सामान मुन्नारला निघालं सुद्धा! आणि मग एका शनिवारी सकाळी विमानानं दोघंजण कोचीला पोहोचले सुद्धा! कोचीहून मुन्नारचा वळणावळणाचा रस्ता तन्वीला खूप भावला. आणि मुन्नारचे छोटे टुमदार घर पाहून तर ती बेहद्द खुश झाली. खिडकीतून समोर हिरवेगार पर्वत दिसत होते. पावसानं चांगलाच जोर धरला होता. शनिवार - रविवार अगदी बेधुंद गेले. शंतनुने  रसिकतेच्या बाबतीत अगदी परिसीमा गाठली होती.
आणि मग दुष्ट सोमवार आला. शंतनुलासुद्धा आज ऑफिसला जावेसं वाटत नव्हत. पण नाईलाज होता. तिथे गेल्यावर मात्र शंतनु अगदी कामात गढून गेला. ह्या ऑफिसचा विस्तार होणार होता. परदेशी लोकांसाठी खास नवीन अद्ययावत सोयींनी युक्त असे हॉटेल उघडायचा त्याच्या पर्यटक कंपनीचा विचार होता. ह्या नवीन क्षेत्रात पाय ठेवताना नवीन रक्ताला वाव देण्यासाठी म्हणून शंतनुची निवड करण्यात आली होती आणि ह्यात चमक दाखवली तर त्याला भरभर पुढे जाण्याचा वाव होता. पहिल्याच दिवशी शंतनुला यायला रात्रीचे नऊ वाजले. तन्वीने आपला सगळा समजूतदारपणा एकत्र करून हसत हसत त्याचं स्वागत केलं. दमलाभागला शंतनु जेवल्यावर दहा मिनिटातच झोपी गेला. दिवसभर हिरव्यागार पर्वतराजीच्या दर्शनाने मूड खुललेल्या तन्वीला त्याच्याशी गप्पा मारण्याची फार इच्छा होती. ती तशीच मारून टाकून ती बिछान्यावर पहुडली. बराच वेळ तिचा डोळा लागत नव्हता.
दुसरा दिवशी सकाळी शंतनुला लवकर निघायचं होतं. रात्री बोलायचं राहून गेलं होतं. तन्वीने सकाळी सातचा गजर लावला होता. त्याच्या तिला आवाजाने जाग आली तर शंतनु निघतच होता. आता मात्र तन्वीचा संयम सुटला. "रात्री मला सांगायचं ना? मी उठले असते लवकर!" ती रागानेच बोलली. शंतनुला आपली चूक कळली होती. "सॉरी तन्वी" असं बोलून तिच्याजवळ तो येणार तितक्यात त्याचा भ्रमणध्वनी वाजला. पलीकडे त्याचा बॉस होता. "हो हो आलोच" असं म्हणत शंतनू धावतच बाहेर पडला. खिडकीतून त्याला टाटा करणाऱ्या तन्वीकडे पाहायचं भानसुद्धा त्याला राहिलं नाही.
शंतनुचा दिवस कामात अगदी  बिझी होता. ह्या प्रोजेक्टला अर्थसहाय्य करणाऱ्या बँकेची अधिकारीमंडळी  दुसऱ्या दिवशी येणार होती. त्यांना प्रेसेंटेशन द्यायचं होत. संध्याकाळी सात वाजत आले तरी ते काही मनासारखं बनत नव्हत. त्यात बरीच माहिती हव्या तशा स्वरुपात बसवायची होती. आणि बॉसचा होकार मिळत नव्हता. "यंग मॅन, आज रात्रभर बसून हे प्रेसेंटेशन आपण पूर्ण करूयात! उद्या आपल्याला बँकेकडून होकारच हवाय!" बॉसचे हे शब्द ऐकून शंतनु हादरलाच. निघताना आपण परत वळून पाहिले सुद्धा नाही हे त्यालाही दिवसा कधीतरी जाणविले होते. बराच वेळ तन्वीला फोन करायचा प्रयत्न त्याने केला होता. पण "तुम्ही प्रयत्न करीत असलेला  भ्रमणध्वनी संपर्ककक्षेच्या बाहेर आहे" असा ध्वनिमुद्रित संदेश ऐकून त्याचा संयम सुटत चालला होता. इतक्यात त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला. तन्वी समोर होती. स्वागतकक्षातून हा नंबर मिळविण्यासाठी तिला बरेच प्रयास करावे लागले होते. "शंतनु, घरी कधी येणार आहेस? आणि एक फोन सुद्धा केला नाहीस" तिच्या आवाजात राग जाणवत होताच. हिला आपण रात्री बहुदा येऊ शकणार नाही हे कोणत्या तोंडाने सांगावे हा गहन प्रश्न शंतनुला पडला होता. "सर, रात्री जेवणाला काय मागवायचं?" नेमका त्याच वेळी अगदी जवळ येऊन बोललेल्या ऑफिसबॉयचे हे शब्द तन्वीपर्यंत पोहोचलेच. "तन्वी…. " शंतनु तिला हे सांगणार तितक्यात समोरून एक हुंदका त्याला ऐकू आला.  आणि फोन कट झाला होता. शंतनुचा पुन्हा मोबाईलवरून फोन लावायचा प्रयत्न अयशस्वी होत होता. "साहेब, ऑफिसातून रेंज मिळत नाही, तुम्हांला बाहेर जाऊन फोन करावा लागेल" ऑफिसबॉय पुन्हा वदला. "ह्याला आपण आधीच विचारायला हवे होते" शंतनुच्या मनात विचार येऊन गेला. त्याने ताबडतोब बाहेर जाऊन फोन लावला. "ठीक आहे, शंतनु! मी थांबेन एकटी रात्रभर आणि खाईन पावभाजी एकटी!" तन्वीच्या आवाजात दुखावलेपणा आणि राग एकाच वेळी जाणवत होता. "आणि हो आता परत फोन करू नकोस, मी झोपले वगैरे असेल तर!" असे म्हणून तन्वीने फोन ठेवला. शंतनु क्षणभर सुन्न होऊन बसला. पण पुन्हा एका झटक्यात उठला. जे झाले ते झाले पण आता साहेबाला खुश करून दाखवणारच असा पक्का निर्धार त्याने केला.
तन्वीला एकटेपण खायला उठलं होतं. अजून केबल टीव्ही वगैरे चालू नव्हता. संध्याकाळी मोठ्या प्रयत्नाने केलेली पावभाजी खायची तिला फारशी इच्छा नव्हती. नाईलाज म्हणून तिने एका डिशमध्ये थोडी भाजी आणि एक पाव घेऊन आपलं जेवण आटपून घेतलं. वातावरणात बराच उकाडा होता. पाऊस केव्हाही चालू होईल अशी लक्षणं दिसत होती. तन्वी बराच वेळ एकटी खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे पाहत होती. ढगाळ वातावरणामुळे आकाशात एकटी चांदणी शोधायचा तिचा प्रयत्न निष्फळ ठरणार होता असा कयास तिने आधीच बांधला होता.
केव्हातरी तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. "अरे बापरे, साडेदहा वाजले, झोपायला हवं" तिने मनाशीच विचार केला. "बिचारा शंतनु, दिवसभर त्याने काय खाल्लं असेल" ह्या विचाराने तिच्या मनात काळजी निर्माण झाली. तन्वी बराच वेळ बिछान्यावर तळमळत होती. पाऊस अजूनही सुरु न झाल्याने उकाडा यं जाणवत होता. डोक्यावर उशी घेवून जोरात पंखा सुरु करूनही काही उपयोग झाला नव्हता. आणि अचानक बाहेर पावसाच्या थेंबांचा आवाज सुरु झाला. त्या आवाजावर आणि त्याबरोबर आलेल्या आवाजाने तन्वीला हळूहळू झोप येऊ लागली.
तन्वीला समोरचा डोंगर दिसत होता. ती त्या रस्त्यावरून पुढे पुढे जात होती. उंच डोंगरात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. आणि तन्वी त्या ढगांच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्या ढगांना स्पर्श केल्यानंतरचा ओलावा तिला खूप भावून गेला. तिची नजर अचानक खाली गेली. ती एका रथात बसून तिचा प्रवास सुरु होता. ह्या सर्व गोष्टींचं आश्चर्य करण्याचं तिने सोडून दिलं. रथ तसाच पुढे पुढे चालला होता. आता काळे ढग मागे पडून अगदी नयनरम्य परिसर सुरु झाला होता. हिरव्यागार मैदानातून प्रवास करताना तिला दूरवर एक सुंदर नगरी दिसत होती. त्यातील एका वैभवशाली वस्तूकडे तिची नजर पुन्हा पुन्हा जात होती. "बहुदा हा ह्या नगरीचा राजवाडा असावा" तिने कयास केला. अचानक तिच्या रथाची गती कमी झाली असे तिला जाणवलं म्हणून तिने समोर पाहिलं. शुभ्र अश्वावर बसून आलेल्या एका देखण्या युवकाने त्यांचा रस्ता अडविला होता. "आपण कोण आहात आणि ह्या नगरीत प्रवेश करण्याचं आपलं प्रयोजन काय?" तो शस्त्रधारी युवक तिला प्रश्न करता झाला. त्या प्रश्नाचं उत्तर तिला काही देता आलं नाही. "मला आपणास महाराजांपुढे हजर करावं लागेल" तो युवक बोलता झाला. तन्विपुढे काही पर्याय दिसत नव्हता. "आपलं नाव काय? तन्वीने प्रश्न केला. "नकुल" काहीशा आश्चर्यचकित  झालेल्या त्या युवकाने उत्तर दिलं. सैनिकांच्या नजरांना तोंड देत तन्वी आणि नकुल ह्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्यात थोडा गहन प्रश्न निर्माण झाला होता. सीमेवर असलेल्या सैनिकांच्या खर्चासाठी आणि प्रशासनीय व्यवस्थेसाठी द्रव्याचं विभाजन कसं करावं ह्यावर प्रधान, सेनापती आणि महाराज ह्यांच्यात खल सुरु होता. मुद्रांच्या वाटपावर घोडं अडलं होतं. "सोपं आहे, सद्याची संभाव्य युद्धस्थिती पाहता चौसष्ट हजार सुवर्ण मुद्रा प्रशासकीय कारभारासाठी आणि शहाण्णव हजार सुवर्ण सैनिकी खर्चासाठी!" न राहवून तन्वी बोलली. आणि बाकी कोणाला बोलण्याची संधी न देताना त्यामागील पृथ्थकरण विशद केलं. ह्या अनोळखी विदुषीच्या ह्या विद्वत्तापूर्ण विवेचनाने महाराज बेहद्द खुश झाले. नकुलाकडून ती सुरक्षेसाठी मोठा धोका नाही ह्याची खातरजमा करून घेत त्यांनी तन्वीला प्रश्न केला, "आमची खजिनदार होण्यास आपणास आवडेल काय?" तन्वीने नकळत होकार दिला. मग महाराजांनी नकुलास तिला तिच्या दालनात सोडण्याची आज्ञा केली. आपल्या दरबारातील विद्वत्तेने प्रभावित झालेल्या नकुलाची नजर तिला मनात खूप आवडली. दालन दाखवून परतणाऱ्या नकुलाने एकदा तरी मागं वळून पाहावं अशी तिची इच्छा पूर्ण होताच तिच्या चेहऱ्यावर लज्जापूर्ण स्मित आलं. तिने लाजूनच द्वार बंद केलं!
शंतनु अगदी झपाटून गेला होता. त्याने अडीच वाजता बनवून आणलेलं  प्रेसेंटेशन पाहून साहेब बेहद्द खुश झाले. हे असंच आपण उद्या सादर करायचं. "यंग मॅन! आता तू घरी जावून झोप घेऊ शकतोस! ग्रेट जॉब!" पडत्या फळाची ही आज्ञा मानत आणि जरासं जेवण घेऊन शंतनु घरी परतला. गाढ झोपी गेलेल्या तन्वीची मुद्रा पाहून एकाच वेळी त्याच्या मनात प्रेम, अपराधीपणाच्या भावना दाटून आल्या. तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळलं नाही.
सकाळी तन्वीचे डोळे उघडताच समोर बसलेल्या शंतनुला पाहुन तिला आश्चर्याचा धक्का बसला. रात्रीचा आपला त्याच्यावरील राग तिला आठवला. आणि अचानक नकुलही आठवला. नकुलच्या आठवणीने तिचा मूड बराच चांगला झाला. झटपट तिने ब्रश करून चहा बनविला आणि शंतनुला हळूच उठवीत ती म्हणाली "खूप दमला असशील नाही ? हा चहा घे! मी पटकन पोहे बनविते!" शंतनू आ वासून पाहताच राहिला!




Monday, January 6, 2014

जाणता अजाणता - भाग २




वसुधाताई आणि गजाननकाका सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते. गजाननकाकांच्या मित्राचा मुलगा एका स्थानिक बँकेत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याला फोन लावल्यावर त्या बँकेत वाणिज्य शाखेतील पदवीधरांसाठी भरती चालू असल्याचे काकांना कळलं. आणि मग! संध्याकाळी तन्वी एक बाहेर चक्कर मारून यायला म्हणून बाहेर पडणार तितक्यात तिचा फोन खणखणला! शंतनुचा फोन असेल ह्या आशेने तिने पाहिलं तर अनोळखी नंबर दिसला. शक्यतो ती अनोळखी क्रमांकावरील फोन घ्यायची नाही. पण कोणास ठाऊक कसं पण तिने हा फोन उचलला! बँकेतून मुलाखतीसाठी फोन होता आणि त्यांनी काकांचा संदर्भ दिला. "मला ह्यात अजिबात रस नाहीये" असे सांगून फोन ठेवायची तीव्र इच्छा झाली. पण नुसतं बोलून पाहायला तर काय हरकत आहे, आपण थोडेच जाणार आहोत तिथे, असा विचार करून तिने पाच मिनिटांचा वेळ मागितला. तयार होऊन ती मुलाखतीला बसली. मुलाखत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चालू झाली. तन्वीच्या सामान्यज्ञानावर, संगणकाविषयी आणि एकंदरीत जगभरच्या आर्थिक परिस्थितीविषयीच्या ज्ञानावर मुलाखतमंडळ खुश दिसत होत. तिचे गणितातील फंडे सुद्धा बऱ्यापैकी चांगले होते आणि वाणिज्यशाखेतील तिच्या प्राविण्यावर तर ते मंडळ फिदा झालं. "तुम्हांला ह्या पदाविषयी, त्यातील जबाबदाऱ्याविषयी काही प्रश्न आहेत का?" मुलाखतमंडळाने हा प्रश्न विचारायला आणि दार उघडून शंतनू आत यायला एकच क्षण मिळाला. "मला महिन्यातून १-२ आठवडे घरून काम करायला परवानगी मिळेल का? तन्वीच्या मनातील हा प्रश्न शंतनुच्या येण्याने तिच्या मनातच राहिला. "नाही" एका शब्दात ती उत्तरली. पुढे फोनवर आपला ई - मेल देत असलेल्या तन्वीकडे शंतनु काहीसा चकित होऊन पाहत होता.
बाहेर फिरायला जायची वेळ टळून गेली होती. शंतनु एव्हाना ताजातवाना होऊन सोफ्यावर बसला होता. तन्वी चहा घेऊन सोफ्यावर येउन बसली. तिची नजर शंतनुने टेबलवर  ठेवलेल्या राहण्यासाठी प्रस्तावित असलेल्या मुन्नरच्या दोन इमारतींच्या  फोटोकडे गेली. त्यातील एका इमारतींचे फोटो तिला बेहद्द आवडले. त्याच्या भोवतालचे चहाचे हिरवे मळे, गॅलरीतून दिसणारे उंच पर्वतराजीचे विहंगम दृश्य! चहाचे घोट घेत पेपर वाचण्याचे नाटक करणाऱ्या शंतनुच्या एका डोळ्याने तन्वीच्या चेहऱ्यावरील ख़ुशी टिपली. तन्वीने सुद्धा मग खुशीत येऊन म्हटलं "आपण ना ह्याच इमारतीत सदनिका घेऊयात!" झालं गेलं विसरून ते दोघंजण अगदी खुशीत हसले. तितक्यात तन्वीचा फोन पुन्हा खणखणला. पलीकडे काका होते. "तन्वी, अगदी कमाल केलीस तू मुलाखतीत! तुला वार्षिक ९ लाखांचं पॅकेज द्यायला ते तयार आहेत! आणि दोन वर्षात बढती! मीच त्यांना हो सांगून टाकणार होतो पण त्यांना तुझ्याकडूनच होकार हवाय! सांगू ना मग हो त्यांना!" तन्वीला क्षणभराची उसंत न देता काकांची बडबड चालूच होती. तन्वीच्या तोंडून शब्द फुटेना. "मी तुम्हांला उद्या सकाळी फोन करते" ती कशीबशी उद्गारली. अचानक झालेल्या तिच्या चेहऱ्यावरील हावभावांच्या ह्या बदलाने शंतनू अगदी चकितच झाला.
पुढे अर्धा तासभर त्याला सर्व परिस्थिती समजून सांगताना तन्वीची हालत खराब झाली. "तू मुलाखत दिलीच कशाला? शंतनूच्या ह्या प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर नव्हतच. तिलाच स्वतःला पडलेला तो प्रश्न होता. घड्याळाकडे पाहिलं तर आठ वाजत आले होते. पुन्हा एकदा हिरमुसलेल्या शंतनूला तसंच ठेवत तिने स्वयंपाकघराकडे धाव घेतली. शंतनुची जेवणाची साडेआठची वेळ पाळायची तर आता फक्त खिचडीसाठी वेळ होता. कुकर लावता लावता मुलाखतीतील आपल्या कामगिरीवर ती बेहद्द खुश होऊन मनातल्या मनात हसत होती. मागे आलेल्या शंतनुची चाहूल घेताच तिने त्या विचारांना आवरलं. "मग हा ब्लॉक भाड्याने द्यायचा की तसाच ठेवायचा? ती म्हणाली. तन्वीला प्रस्तावित केल्या गेलेल्या ९  लाखांच्या  पॅकेजचे विचार शंतनूच्या मनातून अजून गेले नव्हते. आपल्याला चार वर्षानंतर आता कुठं १० चा आकडा गाठता आला आणि हिला पहिल्या नोकरीतच ९ लाख देतायेत! "मुलगी फार हुशार आहे हो!" तन्वीच्या मावशी साखरपुड्याच्या वेळी बोलल्या होत्याच. "आमचा शंतनुही काही कमी नाही" काही ऐकून घ्यायची सवय नसणाऱ्या त्याच्या काकूंनी त्याच वेळी ठसक्यात उत्तर दिलं होत. शंतनुला अचानक तो प्रसंग आठवला. तन्वी त्याचाकडे पाहत त्याच्या मनाचा ठाव घेत होती. अचानक बाहेर चिमण्यांची चिवचिव ऐकू आली. दोघांनी बाहेर उभारलेल्या चिमणीच्या घरट्यात राहणारे चिमणाचिमणी मेहनतीने उभारलेल्या आपल्या घरट्याकडे कौतुकाने पाहत होते!

Sunday, January 5, 2014

जाणता अजाणता - भाग १


 (आधीच्या अनेक कथांप्रमाणे ही सुद्धा अपूर्ण न राहावो ही इच्छा!)

शंतनु ऑफिसातून आला तो काहीसा अबोल होऊनच! तन्वीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखलं की आज काहीतरी बिनसलं आहे. त्याला तिने फ्रेश होवून दिले. तो ताजातवाना होऊन परत हॉल मध्ये येईपर्यंत तिने  गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीच्या खारी बिस्किटाची डिश तयार ठेवली होती.

चहा आणि आवडीची बिस्किटे पाहताच शंतनुचा चेहरा खुलला. त्याने सोफ्यावर बैठक मारली. चहाचा पहिला घोट घेताच त्याची मुद्रा खुलली. तोवर तन्वी आपला कप घेऊन त्याच्याजवळ येऊन बसली होतीच.  तन्विचा स्पर्श होताच शंतनूची उरलीसुरली उदासी निघून गेली.  तन्वीने आपला चहाचा कप टीपॉयवर ठेवला!"असं रुसून घरी परत यायला काय झालं होत?" "काही नाही" शंतनु म्हणाला. दोन मिनिटे कोणीच काही बोललं नाही. तन्वीला हा अबोला सहन न होऊन ती काहीशा रागानेच स्वयंपाकघरात गेली.

"राग फक्त हिलाच धरता येतो" शंतनू मनातल्या मनात पुटपुटला. एक दोन मिनटे थांबून आज आपल्यालाच पडतं घ्यावं लागणार असा सुज्ञ विचार करीत तो स्वयंपाकघरात पोहोचला. एव्हाना तन्वीचे कांदा कापणे सुरु झालं होत. पाठमोरी असली तरी तिने शंतनुची चाहूल घेतली. १० - १५ सेकंद काही मागून हालचाल नाही हे पाहून मग ती वळली. तिच्या नजरेतील भावांनी आणि ओठात दडलेल्या स्मितहास्याने शंतनुची उरलीसुरली नाराजी दूर झाली. "माझी मुन्नारला बदली झालीय" फ्रीजला टेकून उभा राहिलेला शंतनू बोलला. भाजी कापणाऱ्या तन्वीच्या हातातील सुरी तिने कशीबशी आपले बोट कापण्यापासून वाचविली.

तन्विसाठी ही बातमी म्हणजे मोठा धक्काच होता. पुढील एका महिन्यात मुन्नारला संसार उभारायचा होता. कोल्हापुरातील सर्व मैत्रिणी, नातेवाईक सोडून अचानक असे जाणे तिच्या जीवावर येत होते. परंतु नाईलाज होता. तिच्या मनातील वादळाचा जेवणावर परिणाम झालाच.

परंतु शंतनु एव्हाना सावरला होता. भाजीतील कमी मिठाचा त्याने उल्लेखही केला नाही. त्याला वाढून तन्वीने आपले ताट वाढून घेतलं. पहिला घास घेताच तिला मिठाचा कमीपणा जाणवला. "अरे शंतनू, भाजीत मीठ कमी आहे! मला सांगायचं नाही का?" ती म्हणाली. शंतनुच्या डोळ्यात पाहून त्याने आपल्याला न दुखावण्यासाठी मौन राखलं हे तिला जाणवलं आणि इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. शंतनु लगेचच खुर्चीवरून उठला. "रडूबाई, अग लोक देशांतर करतात आणि मजेत राहतात. आपण तर आपल्याच देशात चाललो आहोत! आणि ते सुद्धा मुन्नरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी" दोघांच्या ताटात चिमुटभर मीठ ठेवता ठेवता शंतनु म्हणाला. शंतनुच्या समजूतदारपणाने तन्वी अगदी गहिवरली. एका हातानेच तिने शंतनुला आपल्याजवळ ओढले.

जेवण आटोपल्यावर शंतनुने आवाराआवर करण्यास हातभार लावला. "चल पटकन खाली एक चक्कर मारून येवू" शंतनू म्हणाला. तन्वीला थोडे आश्चर्यच वाटलं. एकदा का ऑफिसातून घरी आला की शंतनुला घराबाहेर काढण्यासाठी फार कष्ट करावे लागायचे. परंतु तिलाही थोडा मोकळेपणा हवा होता. तिने तत्काळ पंजाबी ड्रेस चढविला.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. हवेत कमालीचा उकाडा होता. रात्रीचे साडेनऊ झाले तरी हा उकाडा जाणवत होता. गावाबाहेरील ही कॉलनी गर्द झाडांनी व्यापलेली होती. रहदारी तशी चालू होती. कॉलनीच्या दुसऱ्या टोकाला एक आईसक्रीमवाल्याने गाडी लावली होती. तिच्याकडे बोट दाखवून शंतनू म्हणाला "चल, आईसक्रीमचा कोन घेऊयात!" तन्वीला आज तर एकावर एक आश्चर्यचे धक्के बसत होते.

 आईसक्रीमच्या गाडीपर्यंत दोघेही अगदी हातात हात घालून चालत होते. अचानक हवेत थंड वारा सुटला. जमिनीवर पडलेला पालापाचोळा वाऱ्याने अगदी हवेत उडवून दिला. तन्वी शंतनुला उगाचच बिलगली. आईसक्रीमवाला वाऱ्याचे रूप पाहून आपला गाशा गुंडाळायाच्या मागे होता. त्याने घाईघाईने ह्या दोघांना कोन बनवून दिले .

आपल्या कोनाचा पहिला हक्क शंतनुने तन्वीला दिला. आनंदाने फुललेल्या तन्वीचे ते मोहक रूप शंतनू आपल्या डोळ्यात साठवत होता की दूरवरून पावसाच्या जोरदार सरींचा आवाज दोघांनीही टिपला. "पळ शंतनु, पाऊस आला" तन्वी ओरडली. जमेल तितकं आईसक्रीम तोंडात भरून दोघांनी पळ काढला. अर्ध्या वाटेवर दोघांना पावसाने गाठल. एका झाडाचा आसरा घेवून दोघे थांबले. जोरदार पावसाने उरलीसुरली रहदारी थांबवून टाकली होती. आणि तितक्यात वीजहि गेली.

पहाटे चारच्या सुमारास तन्वीला जाग आली. बाजुलाच लहान मुलाप्रमाणे झोपलेल्या शंतनुला पाहून ती स्वतःशीच खुदकन हसली. रात्री पावसाने तास दोन तासभर जोरदार वर्षाव केला होता. आता मात्र आकाश बऱ्यापैकी निरभ्र झाले होते. कृष्णपक्षातील सकाळपर्यंत आकाशात रेंगाळणारा चंद्र तन्वीला खिडकीतून दिसला. अभावितपणे त्याच्या सोबतीला कुठे चांदणी दिसते का ह्याचाच ती शोध घेऊ लागली. आणि तिला चंद्राच्या बाजूलाच एक चांदणी दिसताच तिची कळी अजूनच खुलली. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कसे अचानक आपणासमोर येतात ह्याचेच तन्वीला राहून राहून आश्चर्य वाटत होते.  शंतनू तसा अगदी शिस्तीचा माणूस, त्याच्याकडून रात्री झालेला कलात्मक प्रेमाचा वर्षाव तिला अगदी अनपेक्षित होता.

तन्वी आणि शंतनू ह्यांच्या लग्नाला आताशा सहा महिने होत आले होते. शंतनु दुनियेच्या मापदंडाप्रमाणे अगदी आदर्श नवरा होता. नावाजलेल्या प्रवासी कंपनीत मोठ्या व्यवस्थापकाच्या हुद्द्यावर होता. लग्न झालेली बहिण आणि आई वडील असं सुखी कुटुंब होते. आई वडिलांना पुणे सोडून कोठे जायचे नसल्याने, तन्वी आणि शंतनुचा राजाराणीचा संसार कोल्हापुरात चालू होता. म्हणायला गेलं तर कोल्हापुरात दोघांचेही नातेवाईक होते. लग्नानंतर ह्या दोघांना बोलावण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली होती. तन्वीला ह्या सर्व गोष्टीत खूप मजा वाटे तर शंतनुला कंटाळा येई . शंतनुला नवनवीन पर्यटन ठिकाणे धुंडाळण्यात रस असे. ह्या मुद्द्यावरून कधी कधी दोघांत खटका उडे. परंतु तन्वी समजुतीने घेई. शंतनुसोबत आपणही काहीवेळा भटकण्यास जाऊया अशी मनाची तिने तयारी केली होती. आणि अचानक काल संध्याकाळी शंतनू मुन्नरला जाण्याची बातमी घेऊन आला.

तन्वीचे विचारचक्र असेच चालू होते. अचानक घड्याळाकडे तिचे लक्ष गेले. साडेपाच होऊन गेले होते. तन्वीने पुन्हा एकदा आपल्या राजसाकडे पाहिले. त्याची गाढ निद्रा अजून तशीच होती. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अजूनही कायम होती. हा अजून रात्रीच्या आठवणीतून बाहेर आला नाही वाटत ह्या खट्याळ विचाराने तन्वी अजून हसली.

तन्वीने स्वतःसाठी चहा बनविला. चहाचे घुटके घेत ती गॅलरीत आली. पूर्वेला आता उजाडून येत होते. रात्रीच्या पावसाने सर्वत्र पालापाचोळा विखरून दिला होता. काही फांद्याही मोडल्या होत्या. पक्षांचा मधुर किलबिलाट सुरु होता. मुन्नारला जाण्याबाबत तन्वीने काल रात्री विचारच केला नव्हता. विचार करायला म्हणा वेळच कुठे मिळाला होता तिला! पण आता मात्र तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले होते. तिची वाणिज्य शाखेतील पदवी होती. मुंबई सोडून कोल्हापुरात येतानाच तिला जीवावर आले होते. लवकरच कोठेतरी छोटी नोकरी मिळवावी असा तिचा मानस होता . परंतु शंतनु हे तिचे बोलणं मनावर घेत नव्हता आणि आता हे मुन्नरचे प्रकरण उद्भवल्याने आपली नोकरी आता अजून पुढे ढकलली जाणार ह्याची तिला खात्री झाली होती. ती ह्या विचाराने काहीशी अस्वस्थ होती. तिचे हे विचारचक्र शंतनुच्या अलगद स्पर्शाने खंडित झाले. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं, शंतनूने तिला एक स्मित हास्य दिलं. तन्वीच्या मनात अचानक सकाळच्या भाजीचा विचार आला आणि ती ताडकन उठून स्वयंपाकघरात गेली. शंतनुचा पुरता हिरमोड झाला होता. हिला दोन मिनिट बोलायला काय झालं होत असा विचार करीत तो नकळत आपल्या नाखुशीच्या कोशात शिरला.

बाकी सकाळ मग तशी नेहमीप्रमाणे गेली . सर्व व्यवहार यांत्रिकपणे चालू होते. अंघोळ करताना टॉवेल विसरण्याचे नाटक करण्याचा विचार महत्प्रयासाने शंतनुने परतवून लावला. ऑफिसला निघताना त्याला टाटा करण्यासाठी तन्वी गॅलरीत आली. पण तिने हात उंचावून केलेल्या निरोपाकडे शंतनूने दुर्लक्ष केले.
सकाळ आता बरीच स्थिरावली होती. रात्रीच्या पावसाच आता नामोनिशाण नव्हत. तन्वीने चपाती दुधात बुडवत आईला फोन लावला, शंतनुच्या बदलीची बातमी द्यायला. "काय बाई हे! मुन्नरला बदली? मी सांगते हो तुला, तू इकडे नोकरी पहा मुंबईला. सहा महिन्यात तो परत येईल की नाही ते बघ! ते काही नाही मी आजच गजाननकाकांना संध्याकाळी तुझ्याकडे पाठवते" आईची ही अखंडवाणी सहन न होत तन्वीने फोन ठेवला. ती तशीच किती वेळ रिकामा पेला घेऊन खिडकीतून दिसणाऱ्या एकट्या चिमणीकडे पाहत राहिली ते तिचे तिलाच माहित!

तन्वीची तंद्री शेजारच्या मनीषाच्या बेल वाजविण्याने खंडित झाली. मनीषा सहजच गप्पा मारायला आली होती. तन्वीची एकंदरीत मुद्रा पाहून मनीषाने आपलं बोलणं आवरत घेतलं आणि ती परतली. तन्वीने घड्याळाकडे पाहिलं "अरे बापरे साडेनऊ होत आले, चटकन आवरायला हवं" ती स्वतःशीच म्हणाली. शंतनुला केलेल्या चपत्यातील उरलेल्या दोन मोरंब्यासोबत झटपट खाऊन तिने आपली न्याहारी आटोपली.  ती क्षणभर थांबली. तिने फोनकडे नजर टाकली आणि शंतनुला फोन लावला. तीन चार रिंगनंतर सुद्धा त्याने फोन न उचलल्यामुळे तिने फोन ठेवला. तो बऱ्याच वेळा सकाळी कामात व्यग्र असतो त्यामुळे बहुदा त्याने फोन उचलला नसावा अशी अटकळ तिने बांधली. "पण त्याने मुद्दाम उचलला नसेल तर?" असा विचार मनात आणून द्यायचा तिचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ती अगदी उदास झाली. उदासपणावर सतत कामात राहणे हाच रामबाण उपाय आहे हे बाबांचे बोल तिला आठवले. मग ती नव्या जोमाने कामाला लागली.
इतक्यात बाहेर फोन वाजतो आहे असा भास तिला झाला. ती  धावतच बाहेर गेली. शंतनू फोनवर होता. त्याची कायम असलेली नाराजी स्वरातून डोकावत होती. "ह्या महिनाअखेरीला शिफ्ट व्हावे लागेल" तो म्हणत होता. "आणि हो फोन उचलायला इतका वेळ का लागला?" "मी आंघोळ करतेय" तन्वीच्या ह्या उत्तरावर शंतनु क्षण दोन क्षणभर तो  फोनवर तसाच न बोलता थांबला. "ठीक आहे, ठेवतो मी फोन" असे बोलून त्याने फोन ठेवला होता. दोन प्रौढांच्या  रुसून बसण्याच्या खेळात थोडी रंगत आली होती.

जेवणं आटपून, टीव्ही पाहून तन्वी जरा पहुडली होती की दाराची बेल वाजली. गजाननकाका दारात उभे होते. ते थेट घरात शिरले. आईने त्यांना सर्व इत्यंभूत खबर दिली होती हे स्पष्ट होते. "वसुधा माझ्याशी सविस्तर बोलली, मी तुझ्यासाठी मुंबईत त्वरित नोकरी शोधतो. शंतनुराव काय सहा महिन्याच्यावर तिथे थांबायचे नाहीत" गजाननकाकांच्या बोलण्याकडे तन्वी दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु ते थांबायचे लक्षण दिसेना तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी शंतनूसोबत मुन्नारला जाणार!"
 

Saturday, January 4, 2014

Asian Heart Institute - एक अनुभव


एक छोटंस हृदय असतं, अगदी शुद्ध रक्तपुरवठा करणारं आणि ताणविरहीत! त्याला जोड असते ती एक साध्या भोळ्या मेंदूची. एक बालक ज्याचं मालक आहेत असे हे दोघं गुण्यागोविंदाने नांदत असतात. मग काय होतं, बालक मोठं होतं. त्याचं खेळणं कमी होत, त्याच्या जिभेला तेलकट, मसालेदार पदार्थाची सवय लागते. त्याचा नोकरीव्यवसाय त्याच्यावर तणाव निर्माण करू लागतो. आणि मग ते हृदय तणावाखाली येतं. आणि मग त्यातील मुक्त रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. ही गोष्ट कोण्या एका हृदयाची नव्हे तर आजच्या जगातील बऱ्याच साऱ्या हृदयांची!

एका अगदी जवळच्या नातेवाईकांच्या Asian Heart Institute मध्ये झालेल्या ऑपरेशनच्या निमित्ताने गेले ३ दिवस तिथे जाण्याचा, राहण्याचा योग आला. त्या निमित्ताने संबंधित  माहिती नमूद करण्याच्या हेतूने हा ब्लॉग!

१> पश्चिम उपनगरात राहणाऱ्यांसाठी बांद्रा स्थानकावरून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी शेयर रिक्षा उपलब्ध आहेत. त्या वापरून ह्या इस्पितळात पोहोचणे इष्ट!
२> प्रत्यक्ष ऑपरेशनच्या आधी रुग्णाचे इस्पितळाद्वारे विविध चाचण्या करून परीक्षण केले जाते. ह्यात रक्तातील साखरेची पातळी आणि बाकीच्या तपासण्या केल्या जातात , जेणेकरून रुग्ण इतकी मोठी शस्त्रक्रिया पेलवू शकेल ह्याची खात्री करून घेतली जाते.
३> ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आहे हे नक्कीच! शस्त्रक्रियेच्या कालावधीत काही काळ रुग्णाचे हृदय बाजूला काढून ठेवून त्याला कृत्रिमरित्या रक्तपुरवठा केला जातो. हा विचारच साध्या माणसाच्या  मनात धडकी भरविण्यास कायम असतो. परंतु एक लक्षात असू द्यात. डॉक्टर पांडाच्या नेतृत्वाखाली अतिशय तज्ञ डॉक्टरांची फौज ह्या इस्पितळात आहे. ते अशा बऱ्याच शस्त्रक्रिया दररोज करत असतात. आणि सराव माणसाला परिपूर्ण बनवितो त्याप्रमाणे त्यांनीही ह्या शस्त्रक्रियेत बरीच कुशलता प्राप्त केली आहे.
४>  मला वैद्यकीय क्षेत्रातील संकल्पना, संज्ञा ह्याविषयी अगदी मुलभूत ज्ञान सुद्धा नसल्याने त्यात शिरण्याचे धाडस मी करणार नाही. त्यामुळे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये अडथळे निर्माण (ब्लॉक्स) निर्माण झाल्याचं चाचणीत माहीत पडल्यास बायपास किंवा अंजिओप्लास्टी असे दोन पर्याय आपणासमोर ठेवण्यात येतात. अडथळे जर जास्तच दाट असतील अथवा संख्येने जास्त असतील तर बायपास ह्या पर्यायाची निवड केली जाते.
५> ह्या शस्त्रक्रियेचा खर्च पाच सहा लाखापासून सुरु होत असल्याने तुमच्याकडे योग्य विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. आता भारतातील कितीजणांना हा खर्च, हे विमा संरक्षण घेणे परवडू शकते हा वेगळा मुद्दा!
६> रुग्णास आदल्या दिवशी सकाळीच दाखल होण्यास सांगण्यात आले. इथे आपण एक खास खोली आरक्षित करू शकत असल्याने रुग्णाचा जवळचा नातेवाईक त्याच्यासोबत राहू शकतो. आदल्या दिवशी रात्री दहा वाजता दुसऱ्या दिवशी होणार्या शस्त्रक्रियेची वेळ सांगण्यात आली. त्यामुळे बाकीच्या नातेवाईकांना त्यानुसार आपण किती वाजता हजर राहावे ह्याची कल्पना आली.
७> शस्त्रक्रियेच्या दिवशी सकाळी साडेपाचच्या सुमारास शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या प्राथमिक पायऱ्यांना सुरुवात  करण्यात आली. आम्ही पावणेआठ वाजता तिथे पोहोचलो. त्यावेळी शस्त्रक्रिया खोलीत नेण्याची वेळ झाली होती. हा क्षण नक्कीच भावनाविवश करणारा होता. पहिल्या मजल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेश (Counselling) करण्याचा कक्ष आहे. तिथे काही मोजक्या वेळा नातेवाईकांना शस्त्रक्रियेच्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते. आम्हांला पहिला अपडेट ११ वाजता असल्याने आम्ही तळमजल्यावरील भव्य प्रतीक्षाकक्षात बसणे पसंत केले. येथील उपहारगृह चांगले, स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार देणारे आहे. तिथे आम्ही उपमा, इडली असा नास्ता घेतला.
८> मुंबईत हल्ली सर्वात जास्त कमतरता असेल ती मनुष्यबळाची! प्रत्येकजण आपल्या कामात इतका व्यग्र असतो की आपल्याला दुसऱ्यासाठी वेळच काढता येत नाही. परंतु अशा प्रसंगी धीर देणाऱ्या माणसांची आवश्यकता असते. बाहेर वाट पाहणाऱ्या लोकांत आमच्यासोबत दोन डॉक्टरसुद्धा असल्याने आम्हांला नक्कीच बरे वाटत होते. ११ वाजताच्या पहिला अपडेटच्या वेळी आम्हांला सांगण्यात आलं की graft (पर्यायी शब्द कलम?) करण्यासाठी LIMAची निवड करण्यात आली आहे आणि त्या तयार आहेत. आता ज्यात अडथळे निर्माण झाले आहेत ती वाहिनी बदलून तिथे पर्यायी वाहिनी बसविण्यासाठी LIMA, RIMA किंवा मग हातापायातील चांगल्या वाहिन्या ह्यापैकी एकाची निवड करण्यात येते. LIMA आणि RIMA ह्यांची निवड करणे पसंद केले जात असावे कारण जास्तीचे टाके वाचतात. मी अज्ञानात काही जास्त किंवा चुकीचे लिहून गेलो असेल तर माफ करा!
९> डॉक्टर पांडा हे GRAFTING  च्या वेळी जातीने हजर राहत असावे असा आमचा कयास! ते रात्री दोन अडीच वाजेपर्यंत इस्पितळातच असतात.
१०> दुसरा अपडेट साडेचारच्या सुमारास मिळाला. त्यावेळी सुद्धा फारशी काही प्रगती झाली नव्हती. एकाच वेळी त्यादिवशी तीन शस्त्रक्रिया चालू होत्या. बहुदा पहिला अपडेट अधिक प्रगती दाखवून गेला  असावा. ह्या
 शस्त्रक्रियेत एकूण ५ GRAFTS होते. आमच्यातील डॉक्टरच्या अंदाजानुसार हे काम पहिल्या अपडेटनंतर तीन तासात व्हायला हवं होत. त्यामुळे आम्ही काहीसे चिंतीत झाले होतो. आम्हीं पुन्हा आठ वाजता समुपदेश कक्षात गेलो. रात्री नऊ वाजले तरी अपडेट येत नव्हता. शेवटी एकदाचा फोन खणखणला! "अभिनंदन, तुमच्या नातेवाईकाचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे", इस्पितळाचा ऑपरेटर उद्गारला! आणि आम्हां सर्वांचा जीव भांड्यात पडला. अजून शस्त्रक्रियेच्या शेवटच्या कलोझिंग स्टेप्स चालू होत्या. आम्हांला त्यांना भेटण्यासाठी एक तासांनी परवानगी देण्यात होती. आता जेवण घेण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. सैंडविचवर आम्ही भूक भागविली. एक तासांनी ते शुद्धीवर आले होते पण त्यांना बोलता येत नव्हते. त्यांना थंडी वाजत होती आणि ते कुडकुडत होते. "थंडी वाजतेय का?" ह्या प्रश्नाला त्यांनी मानेनेच होकारार्थी उत्तर दिले. त्या रात्री माझा भाऊ मुक्कामाला थांबला. त्याला रात्री दोन वेळा डॉक्टरांनी एकंदरीत शस्त्रक्रिया कशी झाली आणि पुढे काय काळजी घ्यायला हवी ह्याविषयी समुपदेशन केलं.
११> ह्या शस्त्रक्रियेनंतर एकंदरीत ३ -४ दिवस अतिदक्षता विभागात राहावं लागतं. त्यावेळी आपल्याला ह्या विभागाचा पास मिळतो, ज्याद्वारे आपण रुग्णास सकाळी दहा ते संध्याकाळी सात ह्या वेळात १० - १०  मिनिटासाठी  तीन वेळा भेटू शकतो. पहिल्या मजल्यावर नातेवाईकांसाठी झोपण्याची प्राथमिक सोय (सोफा, उशी, ब्लॅंकेट) आहे. एका icu खोलीसाठी इथला एक बेड (सोफा!) मिळतो. काल रात्री माझी पाळी होती. मीना प्रभूंचे  'दक्षिणायन' घेऊन मी दाखल झालो होतो. रात्री वरणभात, दोन चपात्या, सोयाबीन आणि अजून एक कमी मिठाची भाजी असा सात्विक आहार घेऊन मी सोफ्यावर झोपण्यास दाखल झालो. रात्री साडेनऊ वाजताच सर्व जण अंधार करून बिछान्यावर पहुडल्याने रात्री चांगली झोप मिळण्याच्या माझ्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पाच मिनिटातच वस्तुस्थितीची जाणीव मला झाली. दोन पार्टिशनच्या पलीकडे दोन बेनची कुजबुज  चालू होती. दोघांतिघांचे भ्रमणध्वनी अधूनमधून खणखणत होते. त्यांना silent mode वर ठेवण्याची अथवा फोनवर हळू बोलण्याची तसदी घेतली जात नव्हती. सार्वजनिक ठिकाणी जनतेला ज्ञान देण्याचा अयशस्वी  प्रयत्न करणं मी हल्ली सोडून दिलंय. ११ वाजेस्तोवर हे सर्वजण थोडेफार शांत झाले असे वाटले आणि मी निद्राधीन होऊ लागलो. आणि मग ज्याची भीती होती ती गोष्ट झाली. इतक्या सगळ्या थकल्या जीवातील दोघेजण अगदी लयबद्ध घोरू लागले. त्यातील एक तर माझ्या अगदी बाजूला होता! सार्वजनिक ठिकाणी घोरू नये असा कायदा जगभर अंमलात आणावा असा विचार मनात येवून गेला. पण मी फारसं काही टेन्शन घेतलं नाही. बारा ते चार ह्या वेळात ह्या लयबद्ध संगीतावर झोप लागली. पण एकदा चारला जाग आल्यावर मात्र पुन्हा झोप येईना. ब्रश करून पाच वाजता चहा प्यालो. प्रतीक्षाकक्षातील टीव्ही चालू करून देण्याची माझी विनंती धूडकावून देण्यात आली. पण समुपदेशन कक्षात मला यश मिळाले. इंग्लंड अगदीच ढेपाळले होते आणि ५ बाद पंचवीस अशी स्थिती होती. सकाळी आठ वाजता विजयभाई आल्यावर मी इस्पितळाचा निरोप घेतला.