एक छोटंस हृदय असतं, अगदी शुद्ध रक्तपुरवठा करणारं आणि ताणविरहीत! त्याला जोड असते ती एक साध्या भोळ्या मेंदूची. एक बालक ज्याचं मालक आहेत असे हे दोघं गुण्यागोविंदाने नांदत असतात. मग काय होतं, बालक मोठं होतं. त्याचं खेळणं कमी होत, त्याच्या जिभेला तेलकट, मसालेदार पदार्थाची सवय लागते. त्याचा नोकरीव्यवसाय त्याच्यावर तणाव निर्माण करू लागतो. आणि मग ते हृदय तणावाखाली येतं. आणि मग त्यातील मुक्त रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. ही गोष्ट कोण्या एका हृदयाची नव्हे तर आजच्या जगातील बऱ्याच साऱ्या हृदयांची!
एका अगदी जवळच्या नातेवाईकांच्या Asian Heart Institute मध्ये झालेल्या ऑपरेशनच्या निमित्ताने गेले ३ दिवस तिथे जाण्याचा, राहण्याचा योग आला. त्या निमित्ताने संबंधित माहिती नमूद करण्याच्या हेतूने हा ब्लॉग!
१> पश्चिम उपनगरात राहणाऱ्यांसाठी बांद्रा स्थानकावरून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी शेयर रिक्षा उपलब्ध आहेत. त्या वापरून ह्या इस्पितळात पोहोचणे इष्ट!
२> प्रत्यक्ष ऑपरेशनच्या आधी रुग्णाचे इस्पितळाद्वारे विविध चाचण्या करून परीक्षण केले जाते. ह्यात रक्तातील साखरेची पातळी आणि बाकीच्या तपासण्या केल्या जातात , जेणेकरून रुग्ण इतकी मोठी शस्त्रक्रिया पेलवू शकेल ह्याची खात्री करून घेतली जाते.
३> ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आहे हे नक्कीच! शस्त्रक्रियेच्या कालावधीत काही काळ रुग्णाचे हृदय बाजूला काढून ठेवून त्याला कृत्रिमरित्या रक्तपुरवठा केला जातो. हा विचारच साध्या माणसाच्या मनात धडकी भरविण्यास कायम असतो. परंतु एक लक्षात असू द्यात. डॉक्टर पांडाच्या नेतृत्वाखाली अतिशय तज्ञ डॉक्टरांची फौज ह्या इस्पितळात आहे. ते अशा बऱ्याच शस्त्रक्रिया दररोज करत असतात. आणि सराव माणसाला परिपूर्ण बनवितो त्याप्रमाणे त्यांनीही ह्या शस्त्रक्रियेत बरीच कुशलता प्राप्त केली आहे.
४> मला वैद्यकीय क्षेत्रातील संकल्पना, संज्ञा ह्याविषयी अगदी मुलभूत ज्ञान सुद्धा नसल्याने त्यात शिरण्याचे धाडस मी करणार नाही. त्यामुळे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये अडथळे निर्माण (ब्लॉक्स) निर्माण झाल्याचं चाचणीत माहीत पडल्यास बायपास किंवा अंजिओप्लास्टी असे दोन पर्याय आपणासमोर ठेवण्यात येतात. अडथळे जर जास्तच दाट असतील अथवा संख्येने जास्त असतील तर बायपास ह्या पर्यायाची निवड केली जाते.
५> ह्या शस्त्रक्रियेचा खर्च पाच सहा लाखापासून सुरु होत असल्याने तुमच्याकडे योग्य विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. आता भारतातील कितीजणांना हा खर्च, हे विमा संरक्षण घेणे परवडू शकते हा वेगळा मुद्दा!
६> रुग्णास आदल्या दिवशी सकाळीच दाखल होण्यास सांगण्यात आले. इथे आपण एक खास खोली आरक्षित करू शकत असल्याने रुग्णाचा जवळचा नातेवाईक त्याच्यासोबत राहू शकतो. आदल्या दिवशी रात्री दहा वाजता दुसऱ्या दिवशी होणार्या शस्त्रक्रियेची वेळ सांगण्यात आली. त्यामुळे बाकीच्या नातेवाईकांना त्यानुसार आपण किती वाजता हजर राहावे ह्याची कल्पना आली.
७> शस्त्रक्रियेच्या दिवशी सकाळी साडेपाचच्या सुमारास शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या प्राथमिक पायऱ्यांना सुरुवात करण्यात आली. आम्ही पावणेआठ वाजता तिथे पोहोचलो. त्यावेळी शस्त्रक्रिया खोलीत नेण्याची वेळ झाली होती. हा क्षण नक्कीच भावनाविवश करणारा होता. पहिल्या मजल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेश (Counselling) करण्याचा कक्ष आहे. तिथे काही मोजक्या वेळा नातेवाईकांना शस्त्रक्रियेच्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते. आम्हांला पहिला अपडेट ११ वाजता असल्याने आम्ही तळमजल्यावरील भव्य प्रतीक्षाकक्षात बसणे पसंत केले. येथील उपहारगृह चांगले, स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार देणारे आहे. तिथे आम्ही उपमा, इडली असा नास्ता घेतला.
८> मुंबईत हल्ली सर्वात जास्त कमतरता असेल ती मनुष्यबळाची! प्रत्येकजण आपल्या कामात इतका व्यग्र असतो की आपल्याला दुसऱ्यासाठी वेळच काढता येत नाही. परंतु अशा प्रसंगी धीर देणाऱ्या माणसांची आवश्यकता असते. बाहेर वाट पाहणाऱ्या लोकांत आमच्यासोबत दोन डॉक्टरसुद्धा असल्याने आम्हांला नक्कीच बरे वाटत होते. ११ वाजताच्या पहिला अपडेटच्या वेळी आम्हांला सांगण्यात आलं की graft (पर्यायी शब्द कलम?) करण्यासाठी LIMAची निवड करण्यात आली आहे आणि त्या तयार आहेत. आता ज्यात अडथळे निर्माण झाले आहेत ती वाहिनी बदलून तिथे पर्यायी वाहिनी बसविण्यासाठी LIMA, RIMA किंवा मग हातापायातील चांगल्या वाहिन्या ह्यापैकी एकाची निवड करण्यात येते. LIMA आणि RIMA ह्यांची निवड करणे पसंद केले जात असावे कारण जास्तीचे टाके वाचतात. मी अज्ञानात काही जास्त किंवा चुकीचे लिहून गेलो असेल तर माफ करा!
९> डॉक्टर पांडा हे GRAFTING च्या वेळी जातीने हजर राहत असावे असा आमचा कयास! ते रात्री दोन अडीच वाजेपर्यंत इस्पितळातच असतात.
१०> दुसरा अपडेट साडेचारच्या सुमारास मिळाला. त्यावेळी सुद्धा फारशी काही प्रगती झाली नव्हती. एकाच वेळी त्यादिवशी तीन शस्त्रक्रिया चालू होत्या. बहुदा पहिला अपडेट अधिक प्रगती दाखवून गेला असावा. ह्या
शस्त्रक्रियेत एकूण ५ GRAFTS होते. आमच्यातील डॉक्टरच्या अंदाजानुसार हे काम पहिल्या अपडेटनंतर तीन तासात व्हायला हवं होत. त्यामुळे आम्ही काहीसे चिंतीत झाले होतो. आम्हीं पुन्हा आठ वाजता समुपदेश कक्षात गेलो. रात्री नऊ वाजले तरी अपडेट येत नव्हता. शेवटी एकदाचा फोन खणखणला! "अभिनंदन, तुमच्या नातेवाईकाचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे", इस्पितळाचा ऑपरेटर उद्गारला! आणि आम्हां सर्वांचा जीव भांड्यात पडला. अजून शस्त्रक्रियेच्या शेवटच्या कलोझिंग स्टेप्स चालू होत्या. आम्हांला त्यांना भेटण्यासाठी एक तासांनी परवानगी देण्यात होती. आता जेवण घेण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. सैंडविचवर आम्ही भूक भागविली. एक तासांनी ते शुद्धीवर आले होते पण त्यांना बोलता येत नव्हते. त्यांना थंडी वाजत होती आणि ते कुडकुडत होते. "थंडी वाजतेय का?" ह्या प्रश्नाला त्यांनी मानेनेच होकारार्थी उत्तर दिले. त्या रात्री माझा भाऊ मुक्कामाला थांबला. त्याला रात्री दोन वेळा डॉक्टरांनी एकंदरीत शस्त्रक्रिया कशी झाली आणि पुढे काय काळजी घ्यायला हवी ह्याविषयी समुपदेशन केलं.
११> ह्या शस्त्रक्रियेनंतर एकंदरीत ३ -४ दिवस अतिदक्षता विभागात राहावं लागतं. त्यावेळी आपल्याला ह्या विभागाचा पास मिळतो, ज्याद्वारे आपण रुग्णास सकाळी दहा ते संध्याकाळी सात ह्या वेळात १० - १० मिनिटासाठी तीन वेळा भेटू शकतो. पहिल्या मजल्यावर नातेवाईकांसाठी झोपण्याची प्राथमिक सोय (सोफा, उशी, ब्लॅंकेट) आहे. एका icu खोलीसाठी इथला एक बेड (सोफा!) मिळतो. काल रात्री माझी पाळी होती. मीना प्रभूंचे 'दक्षिणायन' घेऊन मी दाखल झालो होतो. रात्री वरणभात, दोन चपात्या, सोयाबीन आणि अजून एक कमी मिठाची भाजी असा सात्विक आहार घेऊन मी सोफ्यावर झोपण्यास दाखल झालो. रात्री साडेनऊ वाजताच सर्व जण अंधार करून बिछान्यावर पहुडल्याने रात्री चांगली झोप मिळण्याच्या माझ्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पाच मिनिटातच वस्तुस्थितीची जाणीव मला झाली. दोन पार्टिशनच्या पलीकडे दोन बेनची कुजबुज चालू होती. दोघांतिघांचे भ्रमणध्वनी अधूनमधून खणखणत होते. त्यांना silent mode वर ठेवण्याची अथवा फोनवर हळू बोलण्याची तसदी घेतली जात नव्हती. सार्वजनिक ठिकाणी जनतेला ज्ञान देण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं मी हल्ली सोडून दिलंय. ११ वाजेस्तोवर हे सर्वजण थोडेफार शांत झाले असे वाटले आणि मी निद्राधीन होऊ लागलो. आणि मग ज्याची भीती होती ती गोष्ट झाली. इतक्या सगळ्या थकल्या जीवातील दोघेजण अगदी लयबद्ध घोरू लागले. त्यातील एक तर माझ्या अगदी बाजूला होता! सार्वजनिक ठिकाणी घोरू नये असा कायदा जगभर अंमलात आणावा असा विचार मनात येवून गेला. पण मी फारसं काही टेन्शन घेतलं नाही. बारा ते चार ह्या वेळात ह्या लयबद्ध संगीतावर झोप लागली. पण एकदा चारला जाग आल्यावर मात्र पुन्हा झोप येईना. ब्रश करून पाच वाजता चहा प्यालो. प्रतीक्षाकक्षातील टीव्ही चालू करून देण्याची माझी विनंती धूडकावून देण्यात आली. पण समुपदेशन कक्षात मला यश मिळाले. इंग्लंड अगदीच ढेपाळले होते आणि ५ बाद पंचवीस अशी स्थिती होती. सकाळी आठ वाजता विजयभाई आल्यावर मी इस्पितळाचा निरोप घेतला.
OPERATION KUNACH HOT TEE SANG???
ReplyDeletepan chhan lihito...!!!1
ReplyDelete