Tuesday, January 14, 2014

जाणता अजाणता - भाग ५


पुन्हा एक अबोल सकाळ! मुन्नारला आल्यावर अबोला सुद्धा मल्याळी भाषेत असतो कि काय असा भास राहून राहून शंतनुला होत होता. झोपेतील तन्वीच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्न मुद्रा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हती. परंतु हा विषय काढायचा कसा हेच त्याला समजत नव्हते. ती झोपेत होती, त्यावेळी नक्की काय चाललं होतं ते तिला विचारून सुद्धा आठवलं नाही म्हणजे? त्याचं एक मन त्याला सांगत होतं. नास्ता स्वादिष्ट होताच पण शंतनुचे लक्ष होते कुठे त्याच्याकडे? "तन्वी, कशी आहेस?" चहाचा कप टीपॉय वर ठेवून तसंच परत जाणाऱ्या तन्वीचा हात पकडून त्याने विचारलं. "काय झालं तुला शंतनू?, मी मजेत आहे!" ह्या वेळेला मात्र चेहऱ्यावर चांगलं हसू आणणं तन्वीला जमलं. "रात्री झोपेत अगदी प्रसन्न दिसत होतीस!" शंतनुच्या ह्या उद्गारावर मात्र तन्वी दचकली. "हो, का! असेल, हे वातावरण ना मला अगदी आवडतेय! मस्त थंडावा आणि धुळीचा लवलेशसुद्धा नाही!" कशीतरी तिने वेळ मारून नेली. शंतनुने मग जास्त ताणून धरलं नाही. उगाचच आपण संशय घेतोय अशी समजूत करून घेऊन तो ऑफिसात निघाला. आता बरंच काम होतं.
शंतनुच्या बोलण्याने तन्वी मनापासून हादरली होती. स्वप्नातील हे विश्व बाहेरच्या दुनियेत म्हणजे शंतनुपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती तर! कोण आहे हा नकुल? माझ्या भावना ओळखतो, मला ऑफिसात कर्तबगारी दाखवायची इच्छा होती ती त्याने राजदरबारात पूर्ण केली, माझ्या सौंदर्याचे शंतनुने कौतुक करावं ही अपूर्ण इच्छा त्याने एका छोट्या भेटीतील मोजक्या वाक्यात पूर्ण केली. माझा उतरलेला मूड त्याने गेल्या दोन रात्री बराच चांगला केला. अगदी तो माझाच भाग बनत चालला आहे. पण मग तो कालच्या भेटीत काहीसा उदास का वाटत होता बरं? एकटाच जाऊन तलावाच्या काठी बसला होता. माझ्यावर चिडला असेल का बरं? पण मी काय केलं त्याला राग येण्यासारखं? तन्वीचे विचारचक्र भरधाव चाललं होतं. आणि मग तिला शंतनुबरोबरची घालवलेली संध्याकाळ आठवली. ती सुद्धा त्या वातावरणात नाही म्हणायला फुलून निघाली होती. "नकुलला त्यामुळे तर राग आला नाही?" ह्या विचाराने मात्र ती अजून चिंताग्रस्त झाली. ऊतू जाणाऱ्या दुधाच्या आवाजाने तिचे हे विचारचक्र भंगले. एकदा स्वयंपाकघरात गेल्यावर मात्र तिला बरीच कामे दिसली आणि नकुलचा विचार काहीसा खंडित झाला.
आंघोळ वगैरे आटोपल्यावर तन्वी शांतपणे पेपर घेऊन बसली होती. दररोज पडणाऱ्या पावसानं हवेत थंडावा आला होता. उघड्या खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक येताच एक मस्त झोप काढावी अशी इच्छा तिच्या मनात आली. आणि ती बिछान्यावर पहुडली. झोप लागतच होती आणि पुन्हा एकदा ते डोंगर आणि घनदाट काळे मेघ दिसू लागले. इतक्यात दाराच्या वाजलेल्या बेलने तन्वी अचानक जागी झाली. शेजारणीने मोलकरणीला कामासाठी विचारायला पाठवलं होतं. तन्वीला भानावर यायला वेळ लागला. मोलकरणीचा महिन्याचा पगार सुवर्णमुद्रेच्या रुपात द्यावा कि काय ह्या विचारावर हसावं की रडावं हे तिला कळेना! मोलकरीणीशी बोलताना भाषेचा अडथळा येत होता. शेवटी मोलकरीण "Five Thousand" असे ठसक्यात म्हणाली. तेव्हा "मी साहेबांशी बोलून सांगते" असे इंग्लिश मध्ये सांगून तन्वीने तिला परत पाठविलं.
आता तन्वी अगदी बेचैन झाली. अगदी दिवसाच्या डुलकीमध्ये सुद्धा नकुल यायला लागला तर? आपल्यावर इतका हक्क का बजावायला बघतोय तो? संध्याकाळी शंतनु आला की त्याला हे सर्व सांगून टाकावं अशा निष्कर्षापर्यंत ती येऊन पोहोचली!

No comments:

Post a Comment