शांत मनी भावना नेहमी दाटून येतात. मनीच्या भावना आपल्याला सुखावतात. वय, सद्यकालीन परिस्थिती ह्याचा विसर पडतो. भावना वर्तमानकाळापासून दूर पळतात. भूतकाळ, भविष्यकाळ ह्यामध्ये हिंदोळे घेतात.
ज्याच्या मनी चांगल्या भावना तो पुरुष थोर जाणावा!
आधुनिक काळ तसा निष्ठुर! भावनांना मनात शांतपणे येऊ देण्यास तो फारशी संधी देत नाही. दिवसाच्या क्षणाक्षणाला गृहीत धरून वेळापत्रक बनविल्यावर होणार काय दुसरं? अशा ह्या आर्थिकप्राप्तीच्या विचाराने व्यापलेल्या युगात काही क्षण येतात जे सुंदर भावनांना मनी व्यापून जाण्याची संधी देतात. हे क्षण सांगून येत नाहीत. ज्यावेळी येतात त्यावेळी हा अलौकिक भावनांचा क्षण आहे हे समजण्यास काही वेळ लागतो आणि ज्या क्षणी हे समजते त्या क्षणी ह्या प्रसंगाला धरून ठेवण्याची धडपड सुरु होते. त्या धडपडीत भावनांना मुक्त प्रकट होण्यास काहीसा अडथळा होतो. अशा क्षणीच्या भावनांचा कधी शब्दाद्वारे व्यक्त केलेला , कधी व्यक्त करायचं राहून गेलेला ठेवा मनी जपून राहावा ही इच्छा प्रत्येकजण मनी बाळगतो!
मनाला कधी फार इच्छा होते. शरीरापासून मुक्त होऊन एका दाट जंगलातील एका शांत, लतिका, पुष्पांनी बहरलेल्या बागेत जावं. जंगलात शांत बाग कोठून येणार असा विचार जयाच्या मनी आला तो नर अरसिक जाणावा! अशा ह्या शांत बागेतील एखाद्या उंच वृक्षावर बसून शरीराचे ओझे न बाळगावे लागल्याचा आनंद साजरा करीत झोके घ्यावेत. दूर वर पसरलेल्या गगनाचा व्याप मोजण्याचा ध्यास बाळगावा! पर्वतांची उंची मोजण्याची इच्छा मनी बाळगावी! आकाशगंगेतील एखाद्या ग्रहावर साम्राज्य गाजविण्याची मनीषा धरावी! हवेत मुक्त विहार करणाऱ्या पवनाशी, पक्षांशी स्पर्धा करावी. फुलांचा नैसर्गिक सुगंध आयुष्यभरासाठी जवळ बाळगावा! दूरवर झाडीत विसावणाऱ्या वनराजाच्या सामर्थ्याशी प्रतिकार करण्याचा मानस धरावा! एक एक दाणा वाहून नेणाऱ्या मुंगीच्या चिकाटीची आस धरावी! मनीच्या सर्व सुंदर भावनांना मुक्तपणे बागडू द्यावे. त्याचा महोत्सव करावा!
Aditya pls keep your cool dude....
ReplyDelete