तन्वीने आणलेले पोहे नेहमीइतके किंबहुना त्याहून अधिकच चविष्ट होते. पण शंतनुचे त्याकडे लक्षच नव्हते. तिच्या शांतपणात काहीसा वेगळेपणा आहे असेच त्याला राहून राहून वाटत होते. खुशीत असल्यावर नेहमी त्याच्या अवतीभोवती घुटमळणारी तन्वी आज त्याला टाळत होती असाच भास त्याला होत होता. त्यावर तो तसाच बराच वेळ विचार करीत बसला असता पण पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. अपेक्षेनुसार बॉसच फोनवर होता. "अधिकारीमंडळी येतच असतील अर्ध्या तासात, शंतनु लवकर ऑफिसात पोहोचतोयस ना!" त्याचे हे शब्द ऐकून शंतनु ताडकन उठला. "येतो मी!" निघताना तो तन्वीला म्हणाला. "गुड लक" तन्वी पुढे येत म्हणाली. कुठे तरी काही तरी बदलल्यासारखे त्याला राहून राहून वाटत होते.
शंतनु ऑफिसात निघाल्यावर तन्वीला हायसं वाटलं. तिला रात्रीच्या प्रकाराविषयी शांतपणे विचार करायचा होता. मनात एक छोटीशी खुशीची लहर जरी उमटून गेली असली तरी बेचैनीसुद्धा निर्माण झाली होती. नकुलचा देखणेपणा तिला राहून राहून मोहवीत होता. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने स्वतःला कामात झोकून द्यायचं ठरविलं. त्या छोट्याशा घराला तिनं झाडून पुसून काढलं. नवीन सामान आणल्यावर ते कुठं लावायचं ह्याचाही विचार करून पाहिला. एका कोपऱ्यात जुनी फिल्मी मासिकं पडली होती. त्यातील हृतिकचा फोटो पाहून ती पुन्हा सैरभैर झाली. इतक्यात तिचा फोन वाजला. "अग आमचं प्रपोजल बँकेने स्वीकारलं! त्यांना बऱ्याच शंका होत्या पण त्या सर्वांचं निरसन केलं. बॉस तर भन्नाट खुश झालाय माझ्यावर!" शंतनु झपाटल्यागत बोलत होता. "आज संध्याकाळी मी लवकर येतो, आपण बाहेर जेवायला जाऊयात!"इतकं बोलून त्यानं फोन ठेवला. तन्वीलाही बरं वाटलं. "ह्याचा इथं चांगला जम बसू दे, माझ्या इथे येण्याचं सार्थक होईल!" तिच्या मनात विचार येऊन गेला.
रात्री बाहेर जायच्या बेतानं मात्र जादू केली होती. तन्वीने दुपारचं जेवण आटपून घेतलं. रात्रीची पावभाजी गरम करून खाताना रात्रीच्या निराशेचा विचार मात्र तिने मनाला शिवून दिला नाही. दुपारी झोपायचा विचार येताच तिच्या मनात का कोणास ठाऊक खळबळ निर्माण झाली. आपण झोपुयाच नको असे ठरवून तिने टीव्ही सुरु केला. कोणत्यातरी जुन्या सौंदर्यस्पर्धेचे पुनर्प्रक्षेपण सुरु होते. त्यातील त्या सौंदर्यवती ललना पाहून तिच्या मनात एक विचार आला आणि त्या खुशीत असताना कधीशी तिला डुलकी लागली हे तिचे तिलाच कळलं नाही. जागं झाल्यावर दुपारची झोप विशेष काही न घडता गेली ह्याचं तिला बरं वाटलं.
मग मात्र ती नव्या उत्साहाने तयारीला लागली. शैम्पूने केस धुवून नवीन केशरचना केली. कोचीहून घेतलेली ठेवणीतील कांजीवरम साडीही काढली. बऱ्याच दिवसात आपण स्वतःकडे लक्षच दिलं नाही हे तिला जाणवलं. आणि लग्नाआधी आपल्या सौंदर्याची मनापासून स्तुती करणाऱ्या शंतनुने सुद्धा गेल्या काही दिवसात आपल्याला काही बोललं नाही ही खंत तिच्या मनाला स्पर्शून गेली. थोड्याच वेळात स्वतःला सावरून तिने आपली तयारी पूर्ण केली.
शंतनु आला तो खुशीच्या घोड्यावर स्वार होऊनच! "आपण कसं त्या अधिकारी मंडळीच्या शंकाचे समाधान केले, बॉस मध्येच काही चुकीचं बोलणार होता आणि मी कसं त्याला सावरलं" ह्याचं वर्णन करण्यातच त्याचं पूर्ण लक्ष होतं. तन्वीने दिलेला चहा घेता घेता तो म्हणाला, "चल आता आपण निघूयात". त्याच्यासाठी सजलेल्या तन्वीने अजून रात्र बाकी आहे अशी समजूत करून घेतली. तरीही कांजीवरम त्याच्या नजरेत भरायलाच हवी होती हे मात्र तिला ठामपणे वाटलं.
बॉसने शंतनुसाठी ड्रायव्हर सकट गाडी पाठवली होती. ड्रायव्हर तसा जाणकार होता. पाण्याने ओथंबून भरलेल्या काळ्या मेघांच्या अस्तित्वानं सायंकाळच्या वेळी खुलून उठणारं मुन्नारच्या हिरव्यागार वैभवाचे दर्शन देणारे काही बहुसंख्य लोकांना फारसे परिचित नसणारी ठिकाणही त्याला माहित होती. तिथे गेल्यावर मात्र शंतनूच्या डोक्यातील बॉस आणि पॉवरपॉइंटचे भूत निघाल. आणि एकदा ढगांचा जोरदार गडगडाट झाल्यावर त्यानं तन्वीला जवळही ओढून घेतलं, तेव्हा मात्र तिचे रोमरोम शहारून गेले. रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी वरच्या भागातील पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे ठरविलं. तेथील मेणबत्तीच्या प्रकाशातील जेवण तर तन्वीला स्वर्गसुखाची जाणीव करून गेलं. परतीच्या प्रवासात पावसाचं आगमन झालं. विजांच्या गडगडाटाने भयभीत झालेली तन्वी शंतनुला मागच्या सीटवर बिलगली. कारमध्ये तिने दिलेली गाण्यांची सीडी चालू होती आणि "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे चालू होतं. शंतनुचे हे शृंगारिक रूप रात्री बराच वेळ टिकलं होत. केव्हा तरी दमून तो झोपी गेला. ह्याहून जीवनात तृप्तता म्हणजे अधिक काय असा विचार तन्वी करीत होती. अचानक कांजीवरम कडे तिचे लक्ष गेलं आणि ती अचानक बेचैन झाली. शंतनुने इतक्या वेळात एकदाही कांजीवरमचे सोडा तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले नव्हते. कौतुक करून घ्यायची तिची इच्छा अतृप्त राहिली होती. एका अप्रतिम परिपूर्ण संध्याकाळला गालबोट लागून गेलं होतं.
तन्वीला बऱ्याच वेळ झोप लागत नव्हती. नकुलच्या विचाराने हुरहूर तर जाणवत होतीच. मग केव्हातरी तिला झोप लागली.
राजदरबार भरला होता. महाराज सर्वांकडून कारभाराची इत्यंभूत माहिती घेत होते. तन्वीची नजर मात्र नकुलला शोधत होती. इतक्यात "खजिनदार - राजकोशाची स्थिती कशी आहे?" महाराजांचे गंभीर स्वर तिच्या कानी पडले. काहीशा अपराधी मुद्रेने तिने झटपट आर्थिक स्थितीचे विवेचन सादर केलं. त्यानंतर तिला राजदरबाराच्या कारभारात रस राहिला नव्हता. तो केव्हाचा संपेल ह्याचीच ती वाट पाहत होती. एकदाचा राजदरबार संपला. नकुल कोठेच दिसला नव्हता. ती तशीच त्याच्या शोधार्थ घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडली. काल नकुल जिथे भेटला होता तिथे ती पोहोचली. एका तलावाच्या काठी एकट्याच बसलेल्या पाठमोऱ्या नकुलला तिने झटकन ओळखलं. त्याचा मानेवर विसावणारा कुरळा केशसंभार तिला खूपच मोहक वाटून गेला.
मोहित होऊन ती त्याचे ते रूप आपल्या नजरेत साठवायचा प्रयत्न करीत असताना नकुलला तिची चाहूल लागली. मागे वळून त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मुद्रेवर स्मितहास्य आलं. पण त्याच्या नजरेतील दुःखी भाव मात्र तन्वीने बरोबर टिपले. बराच काळ दोघंही काही बोलली नाहीत. "आपण इतका काळ कुठं होतात ?" नकुलने विचारलं. तन्वीला ह्या प्रश्नाचा उलगडा झाला नाही. आकाशात मावळतीच्या सूर्याची तांबडी प्रभा पसरली होती. तिने तन्वीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. "आज आपले सौंदर्य आणि आपली वेशभूषा खूपच खुलून दिसत आहेत!" नकुल म्हणाला आणि मग शांतपणे उठून तो आपल्या निवासस्थानाकडे चालू लागला. आपल्या वेषभूषेकडे लक्ष गेल्यावर तन्वी दचकलीच. कांजीवरम खरोखरच त्या संधीप्रकाशात खुलून दिसत होती" आपल्या रूपाच्या कौतुकाने तन्वी अगदी बहरून गेली होती.
शंतनुला मध्येच जाग आली होती. घोटभर पाणी पिऊन झोपी जाणार तितक्यात त्याची नजर तन्वीच्या चेहऱ्याकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर अधीरपणा दिसत होता. त्याला आश्चर्य वाटलं पण असेल असेच काही असे म्हणून तो पुन्हा झोपी गेला. पण पुन्हा एकदा त्याच्या मनात तोच विचार आला. मग त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तन्वी अगदी लज्जेने खूष झाली होती. शंतनू आता मात्र चकित झाला होता. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. आता मात्र तन्वी अगदी समाधानाने गाढ झोपी गेली होती. अगदी आकाशीचा चंद्र मागण्याचा हट्ट धरलेल्या बालकाच्या हाती खरोखर तो चंद्र हाती लागल्यावर त्याला जितकं समाधान होईल तितकं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शंतनुची झोप मात्र पूर्ण उडाली होती!
No comments:
Post a Comment