Thursday, January 16, 2014

जाणता अजाणता - भाग ६


सायंकाळी निसर्गाने वेगळंच रूप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाने बिचारे वृक्षवल्ली भयभीत झाले होते. वारा जसं नाचवेल तसं नाचण्याव्यतिरिक्त त्यांना पर्यायच नव्हता. तन्वी सुद्धा काहीशी भयभीत झाली होती. ह्या अनोळखी प्रदेशात अशा वातावरणात एकट राहायची तिला जशी भिती वाटत होती त्याचप्रमाणे तिचं मन शंतनुच्या काळजीनेही व्याकुळ झालं होतं. हा बिचारा ह्या वातावरणात कसा येईल? काळ्या मेघांनी व्यापलेल्या आकाशामुळे नेहमीपेक्षा लवकरच अंधार झाला होता. तन्वी अचानक भानावर आली. तिने देवघरात जाऊन दिवा लावला. आणि पुन्हा खिडकीत येऊन बसली. दुरूनच तिला एक तरुण रेनकोट घालून जोरात पळत येताना दिसला. आपल्या विचारातच मग्न असलेली तन्वी त्याच्या पळण्याकडे  पाहत होती. तो तरुण तिच्याच घराकडे जेव्हा आला तेव्हा ती अचानक दचकली. जरा निरखून पाहिल्यावर मात्र तिला कळलं "अरे हा तर शंतनु आहे!" लगबगीने ती दाराकडे गेली. शंतनु अगदी ओलाचिंब होऊन तिच्यासमोर होता. तन्वीला त्याचं ओलाचिंब रूप खूप भावलं, क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. "अग पाहत काय बसली? लवकर माझी बॅग घे आणि मला एक कोरडा टॉवेल आणून दे"! शंतनुच्या ह्या ओरडण्याने तन्वी भानावर आली.
मग मात्र तन्वीने शंतनुची चांगलीच काळजी घेतली. बाथरूममध्ये लगेच गरम पाणी चालू केले. त्याची काही कागदपत्रे प्लास्टिकच्या  बॅगेतून सुद्धा थोडीशी भिजली होती. ती तिने सुकवायला घेतली. नशिबाने त्यात काही महत्वाचे कागदपत्र नव्हते. शंतनु आंघोळ करून परत येईपर्यंत गरमागरम चहा आणि त्याचे आवडते नुडल्स तयार होते. वाफाळते नुडल्स पाहून शंतनुने तशीच तिथे धाव घेतली. "थांब, शंतनु, केस जरा नीट पुसू दे, मला!" तन्वी काहीशी किंचाळलीच! शंतनुला तिची चिंताग्रस्त मुद्रा आवडून गेली. नुडल्सची प्लेट हातात घेत त्याने तिला केस पुसून दिले. त्याला तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. केस बऱ्यापैकी सुकले हे जाणवल्यावर तन्वीच्या डोक्यात अजून एक किडा वळवळला. "एक मिनिटं" असे म्हणून तिने शंतनुकडून आपली सुटका करून घेतली. खरोखर एका मिनिटात परत आलेल्या तन्वीला पाहून खुशीत आलेल्या शंतनूची ख़ुशी क्षणभरच टिकली.  त्याच्या छातीला लावल्या गेलेल्या बामच्या उग्र वासाने "तन्वी" असे जोरात ओरडून त्याने तिला दूर लोटलं. नुडल्सची प्लेट बाजूला सारून त्याने एका हातानं बामचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न केला. आपलं हे रूप तन्वी कौतुकाने पाहतेय हे पाहून मात्र त्याचा राग बराच निवळला.
मध्येच केव्हातरी वीजपुरवठा खंडित झाला. मेणबत्तीच्या प्रकाशात खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या सोबतीने तन्वी आणि शंतनु एक अविस्मरणीय जेवण घेत होते. हे वातावरण एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या वातावरणाच्या तोडीचे आहे आणि तन्वीने केलेली कांदा भजी तिथल्या कोणत्याही स्टार्टरला लाजवेल असेच शंतनुला राहून राहून वाटत होते.
रात्र बहरत होती. तन्वी अगदी खुशीत आली होती. दिवसाच्या भितीचा कोठेच मागमूस नव्हता. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून शंतनु झोपी गेला. "बिचारा दमला असेल", आपल्या ह्या विचाराने तन्वी स्वतःशीच खुदकन हसली. "लबाड कुठली" असा विचार तिच्या मनात आला. "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणं मनातल्या मनात गुणगुणताना असाच कधीतरी तिचा डोळा लागला.
तिथलं वातावरण अगदी भीतीदायक होतं. अक्राळविक्राळ राक्षससदृश्य सैनिकांनी तन्वीला घेरलं होतं. तन्वी त्यांच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु ह्यांच्या तावडीतून सुटणं कठीण आहे हे लक्षात येऊन ती हताश होऊन खाली बसली. तिची नजर पलीकडे गेली. सर्वत्र असाच गोंधळ चालू होता. राजाचे काही सैनिक ह्या आक्रमणाला तोंड द्यायचा प्रयत्न करीत होते. परंतु एकंदरीत परीस्थिती कठीण दिसत होती. अचानक तिची नजर एका शूर योद्ध्याकडे गेली. त्याने शत्रूसैनिकांचा बिमोड करायला लावला होता. तन्वीने तशाही परिस्थितीत त्याला ओळखले. "नकुल" तिने त्याला हाक मारली. नकुलने तिच्याकडे वळून पाहिलेसुद्धा, एक क्षणभर थांबला देखील तो! पण मग मात्र तो तसाच पुढे गेला, शत्रूच्या घोळक्यात अडकलेल्या एका सरदाराची सुटका करायला! "नकुल, मला वाचव, नकुल!" तन्वी जोरात ओरडली.
तन्वीच्या ह्या हाकेने शंतनु खडबडून जागा झाला. "तन्वी, काय झालं? ठीक आहेस ना? आणि हा नकुल कोण?" शंतनु विचारत होता. तन्वी आता भानावर आली होती. "हा नकुल कोण" हे शंतनुचे शेवटचे शब्द तिच्या कानी पडले. इतके दिवसाचं हे रहस्य आता उघड करणं भाग होतं. "मला एक ग्लास पाणी आणशील, शंतनु!" तन्वीची ही विनंती शंतनुने मान्य केली. ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन तन्वीने ग्लास बाजूला ठेवला. एक क्षणभर  उसंत घेतली.
पुढे बराच वेळ तन्वी शंतनुला तिच्या आयुष्यातील हा विश्वास न बसण्याजोगी कहाणी शंतनुला सांगत होती. शंतनु हादरला होता. शंतनुच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याचा तन्वी आटोकाट प्रयत्न करीत होती. आपल्या मनात नकुलविषयी निर्माण झालेली भावना मात्र न सांगण्याची दक्षता तिने घेतली होती. परंतु तिच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाचा भाव आणि त्या दिवशी तिचे झोपेतील लाजणे ह्या सर्वांची संगती लावण्याचा शंतनुचा प्रयत्न चालू होता. अशीच केव्हातरी तन्वीची कहाणी आताच्या स्वप्नापर्यंत येऊन थांबली. आणि तिने  शंतनुच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा इतका गंभीर चेहरा तिने कधीच पाहिला नव्हता. बराच वेळ दोघेही शांत होते. "शंतनु, काहीतरी बोल ना!" ती  न राहवून बोलली. "ही प्रतारणा आहे" शंतनुचे हे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे तिच्या कानात शिरले!  

No comments:

Post a Comment