आपला राग एका शब्दात व्यक्त करून शंतनु झोपी गेला किंबहुना त्यानं झोपी गेल्याचं नाटक केलं. इथे तन्वी मात्र विमग्न परिस्थितीत तशीच बसून होती. ह्या सर्व प्रकारात आपला दोष काय हेच तिला कळत नव्हतं. एका क्षणी मात्र तिने अबलेची भूमिका घेण्याचं नाकारलं. शंतनुला गदगदा हलवून ती म्हणाली, "ह्यात कोणती प्रतारणा, शंतनु? माझ्या स्वप्नात जे काही येतं, त्यावर माझं नियंत्रण असतं का? आणि ह्याचा मला देखील त्रास होतोच आहे ना? तू ऑफिसात असताना मी एकटी कसे दिवस काढत असते ते माझं मला ठाऊक!" शंतनुला काही प्रमाणात त्याची चूक कळून चुकली होती. पण तो बराच दुखावला गेला होता. "उगाच का हिच्या मनात असे विचार येतात" त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. मध्येच एकदा तिची समजूत काढण्याची त्याला इच्छा झाली. पण त्याच्या अहंकाराने त्याला रोखले.
सकाळी पाचच्या सुमारास त्याला जरी झोप लागली तरी तन्वी मात्र तशीच जागी होती. नकुलचा तिला अतिशय राग आला होता आणि भीतीही वाटू लागली होती. त्याने तिची झोप उडवून टाकली होती. खरतरं प्रेमात झोप उडवून टाकणं हा किती रोमांकित क्षण! पण इथले संदर्भ फार वेगळे होते. एका क्षणाच्या कल्पनेच्या दुनियेतील सुखाने किंबहुना सुखाच्या भासाने तिचं प्रत्यक्षातील सुंदर घरकुल पणाला लागलं होतं. नकुलच्या तिच्या आयुष्यातील आगमनाच्या प्रयोजनाचा थांगपत्ता तिला लागला नव्हता आणि लागण्याची शक्यताही नव्हती. तो जसा अगेला अचानक तिच्या आयुष्यात आला तसा केव्हाही निघून जाण्याची शक्यताच जास्त होती. त्याने निर्माण केलेलं विश्व कितीही सुखदायक असलं तरी त्या विश्वाच्या शाश्वतेची खात्री नव्हती. ह्यातून बाहेर पडण्याचीच तिला आता तीव्र इच्छा होऊ लागली होती. पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तिच्या शंतनुची गरज होती. आणि तो शंतनुच ह्या क्षणी दुखावला होता.
सकाळचा गार वारा तन्वीच्या अंगाला सुखावत होता. मन मात्र दुखावलेलच होतं. तिच्या मनानं आता काहीस समजुतदारपणाचं वळण घेतलं होतं. "शंतनुचं सुद्धा फारस काही चुकलं नाही म्हणायचं! त्याला अजूनही मी खूप हवीहवीशी वाटतेय, त्याच्या मनात माझ्याविषयी स्वामित्वाची भावना आहे आणि म्हणून तो इतका चिडला!" ह्या विचारचक्राने तन्वीला काहीसं बरं वाटलं. ह्या बरेपणाच्या भावनेत तिला एक डुलकी लागली.
तन्वीला जाग आली तेव्हा शंतनु घरात नव्हता. एकंदरीत लक्षणावरून तो ऑफिसात गेल्याचीच चिन्हं दिसत होती. तन्वीने त्याच्या ऑफिसातील क्रमांकावर फोन लावला. "पोहोचलास का?" शंतनुला एका शब्दात उत्तर द्यायची संधी देणारा प्रश्न तन्वीने केला. "हुं" अशा एका हुंकारात शंतनुने उत्तर देऊन फोन ठेवला.
चहाचा कप घेऊन तन्वी शांतपणे बसली होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती केव्हातरी काहीशी परिचित होणार होती. नकुल कोण आहे, तो नेहमी आपल्या स्वप्नात का येतो ह्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि कधी मिळेल ह्याची खात्रीही नव्हती. पण त्याचं स्वप्नातील वागणं कधीतरी एका विशिष्ट प्रकाराकडे झुकणार होतं. आणि मग एकदा का त्याच्या वागण्याचा उलगडा झाला की मग तन्वी त्याच्याशी मुकाबला करणार होती. विचारांच्या ह्या शृंखलेने तन्वीला बरंच बरं वाटू लागलं होतं. पण मग एक विचार तिच्या मनात आला. आपण प्रत्यक्ष जीवनातील तन्वीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकतो पण त्या दुनियेतील तन्वीच्या वागण्याचा काय भरवसा? स्वप्नातील दुनियेतील भावना ह्या तन्वीला कळतात, पण इथला खंबीरपणा त्या तन्वीपर्यंत कसा पोहोचवायचा? ती नकुलच्या आकर्षणात अशीच वाहवत गेली तर? ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तन्वीकडे नव्हते. "गेली तर तर गेली ती तन्वी त्या नकुलच्या आकर्षणात वाहवत!" तन्वी स्वतःशीच पुटपुटली. शंतनुने जर ह्या दुनियेतील तन्वीला पूर्ण साथ दिली तर मग त्या तन्वीचे आणि नकुलचे काही का होईना! पहिल्यांदाच तन्वीने दोन्ही तन्वीच्या मतलबाची वेगवेगळी विभागणी केली होती. आणि हो तिथल्या आठवणी मला सुखावतात! वाटली शंतनुला ही प्रतारणा तर वाटू देत! ह्या विचाराने मात्र तन्वी थोडी घाबरून गेली. पण काहीसा बिनधास्तपणाच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो हे तिने जाणले. जवळच्या हॉटेलचे मेनू कार्ड घेऊन बदललेली तन्वी मल्याळम भाषेत मसालाडोसा कसा ऑर्डर करायचा ह्याचा विचार करू लागली!
No comments:
Post a Comment