Saturday, January 25, 2014

गाणी - सोहमची, आईवडिलांची आणि आमच्या तिघांची !


हल्ली वसई बोरीवली अशा शनिवार रविवारी बऱ्याच फेऱ्या होतात. कधी आम्ही तिघंही असतो तर कधी मी आणि सोहमच, तर कधी मी एकटाच! माझी चालकाची जागा जशी पक्की तशी सोहमची माझ्या बाजूची! गाडी चालवताना माझं लक्ष समोर, त्यामुळे सोहमच्या हातात गाडीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांचे नियंत्रण! बाकी माझ्या स्वभावधर्माला अनुसरून गाडीत काही आधुनिक गाण्याचं चोखंदळपणे जमवलेली ध्वनीमुद्रित साठा वगैरे नाही. त्यामुळे जय FM ही परिस्थिती!
जेव्हा आम्ही तिघं असतो तेव्हा सोहम अल्पमतात येतो! माझ्याबरोबर राहून (किंवा वयाप्रमाणे!) प्राजक्ताची आवड आता हळूहळू जुन्या गाण्याकडे! त्यामुळे सोहम सेकंदाला एक ह्या वेगाने रेडिओ स्टेशन बदलत असताना, एखादं चांगलं जुनं गाण लागलं की मागून आवाज येतो, "अरे ते बदललं का, राहून दे ते! चांगलं गाणं होतं!" मग माझ्याकडे एक नाराजीचा कटाक्ष टाकून सोहम मागच्या स्टेशनकडे जातो!
सोहमचं वय ९ वर्षे! गेल्या काही वर्षात रात्रीच्या वेळात घरी केबल टीव्ही आणि FM रेडिओवर चालू असलेल्या आणि जबरदस्तीने ऐकाव्या लागलेल्या जुन्या गाण्यांनी त्याला तशी ही जुनी गाणी अगदीच अपरिचित नाहीत! मध्येच एकदा त्याने ह्या जुन्या गाण्यांचा उल्लेख 'झोप यायला लावणारी" गाणी असा केला तेव्हा गंमत वाटली. पण हळूहळू तो सुद्धा रात्री बाकी सर्व आवाज बंद करून ही जुनी गाणी ऐकण्याच्या आमच्या सवयीत सहभागी झाला.
पुन्हा एकदा गाडीप्रवासाकडे! हा प्रवास ज्यावेळी अगदी सकाळचा असतो तेव्हा पुन्हा आमचा कल मराठी अभंग, भक्तीसंगीत वगैरे प्रकार ऐकण्याकडे असतो. बिचारा अल्पमतातील सोहम ते ही सहन करतो. पण एकदा सकाळी आठ वगैरे वाजले की तो मग वादविवाद स्पर्धेत येतो. त्याला नवीन गाणीही ऐकायची असतात. आम्हीही सुजाण पालकांप्रमाणे मग काही नवीन गाणी ऐकतो.
तर मग आता काही जुनी गाणी सोहमही गुणगुणतो! तेव्हा त्याचा कान तयार झाला असे प्राजक्ता म्हणते! ह्यात मग किशोर प्रामुख्याने येतो. 'चिंगारी कोई भडके' हे किशोरच्या आवाजातील गाणे त्याला आवडते. पण हे गाणे म्हणायला त्याची मला मात्र बंदी आहे!  असो, अजूनही मी माझ्या आवाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न सोडणार नाही! मध्येच तो "प्यार में कभी कभी ऐसा भी होता हैं!" हे B4U वर बऱ्याच वेळा वाजवलं जाणारं गाणं गुणगुणायला लागला तेव्हा प्राजक्ता माझ्याकडे बघायला लागली. आमच्या जुन्या गाण्याच्या व्याख्येत हे गाणं काही शंभर टक्के बसत नव्हतं. मग काही वेळाने आम्हांला उलगडा झाला, त्याला त्या गाण्यातील येणारे "आमना सामना" हे शब्द जरा जास्तच भावले होते! बाकी काही नाट्यसंगीतातील गाणीही त्याला परिचित झाली आहेत.
ही झाली सोहमची गोष्ट! पण त्याच्याबरोबर राहून मी ही काही प्रमाणात बदललो! आधी जुनी गाणी म्हणजे अगदी नको म्हणणारा मी, काही नवीन गाणीही हल्ली भावून घेतो. "चलाओ ना नैनो के बाण रे" हे आमच्या दोघांचे सामायिकरुपात आवडीचे क्रमांक एकचे गाणे! त्यानंतर "चली रे" "बदतमीझ दिल" "रघुपती राघव राजाराम" "मुझे तो तेरी लत लग गयी!" "तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी" "तेरा प्यार प्यार हुक्का बार" आणि अजून काही ही त्याची खास आवडीची गाणी! स्टेशन बदलत असताना ह्या गाण्याचे सूर ऐकू आले की लगेच आम्ही तिथे थांबतो! नजरेने माझी संमती घेतली जाते! गडी खुश होतो, आणि नकळत मीही! मूड खरोखर चांगला असेल तर पाय वेगवर्धकावर जातो आणि गाडी ९० - १०० च्या आसपास जाते. मग तो वेगनिदर्शकाकडे नजर टाकून मला भानावर आणतो! मग एकटा ऑफिसला जाताना मीही अधूनमधून ही गाणी ऐकतो!
थोडक्यात हल्ली आमच्या गाण्याच्या तीन याद्या  झाल्या आहेत. फक्त प्राजक्ता आणि माझ्या आवडीची गाणी, फक्त सोहमच्या आवडीची गाणी, आणि आमच्या तिघांच्या आवडीची गाणी!
दोन लक्षात घेण्यासारखे मुद्दे!
१> संगीताचं बाह्यस्वरूप काळानुसार बदलणार! त्याला इलाज नाही. पण हृदयाला साद घालणारी गाणी सदैव बनत राहणार! डोळे नव्हे कान उघडे ठेवून आपल्याला त्या गाण्यांचा शोध घेता आला पाहिजे!
२> वडील आणि मुलगा एकत्र एका गाण्याचा आनंद घेत आहेत ही गेल्या पिढीत अगदी दुर्मिळ असणारी गोष्ट हल्ली जास्त प्रकर्षाने जाणवते! ह्या संधीचा फायदा घेत किशोर, लता, महमद रफी, मुकेश, सुमन कल्याणपूर मंडळीचा चाहता वर्ग पुढच्या पिढीकडे जमलं तर पोहोचवूयात!

No comments:

Post a Comment