Sunday, April 18, 2010

क्लिष्टता शालेय जीवनातील आणि आयुष्यातील!

बालपणी कसे सर्व काही सोपे असायचे. आता बालपणही सोपे राहिले नाही ही दुसरी गोष्ट. पण मी आपल्या वेळच्या बालपणाविषयी म्हणतोय. गणितात दोन आकड्यांची बेरीज - वजाबाकी, मातृभाषेतून इतिहास, भूगोल, विज्ञान!

जसजसे आपण मोठे होत गेलो तसे अभ्यास, जीवन अधिकाधिक क्लिष्ट होत गेले. आता क्लिष्टपणा म्हणजे काय याचा उहापोह करण्याचा प्रयत्न आज मी करतो आहे. कोणतीही गोष्ट क्लिष्ट असते म्हणजे काय? माझे मत असे आहे की कोणतीही क्लिष्ट गोष्ट ही अनेक सोप्या गोष्टीची बनलेली असते. जर का तुम्ही या सर्व सोप्या गोष्टी वैयक्तिक पणे ओळखू शकलात आणि त्या विविध सोप्या गोष्टीतील अवलंबिता ओळखून लक्षात ठेवू शकलात तर तुम्ही ती क्लिष्ट गोष्ट साध्य केली असे आपण म्हणू शकतो. उदाहरण द्यायचे म्हटले तर ९ - १० मध्ये भूमिती मध्ये प्रमेय आणि त्याची सिद्धता. प्रमेय कितीही क्लिष्ट असो पण सिद्धतेमधील प्रत्येक पायरी ही वैयक्तिकपणे सोपी असते.

तर मग शैक्षणिक दृष्ट्या कोणत्याही क्लिष्ट गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या गोष्टीतील विविध सोप्या गोष्टी वैयक्तिक पणे ओळखून त्यातील अवलंबिता ओळखणे आणि लक्षात ठेवणे असे विधान मी करतोय.

शैक्षणिक क्लिष्ट गोष्टीतील विविध सोप्या गोष्टी व त्यातील संबंध हे स्थिर असतात. ते एकदा लक्षात ठेवले की आयुष्यभर कायम उपयोगी पडतात. परंतु आयुष्यातील क्लिष्ट गोष्टी म्हणजेच कठीण प्रसंग मात्र इतके सोपे नसतात. ते आपल्यावर अनपेक्षितरीत्या चालून येतात आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे तुलनेने कमी वेळ असतो. अशा वेळी कामी येतो तो आपला अनुभव आणि दुसर्यांचा सल्ला (अर्थातच योग्य असेल तर!) आता आपला अनुभव आणि दुसर्याचा सल्ला यांना शालेय जीवनातील तुलना द्यायची झाली तर ती पाठ्यपुस्तकांची द्यावी लागेल. आपला अनुभव आणि दुसर्याचा सल्ला यात जीवनातील क्लिष्ट गोष्टीतील विविध सोप्या गोष्टी वैयक्तिक पणे ओळखून त्यातील अवलंबिता उपलब्ध केली असते.

मागे आपल्याच batch चे एक इ-मेल आले होते. त्यात अगदी हेच म्हटले होते
शालेय जीवनात गुरुजन आधी शिकवितात आणि मग आपली परीक्षा घेतात
पण आयुष्य मात्र आधी परीक्षा घेते आणि त्यातून आपण शिकतो

No comments:

Post a Comment