Sunday, December 5, 2010

Punching Bag अर्थात पोते

आपण व्यावसायिक जीवनाच्या सुरवातीला कंपनीमध्ये प्राथमिक पातळीवर काम करण्यास आरंभ करतो. कनिष्ठ पातळीवर काम करताना आपल्याला फक्त वरिष्ठांनी दिलेले काम पार पाडावे लागते. हे काम पार पाडत असताना आपल्या व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचा मुलभूत हक्क आपणास बहाल होतो. समदुःखी मित्रांसमवेत आपण हा हक्क कंपनीच्या कॉफी मशीनवर, कॅन्टीन मध्ये उपभोगतो.

जसजसा आपला अनुभव वाढत जातो, आपल्या कुवतीनुसार आपली क्षमता वाढत जाते, तसतसे आपण व्यवस्थापनाच्या शिडीवर वर चढू लागतो.
आता आपला बॉस हा एक वरिष्ठ व्यवस्थापक असतो आणि आपण Junior पातळीवरच्या एका गटाच्या कामाच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत असतो. या स्थितीमध्ये आपली विविध स्वभावाच्या, विविध वयोगटातील व्यक्तींशी सुसंवाद साधण्याची कला अत्यंत महत्वाची बनते. सोप्या भाषेत त्या कलेस Communication Skill असे बनले जाते. समोरच्या व्यक्तीची मनोस्थिती जाणून घेवून, कामाच्या सद्यस्थितीचे योग्य विश्लेषण करून त्या व्यक्तीशी कशा प्रकारे वागावे याचा निर्णय घ्यावा लागतो. कोणता संवाद समूहाशी साधायचा, कोणता संवाद व्यक्तिगत पातळीवर साधायचा, तो कोणत्या वेळी साधायचा आणि लेखी स्वरुपात साधायचा की तोंडी असे बरेच निर्णय अचूकपणे घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यासाठी बरेचसे अलिखित नियम अस्तित्वात असतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला संयम कधीही ढळू न देणे किंवा संत बनणे. याच पातळीवर असताना आपल्याला वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबर सुद्धा कित्येक बैठकींना उपस्थित राहावे लागते. इथे जरी आपण कनिष्ठ असलो तरी आपणास वरिष्ठ लोकांचे आदेश शांतपणे ऐकावे / पाळावे लागतात.

ह्या वर्गास दोन्ही बाजूने फटके खावे लागत असल्यामुळे गमतीने ह्या मधल्या व्यवस्थापकीय वर्गास कधी कधी Punching Bag असे म्हटले जाते. ह्या स्थितीकडे जर सकारात्मक दृष्टीकोनातून बघायचे झाले तर ही स्थिती आपणास एक व्यक्ती म्हणून संयमी बनविते आणि व्यक्तिगत जीवनात आपणास त्याचा फायदा करून घेता येवू शकतो.

No comments:

Post a Comment