Wednesday, December 15, 2010

What is your buffer?

व्यावसायिक जीवनाचा एक अलिखित नियम म्हणजे बफर! ज्यावेळी आपला बॉस आपणास एखादे काम सोपवतो त्याच वेळी तो आपणास काम पूर्ण करण्यासाठी आपणास किती वेळ लागेल याचा अंदाजही विचारतो. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार काम पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेचा अंदाज बांधतो आणि त्यात काही अधिक वेळ मिळवून येणारा एकूण वेळ हा बॉसला काम पूर्ण करण्यासाठीचा अंदाजित वेळ म्हणून देतो. हा जो काही अधिक वेळ मिळविला गेला त्याला बफर असे म्हणतात. याचा उपयोग कामात येवू शकणारे अडथळे, अडचणी पार पाडण्यासाठी होतो.

वैयक्तिक जीवनात सुद्धा प्रत्येक जण आपल्याला जगण्यासाठी किती पैसा लागेल याचे ठोकताळे बांधतो आणि मग त्यात आपला बफर मिळवितो. जो पर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळविण्यासाठी लागणारा पैसा मिळविणे हे व्यक्तीचे ध्येय असते तो पर्यंत सर्व काही आलबेल असते. परंतु ज्यावेळी या मुलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन चैनीसाठी पैसा मिळविणे हे ध्येय बनते त्यावेळी मात्र परिस्थिती बदलते. माणूस सदैव बिकट परिस्थिती उद्भवली तर काय (म्हणजेच बफर) याचा विचार करून अधिकाधिक पैसा मिळविण्याचा प्रयत्न करतो. सद्य युगात असुरक्षिततेच्या भावनेमुळे आणि स्पर्धेमुळे ह्या बफरचे प्रमाण अवास्तव वाढले आहे.

आपले जसे वैयक्तिक जीवन असते तसेच सार्वजनिक जीवनही आहे. भूमातेवरील उपलब्ध साधने ही वैयक्तिक जीवनासाठी लागणारी साधने आणि समाज स्वाथ्य टिकविण्यासाठी लागणारी साधने यात विभागली गेली आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासाठी लागणारी साधने आणि समाज स्वाथ्य टिकविण्यासाठी लागणारी साधने यांचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. ज्या क्षणी आपल्या वैयक्तिक जीवनातील बफरचा हव्यास आपल्या सामाजिक जीवनावर परिणाम करतो त्यावेळी समाजस्वास्थ्य बिघडण्यास सुरुवात होते. आज नेमकी हीच परिस्थिती उदभवली आहे. प्रश्न असा आहे की What is your buffer?

No comments:

Post a Comment