ऑलिम्पिक मी मनसोक्त बघतोय. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तर भरभरून बघतोय. उद्घाटन सोहळा सुंदर झाला, अगदी बीजिंग इतका नसला तरी चांगला झाला. कोणी मधुरा नावाच्या बंगलोरच्या युवतीने भारतीय पथकात समाविष्ट होवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणा तिला तरी दोष का द्यावा, फुकटच श्रेय मिळवण्याची सवय लागलेल्या हल्लीच्या भारतीय मनोवृत्तीचे तिने जगासमोर दर्शन घडविले.
- धनुर्धारी
महिला संघाकडून तर अधिक जास्त अपेक्षा होत्या कारण त्यात आपली जगज्जेती दीपिका समाविष्ट होती. तिथेही अशीच गोष्ट. पहिल्याच फेरीत आपण हरलो. महिला संघाने तर आपल्या क्षमतेच्या जवळपासही खेळ केला नाही. वैयक्तिक स्पर्धेतही दीपिका पहिल्याच फेरीत हरली. 'क्या हो रहा था यह समजने के पहेलेही सब ख़तम हुवा था' असे दुःखी स्वरात ती म्हणाली.
२. बॅडमिंटन
बॅडमिंटनमध्ये दुहेरी सामन्यापासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ज्वाला गट्टा दुहेरीच्या महिला आणि मिश्र अशा दोन्ही सामन्यात पराभूत झाली. नंतर मात्र महिला दुहेरीच्या सामन्यात तिने अश्विनी पोन्नापाच्या साथीने साखळीतील शेवटचे दोन सामने जिकून आशा जिवंत केल्या. त्यांचा शेवटचा सामना सुरु व्हायच्या आधी समालोचकाने म्हटले सुद्धा की उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी त्यांना हा सामना एका विशिष्ट गुण फरकाने जिंकणे आवश्यक आहे. चुरशीच्या पहिल्या गेम नंतर दुसर्या गेम मध्ये त्यांनी ९ -० आणि मग ११- १ अशी आघाडी घेतली सुद्धा, पण नंतर मात्र सिंगापोरच्या जोडीने चुरस देत पराभवाचे अंतर कमी केले. महिला दुहेरीचे सामने गाजले ते काही गटातील निर्णय दोन्ही जोडीनी आपसात ठरविल्याने. ह्यात चीनच्या जोडीचाही समावेश होता. त्या बद्दल शिक्षा म्हणून ह्या जोड्यांना बाद ठरविले गेले. हे तर योग्य झाले, पण हा आदेश त्यांना ज्यांनी दिला त्या उच्च पदाधिकाऱ्यांचे काय? आपल्या जोडीनेही आपल्या गटातील एका निर्णयावर आक्षेप घेतला पण तो मान्य केला गेला नाही. इतके करून सुद्धा चीनचे खेळाडू महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावून गेले.
बाकी सैना नैहवालचे कौतुक करावे तितके थोडे. तिची एकाग्रता वाखाणण्याजोगी, चीनच्या खेळाडूंच्या मोठ्या समूहाला एकटीने टक्कर द्यायची हे काय सोपे काम नाही. उपांत्य फेरीत ती हरली खरी पण कास्न्य पदकासाठीच्या सामन्यात तिला तमाम भारतीयांच्या प्राथनानी साथ दिली आणि चीनी खेळाडूला दुखापतीपायी माघार घ्यावी लागली. कश्यपने देखील सुखद धक्का देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली.
३. टेनिस
हा एकमेव असा खेळ जिथे आपणाकडे दुहेरीतील जागतिक स्तरावरील खेळाडू आहेत. परंतु व्यक्तिगत अहंकाराने राष्ट्रभावनेला तिलांजली देण्यात आली. पेस - भूपती आणि भूपती - मिर्झा अशा आपल्या जोड्यांना विजयाची उत्तम संधी होती. पण आपल्या महान खेळाडूंनी तसे काही होवून दिले नाही. आणि आपले आव्हान दुसर्या फेरीच्या पुढे काही जावू शकले नाही. बाकी फेडरर ज्या प्रकारे मरेकडून अंतिम सामन्यात हरला ते काही मला झेपले नाही. एक तर फेडरर अगदीच सुमार खेळ खेळीत होता किंवा दमला होता किंवा ....
४. नेमबाजी
मला सुरुवातीपासून १० meter air rifle ह्या स्पर्धा प्रकारापासून खास आशा होत्या. कारण एकच ह्यात आपले दोन खंदे वीर गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा भाग घेत होते. नेमबाजीच्या ह्या स्तरावरील स्पर्धेत शेवटी एकाग्रता आणि मानसिक सामर्थ्याची कसोटी लागणार. २००८ ला अभिनवने बाजी मारली आणि ह्यावेळी गगनने. गगनने पदकांचे खाते उघडले आणि मी धन्य झालो. १९८० च्या मास्को ओलीपिक मधील हॉकीच्या सुवर्णपदकानंतर १९८४, ८८, ९२ अशी तीन ओलीपिक मध्ये भारताच्या पदकाची पाटी कोरीच राहिली होती. त्या मुळे हल्ली प्रथम मी पहिले पदक कधी मिळते याची वाट पाहत असतो. बाकी त्यानंतर विजय कुमारने पिस्तोल शूटिंग मध्ये अनपेक्षितरित्या रौप्य पदक मिळवून दिले. जिंकल्यावर गडी म्हणाला, 'ह्या स्तरावर जिंकण्यासाठी मनोबलाची आवश्यकता असते आणि आम्हाला सैन्यात ह्याची सवय असते.' अखंड भारतात शिस्त कोठे अस्तित्वात असेल ती सैन्यात!
५. हॉकी
आज भारत दक्षिण आफ्रिकेकडून हरला. आणि बाराव्या / अंतिम स्थानावर राहिला. भारताचे ऑस्ट्रेलीयान प्रशिक्षक नोब्ब्स यांना अजून थोडी संधी द्यावयास हवी असे माझे वयैक्तिक मत. बाकी आपण ज्याकाळी जिंकायचो त्याकाळची आणि आजची हॉकी फारच वेगळी. तेव्हा नैसर्गिक मैदानावर सामने खेळले जायचे आणि त्यामुळे शक्तिमान लांबलचक पास देण्याची पद्धती अस्तित्वात नव्हती, हॉकीच्या काठीने चेंडू खेळवत नेत, प्रतिस्पर्ध्याला चकवत गोल करण्यात आपली खासियत. हॉकीचा पृष्ठभाग बदलला आणि खेळही बदलला. त्यामुळे मी मात्र आपल्या संघाकडे सहानभूतीने बघतो. इथे गरज आहे ती ललित मोदि किंवा शरद पवार सारख्या धूर्त लोकांची जे परत हॉकीला नैसर्गिक पृष्ठभागावर घेऊन येतील.
६. बॉक्सिंग
मेरी कोमने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. परंतु दुर्दैवाने उपांत्य फेरीत तिला सुवर्णपदकविजेत्या ब्रिटीश खेळाडूकडून हार पत्करावी लागली. आजच तिच्या आहाराविषयी लेख वाचला. तिने कारकिर्दीतील सुरुवातीचे बरेच दिवस भात आणि भाज्या अशा आहारावर काढले. बाकी विजेंदर सिंग आणि इतर बॉक्सर झुंज देत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचले परंतु तिथे हरले. आपण निर्णयाविरुद्ध मागितलेली दाद फेटाळली गेली. इथे एक बाब मला खटकली. एक प्रश्न पडला, आपण हार खुल्या दिलाने पत्करू शकत नाही का?
७. कुस्ती.
प्रत्येक अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी जेव्हा भारतीय संघ जाहीर होतो त्यावेळी मी कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणी कुस्तीवीर दिसतो कि नाही याची तपासणी करतो.
योगेश्वर दत्तने कमाल केली. उपांत्यपूर्व फेरीत हरून सुद्धा त्याने मिळालेल्या संधीचे सोने करीत कांस्य पदक पटकाविले. सुशीलकुमारचे तर कौतुक करावे तितके थोडे. त्याने अनेक तगड्या पैलवान्नाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. नंतर मात्र मान दुखावल्यामुळे तो अंतिम फेरीत हवा तसा प्रतिकार करू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
८ Gymnastic
हा देखील एक सुंदर खेळ. महिला सांघिक स्पर्धेत रशिया संघ जिंकण्याच्या स्थितीत असताना एका खेळाडूची उडी चुकली आणि आणि त्यांचे सुवर्णपदक हुकले. ध्येयाच्या किती जवळ तरीही किती दूर!
९. लयबद्ध जलतरण
ह्या खेळात भारताचा सहभाग नसला तरी हा खेळ पाहणे अत्यंत आनंददायी अनुभव असतो. अनेक खेळाडूंनी पाण्यामध्ये साधलेल्या समन्वय हालचाली, त्यामागची मेहनत. धन्य ते खेळाडू!
असो प्रत्येक देशांच्या दृष्टीने प्राधान्य दिल्या जाणार्या गोष्टी वेगळ्या असतात. चीनच्या काही सुवर्णपदकविजेत्यांनी जो काही वैयक्तिक त्याग केला त्याच्या गोष्टी ऐकल्या की अंगावर शहारे येतात. उत्तर कोरियातील ज्या खेळाडूंना पदक मिळाले नाही त्यांना छळ छावणीत पाठविले जाते अशी वाचलेली बातमी खोटी असो अशी मी प्राथना करतो.
पुढील ऑलिम्पिक २०१६ साली ब्राझील मधील रिओ इथे होणार. एका विकसनशील देशाला ऑलिम्पिक भरविण्यासाठी माझ्या शुभेच्छा! बाकी २०१६ साठी भारताने १००० खेळाडू निवडून, त्यांच्या चरितार्थाची सोय करून त्यांना पुढील चार वर्षासाठी एका थंड हवेच्या ठिकाणी सरावासाठी ठेवावे अशी भोळीभाबडी सूचना! बाकी आतापर्यंतची ६ पदकांची आपली सर्वोत्तम कामगिरी बजाविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन!
No comments:
Post a Comment