Sunday, December 9, 2012

STOLEN HARVEST - समृद्धीची लुट - एक अस्वस्थकारी अनुभव


मध्यंतरी वीणा गवाणकरांनी चतुरंग मध्ये वाचनसंस्कृती विषयी एक छान लेख लिहिला होता. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून वाचन करणे कसे महत्वाचे आहे असा एकंदरीत त्या लेखाचा आशय होता. वाचनाच्या सवयीने मुलांची बौद्धिक वाढ कशी झपाट्याने होते हे सर्वांनाच ऐकून माहित असते परंतु ते प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी पालकांना स्वतः आदर्श निर्माण करावा लागतो आणि हीच फार कठीण गोष्ट आहे. माझा एक खास मित्र अधून मधून मराठीतील वाचनीय पुस्तकांची मला शिफारस करत असतो. हल्लीच त्याने कमल देसाई ह्यांनी अनुवादित केलेले समृद्धीची लुट हे पुस्तक सुचविले. मूळ पुस्तक वंदना शिवा ह्यांनी STOLEN HARVEST ह्या नावाने लिहिले आहे.
नैसर्गिक साधनसामृगीच्या ऱ्हासाविषयी आपण सर्वच भावनिक होवून बोलत असतो. परंतु हे पुस्तक आकडेवारीसहित काही विदारक सत्य समोर आणते. नैसर्गिक अन्नसाखळीला परंपरागत शेती कशी जोपासत होती आणि आता छोट्या शेतकऱ्याच्या अधोगातीमुळे ही नैसर्गिक अन्नसाखळीच कशी धोक्यात आली आहे, तथाकथित शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे चित्र कसे दिखावू आणि क्षणभंगुर आहे ह्याचे भयाण चित्र हे पुस्तक आपल्यासमोर रेखाटते. त्यानंतर लेखिका जगाच्या विविध भागातील स्थानिक अन्न संस्कृतीचा कसा वेगाने ऱ्हास चालू आहे ह्या विषयाला हात घालते. तिथून लेखिका समुद्रातील मस्त्यसंपत्तीचा मनुष्याने कसा विनाश चालविला आहे ह्याकडे वळते.
हा ब्लॉग लिहताना सुरुवातीला मी ह्या पुस्तकाचा सारांश मांडावा असा विचार केला होता. परंतु ज्या पातळीवर हे मूळ पुस्तक आणि त्याचा अनुवाद लिहला गेला आहे ते लक्षात घेता हा सारांश लिहिणे म्हणजे लेखिका आणि अनुवादिका ह्या दोघींवर अन्याय करण्यासारखे होईल हे मला जाणवले. इथे एकच म्हणणे, जर तुम्हाला पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी चिंता वाटत असेल तर हे पुस्तक मिळावा आणि वाचा.
दुनियेत पूर्वीपासून सम्राट होते. पूर्वी उघड रूपाने संपत्ती गोळा करणाऱ्यांनी आपली रूपे, पद्धती बदलल्या आहेत एवढाच काय तो फरक.
 

1 comment: