Tuesday, February 19, 2013

सुमेर ग्रह भाग ८


निरंजन आपल्या दीर्घ निद्रावस्थेतून हळूहळू जागा झाला. आज्ञावलीमध्ये कुण्या आगंतुक व्यक्तीचा प्रवेश झाल्यास आपली निद्रा भंग होईल ह्याची त्याने तजवीज करूनच ठेवली होती. आपला महा महासंगणक सुरु करताच त्याला एकंदरीत सर्व परिस्थितीचा उलगडा होण्यास फारसा काही वेळ लागला नाही. आपली मनुष्यजात आपल्यापर्यंत येऊन पोहोचली ह्याचा त्याला सखेद आनंद झाला. सखेद ह्यासाठी की ही भेट काही शांत असणार नाही हे ते जाणून होता.
निरंजनचे मन आपसूकच २०० वर्षांपूर्वीच्या घटनांकडे गेले. अंतराळातील निघालेल्या ह्या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटताच निरंजन एकदम कावराबावरा झाला होता. आता हे यान कोठे जाईल, आपण असेच अंतराळात भरकटून आपला अभागी अंत होणार अशा नको नको त्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले. असेच काही दिवस गेले. यानातील इंधनाचा साठा आता संपण्याच्या मार्गावर होता. परंतु आता निरंजन ह्या सर्व गोष्टींची चिंता करण्याच्या पलीकडे गेला होता. त्याच्या मनावर एका निरंतन शांततेने कब्जा केला होता. हळूहळू निरंजन एका दीर्घ निद्रेत गेला होता.
निरंजनची निद्रा ज्यावेळी भंग झाली त्यावेळी एका वेगळ्याच ठिकाणी असल्याचे त्याला आढळून आले. हे स्थळ समुद्राच्या खोल तळाशी होते. तिथे निरंजन सोडून कोणीच नव्हते आणि निरंजनच्या खाण्यापिण्याच्या गरजा अत्यंत मामुली स्वरूपाच्या राहिल्या होत्या. आपला मेंदू अत्यंत प्रगतावस्थेत गेला आहे हे काही दिवसातच निरंजनला जाणवले. कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा विचार मनात आल्यास त्या विषयाची इत्यंभूत माहिती मेंदू आपल्यासमोर सादर करतो हे निरंजनला कळून चुकले होते. संगणकावरील खेळाची निरंजनला फार आवड होती. असाच काही खेळ आपण निर्माण करावा असा विचार त्याच्या मनात आला. पण संगणक होता कोठे? असा विचार मनात येताच अत्याधुनिक संगणक निर्माण करण्याच्या सर्व सूचना मेंदूने त्याच्या समोर सादर केल्या अगदी त्याला लागणाऱ्या साधनसामुग्रीसकट. हे सर्व अतर्क्य घडत आहे हे निरंजनला समजत होते परंतु असे का घडत आहे हे हयची त्याला आता चिंता करावीशी वाटत नव्हती. एकंदरीत मनुष्यजातीने आतापर्यंत मिळविलेले सर्व ज्ञान आपल्या डोक्यात शिरले आहे असा एकंदरीत त्याचा ग्रह होऊ लागला होता.
संगणकावरील खेळात नेहमी प्राथमिक Basic, Intermediate आणि Advanced अशा तीन पातळ्या असायच्या. आपल्या खेळात सुद्धा अशा पातळ्या बनवाव्यात असा निग्रह निरंजनने केला. पण खेळ कसला? निरंजनला हल्ली काहीसे एकटे वाटू लागले होते. आपल्या अवतीभोवती सजीव असावेत अशी इच्छा त्याच्या मनात रुजू लागली होती. असा विचार यायची खोटी, गणकांची संपूर्ण संरचना त्याच्यासमोर सादर झाली होती. मग निर्माण झाले होते वेताळ - म्हणजेच intermediate level. ह्या सर्व गडबडीत निरंजनला थोडासा थकवा आला होता. आणि त्यामुळे त्याने ही निद्रा घेतली होती. आता त्याच्या मनात अतिप्रगत पातळीचा शोध चालू झाला होता. अरे वेड्या अतिप्रगत पातळी तर स्वतःहून तुझ्यापुढे चालून आली आहे, त्याच्या मनाने त्याला सांगितले. प्रथमच निरंजनच्या मनात थोडी खळबळ माजली होती. ह्या सर्वाचा कर्ता करविता कोण ह्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे प्रथमच त्याला वाटू लागले. 

No comments:

Post a Comment