Friday, February 8, 2013

इराणी चषक सामना - रोहित शर्मा, अभिषेक नायर आणि सचिन!


लहानपणी मला अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले होते. मी वसईला मोठा होत असताना मध्येच गल्लीत एखाद्या दिवशी चांगली फलंदाजी केली की मी अनेक मनोरथे रचित असे. त्यात मला एक प्रश्न पडे की मी समजा रणजी दर्जापर्यंत पोहोचलो की माझी निवड महाराष्ट्राच्या संघात की मुंबईच्या? ह्या प्रश्नावर माझी बरीच उर्जा खर्च झाल्याने मी रणजी दर्जापर्यंत पोहोचलो नाही ही गोष्ट वेगळी!
सध्या इराणी चषक सामना चालू आहे. क्रिकइन्फोवर ह्या सामन्याचे धावते वर्णन वाचणे हा एक ज्ञानवर्धक आणि मनोरंजक अनुभव असतो. संपूर्ण भारत आणि जगभरातील रसिक आपली टिपण्णी पाठवत असतात आणि त्यातील निवडक टिपण्या आपणास वाचता येतात.
२०११ च्या इंग्लंड दौऱ्यापासून मी सचिनने निवृत्त व्हावे अशा विचाराच्या टिपण्या जमेल तिथे प्रसिद्ध करीत आहे. परंतु हल्ली माझे पुन्हा मतपरिवर्तन होऊ लागले आहे. कालचाच सामना पहा! रोहित शर्मा आणि अभिषेक नायर ह्या दोघांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुवर्णसंधी होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आपला खेळ आणि संयमी मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी संपूर्ण वानखेडे मैदान आणि समोर सचिन उपलब्ध अशी आदर्श स्थिती होती. पण दोघेही बेजबाबदार फटका मारून बाद झाले. एका रसिकाने ह्यावर एक मार्मिक प्रतिक्रिया दिली. 'आपल्या विकेटचे मुल्य रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यात सुद्धा कळले नाही. ह्याउलट सचिनकडे पहा तो कसा राष्ट्रीय पातळीच्या सामन्यात सुद्धा कधीच आपली विकेट फेकत नाही.' पुढे तो रसिक म्हणाला ' स्थानिक पातळीवर रोहितच्या जवळपास गुणवत्तेचे अनेक असे खेळाडू आहेत ज्यांना एकही संधी मिळत नाही, त्यांच्याविषयी मला वाईट वाटते.' अगदी बरोबर म्हणाला तो रसिक!
सचिन असो वा जाफर, दोघे जुन्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. संयम भरभरून आहे त्यांच्यात, तीच गोष्ट नव्या पिढीच्या अजिंक्य रहाणेची. पण सर्वसाधारण नवीन पिढीचे काय? आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी ज्यांची केवळ स्वप्ने मागच्या पिढीने बघितली अशा गोष्टी अगदी आरामात आज बहुसंख्य नवीन पिढीस उपलब्ध आहेत. पण जे आरामात मिळते त्याचे मुल्य कळावयास कठीण जाते. तीच गोष्ट काहीशी रोहितच्या बाबतीत झाली आहे. तीच गोष्ट प्रवीणकुमार ह्या गोलंदाजाची! कालच बातमी वाचली की त्याने स्थानिक सामन्यात बेजबाबदारपणे वागण्यास सुरवात केली आहे. IPL चा पैसा त्याच्या डोक्यात गेला आहे असे त्याच्या स्थानिक सहकाऱ्याचे मत आहे.
एकंदरीत काय नवीन पिढीतील बऱ्याच जणांचे सर्व लक्ष तरुणपणातील वर्षांकडे आणि त्यातील मौज मस्तीकडे आहे. पण आयुष्य मात्र केवळ तरुणाईचेच नाही हा मुद्दा कोठेतरी विसरला जात आहे.
असो बाकी सचिनने तळाचे फलंदाज समोर असताना स्वतःकडे फलंदाजी ठेवण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. बहुदा तुमच्या बेजबाबदारीची मी पूर्ण जबाबदारी घेणार नाही असेच काही त्याला सूचित करायचे असेल! बघूया आज मुंबई आपला लढाऊ बाणा दाखविते का?

No comments:

Post a Comment