Thursday, June 20, 2013

क्रिकेट आणि मी (भाग ३) - सरदार पटेल कॉलेज


आधीचे दोन भाग
http://nes1988.blogspot.in/2010/07/blog-post_31.html
http://nes1988.blogspot.in/2010/08/blog-post.html
सचिन कन्नडकर निर्विवादपणे उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. जलद गोलंदाजी करायचा आणि  जबाबदारीने फलंदाजी सुद्धा करायचा. एकंदरीत त्याची क्रिकेटची जाण उत्तम होती. चौथ्या वर्षी मी खेळलो नाही पण बाकीच्या तिन्ही वर्षात मी दर वर्षी आमच्या वर्गाच्या संघातर्फे सलामीला खेळलो. गुण्या (श्रीनिवास खरे) हा गुणी डावखुरा फलंदाज माझा सलामीचा साथीदार होता. हे सामने फेब्रुवारीमध्ये खेळले जात. आमच्या संघांची निवडप्रक्रिया जानेवारीत सुरु होई. मी ह्या निवड सामन्यात उत्तम फलंदाजी करीत असे. त्यामुळे सचिन मला नेहमी संघात घेई. आमच्या संघाच्या बर्याचशा जागा सहजपणे निवडल्या जात. पण यष्टीरक्षकाच्या जागेसाठी थोडी कुरबुर होई. सुगंध आफळे हा आमचा क्रमांक १ चा यष्टीरक्षक होता. आणि सतीश भाटवडेकरचा ही जागा पटकाविण्याचा फार मानस होता. त्यामुळे सुगंध यष्टिरक्षण करताना सतीशबरोबर सीमारेषेवरून सामने बघण्यात मजा येई. सतीश पार्ले टिळकचा विद्यार्थी असल्याने शुद्ध मराठीतील त्याची टिप्पणी धमाल असे. सीमारेषेवरून आलेला थ्रो सुगंध हमखास चुकवीत असे आणि मग सतीश 'असे चेंडू मी हमखास अडविले असते' असे बोलत असे.
मला एकंदरीत दोघा तिघांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. गिरीश गरोडिया जो आमचा तिसर्या क्रमाकांचा फलंदाज असे तो एकदा म्हणाला होता की आदित्याची बॅट कशी सरळ रेषेतून येते. तसेच एकदा एक सीजन चेंडूचा सामना चालू होता त्यावेळी एक फलंदाज बऱ्याच वेळ बचावात्मक फलंदाजी करीत होता, त्यावेळी नितीन अम्बुरे म्हणाला 'अरे जर फक्त चेंडू अडवायचेच असतील तर आदित्य काय वाईट आहे'. ह्या माझ्या फलंदाजीवरील स्तुतीपर प्रतिक्रिया वीस वर्षापलीकडे काळ लोटला तरी मी लक्षात ठेवल्या आहेत.
सचिनला नाणेफेक जिकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्यास आवडे. मला का कोणास ठावूक लेगअम्पायर च्या मागे क्षेत्ररक्षण करण्यास ठेवले जाई. सचिन आम्हाला सुरुवात चांगली करून देई पण नंतरचे आमचे गोलंदाज त्यावर पाणी फिरवीत. केतन बेलसरे हा नो बॉल टाकण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यानंतर समित वर्तक, संतोष पाटील, अक्षय सूर्यवंशी हे गोलंदाज गोलंदाजी करीत.  तर प्रतिस्पर्धी संघ १२ षटकात ७५ - ८० च्या आसपास मजल मारे. मग आम्ही पटकन सरदार पटेल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जावून पाणी पिवून येत असू आणि फलंदाजीला उतरत असू. गुण्या चेंडू तटवून एकेरी दुहेरी धावा काढण्यात पटाईत होता. मी ही तसे फारसे चेंडू वाया जावून देत नसे. परंतु अशा १० - १२ धावून काढल्यावर माझी दमछाक होई. मग मी धावा धावून काढण्याऐवजी एखादा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होई. मग नंतर समित, केतन, इम्रान आणि कप्तान सचिन मिळून आम्हाला धावसंख्येपर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. पहिल्या वर्षी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात तृतीय वर्षाच्या वर्गाशी आमचा सामना होता. त्यात निर्मल अरोरा हा प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज अगदी वेगवान गोलंदाजी करीत होता. ७६ धावांचा पाठलाग करताना ६ षटकात आम्ही १९ धावांचीच सलामी देवू शकलो. पाचव्या आणि सहाव्या षटकात बाद होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो. सहाव्या षटकाच्या शेवटी बाद झाल्यावर मी आणि संघाने सुटकेचा निश्वास टाकला.
मंगेश केळकर हा लॉंग ऑनला उभा असे. त्याने तिथे एकदा अगदी सीमारेषेच्या टोकाला सुंदर झेल घेतला होता. पहिल्या वर्षी फिरोज शेख आमच्या संघात होता. त्याने आमचा पहिलाच सामना जो दुसऱ्या का तिसऱ्या वर्षीच्या विद्युत शाखेच्या संघाशी होता तो एकदम बिकट परिस्थितीतून जिकून दिला होता. हा फिरोज तसा एकदम मन का राजा होता. पहिल्या वर्षीच्या सुट्टीत त्याला चित्रपट सृष्टीत शिरण्याचे वेध लागले. तो रणजीत स्टुडीओत जावून आला. त्यानंतर मला आणि संजेशला भेटून त्याने त्याची आगामी चित्रपटासाठी नायक म्हणून निवड झाल्याची खुशखबरी सुद्धा दिली. त्याच्या म्हणण्यानुसार आयेशा झुल्का त्याची नायिका असणार होती. त्यानंतर ना त्याचा चित्रपट आला ना तो कधी आम्हाला भेटला.
मी पहिल्या वर्षी सरदार पटेल कॉलेजच्या वसतिगृहात राहत असे. तिथे संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर शैलेश सापळे, संजय फडके, संजेश चौधरी (वसई), फिरोज आणि आमचा कंपू क्रिकेट खेळत असू. तिथेसुद्धा माझी होस्टेलच्या संघात निवड झाली. त्यावर्षी माझ्या बहिणीचे लग्न होते. विवाह सोहळा घरीच असल्याने धावपळ सुरु होति. होळीचा सण होता आणि मला अभ्यास करायचा असल्याने मी हॉस्टेलवरच थांबण्याचे ठरविले. होस्टेलवर होळी साजऱ्या करण्याच्या पद्धतीविषयी मी बर्याच गोष्टी ऐकून असल्याने मी सकाळीच माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तळमजल्यावर असलेल्या माझ्या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारून गुपचूप येवून खोलीत बसलो. हद्द म्हणजे मी आंघोळ सुद्धा केली होती. सकाळी सात वाजता टोळी  सर्व खोल्यातील जनतेला उठविण्यास निघाली.झोपलेल्या अथवा झोपेचे सोंग घेतलेल्या मुलास खोलीबाहेर आणून त्याच्या अंगावरून थंड पाण्याची बादली ओतून त्याची झोप उडविली जात होती. प्रथम आलेल्या संतापाची मग खुन्नसने घेवून हा मुलगा तत्काळ बाथरूमकडे बादली भरण्यास धावे. अशा प्रकारे टोळीची संख्या फुगत चालली होती. कुलुपबंद खोलीतून मी हा सर्व प्रकार ऐकत होतो. काहीवेळाने टोळी माझ्या खोलीबाहेर आली. माझ्या खोलीला कुलूप पाहून अचंबा व्यक्त करण्यात आला. अरे आदित्य तर रात्री मेसमध्ये जेवायला होता, शैलेश बोलता झाला. अनुभवी टोळी होती ती! एका मिनिटात त्यातील दोघेजण गॅलरीतून डोकावते झाले. मग मला कुलूप फोडण्याची धमकी देण्यात आली. होळीचा दिवस असल्याने आणि त्यातील एकेकाचा इतिहास माहित असल्याने ह्या धमकीच्या खरेपणाविषयी संशय घेण्याचे काहीच कारण नव्हते. मी दरवाजा उघडल्यावर मला सन्मानपूर्वक होस्टेलच्या प्रवेशद्वाराशी नेण्यात आले. तिथे तीन चार बादल्या पाणी समोरील मातीत ओतून मला त्या चिखलात झोपविण्यात आले. त्यानंतरचे दोन तास मीही टोळीचा अग्रगण्य सदस्य बनून दंगा केला. हे थोडे विषयांतर झाले!
अशाच अजून सुट्टीच्या दिवशी मी अभ्यासाचा प्रयत्न करीत असताना शैलेश धावत आला. मागच्या D. N. नगरातील संघाने आम्हाला सामन्याचे आव्हान दिले होते. शैलेशसारख्याला हे आव्हान स्वीकारल्याशिवाय कसे राहणार? भवन्सच्या मैदानावर सामना सुरु झाला. मी आणि अमित माटी सलामीस गेलो. त्यादिवशी माझी फलंदाजी सुंदर होत होती. सरळ बॅटने सुरुवातीला एकेरी दुहेरी धावा काढल्यावर मी एक पॉईंटच्या डोक्यावरून चौकार मारला. त्याने आत्मविश्वास बळावल्यावर मी गोलंदाजाच्या डोक्यावरून दोन चौकार ठोकले. समोरून अमितही सुंदर फलंदाजी करीत होता. आम्ही सहा षटकाच्या आतच पन्नासची मजल मारली. मग मी वाहवत गेलो आणि लॉंग लेगला झेल देवून बाद झालो. आम्ही एकूण शंभरच्या आसपास मजल मारली . प्रतिस्पर्धी संघाला हे आव्हान काही झेपले नाही आणि आम्ही आरामात सामना जिंकला. सामन्याच्या गप्पा मारता मारता दुपारी अभ्यास केला पाहिजे हे मी ठरवीत होतो. साडे तीन वाजता स्वराज पुन्हा धावत आला. अरे वो लोग वापस आ गये हैं! नकार देण्याची सोय नव्हती. परंतु शत्रू मोठ्या तयारीनिशी आला होता. त्यांनी त्यांच्या संघात दोन तीन व्यावसायिक आणले होते. दुर्दैवाने नाणेफेक त्यांनी जिंकली. सुस्तावलेल्या आम्हाला त्यांनी ठोक ठोक ठोकले. त्यांनी सुद्धा शंभरच्या आसपास मजल मारली. तरीही सकाळच्या कामगिरीमुळे आम्ही आशावादी होतो. परंतु एक खतरनाक गोलंदाज सलामीला आला. त्याने पहिल्याच षटकात प्रथम माझी आणि मग अमितची यष्टी वाकवली. तंबूत सन्नाटा पसरला. परंतू शैलेश, स्वराजने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही लक्ष्य मोठे होते आणि हा सामना आम्ही वीसेक धावांनी हरलो. सुट्टीच्या दिवशी हॉस्टेलवर अभ्यासासाठी थांबण्यात काही अर्थ नाही हा धडा मी वरील दोन घटनांवरून शिकलो.
  

No comments:

Post a Comment