राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्यांच्या राजमाता शर्मिष्ठा व मंडळीबरोबरच्या फिस्कटलेल्या बैठकीची खबर लगोलग शत्रुघ्नच्या वर्तुळात पोहोचली होती. शत्रुघ्नच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. भावनांची तीव्रता जोरात असतानाच त्यांचा भडका उडवावा असे त्याचे कुटील मन त्याला वारंवार सांगू लागले. कुटील मनाचे सांगणे ऐकत शत्रुघ्न आपल्या पथकाबरोबर राजा प्रद्द्युतच्या नगरीकडे निघाला. मनातील विचार कुटीलतेच्या विविध पातळ्या गाठत होते. राजमातेच्या नकाराची राणी आश्लेषानी वैयक्तिक अपमान म्हणून समजूत करून घेतली असेल हे तो पुरेपूर जाणत होता. दोन स्त्रियांच्या मनातील ईर्षा कोणत्या कारणावरून निर्माण होऊ शकते ह्याचा ठाव घेणे अशक्य आहे हे तो पुरेपूर जाणून होता.
शत्रुघ्नच्या आगमनाने राजा प्रद्द्युत फारसा काही आनंदला नाही. शत्रुघ्नच्या कुटील कारस्थानाचा त्याला हल्ली काहीसा उबग येवू लागला होता. एकंदरीत ह्या सर्व राज्यविस्ताराच्या मोहापासून दूर राहावे अशी त्याची भूमिका होवू लागली होती. अशा मनोवस्थेतच तो शत्रुघ्नबरोबरच्या बैठकीसाठी स्थानापन्न झाला. शत्रुघ्नने सिद्धार्थच्या रणसज्जतेविषयी इत्यंभूत अहवाल सादर केला. सिद्धार्थला पूर्ण सैन्याला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी किमान एका सप्ताहाचा अवधी लागेल असे त्याचे म्हणणे होते. ह्या अवधीतच सिद्धार्थच्या साम्राज्यावर जोरदार हल्ला करून ते नामशेष करावे असा त्याचा प्रस्ताव होता. राजा प्रद्द्युतची सद्सदविवेक बुद्धी ह्या विचाराला साथ द्यायच्या विरुद्ध होती. ज्या युवराजाचा आताच आपण पाहुणचार स्वीकारून आलो त्याच्याच साम्राज्यावर इतक्या लगेच आक्रमण करावे हे त्यांना अजिबात पटत नव्हते. परंतु शत्रुघ्नाला शब्द तर ते देवून बसले होते आणि कोणत्याही योग्य कारणाशिवाय आपला शब्द फिरवणे योग्य नव्हते. राजा प्रद्द्युतनी सर्व अटींची उजळणी करण्यास शत्रुघ्नाला सांगितले. आपल्या विचारांना काही वेळ द्यावा हाच हेतू त्यामध्ये होता. शत्रुघ्नने सुरुवात केली. त्याच्या बोलण्याकडे प्रद्द्युतचे फारसे लक्ष नव्हतेच. "सिद्धार्थच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात यश आल्यास त्यातील अर्धे साम्राज्य राजा प्रद्द्युतच्या राज्यात सामील करण्यात येईल", शत्रुघ्नच्या ह्या वाक्याने मात्र प्रद्द्युत खडबडून जागे झाले. " मी तर तीन चतुर्थांश साम्राज्याच्या बोलीवर ह्या योजनेत सामील झालो होतो" राजा प्रद्द्युत ह्यांच्या आवाजातील राग अगदी स्पष्ट प्रकट झाला होता. "वा राजे! सर्व योजना आखायची आम्ही! सर्वांना एकत्र आणायचे आम्ही! आणि मोठा वाटा मात्र तुम्हाला!" शत्रुघ्नचे कुटील रूप आता उघड झाले होते. शब्दाने मग शब्द वाढत गेला. बैठक फिस्कटणार अशीच लक्षणे दिसू लागली होती.
लगोलग ही खबर राणी आश्लेषाच्या दालनापर्यंत जावून पोहोचली. लगबगीने त्या बैठकीत येवून पोहोचल्या. त्यांच्या आगमनाने राजा प्रद्द्युत प्रचंड नाराज झाला तर शत्रुघ्न अत्यंत आनंदी! आपला अंदाज अगदी बरोबर ठरला ह्याचा त्याला मनोमन आनंद झाला. राणी आश्लेषानी प्रथम दोघांची अशा बैठकीतील स्वतःच्या आगमनाबद्दल माफी मागितली. मग त्यांनी एकंदरीत विसंवादाचे कारण जाणून घेतले. त्यांचाही थोडा संताप झालाच, शत्रुघ्नच्या कुटील बुद्धीने! परंतु राजमाता शर्मिष्ठाची मुद्रा डोळ्यासमोर येताच त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला. "आम्हाला तुमच्या सुधारित अटी मान्य आहेत", राणी आश्लेषा ह्यांच्या उद्गारांनी राजा प्रद्द्युत ह्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ क्रुद्ध मुद्रेने बैठकीतून प्रस्थान केले. त्यांचा राग कसा दूर करायचा हे राणी आश्लेषा बरोबर जाणून होत्या. सध्यातरी त्यांनी मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचे असे ठरविले. सेनापतींना बैठकीत पाचारण करण्यात आले. बैठक पुढील तीन - चार तास सुरु होती. बैठक संपल्यावर ज्यावेळी शत्रुघ्न बाहेर पडला त्यावेळी तो अत्यंत खुश झाला होता. दोन दिवसातच सिद्धार्थच्या साम्राज्यावर आक्रमणाची योजना अगदी सूक्ष्म तपशिलासहित तयार होती.
सिद्धार्थ, राजमाता, सेनापती, प्रधान ह्यांचीही बैठक सुरु होती. महर्षी अगस्त्य सुद्धा राजमहाली आले होते. शत्रू नक्कीच प्रबळ होता. आणि हेरांनी आणलेली शत्रुघ्नच्या भेटीच्या बातमीचा अर्थ स्पष्ट होता. आक्रमण अगदी उंबरठ्यावर येवून ठाकले होते. थेट मुकाबला करता करता शत्रूच्या रणनीतीची आतल्या गोटातून बातमी काढणे गरजेचे होते. आणि त्यासाठी कुशल हेरांची आवश्यकता होती. अंशुमत ह्याच्या कारकिर्दीत सैन्यबळ इतके प्रबळ होते की हेरखात्याकडे तसे म्हणावे तर दुर्लक्षच झाले होते. आता वेळ कमी होता. सिद्धार्थने निर्णय जाहीर केला. सर्व सामर्थ्यानिशी शत्रूशी मुकाबला करण्याचा! "मी स्वतः आघाडीच्या तुकडीत सामील असणार!" त्याच्या ह्या उद्गाराने प्रत्यक्ष अंशुमत महाराज समोर ठाकले आहेत असा केवळ शर्मिष्ठा ह्यांना नव्हे तर सर्वांनाच भास झाला.
सिद्धार्थला आशीर्वाद देवून आणि राजमाता शर्मिष्ठेला धीर देवून महर्षी अगस्त्य आश्रमाकडे निघाले. त्यांच्या मनात विचारांचे वादळ सुरु होते. तपोवनात शिरताच सीमंतिनीचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांची काहीशी चिंतीत मुद्रा पाहून ती काळजीत पडली. काही वेळाने ती महर्षीच्या कुटीत शिरली. तिला पाहून महर्षीनी स्मित हास्य केले. महर्षीनी तिला सर्व हकीकत सविस्तर सांगितली. आपल्या मनीच्या राजकुमारावर आलेला हा कठीण प्रसंग ऐकून महर्षी पुढे काय बोलत आहेत ह्यावरील सीमंतिनीचे चित्त उडाले. "सिद्धार्थला कुशल हेरांची गरज आहे" हे एकच वाक्य तिच्या कानात सतत रेंगाळत होते.
निशादेवतेने आश्रमावर आपले पांघरुण पसरविले होते. सुरक्षासेवकांनी सुद्धा एकंदरीत परिस्थिती पाहून निद्राधीन होणे पसंद केले होते. आणि अशा ह्या थंड वातावरणात हळूच एक युवक कोणी पाहत नाही ह्याची खात्री करून घेत बाहेर पडला. अश्वशालेतील एका घोड्याला मोकळे करून त्याने त्या घोड्यावर मांड ठोकली. तो काही फारसा कुशल दिसत नव्हता. पहिल्यादा अडखळला सुद्धा परंतु शेवटी एकदाचा घोड्यावर बसून त्याने घोड्याला भरधाव वेगाने आश्रमाबाहेर पिटाळले. सुरक्षासेवकांची झोप इतकी गाढ होती की हा घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्या स्वप्नातील असावा अशी त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली व ते परत निद्राधीन झाले.
No comments:
Post a Comment