मागील भागात रंजूचा उल्लेख करायचा राहून गेला. जसजसे एकक परीक्षण प्रगतावस्थेत गेले तसतशा काही क्लिष्ट समस्या पुढे येऊ लागल्या. मग रंजूला पाचारण करण्यात आले. आता रात्रपाळीत तीस चाळीस लोक धडपडत असायची आणि रंजूसाहेब एका संगणकावर कारचा खेळ खेळत असायचे. सुरुवातीला मला रंजुची आणि त्याच्या मेनफ्रेमवरील करामतीची माहिती नव्हती. आणि त्यातच रंजूचे आगमन झाल्यावर पहिले काही दिवस काहीच प्रश्न उदभवले नाहीत. त्यामुळे ह्या माणसाला खेळ खेळण्यासाठी इथे का बोलावलं असा मला प्रश्न पडायचा. बाकी तो कारचा खेळ मात्र उत्तम खेळायचा. मग एकदा आमचा एक संघ एका समस्येत अडकला. आता DB२ टेबल लोड होत नव्हते की nomad प्रोग्रॅम चालत नव्हता हे नक्की आठवत नाही. पण दिवसभर संघ अथक प्रयत्न करीत होता. रंजूचे रात्री नऊच्या सुमारास आगमन झाले. पाच दहा मिनिट त्या समस्येकडे त्याने पाहिलं. मग आपल्या डेस्कवर गेला. एक कारची शर्यत खेळला. त्यावेळी त्याच्या डोक्यात त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचं ह्याचा विचार चालू होता हे नक्की. मग ती शर्यत जिंकून आल्यावर गडी त्या प्रश्नावर बसला. दोन तीन प्रकारे प्रयत्न झाले आणि मग दहा मिनिटात तो प्रश्न सुटला होता. रंजूविषयी माझा आदर दुणावला होता. कोणत्याही क्षेत्रात मेहनत वगैरे ठीक असते पण अफाट गुणवत्तेला पर्याय नसतो ह्याची नोंद मी त्यावेळी केली.
रंजू खट्याळ होता. आपल्या खट्याळपणासाठी तो मेनफ्रेमच्या रेक्स ह्या भाषेचा वापर करायचा. रेक्समध्ये मेक्रो लिहून आम्हा गरीब आत्म्यांचा तो छळ करायचा. मेनफ्रेममध्ये लॉगऑन करताना किंवा मध्येच कधीही आमची हिरवी काळी स्क्रीन अचानक मोठमोठ्या संदेशांनी भरून जायची. मग आम्ही समजायचो की रंजूची आमच्यावर वक्रदृष्टी झाली आहे. एकदा त्याने असाच एकाला संध्याकाळच्या वेळी मेसेज पाठवला की मेनफ्रेमचे TSO सेशन आता पाच मिनिटात बंद होणार आहे. तो बिचारा गरीब जीव खुशीने सर्व तयारी करून घरी जायला तयार होवून बसला. सेशन बंद होण्याची वाट पाहत! एव्हाना ही बातमी शंभर जणांच्या संघाला पोहाविण्याची काळजी रंजुने घेतली होती त्यामुळे सर्वजण गालात हसत त्या गरीब जीवाकडे बघत होते. मग काही वेळाने त्या गरीब जीवाने (रमेश) बाकीच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र हास्यकल्लोळ पसरला!
कालांतराने Y२K प्रोजेक्ट संपलं. मग मी इंग्लंडला गेलो तिथे सुदैवाने रात्रपाळी करण्यापर्यंत वेळ आली नाही. शनिवारी मात्र जावं लागायचं. तिथे त्या मजल्याच्या दुसऱ्या भागात त्या वित्तीय संस्थेचे कॉलसेंटर सुद्धा होते. एकदा त्यांचा दुभाषा आला नव्हता आणि पाकिस्तानातून क्रेडीट कार्डच्या चौकशीसाठी एक कॉल आला. मग तेथील एक गौरवर्णीय ललना माझ्याकडे आली आणि तिने मला तो कॉल घेण्यासाठी बोलाविले. अस्मादिक धन्य झाले! बाकी तो कॉल मात्र मी कसाबसा निभावला.
मधली काही वर्ष रात्रपाळीशिवाय गेली. ०३-०४ साली मी फ्लोरिडात गेलो. तिथे एक मोठे प्रोजेक्ट प्रोडक्शनमध्ये जायचं होत. त्याचं सर्व प्रकारचं परीक्षण आम्ही सहा - सात महिने करीत होतो. त्यातील शेवटचा एक महिना implementation डे (अंमलबजावणीचा दिवस) च्या दिवशी कराव्या लागणाऱ्या कृतींचा क्रम आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींची नेमणूक हे ठरविण्यात गेला. ही एकूण अंमलबजावणी ३६ - ४२ तास चालणार होती. प्रथम युरोप, मग अमेरिका आणि मग आशिया - ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे ही अंमलबजावणी करण्यात येणार होती. ह्यात कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आज्ञावली आणि माहितीभांडार ह्यांना कसे पूर्वपदावर आणायचे ह्याचेही नियोजन करणे आवश्यक होते. कितीही नियोजन केले तरी ही (पूर्वपदावर आणण्याची) वेळ येऊ नये ही प्रार्थना आम्ही करीत होतो. माझी नेमणूक शुक्रवारी आणि शनिवारीच्या रात्रपाळीसाठी करण्यात आली होती. थोडक्यात म्हणजे मी आघाडीचा आणि शेवटचा फलंदाज होतो.
शुक्रवार संध्याकाळ सात ते शनिवार पहाट चार अशी माझी शिफ्ट होती. माझ्याबरोबर गॅरी होता. गॅरी तसा प्रेमळ माणूस होता. त्याच्याकडे आणि त्याच्या एका मित्राकडे विविध प्रकारच्या चॉकलेटचा मोठा साठा असे . माझ्या अमेरिकतील वास्तव्यातील प्रत्येक दिवशी तो तीन - चार चॉकलेट माझ्या आणि आम्हा काही जणांच्या डेस्कवर आणून ठेवी. आणि ही चॉकलेट न खाल्ल्यास तो नाराजी व्यक्त करी. त्यामुळे सुरुवातीला मी दररोज ती खात असे. पण नंतर कंटाळा आल्याने मी ही चॉकलेटस खणात ठेवून घरी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. घरी मोठा चॉकलेटचा डबा भरला. मला काही काळाने गॅरी तसला म्हणजे गे असल्याचे एका मित्राकडून कळाले. मला मोठा धक्का बसला. परंतु त्याचे ऑफिसातील वागणे चारचौघासारखे होते. त्यामुळे चिंता न करण्याचे आम्ही ठरविले.
आमची सुरुवात थोडी अडखळत झाली. काही सुरुवातीचे जॉब अबेंड (अयशस्वी) झाले. परंतु आम्ही त्यातील समस्या सोडवून पुढे मार्गक्रमणा सुरु ठेवली. मग IMS माहितीभांडार रूपांतरण करण्याची वेळ आली. कोट्यावधी रेकॉर्ड असलेले हे माहितीभांडार. ज्यावेळी त्याचे रूपांतरण करण्याचा क्षण येतो तेव्हा भलेभले तणावाखाली येतात. तुम्ही भले आधी कितीही परीक्षण केले असो, प्रोडक्शन ते प्रोडक्शन! तिथे डेटाच्या असंख्य शक्यता (combination) असतात. त्यातील काही जर परीक्षणात समाविष्ट झाल्या नसतील तर बोंब लागली म्हणून समजाच! अशा सगळ्या वाईट विचारांना बाजूला सारून आम्ही देवाचे नाव घेत हे जॉब सुरु करण्याची सूचना दिली. जसजसे हे जॉब व्यवस्थित धावू लागले तसतसा आमचा जीव भांड्यात पडला. हे जॉब एकूण अडीच तीन तास चालले. जॉब चालू असताना आम्ही काही फारसे करू शकणार नव्हतो. मध्ये पिझ्झा येवून गेला. आमच्या मोठ्या डायरेक्टर बाईचे रात्री दोन वाजता आगमन झाले. एकंदरीत काम व्यवस्थित चालल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पहाटे चारच्या सुमारास दुसऱ्या फळीचे आगमन झाले. त्यांना माहिती हस्तांतरित करून आम्ही निघालो. मला गॅरीने घरी सोडण्याची तयारी दर्शविली. काहीशा धाकधुकीतच मी त्याच्या गाडीत बसलो. त्याने सुखरूपपणे घरी सोडल्यावर मी देवाचे आभार मानले.
बाकी मग अंमलबजावणी यशस्वी झाली. सर्वत्र आमचे कौतुक वगैरे झाले.
०५ साली मी न्यू जर्सीला एका भाड्याने कार देणाऱ्या कंपनीच्या संगणक विभागात दाखल झालो. बाकी काम तसे ठीक होते. अचानक एका निवांत संध्याकाळी विविध रेंटल स्टेशनच्या उत्पन्नाचे शहर, जिल्हा, विभाग ह्यानुसार वर्गीकरण करून माहिती साठविणारा डेटाबेस करप्ट झाल्याची चिन्हे दिसू लागली. ऑनलाईन आणि बेच (हे नीट टाईप होत नाहीय) अशा दोन्ही प्रोसेस आचके देऊ लागल्या. हा उत्पन्न नोंद ठेवण्याचा डेटाबेस असल्याने ही नक्कीच आणीबाणीची वेळ होती. आम्ही सर्व एकत्र येऊन नक्की कोठे प्रश्न निर्माण झाला असावा ह्याचे विश्लेषण करू लागलो. अशा विश्लेषणात ही स्थिती टेस्ट रिजन मध्ये निर्माण करता येणे ही मोठी बाब असते. आमचा अमेरिकन व्यवस्थापक देखील आमच्या मागे येवून आम्ही काय करतो आहोत हे पाहू लागला. दुर्दैवाने आमचे सर्व अंदाज चुकत होते . त्या डेटाबेसमध्ये ही माहिती रात्रीच अपडेट होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे कंपनीचा VP सुद्धा येवून बसला. तो मुळचा इंग्लिश. परंतु गेले वीस वर्षे अमेरिकेत ह्या कंपनीत होता. आणि सुरुवातीच्या दिवसात त्याने ह्या आज्ञावलीवर काम केले होते. त्यामुळे तोसुद्धा आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन आम्हाला विविध प्रोग्रॅम उघडायला सांगू लागला. ह्या प्रोग्रॅमच्या ह्या पराग्राफमध्ये बघा वगैरे वगैरे. दुर्दैवाने ते ही उपयोगी पडत नव्हते. बाकी इंग्लिश आणि अमेरिकन लोकांचे संबंध सलोखा, जिव्हाळा ह्या सर्व संज्ञांना कोसभर दूर ठेवणारे. त्यामुळे आमचा व्यवस्थापक आणि हा VP ह्यांचे एकमेकाला चिमटे काढीतच होते. शेवटी मग एक मोठा कॉल झाला आणि बेच प्रोसेस तशीच पुढे दामटवायचा निर्णय घेण्यात आला. मध्येमध्ये जॉब अबेंड करीत होता पण शेवटी आम्ही सकाळपर्यंत ती प्रोसेस संपविली. आता डेटाबेस अधिकच भ्रष्ट झाला होता आणि पुढील काही दिवस, आठवडे तो सुधारेपर्यंत देशभरातून येणाऱ्या चौकशीसत्राला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होते. आणि झालेही तसेच! आणि हो रात्री अकराच्या सुमारास मागवलेला पिझ्झा खाण्याची सुद्धा फारशी इच्छा आम्हाला झाली नव्हती.
ह्याच कंपनीत रेंटल स्टेशनचे नंबर साठवणारा एक डेटाबेस होता. त्याची व्याख्या काहीशी चुकीची केली गेल्यामुळे तो एका वेळी मर्यादित नंबर साठवू ठेवू शकत असे. त्यामुळे दरवर्षी आम्ही न वापरात असलेले नंबर आणि त्यासंबंधीची माहिती उडवून टाकून तो नंबर नवीन ठिकाणच्या रेंटल स्टेशनला देत असू. हा नंबर खरोखरच वापरात नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करीत असू. परंतु कधीतरी गोंधळ व्हायचाच! ही माहिती उडविण्याची प्रक्रिया संध्याकाळी ज्यावेळी डेटाबेस थोडी शांतता अनुभवत असेल अशा वेळी अमलात आणली जायची. अशाच एका डिसेंबर महिन्यातील थंडीच्या दिवशी आम्ही ही प्रक्रिया संध्याकाळी सहाच्या सुमारास चालू केली. सुरुवातीला सारे काही आलबेल होते. सर्व काही नियोजनानुसार चालले होते. त्यामुळे आम्ही आठ वाजायच्या सुमारास घरी परतलो. सर्व रस्ते बर्फाच्छादित होते. पण नंतर मग अबेंड यायला सुरुवात झाली. अर्ध्या तासातच आम्हाला कळून चुकले की उडविलेल्या स्टेशनपैकी एक स्टेशन खास उपयोगातील होते. त्याचा बिसनेस काही वेगळ्या कारणासाठी उपयोग करायचे. हे उडविल्यामुळे बराच गोंधळ माजला. आम्ही आपापल्या गाड्या घेवून आठ मैलावरील ऑफिसात परतण्याचा निर्णय घेतला. शून्याखालील तापमानात रात्री दहा वाजता घराबाहेर पडणे हा नक्कीच आनंददायी अनुभव नव्हता. आणि गाडी जोरात पळविली तर जागोजागी दिसणाऱ्या पोलिसांचा धाक वाटत होता. ऑफिसात पोहोचल्यावर त्या स्टेशनला परत डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे उत्तर फारसे कठीण नसल्याचे जाणविले. तरीही ते उत्तर अंमलात आणण्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागल्या. त्या परवानग्या घेवून, त्या स्टेशनला समाविष्ट करून सर्व काही आलबेल होण्याची खात्री करेपर्यंत सकाळचे चार वाजले होते. यशस्वी होवून सकाळी घरी परतण्याचा आनंद काही औरच होता. मग दुसऱ्या दिवशी हे स्टेशन उडविण्याची ज्याने परवानगी दिली होती त्याचा आमच्या व्यवस्थापकाने व्यवस्थित समाचार घेतला!
अशा ह्या काही गमती जंमती! आपणास आवडल्या असाव्यात ही आशा !
No comments:
Post a Comment