प्रस्तावना
ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल.
भाग १
सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा.
काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची.
सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही.
वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले.
पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते.
नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली.
वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते.
लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले.
असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता.
दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता.
सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता.
सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता.
भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता.
भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.
इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.
कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.
सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच!
नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता.
मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती.
मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता!
भौमिक आणि कच पूर्णपणे गोंधळून गेले होते आज्ञावली आता पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणापलीकडे गेली होती. कोण्या अज्ञात व्यक्तीने त्यावर नियंत्रण मिळविले होते आणि कच आणि भौमिक ह्यांचा ह्या आज्ञावलीतील प्रवेश बंद करून टाकला होता. इथे नासा आणि बोस ह्यांची बैठक जोरात चालू होती. ह्या दोन्ही मनुष्य सदृश्य जीवसमूहांचे पुढे काय करायचे ह्याविषयी ह्या बैठकीत एकमत होत नव्हते. बहुसंख्य लोकांचे मत होते की त्यांना सद्यपरिस्थितीप्रमाणे राहू द्यावे. परंतु ही बातमी आतापर्यंत बाहेरील बड्या कंपन्याच्या वरच्या वर्तुळात पोहोचली होती. त्यातील पर्यंटन आणि वैद्यकीय कंपन्यांना ह्या ग्रहाविषयी आणि इथल्या सजीवाविषयी व्यावसायिक आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी ह्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही लोकांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. ही फितूर मंडळी मानवाने ह्या ग्रहावर आधिपत्य गाजवावे ह्या विचाराचा पुरस्कार करीत होती.
मिहिर मात्र आपल्या प्रयोगात अधिकाधिक अचूकता आणण्याच्या मागे लागला होता. निलोतम्माचा स्वभाव आपल्याला समजलेल्या विदिशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने बनविला खरा पण खरी मेख त्यातच होती. विदिशाचा स्वभाव त्याला पूर्णपणे त्याला कळला थोडाच होता आणि आजूबाजूच्या घटकांचे काय? त्यामुळे त्याने अजून एक धाडशी निर्णय घेतला आणि ह्या दोन पात्रांव्यतिरिक्त अजून काही पात्रे आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे त्याने ठरविले.
पर्वतराजीत बसलेल्या कचने आनंदाने एक उडी मारली. अथक प्रयत्नानंतर त्याला पुन्हा आज्ञावलीत प्रवेश करता आला होता. आपल्या आज्ञावलीचे पूर्ण बदलेले रूप पाहून तो थक्क झाला. वेताळांचे नियंत्रण करणारा आज्ञावलीचा भाग कच आणि भौमिक ह्यांच्या पलीकडचा होता. तिथे प्रवेश केल्यास वेताळ आपले स्वत्व गमावून बसेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा भाग नियंत्रित करतो तरी कोण असा प्रश्न एकदा वैतागून कचाने भौमिकला केला होता. वेताळापेक्षा वेगळी अशी अतिवयस्क व्यक्ती जी प्रयोगशाळेच्या आतल्या कक्षात बसून असते ती भाग नियंत्रित करते अशी वदंता होती. परंतु ह्या वयस्क व्यक्तीला सद्य वेताळापैकी कोणी पाहिले नव्हते.
बोस आणि नासा ह्यांच्या बैठकीत नेमका तोच मुद्दा चर्चिला जात होता. ह्या वसाहतीचा कर्ता करविता कोण. सह्याद्रीतील वैज्ञानिकांचे लक्ष राहून राहून दोनशे वर्षांपूर्वी अंतराळात गायब झालेल्या यानाकडे जात होते. त्यात निरंजन नावाचा अतिबुद्धिमान वैज्ञानिक अंतराळात गायब झाला होता. पुढे एक दोन वर्षे हे यान चर्चेत राहिले पण नंतर सर्वजण त्याला विसरून गेले होते. आता अचानक त्या यानाचा संभाव्य मार्ग तपासून पाहिला जावू लागला.