Saturday, February 2, 2013

सुमेर ग्रह भाग ३


वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते.
लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले.
असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता.
दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता.

No comments:

Post a Comment