Tuesday, February 12, 2013

सुमेर ग्रह भाग पाच

 
भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.


इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.

कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.

सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच!

No comments:

Post a Comment