निरंजन आता एकदम थबकून गेला होता. आपल्या मेंदूतील विचारप्रक्रियेवर कोणीतरी नियंत्रण करू पाहत आहे हे त्याला पूर्णपणे जाणवत होते. त्या शक्तीशी करण्याचा त्याचे अंतर्मन आटोकाट प्रयत्न करीत होते. परंतु सध्यातरी त्याचा मेंदू त्या शक्तीने ताब्यात घेतला होता. आता निरंजन-१ कार्यान्वित झाला होता.
निरंजन-१ ने पृथ्वीवरील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला. सर्वप्रथम फटका बसला तो दूरसंवेदन उपग्रह सेवेला. ती ठप्प करण्यात आली. त्यानंतर इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. मिहिर, बोस आणि नासाचे सर्व तंत्रज्ञ थक्क होवून हा खेळ पाहत होते. आतापर्यंत अशा घटना केवळ हॉलीवूडच्या सिनेमात पाहण्याचीच सर्वांना सवय होती. निरंजन-१ च्या मेंदूत लक्षावधी प्रतिमा अफाट वेगाने फिरवल्या जात होत्या. आता भूतलावरील प्रतिमांचा रोख भारताकडे वळला होता. अचानक ह्या लक्षावधी प्रतिमेतील एका प्रतिमेकडे पाहून निरंजन-१ अडखळला. विदिशाच्या गावातील पुरातन वाड्यात तिच्या पूर्वजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक प्रतिमा निरंजनचीच होती. निरंजन-१ च्या ह्या एका दुबळ्या क्षणाचा मूळ निरंजनने फायदा उठवत आपल्या मेंदूवर पुन्हा कब्जा मिळविला. आता निरंजन-० कार्यान्वित झाला होता. अचानक दूरसंवेदन उपग्रह आणि इंटरनेट सेवा सुरु होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. निरंजन-० ने मिहिर, बोस, कच ह्यांच्या मेंदूत आपली ज्ञानसंपदा घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला. आपले हे स्वत्व किती काळ टिकणार ह्याची त्याला शास्वती नव्हती. त्याचा हा अंदाज खरा ठरला. निरंजन-१ काही सेकंदातच पुन्हा कार्यान्वित झाला होता. परंतु निरंजन-० ने आपले काम अंशतः पार पाडले होते. आपल्या मेंदूतील बुद्धिमत्तेचा काही भाग intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित करण्यात त्याने यश मिळविले होते.
निरंजन-१ पुन्हा आता सर्व ठप्प करण्याच्या मागे लागला होता परंतु ह्यावेळी त्यापुढे आव्हान होते ते intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित झालेल्या निरंजन-० च्या बुद्धिमत्तेचे. त्यामुळे निरंजन-१ काहीसा गोंधळून गेला. त्याचवेळी मिहिरने ह्या सर्व घडामोडींची कल्पना बोस आणि वरिष्ठ अधिकार्यांना दिली. आणीबाणीच्या वेळी कार्यान्वित करण्यात येणारी यंत्रणा चालू करण्यात आली. अतिमहत्त्वाचे संगणक माहितीमाया जाळापासून वेगळे करण्यात आले आणि त्यात फक्त १-२ व्यक्तींना शिरकाव करता येईल अशी सोय करण्यात आली.
इथे आपल्याला मिळालेल्या अधिक बुद्धिमत्तेवर कच खुश झाला होता. पण त्याला एकंदरीत परिस्थितीची कल्पना नव्हती त्याचे लक्ष निलोतम्मावरच होते. आपल्या मिळालेल्या ह्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो निलोतम्माला आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करू लागला होता. इथे मिहिरच्या डोक्यात सुद्धा असलेच विचार चालले होते. सामक आणि निलोतम्माला उपग्रहात बसवून पृथ्वीवर आणण्याचा त्याचा मानस होता. ह्या सर्वात बोस एकच वस्तुनिष्ठ विचार करणारे होते. निरंजन-० ची बुद्धिमत्ता त्यांच्यात आल्याने त्यांनाही सर्व पात्रांची ओळख झाली होती. त्यांच्याकडे सर्वात जास्त अधिकार असल्याने शेवटी सामक, नीलोतम्मा, कच ह्यांना सुमेर ग्रहाजवळ गेलेल्या उपग्रहात जवळजवळ कोंबण्यात आले. आणि ह्या उपग्रहाचा परतीचा प्रवास सुरु झाला. ह्या उपग्रहाने सुमेर ग्रहाजवळ पोहोचण्यात बरीच वर्षे लावली होती. परंतु आपल्या नंव्याने प्राप्त झालेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बोस आणि मिहिर ह्यांनी हा परतीचा प्रवास केवळ एका दिवसात होईल अशी तजवीज केली होती. ह्या उपग्रहाचे पृथ्वीवर आगमन अगदी गुप्त ठेवण्यात आले होते.
No comments:
Post a Comment