बोरिवलीमध्ये शब्द ह्या पुस्तकालयात सवलतीच्या दरात पुस्तकविक्री सुरु आहे म्हणून कुतूहलाने गेलो. रविवार संध्याकाळ आणि सवलतीच्या दरात पुस्तके ह्याचा परिणाम म्हणून माझ्यासारखे अनेकजण तिथं आले होते. ज्या प्रकाशनाची पुस्तके सवलतीच्या दरात होती ती काही मला झेपली नाहीत. अपवाद फक्त सावरकरांच्या दोन पुस्तकांचा 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने' आणि '१८५७ चे स्वातंत्र्यसमर'. ही पुस्तके निवडून मग मी मोर्चा इतर पुस्तकांकडे वळविला. मीना प्रभू ह्याच्या प्रवासवर्णनाची 'मेक्सिकोपर्व', 'माझे लंडन', 'चीनी माती', दक्षिण रंग', 'इजीप्तायन' ही पाच पुस्तके मला खुणावू लागली. तिही मी उचलली. माझा मित्र दर्शन वर्तक ह्याने मीना प्रभू ह्यांच्या पुस्तकांचे परीक्षण केले होते त्याची ह्या निमित्ताने आठवण झाली. तसेच मग इंदिरा संत ह्याच्या मृद्गंध ह्या पुस्तकाने लक्ष वेधले. तेही उचलले. माझी ही पुस्तक खरेदी पाहून मुलाने देखील सापाचे आणि बाकी गोष्टींची पुस्तके घेतली.
अचानक माझे लक्ष अच्युत गोडबोले ह्यांच्या मुसाफिर ह्या पुस्तकाने वेधले. अच्युत गोडबोले ह्यांनी बर्याच काळापासून मला प्रभावित केले आहे. १९९८ साली सिंटेल मध्ये मी प्रवेश केला त्याच्या आसपास त्यांनी ही कंपनी प्रमुख अधिकारी पदावरून सोडली होती. एका मराठी माणसाने ह्या कंपनीत इतके मोठे पद भूषवावे ह्याचा मला त्यावेळी खूप अभिमान वाटला होता. त्यानंतर त्यांची भेट लोकसत्तेतील लेखामधून होत राहिली. प्रत्येक वेळी त्यांनी मला अधिकाधिक प्रभावित केले. सगळ्या पुस्तन्काची किंमत २००० च्या आसपास झाली. मॉलच्या रविवारीच्या लगेच विसरता येण्याजोग्या एका भेटीचा सरासरी खर्च. परंतु ह्याच पैशात किती अमुल्य ठेवा खरीदला होता मी.
रात्री हे पुस्तक चाळण्यास सुरुवात केली. अच्युत गोडबोले ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतके बहुविध रंग वाचून मी थक्क झालो. पुस्तकाच्या प्रस्तावनेत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. सोलापूरचे वर्णन, आयआयटी मधील बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या कारवाया, भीमसेन जोशी सारख्या मान्यवर कलावंताबरोबरचे अनुभव, सामाजिक चळवळीत त्यांचे झोकून देणे, काहीसा भ्रमनिरास झाल्यावर परत व्यावसायिक जगतात प्रवेश आणि मग तेथून घेतलेली गगनभरारी. हे पुस्तक फक्त वरवर चाळून इतके थक्क व्हायला होते. देवाने एकाच माणसाच्या अंगी इतकी गुणवत्ता द्यावी जी एका जन्मात वापरणे कठीण जावे? बुद्धिमत्तेचे पण बघा कसे असते, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती माणसाला धोपटमार्गाने जावू देते पण त्याच्यापलीकडील बुद्धिमत्ता माणसाच्या अंगात तुफान निर्माण करते. असा माणूस कोणती क्षेत्र पालथी घालील त्याचा त्या माणसाला देखील अंदाज नसतो. असेच काही अच्युत गोडबोले ह्यांच्या बाबतीत म्हणता येईल. खंत एकाच गोष्टीची, आपण / आपला देश अशा गुणी माणसांचा काहीच उपयोग करून घेत नाही. अरे रस्त्यावर पोस्टर लावायची तर अशा लोकांची लावा जी नव्या पिढिला आदर्श दाखवतील!
असो, ह्या पुस्तकाला मान्यवरांनी ज्या प्रस्तावना दिल्या आहेत त्याही वाचण्याजोग्या आहेत. त्यावर मी काही भर घालू शकणार नाही. फक्त पुस्तकातील एक लक्षात राहिलेला क्षण. व्यावसायिक क्षेत्रात पुनरागमन केल्यावर गोडबोले ह्यांच्या वैयक्तिक जीवनात कठीण प्रसंग येतो, बचतही जवळपास शून्य आणि व्यावसायिक जीवनावरही काही प्रभुत्व नाही, अशा क्षणी सामान्य माणूस डगमगून गेला असता परंतु गोडबोले ह्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुस्तकवाचनाचा झपाटा लावला, तंत्रज्ञानावरील असंख्य पुस्तके वाचून काढली आणि अल्पावधीत त्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळविले. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. जर कोणी निराश झाले असेल त्यांनी हा भाग जरूर वाचवा. एकूणच नक्की वाचण्याजोगे पुस्तक! Must Read!
No comments:
Post a Comment