Sunday, February 3, 2013

सुमेर ग्रह भाग ४



सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता.
सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता.
भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता.

No comments:

Post a Comment