माझे स्वतःचे माझ्याविषयी मत काय असतं? प्रत्येक क्षणाला हे मत निर्माण होत असत आणि बदलत राहते. ह्या स्वतःविषयीच्या माझ्या मताबरोबर अजून काही भावनांचा कल्लोळ मनात चालू असतो. मी दररोज काही उद्दिष्ट ठरवून दिवस सुरु करतो. काही वैयक्तिक तर काही व्यावसायिक. काही परम महत्वाची तर काही कमी महत्वाची. जसजसा दिवस पुढे जातो तसतसा माझा त्या दिवसांच्या भावनांचा रंग काहीसा ठरविला जातो, महत्वाची कामे झाल्यास मी खुश होत जातो. आता ह्या खुशीच्या क्षणी मी काहीसा बेफिकीर होऊन बाकीची कर्तव्य विसरू शकतो किंवा एकदम जोरात येवून बाकीची कामे आटोपण्याचा धडाका लावू शकतो. आता महत्वाची कामे झाल्यास माझे बाह्य स्वरूप आतल्या माझ्यावर खुश असतो. मी स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो.
दुनियेला माझे फक्त बाह्य रूप दिसते. माझे हे बाह्य रूप माझ्या बोलण्या चालण्यातून, लिहिण्यातून प्रकट होत असते. पण माझ्या अंतर्रुपापर्यंत पोहोचण्याची फक्त मलाच संधी मिळते. माझे हे अंतर्रुप मी कितपत ओळखले ह्याचा मला कधीच थांगपत्ता लागू शकत नाही. तसा ह्या गोष्टीवर फार कमीवेळा मी विचार करतो.
ह्या अंतर्रुपात आनंद, दुःख, प्रेम, क्रोध, मत्सर, लोभ अशा अनेक भावना गोंधळ घालीत असतात. एकंदरीत माणसाच्या अंतर्रुपात जी भावना दीर्घकाळ वास्तव्य करून राहते त्यानुसार त्याचा स्वभाव बाह्यजगत ठरविते. माझ्या बाह्यरुपाचा जगाशी जो संवाद होतो त्यानुसार हे बाह्यरूप माझ्या अंतर्रूपाशी संवाद साधते. ह्या संवादानुसार वर उल्लेखलेल्या भावनेतील एखादी भावना उचल खाते. आता ही भावना किती काळ टिकते हे एकतर बाह्यरूपाने पाठविलेल्या दुसर्या संदेशावर ठरते किंवा माझ्या मनःशक्तीवर! मला त्रासदायक ठरणारी भावना लवकरात लवकर घालविण्यासाठी एकतर मी अनुकूल वातावरणात जाणे आवश्यक असते किंवा माझ्या मनःशक्तीला आव्हान करणे आवश्यक असते.
माझ्या बाह्यरूपाला खुश करण्यासाठी मी चमचमीत अन्न घेतो, वातानुकुलीत खोलीत झोपतो, दूरदर्शन पाहतो, समाजात मिसळतो. परंतु आपण आपल्या ह्या अंतर्मनाची फार कमी वेळा काळजी घेतो, त्याचे लाड करतो. अंतर्रूपाला खुश करण्यासाठी फार कमी मार्ग असतात. हल्ली शास्त्रीय संगीत ऐकल्यावर कुठेतरी अंतर्मन शांत झाल्यासारखे वाटते. शनिवारी रात्री अंधारात केवळ श्रवणेद्रियांना जागृत ठेवून हे शास्त्रीय संगीत ऐकावे, सुब्बलक्ष्मी, भीमसेन ऐकावेत. राम मराठे ह्यांचे मंदारमाला नाटकातील जयोस्तुते उषा देवते ऐकावे. प्रत्येकाचे अंतर्मनाला खुश करण्याचे मार्ग वेगळे. कोणाला जंगल खोऱ्यात जायला आवडते. प्रत्येकाने आपला मार्ग ओळखावा आणि त्या मार्गाने प्रवास करावा.
हे अंतर्मन जरूर पडेल तेव्हा तुमची सर्वोत्तम क्षमता बाहेर काढू शकते. त्यावेळी ते तुमच्या बाह्यमनाला आदेश देते की बाबारे आता सर्वोत्तम कामगिरीची गरज आहे. मेंदू, शरीर एका तन्मय स्थितीत जाते. आपली ही सर्वोत्तम स्थिती अंतर्मन लक्षात ठेवून देते आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ह्या स्थितीत तत्काळ नेण्यास मदत करते.
No comments:
Post a Comment