नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता.
मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती.
मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता!
No comments:
Post a Comment