Wednesday, February 27, 2013

समुद्रकिनारा


निसर्गातील काही ठिकाणे माणसाला कधी नतमस्तक बनवितात तर कधी भावूक. नित्य जीवनात कधी आपणास गर्व झाला असेल अथवा कधी आपण अगदी निराश / दुःखी झालो असू तर ही ठिकाणे आपणास आपल्या ह्या भावनांचा योग्य असल्यास क्षुल्लकपणा दाखवितात तर कधी ह्या भावनांच्या खरोखरीच्या गहनतेतून बाहेर निघण्यास मदत करतात. उंच पर्वतावरून घेतलेले पृथ्वीचे मनोहर दर्शन, दाट जंगलात केलेली पायवाट, एखाद्या गावाच्या छोट्या घरातून चांदण्या रात्री केलेले चंद्राशी, चांदण्यांशी मनोगत अशी ही अनेक ठिकाणे आहेत. आजचा हा विषय आहे सागरकिनारा!
समुद्र आणि मनुष्याचा संबंध लहानपणी येतो. आता हे विधान समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना बहुतांशी लागू होते. वाळूचे किल्ले बनविणे, भरतीच्या वेळी आपल्या मागे पुढे करणाऱ्या लाटांशी खेळणे ह्यात मनमुराद आनंद लुटणे ह्या वाक्याचा प्रत्यय येतो. माझ्या एका मित्राच्या भाषेत बोलायचे तर य मजा येते. घराभोवती खेळतांना सुद्धा तसे थोडेफार निर्बंध असतात ह्यातील बरेचसे सागरकिनारी लागू होत नाहीत. ह्यातील मुख्य म्हणजे पडण्याची भिती. वाळूत पडणे हा देखील एक सुखद अनुभव असतो. ओल्या वाळूचा पायाला होणारा सुखद स्पर्श सुखाची एक लहर मनाच्या त्या बिंदूपर्यंत घेऊन जातो.
बालपण हळूहळू संपते. परीक्षारूपी सैतान आपले जीवन व्यापून टाकतो. परीक्षेच्या आदल्या संध्याकाळी शांत समुद्रकिनारी बसून आपल्या मनाच्या अभ्यासू कोपऱ्याशी संवाद साधल्यास फार बरे वाटते. ही अशी मोठी परीक्षा आटोपल्यावर हा समुद्रकिनारा पुन्हा आपणास वेगळा भासतो. आपल्याला धीर दिल्याबद्दल त्याचे आभार मानायची अनावर इच्छा मनात होते.
प्रेमात पडलेल्यांचा तर हा समुद्रकिनारा एक मोठा आधार असतो. डूबत्या सूर्याच्या लालसर सोनेरी किरणांच्या साक्षीने हातात हात घेवून ज्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या त्यांच्यासारखे सुदैवी तेच. कवीजनांना तर हा समुद्रकिनारा आणि डुबता सूर्य कायमच प्रेरणा देतो.
कोणाच्या आयुष्यात दुर्दैवी प्रसंग येऊन जवळची व्यक्ती सोडून गेली असल्यास हा किनारा त्या व्यक्तीच्या आठवणीचा चलतचित्रपट डोळ्यासमोर उभा करतो. त्या व्यक्तीच्या प्रतिमा त्या भावुक वातावरणात डोळ्यासमोर उभ्या राहतात.
तरुणपणात आपल्या भवितव्याच्या सर्व चिंता आपण ह्या सागराशी शेअर करतो. आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी ह्या समुद्रकिनारी क्रिकेट खेळतात.
परदेशीचा समुद्रकिनारा सुरुवातीला थोडा अनोळखी भासतो. परंतु एकदा का त्याची आणि आपली नाळ जुळली की सर्व बंध तुटून पडतात. आपल्या तोकड्या भौगोलिक ज्ञानाच्या जोरावर हे पाणी कुठेतरी लांबवर जावून वसईच्या किनाऱ्याशी पोहचत असेल असा विचार आल्याशिवाय राहत नाही. आणि मग आठवतात ते सावरकर आणि त्यांची ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता!
ह्या समुद्रकिनाऱ्याची एकच दुःखद आठवण! ९२ साली महाविद्यालयीन सहल केळवे येथे गेली होती. दुपारपर्यंत सुंदर फलंदाजी करणारा ललित भोजनानंतर माझ्या मनगटावर आपले घड्याळ बांधून पोहायला गेला तो कायमचाच! हा ललित आणि रात्रभर समुद्रकिनारी बसून त्याची वाट पाहणारा नारायण, कायमचेच स्मरणात राहतील!
असा हा आपला सखा  सागरकिनारा!

 

No comments:

Post a Comment