कोणत्याही दोन व्यक्ती, समाज, राष्ट्र ह्यांचा एकमेकात संवाद, क्रिया - प्रतिक्रिया सुरु असतात. बहुदा ह्यातील एक घटक हा दुसऱ्या घटकापेक्षा सामर्थ्यवान असतो. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर तो दुसऱ्या घटकाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवावयास पाहतो. ह्या दोघांतील संबंधांच्या प्राथमिक पातळीत सामर्थ्यवान घटक आपल्या शक्तीचे थेट प्रदर्शन करतो आणि कमकुवत घटकास आपणास हवे तसे करण्यास भाग पाडतो. परंतु असा संबंध दीर्घकाळ टिकण्यास बऱ्याच अडचणी येतात. कमकुवत घटकाच्या मनात निर्माण होणारा असंतोष आणि त्याचे वाढणारे बळ ह्या दोन मुख्य अडचणी होत. मग सामर्थ्यवान घटक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या तत्वाचा वापर करू पाहतो. कमकुवत घटकाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे अशा प्रकारे नियंत्रण करावे की त्याने आपल्यास हवे तसे वागावे हे धोरण स्वीकारले जाते. ह्यामध्ये कमकुवत घटकाच्या वागणुकीवर सतत नियंत्रण ठेवणारी यंत्रणा उभारली जाते. ही वागणूक नियंत्रणापलीकडे गेल्यास लगेच धोक्याचा संदेश निर्माण केला जातो आणि बलवान घटक प्रत्यक्ष कृती करतो.
ह्याची व्यवहारात उदाहरणे द्यायची झाली तर हुकुमशाही राजवट ज्यात नागरिकांच्या वर्तनावर बिग ब्रदर लक्ष ठेवून असतो. मीना प्रभूंच्या चीनी माती ह्या पुस्तकात काही काळापूर्वीच्या आणि काही प्रमाणात आताच्याही चीनमधील नागरिकांच्या ह्या स्थितीचे वर्णन आहे. स्थानिक माफिया जे सर्व सामान्य लोकांच्या वागणुकीवर लक्ष ठेवतात.
आता आपण बालक पालक ह्या नात्याकडे वळूया. पूर्वीच्या पिढीत पालक ठोकशाही, हुकुमशाही तत्वाचा वापर करायचे. आजचे काही पालक त्यावेळी बालक ह्या नात्यात असल्याने त्यांना हे असेच तत्व वापरायचे असे वाटणे साहजिक आहे. परंतु काळ बदलल्याने पालकांनी अदृश्य शक्ती तत्वाचा वापर करणे आवश्यक आहे. घरातील परिस्थितीला असे नियंत्रित करा की बालक आपल्याला हवे तसे वागेल. ह्यात बरीच वैचारिक गुंतवणूक आणि स्वयंशिस्तीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पालकांनी स्वतःच्या वागणुकीद्वारे बालकांचे formatting (जडणघडण) करणे हा ही एक उपाय असू शकतो.
ह्यातही एक मेख आहेच हल्लीची बालक पिढी भावनिक दृष्ट्या बरीच पुढे गेली आहे त्यामुळे काही काळात त्यांना ह्या तत्वाचा उलगडा होईल. आणि मग ह्या तत्वाचा वापर आपल्यावर केला जाईल.
हे तत्व अमलात आणण्यासाठी पालकत्व हे सर्वात प्राथमिक पातळीवरचे नाते आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवरील अनेक नात्यांत हे तत्व अमलात आणले जावू शकते. पण त्याच्या समीकरणाची क्लिष्टता मात्र वाढत जाते.
No comments:
Post a Comment