चेनच्या अकस्मात गायब होण्याने आलोक काहीसा उदास झाला होता. पूर्ण सकाळ त्याने चेनचा शोध घेण्यात घालविली. डायनाला त्याच्या ह्या चेनबद्दलच्या आपुलकीचे गूढ काही समजत नव्हते. दुपारी प्रथमच डायनाने भारतीय पद्धतीचे भोजन बनविले होते. छोले भटुरे आणि वेज बिर्याणी असा बेत होता. ह्या जेवणाने मात्र किमया साधली. आलोकचा मूड बराच सुधारला. जेवणानंतर दोघेही नौकाविहारासाठी बाजूच्या सरोवरात गेले. आजूबाजूच्या गर्द झाडीने वातावरणात आल्हाददायक गारवा आणला होता. बराच प्रयत्न करूनसुद्धा सूर्यकिरणे सरोवरापर्यंत पोहचू शकत नव्हती. पांढऱ्या शुभ्र बदकांची रांग निळ्याशार पाण्यात पोहत होती. ह्या परिस्थितीसाठी योग्य गाणे कोणते हे शोधण्याचा आलोकचा प्रयत्न डायनाने ओळखला. अचानक तिच्या तोंडून आलेले 'ये हसीं वादिया, ये खुला आसमान, आ गये तुम कहा ये मेरे साजना' हे गाणे ऐकून आलोक थक्क झाला. त्याने तिच्याकडे पाहून एक स्मित हास्य केले. आता मात्र डायनाच्याने राहवेना, ती आलोकच्या जवळ सरकली आणि तिने त्याचा हात हाती घेतला. सर्व बंधने गळून पडण्याची ही सुरुवात होती. पुढे दोन तीन महिने मोठ्या आनंदात त्या दोघांनी घालविले.
.
.
.
.
.
.
माधुरीच्या हाकेने आलोक खडबडून जागा झाला. त्याला क्षणभर काही कळेनासे झाले. तो आपल्या मुंबईच्या घरी होता. सकाळची धावपळ घरात सुरु होती. 'आज दांडी मारायचा विचार दिसतोय' अखिल मराठी समाजातील बायका जितक्या प्रेमाने आपल्या पतीदेवांशी बोलू शकतील तितक्या प्रेमाने माधुरी आलोकशी बोलत होती. आलोकने थोड्या बेताने घ्यायचे ठरविले. 'हो आज डोकं, सणकून दुखतंय जरा!' तो म्हणाला. भिंतीला कान लावून आलोकच्या बोलण्याकडे लक्ष देणाऱ्या सुनंदाबाई ताडकन आत शिरल्या. 'थांब, बामने तुझं डोकं चांगले चोळून देते' एकंदर परिस्थितीचा कब्जा घेत त्या म्हणाल्या. आपल्या नवऱ्याचे हे बालपण संपणार तरी केव्हा असा विचार करीत माधुरीने आपली सकाळची आवाराआवर चालू ठेवली. 'सुट्टी घेणारच असशील तर मिहिरकडे जरा लक्ष ठेव! उनाडक्या करतोय नुसता! ह्या वाक्यातील तुझ्यासारखा हा शेवटचा शब्द माधुरीने मोठ्या प्रयासाने आवरला.
माधुरी ऑफिसला गेल्यावर आलोकने मिहिरला त्याच्या मित्रांच्या ताब्यात सोडले. एव्हाना सकाळचे ११ वाजून गेले होते. आलोकने वतर्मानपत्रावर नजर टाकली. चीनच्या सरहद्दीवरील एका ठाण्यावर रोबोंनी धुमाकूळ घातल्याची बातमी होती. त्यातील मुख्य रोबो रात्री काही काळ गायब झाला होता आणि मग परत आल्यावर त्याने उलटेसुलटे आदेश देण्यास सुरवात केली होती. एकदम हादरून आलोकने संगणक सुरु केला. जीमेलवर त्याने डायनाच्या नावाने धुंडाळले. बाईसाहेब ऑनलाईन होत्याच. आलोक तिला पिंग करणार इतक्यात समोरून तिनेच पिंग केले. 'हलो आलोक'. 'हाय डायना' आलोक उत्तरला. 'आठवते का सारे तुला?' डायनाने विचारले. 'हो, काहीच समजत नाहीये, घडले सारे ते खरे कि खोटे' आलोक उत्तरला. डायना काहीच उत्तरत नाहीय हे पाहून तो पुढे म्हणाला 'हे असे काही घडले ह्यावर आपण दोघे सोडून कोणीच विश्वास ठेवणार नाही, काहीच पुरावा नाही आपल्याजवळ'. शेवटी डायना उत्तरली 'पुरावा आहे आलोक, मी प्रेग्नंट आहे!'
तिच्या ह्या उत्तराने निरंजन आणि आलोक ह्यातील कोण जास्त थरथरले हे कोणीच सांगू शकत नव्हते!
...................................................
समाप्त!