आलोकने आपल्या मार्गात एक बदल केला होता. दिल्लीला जाण्याऐवजी थेट लखनौला जायचे त्याने ठरविले होते. इतक्यात फोनची घंटा खणखणली. डायनाबाई लवकर जाग्या झाल्या होत्या. इतके दिवस आपण गुगल ग्लासला कसे विसरलो ह्याबद्दल तिने आलोकचे चांगलेच बौद्धिक घेतले (धन्यवाद विकास!). आता आलोकवर नव्याने एक दुकान फोडण्याची जबाबदारी आली. आलोकने पहिली संधी मिळताच ती पार पाडली सुद्धा आणि मग ते दोन (हो प्रत्येक गोष्टीचा back-up प्लान बनवायची एव्हाना अलोकला सवयच झाली होती) गुगल ग्लास घेवून आलोक पुन्हा गाडीत बसला. त्या दोघा गुगल ग्लासांना आलोकने पूर्ण मार्गाच्या माहितीने परिपूर्ण केले सुद्धा! दुपारी साधारणतः दीडच्या सुमारास आलोक लखन्नौला पोहोचला सुद्धा. सात तासात त्याने ९०० किमी अंतर पार केले होते. आपल्या गाडीतील संपलेल्या पाण्याच्या बाटल्या फेकून देवून आलोकने नवीन पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. दुपारच्या वेळी हलका आहार घेण्याच्या त्याच्या नियमानुसार त्याने काही बिस्किटे, फळे ह्यावरच आपली भूक भागविली. विजेच्या अभावामुळे हळूहळू मॉलची अवकळा होवू लागली होती.
आलोकने तासभर गाडीतच डुलकी घेतली. त्या झोपेने ताजातवाना होवून आलोक पुन्हा पुढच्या मार्गाला निघू लागला. अचानक त्याचे लक्ष 'अखिल भारतीय विज्ञान प्रदर्शना' च्या लावलेल्या बोर्डाकडे गेले. पुढच्या प्रवासात बघूया काही उपयोगी पडणाऱ्या वस्तू दिसतात का असा विचार करीत आलोकने आपली गाडी तिथे वळविली. अचानक त्याचे लक्ष wi - fi सिग्नल कडे गेले. तो पूर्णपणे विझला होता. त्याचा मोबाईलही नेटवर्क दाखवीत नव्हता. तशाच गंभीर मनःस्थितीत आलोक विज्ञान प्रदर्शनात शिरला. फिरता फिरता त्याचे लक्ष सौरउर्जेवर चालणाऱ्या मोटारविभागाकडे गेले. मग अर्ध्या तासातच आलोक सौरउर्जेवर चालणारी इनोवा घेवून निघाला. त्यात १५०० किमी अंतर जावू शकेल इतका चार्ज होता. आलोक मग आपला संगणक उघडला. संपूर्ण नेटवर्क डाऊन होत असल्याचा त्यात संदेश होता. म्हणजे आता पुढील सर्व मार्ग आलोकला डायनाच्या मार्गदर्शनाशिवाय काढायचा होता.
पुढचे लक्ष होते काठमांडू! अंतर होते जवळजवळ साडे चारशे किमी! परंतु आता पूर्ण सपाटीचा रस्ता संपला होता. आलोकच्या सारथ्यकौशल्याची आता खरी कसोटी होती! एकंदरीत पुढच्या सर्वच प्रवासात त्याच्या शरीराच्या प्रतिकारशक्तीची, मनोबलाची कसोटी लागणार होती. पुढे होता तो अनोळखी प्रदेश, मनुष्याच्या अनुपस्थितीने हा प्रदेश कशी रूपे बदलतो. गाडी कशी साथ देते, खायला प्यायला काय मिळते अशा अनेक घटकांवर आलोकचे भविष्य अवलंबून होते.
No comments:
Post a Comment