ह्या लेखमालिकेतील दुसरया भागाचा शेवट ह्या क्षेत्रात पाच सहा वर्षे काढलेल्या एका पारंपारिक मनोवृत्तीच्या भारतीय व्यावसायिकाच्या उदाहरणाने केला होता. ह्या व्यावसायिकास विविध कारणांमुळे आज्ञावली लिहिणे नकोसे होऊ लागते. ह्या सर्व प्रकारात ज्या प्रकारची प्रोजेक्ट तुमची कंपनी घेत असते हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो. समजा कंपनीकडे बहुतांशी प्रोजेक्ट अशी आहेत ज्यात अनुभवी , आज्ञावलीतील खाचाखोचा माहित असलेल्या लोकांची गरज नाही, तर मग साहजिकपणे त्या कंपनीच्या दृष्टीने अनुभवी माणसांचे महत्व कमी होते. एकंदरीत चाणाक्ष व्यावसायिक ह्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मग वेगळे पर्याय निवडतो. ह्यात नवीन येणाऱ्या प्रोजेक्टसाठी प्रपोजल लिहिणे, ऑडीट / सेल्स टीम मध्ये सहभागी होणे, किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये डीलीव्हरी मनेजर होऊन बसणे ह्या प्रकारांचा समावेश होतो. आता खरी मेख अशी आहे की वरील उल्लेखलेल्या भूमिकांमध्ये चपलख बसण्याचे गुण काही माणसांत निसर्गतःच असतात. ती माणसे ह्या भूमिकांत आनंदी राहतात परंतु काहीजण असे असतात ज्यांनी लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त काही केले नसते आणि ह्या व्यवसायातसुद्धा आज्ञावली लिहिणे हे सुद्धा एक अभ्यासाचेच व्यापक रूप आहे. अशा लोकांना वरील भूमिका निभावणे कठीण होऊ लागते. केवळ मेहनतीच्या जोरावर ह्या भूमिकांतील यशाच्या व्याख्या काबीज करणे त्यांना कठीण जाते आणि मग त्यांची ह्या भूमिकांमध्ये कुतरओढ होत राहते.
एकंदरीत हे सर्व मुद्दे मांडण्याचा हेतू असा की आतापर्यंतचे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले यश आपणास काहीसे आपसूक मिळाले आहे. ह्यात कंपन्या आणि व्यावसायिक हे दोन्ही आनंदी आहेत. परंतु आता ह्या अनुभवी मनुष्यबळाची योग्य काळजी घेणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे. हा प्रश्न पाहिले तर अजून गंभीर होत जाणार. आज मोठ्या कंपनीमध्ये जवळपास दोन लाख व्यावसायिक आहेत. दहा वर्षांनी ह्या सर्वांना व्यवस्थापक पदे मिळणे शक्य नाही. त्यामुळे जमेल तितक्या व्यावसायिकांनी खोलवर ज्ञान मिळविणे अत्यावश्यक आहे. हे क्षेत्र तसे कठोर आहे. इथे २० : ८० नियम लागू होतो. वीस टक्के लोक ८० टक्के महत्वाचे काम करतात आणि बहुदा ह्या लोकांनाच खुश ठेवले जाते. अजून एक गोष्ट, ह्या क्षेत्रात सतत कामगिरी उंचाविण्याचे तुमच्यावर दडपण असते. त्यामुळे बढती मिळून जर तुम्ही वरच्या जागी गेलात आणि दुर्देवाने तिथले काम जमले नाही तर तुम्हांला बहुदा बाहेरचे दार दाखविले जाते.
ह्यात अजून एक पर्याय उपलब्ध आहे. साधारणतः १५ - २० वर्षे ह्या क्षेत्रात नोकरी केल्यावर दुसर्या एखाद्या तुलनात्मक दृष्ट्या शांत क्षेत्राची निवड करणे. तितकी प्रगल्भता आपण जोपासणे आवश्यक आहे.
असो एकंदरीत ही लेखमालिका इथेच आटोपती घेतोय. ह्या लेखाचा मुख्य रोख मोठी स्वप्ने बाळगून ह्या क्षेत्रात शिरणाऱ्या नवीन पिढीकडे आहे. हे क्षेत्र अजूनही फायदेशीर आहे परंतु सरधोपटपणे सर्वांना यश मिळण्याचा काळ मागे पडला आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या क्षमतेचे, गुणवत्तेचे व्यवस्थित मूल्यमापन करून ह्या क्षेत्रातील आपले करीअर नियीजन करणे अत्यावश्यक बनले आहे.
समाप्त
No comments:
Post a Comment