डायनाने सकाळी उठून लॉर्डसवर क्रिकेट सामना पाहण्याचे ठरविले होते. सकाळी पाच वाजताच उजाडत असल्याने तिची झोप काहीशी खंडित झाली होती. अशा प्रसन्न सकाळी तिने एक फेरफटका मारायचे ठरविले. फेरफटका मारताना नेहमी दिसणारी माणसे न दिसल्याने तिला काहीसे चुकचुकल्या सारखे झाले. परंतु सकाळचे प्रसन्न वातावरण तिला त्या विचारावर जास्त लक्ष देण्यापासून परावृत्त करीत होते.
आलोक धावत धावत परत आपल्या घरात आला आणि त्याने केबल टीव्ही सुरु केला. बातम्यांच्या सर्व वाहिन्या ठप्प झाल्या होत्या. मग त्याने चित्रपटांच्या वाहिन्यांकडे मोर्चा वळविला तिथे मात्र चित्रपट चालू होते. त्यामुळे त्याला थोडा दिलासा मिळाला. परंतु त्याच्या संशयी डोक्याने पुन्हा उचल खाल्ली. अरे हे तर थेट प्रक्षेपण नाहीये. ही सर्व माणसे जिवंत असल्याचा पुरावा कुठाय? मग तो धावपळीने संगणकाच्या दिशेने पळाला. संगणकावर पुन्हा तेच, एकही मित्र कुठेच ऑनलाईन नव्हता . वर्तमानपत्राच्या इंटरनेट स्थळांवर सुद्धा शेवटचा अपडेट पाच तासापूर्वीच दाखविला जात होता. आता मात्र आलोकचा मेंदू पूर्ण सक्रिय झाला होता. त्याला आता एका जिवंत माणसाच्या अस्तित्वाच्या पुराव्याची आवश्यकता निकडीने भासू लागली होती. पण भुकेच्या जाणीवेने त्याचे लक्ष विचलित होत होते. बायकोच्या कटकटीकडे लक्ष देवून किमान चहा तरी बनविण्याचे शिकलो असतो तर बरे झाले असते असे त्याला वाटून गेले. परंतु आता इलाज नव्हता. मग त्याने खाली उतरण्याचे ठरविले. बऱ्याच दिवसाने त्याने आपली कार बाहेर काढली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे चहाच्या सर्व टपऱ्या (हो २१३४ मध्ये मुंबई कितीही बदलली असली तरी चहाच्या टपऱ्या मुंबईकरांच्या चहाप्रेमामुळे शाबूत होत्या. ) बंदच होत्या. मग त्याला एक मेरवान बेकरी दिसली. ह्यातील सुंदरपणे मांडून ठेवलेल्या केक, पेस्ट्रीकडे त्याने कितीवेळा पाहिले होते परंतु वेळ नसल्याने त्याने कधी तिथे आपला मोर्चा वळविला नव्हता. आज मात्र तसे पाहिले तर त्याच्याकडे वेळचवेळ होता. तो गाडी पार्क करून उतरला. गाडी पार्क करताना मोठ्या आशेने त्याने गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क केली. एखाद्या भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने आपल्या गाडीला बघून थांबावे अशी वेडी आशा त्यामागे होती. मेरवानच्या दाराशी येवून त्याच्या काचेतून त्याने एका चविष्ट दिसणाऱ्या केकची निवड केली. हाच केक आपण विकत घेवूया असा त्याने विचार केला. मग त्यातील विकत ह्या शब्दावर तो थबकला. दरवाज्यावर येवून तो थांबला. दरवाजा तर लॉक होता. आतापर्यंत आलोकचा मेंदू ह्या स्थितीला सरावला होता त्याने शांतपणे आपल्या गाडीकडे परत जावून आपली हत्याराची पिशवी आणली आणि एका फटक्याने दरवाजा तोडला. सर्व सुरक्षा भोंगे एकदम वाजू लागले. अलोक मोठ्या आशेने सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाट पाहू लागला जसे की चित्रपटात येणाऱ्या ! परंतु ते काही येणार नाहीत हे तो पक्के जाणून होता. मग शांतपणे आपल्याला हवे ते केक खात तो आपल्या मनात येणाऱ्या विचारांच्या थैमानाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होता.
No comments:
Post a Comment